फिलिप
फिलिप.. दिसायला अगदीच ओंगळवाणा, दाढीचे खुंट वाढलेले, राबलेले - पिवळसर दात, केसांना वर्षभर जणू तेल- पाणी लागलंच नसावं, अंगात मळलेला- मेणचट झालेला टी.शर्ट आणि हाफ पँट, पोटाची ढेरी सुटलेला, असेल पाच फूट उंचीचा, पायात झिजलेल्या स्लीपर्स, जवळ जवळ तीस- बत्तीस वर्षं वयाचा. फिलीपला दोन मोठे भाऊ आणि एक बहीण तर फिलिप शेंडेफळ. आईवडील लहानपणीच दुर्धर आजारात गेलेले. फिलिप लहानपणी खेळता खेळता घराजवळच्या पाण्याच्या हौदामधे पडला आणि जवळ जवळ दोन तीन मिनिटं पाण्यातच गटांगळ्या खात राहिला. या दोन तीन मिनिटांत त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही आणि म्हणून त्याचा मेंदू कमजोरच राहिला. वयानुसार शरीर वाढू लागलं पण मेंदूची प्रगती मात्र होत नव्हती. त्यात त्याला सांभाळायला, सावरायला, शिकवायला घरात कुणाही जवळ वेळ आणि इच्छाशक्ती या दोन्हीही नसल्यामुळे फिलिपच्या बुद्धीची वाढ मात्र व्यवस्थित होऊ शकली नाही. हळूहळू घरातील सर्वांनीच फिलिपकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलं आणि फिलिपचं रुपांतर एखाद्या बेवारस भटक्या जनावरासारखं गलिच्छ झालं. त्याची भाषा लोकांना समजेनाशी झाली. कंटाळून मग मोठ्या भावंडांनी त्याला मारझोड करायला सुरूवात केली. कॉलेजमध्ये जाणाऱ्या बहिणीला फिलिपच्या ओंगळवाण्या रूपाची लाज वाटू लागली आणि फिलिपचं आयुष्य अजूनच दयनीय झालं.
बघता बघता फिलिपने वयाची तिशी ओलांडली. तसं तो हळूहळू घरची सर्वच वरकामं करु लागला. मजुरासारखं राबवून घेतल्यानंतरच तो चार घास खाऊ शकत होता नं. इथे फुकट कोणीही कोणालाही पोसायला तयार नसतं.
रोज दुपारी दुधाच्या बाटल्यांनी भरलेल्या पिशव्या खांद्यावर घेऊन तो घरोघरी जाऊन दूध पोहोचवू लागला. आमचं सकाळचं कॉलेज आटोपून दुपारी दोन वाजता आम्ही घरी पोहोचण्याची आणि फिलिप दूध देण्यासाठी येण्याची एकच वेळ असायची. निलांबरीच्या घरी तो रोज दूध देण्यासाठी यायचा. निलांबरीच्या आजीचा त्याच्यावर विशेष ओढा कारण, त्याची परिस्थिती ठाऊक असल्यामुळे ती त्याला कधी पोळी - भाजी तर कधी आपल्या बागेतली केळी खायला बसवायची. नीलांबरी समोर दिसताच मात्र तो मनापासून हसायचा. आपल्या भाषेत "काय गो.. कॉलेजातून आलीस" असं तो न चुकता नेहमीच म्हणायचा.
अनाथ- मेहनती पोर म्हणून आजीचा त्याच्यावर विशेष जीव पण, अनाथ असला तरीही तरुण पोरगा.. कसा भरवसा ठेवणार ? म्हणून नीलांबरीची आई मात्र नेहमीच आजीवर कुरकुर करायची. कधी कधी भर रस्त्यात "काय गो.. नीलांबरी, कॉलेजातून आलीस ? म्हणून निलांबरीच्या नावाचा घोषा करायचा म्हणून निलांबरीसुद्धा फिलिपवर नाराजच असायची. "आजी, तू त्याला इथं थारा देऊ नकोस. भर रस्त्यात हाका मारत सुटतो, मागेच लागतो आणि मग इतर मैत्रिणी मला चिडवतात" म्हणून नीलांबरीसुद्धा फिलिपवर नाराज व्हायची. आजी मात्र "अगं, कोण कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. सत्कर्म कधी वाया जात नाहीत. गरिब- बापुडं पोर ते !! काय करणार आहे तुम्हाला ? असं नेहमीच म्हणायची.
दिवस सरत होते. आमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. आम्हा मैत्रिणींना नोकऱ्या लागल्या तरीही आमच्या भेटीगाठी मात्र सुरूच होत्या. एकमेकींच्या घरी जाणं येणं आमचं सुरूच होतं. त्यात नीलांबरीचं घर अगदीच गावठाण भागात, रहदारीपासून दूर, घराशेजारीच केळ्यांची बाग. नोकरीच्या दगदगीतून थकल्यावर मनाला विरंगुळा म्हणून तिचं घर आमच्यासाठी एखाद्या पिकनिक स्पॉटपेक्षा कमी नव्हतं. त्या दरम्यान फिलिप आमच्या नजरेसमोर येतच होता. दरम्यान फिलीपला डायबेटीसही झालं पण, तरीही घरोघरी दूध पोहोचवण्याचं काम मात्र तो नियमित करतच होता. त्याशिवाय त्याच्या पोटाला चार घास मिळणं अशक्य झालं असतं. आता तो आमच्या बरोबर बऱ्यापैकी बोलायचा. त्याच्या मेंदूचा विकास नक्की कितपत झालाय, तो नात्यांना, माणसांना कितपत समजू शकतोय, त्याच्या मनात आमच्याबद्दल किंवा एकुणच आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल काय भावना आहेत.. हे मात्र नीट समजत नव्हतं पण चिडलेल्या निलांबरीला अजूनच चिडवणं हे मात्र तो अजुनही करायचा. नीलांबरीकडे त्याचं विशेष लक्ष. तो नक्की तिच्या सोबत कोणत्या भावनेने बोलतो हे मात्र समजत नसायचं कारण, त्याच्या वागण्यात वावगं असं कधीही जाणवत नव्हतं पण नीलांबरी मात्र त्याच्यावर नेहमीच भडकायची. ती भडकल्यावर "काय गो.. अशी भडकतेस का माझ्यावर" ? असं तो नेहमीच हसत हसत म्हणायचा आणि मुळात ती कितीही चिडत असली तरीही निलांबरीचा राग मात्र त्याला कधीही नाही यायचा.
वर्ष सरली आणि हळू हळू आम्हा सर्व मैत्रिणींची लग्न झाली आणि आमच्या भेटीगाठी कमी झाल्या. नीलांबरीसुद्धा लग्नानंतर बेंगळूरला स्थिरस्थावर झाली. नोकरीत व्यस्त म्हणून मग पुढच्या चार पाच वर्षांत तिचं मुंबईत येणंच होईना म्हणून तिच्या घरचेच तिला भेटण्यासाठी अगदी दर पाच सहा महिन्यांनी तिच्या बँगलोरच्या घरी जाऊ लागले. भेटीगाठी सतत होत राहिल्याने काही प्रश्नच नव्हता.
पण, एक दिवस निलांबरीला घरच्यांना सरप्राईज द्यावं म्हणून मुंबईत यावं असं वाटलं म्हणून कुणालाही न कळवताच ती चार दिवसांसाठी म्हणून मुंबईला यायला निघाली. निलांबरी रात्री अडीच वाजता मुंबई एअरपोर्टवर उतरली आणि टॅक्सीने घरी येण्यासाठी निघाली पण घरापासून दूरपर्यंत रस्ता खोदून ठेवल्यामुळे टॅक्सी घरापर्यंत पोहोचणं शक्य नसल्यामुळे ती बाहेरच उतरली. रस्त्यावर मिट्ट अंधार. टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन बॅग हातात घेऊन ती चालू लागली पण तिला आपल्या मागून कुणी तरी चालतंय अशी चाहूल लागली. तिने रागानेच मागे वळून पाहिलं. तो टॅक्सीवालाच होता. एखादा प्रवासी टॅक्सीतून उतरल्यानंतर टॅक्सी बाजूला पार्क करून त्या प्रवाशाच्या मागे चालत जाणं हे तसं विचित्रच पण अंधार असल्यामुळे आणि आपण एकटेच असल्यामुळे काही बोलणं तसं अयोग्यच ठरलं असतं म्हणून एकदाचं घर गाठायचं या विचाराने ती झपझप पावलं उचलू लागली. घरातल्यांना कळवून आलो असतो तर आज अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसतं, सरप्राईज देण्याच्या नादात आपण खूप मोठी चूक करून बसलोय याचा तिला पश्चात्ताप झाला. तिला दरदरून घाम सुटला आणि इतक्यात तिला मागून जोरात एक हाक ऐकू आली,"काय गो.. नीलांबरी, माहेरी आलीस"? आवाज फिलिपचा होता म्हणून तिने आशेने मागे वळून पाहिले. हो तो फिलिपच होता. फिलीपला पाहताच तिच्या जीवात जीव आला आणि आयुष्यात पहिल्यांदाच आनंदही. फिलीपला पाहताच तो टॅक्सीवालाही जरा घाबरूनच परत फिरला. निलांबरीला घराजवळ सोडल्यानंतर फिलिपसुद्धा आल्या पावली परत निघून गेला. नीलांबरीने मात्र घरात शिरताच आईला आणि आजीला घट्ट मिठीच मारली आणि अश्रुंना वाट मोकळी करुन दिली आणि तिने टॅक्सीवाल्याची घटना सगळ्यांना सांगितली आणि परत कधीही अशा रीतीने सरप्राईज न देण्याचं प्रॉमिसही केलं. लेकीचे लाड करून आईबाबा आणि आजीने तिला झोपायला पिटाळलं.
दुसऱ्या दिवशी आई आणि आजी तिला फिलिपच्या घरी त्याचे आभार मानण्यासाठी घेऊन गेल्या पण, फिलिपच्या बहिणीने सांगितलेली कहाणी ऐकताच नीलांबरीच्या पायाखालची जमीनच सरकली. फिलिप डायबेटीसमुळे आजारी होता, त्यात घरात काळजी घेणारा कोणीही नसल्यामुळे आणि उपचारांअभावी तो सर्वांना सोडून देवाघरी गेला होता. आजी आणि आईला तर हे ठाऊक होते पण नीलांबरीसमोर हे व्यवस्थित यावे म्हणून त्या तिला फिलिपच्या घरी घेऊन आल्या होत्या. निलांबरीला आठवले आजी नेहमीच म्हणायची, "अगं,सत्कर्म कधी वाया जात नाही" फिलिपच्या बहिणीनेच मग निलांबरीला सांगितलं की, "तो तुला मोठी कॉलेजवाली दिदी असं संबोधायचा". फिलिप आपल्याला बहीण मानत होतो आणि आपण मात्र त्याच्याकडे संशयाने पाहायचो. त्याच्या ओंगळवाण्या व्यक्तिमत्त्वाचा तिरस्कारच करायचो. आपण किती चुकलो होतो याचा निलांबरीला पश्चात्ताप झाला.. निलांबरीवर फिलिपचा विशेष जीव होता आणि मेल्यानंतरही तो निलांबरीला तिच्या संकटाच्या वेळी मदत करण्यासाठी आला होता.. खरच !! तो फिलिपच असेल का ??
आपण चेहरा आणि कपड्यांवरून एखाद्याबाबत आडाखे बांधतो पण ज्यांना आपण वाईट समजत असतो अनेकदा त्यांच्या मनात आपलं स्थान मात्र निर्मळ असतं आणि तेच लोक कधी तरी आपल्याला वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदत करतात. मदत.. पण अशा तऱ्हेने ??
©® सौ. आशा आशिष चव्हाण...
No comments:
Post a Comment