सीता भवन - Marathi Story - Part 2
आवाज..स्वतःच म्हणणं मांडण्यासाठी निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात सुंदर देणगी ! अवघी दुःखे, निराशा, व्यथा-वेदना, विवंचना केवळ एखाद्या गीताच्या सुरेल लकेरीने नाहीशा होतात. ओंकाराचा मंगल ध्वनी नवी ऊर्जा प्रदान करतो. लहान मुलांचे बोबडे बोल सर्व चिंता विसरायला लावतात...
...पण...प्रत्येक आवाज दिलासा देणारा असतो का ? नक्कीच नाही !
सीता भवनच्या खालच्या मजल्यावर तसलाच आवाज सीताक्काच्या कानावर येत होता. काहीतरी खसपसत होतं. करवादत होतं. विव्हळत होतं. त्या आवाजातली वेदना, आक्रोश कुणाच्या तरी कानी जावा अशी त्या पीडिताची (किंवा आणखी जे काही असेल त्याची) इच्छा दिसत होती.
तो आक्रोश खरा होता ? की ते मायाजाल निर्माण केलं होतं..स्वतःपर्यंत सावज खेचून आणण्यासाठी त्याने आवाजाचे ते आमिष दाखवलं होतं ?
मेंदूतून बाहेर पडणाऱ्या त्या प्रतिक्रियेची नोंद घेण्याचे भान सीताक्काला राहिले नाही. उत्सुकतेने तिच्या विवेकावर मात केली. अंथरुणावरून ती धडपडत उठली. विस्कळीत झालेली साडी ठिकठाक करून तिने पायात चपला अडकवल्या. आवाज न येऊ देता, हळुवारपणे दार उघडून ती जिन्यावरून खाली येऊ लागली. कितीही प्रयत्न केला तरी वेडीवाकडी पावले पडल्याने तिच्या चपलांचा आवाज जिन्याच्या त्या अरुंद पोकळीत घुमत होता..
एक एक करीत तिने त्या मजल्यावरच्या सर्व खोल्यांचा कानोसा घेतला. आपल्या वास्तव्याने त्या निर्जीव वास्तूत चैतन्य खेळवणारे जीव बेपत्ता झाल्याचा शोक करीत असल्यागत त्या खोल्या मौन होत्या. त्यांना बाहेरून लावलेली कुलुपे तशीच होती. कुठे, कसलाही आवाज नव्हता. त्याचा अर्थ स्पष्ट होता...
सीताक्काला भास झाला होता !
उत्सुकता नैराश्यात बदलल्याने सीताक्का जड पावले टाकत पुन्हा वरच्या मजल्याकडे जाण्यासाठी वळली. पाचसहा पायऱ्या चढली असेल-नसेल तोच पुन्हा कुणीतरी खसपसल. यावेळी तो आवाज काहीसा स्पष्ट होता.
शेजारी बसून कानाला तोंड लावून काहीतरी रहस्य सांगावं तशी ती कुजबुज होती. ते जे कोणी होते, त्यांच्यात आणि आपल्यात फार अंतर नाही हे सीताक्काला कळून चुकले.
फक्त एक झडप घालण्याचा उशीर .....
सीताक्का मटकन खाली बसली. आश्चर्य म्हणजे त्या मरणाच्या भीतीवेळीही तिची उत्सुकता कायम होती. तिचे कान त्या कुजबुजीतला शब्द न शब्द टिपून घेत होते. बालिश आवाजात ती बडबड चालली होती.
ए दादा, कसं बनवलं ना त्या आज्जीला !
नको रे, मला नाही आवडत म्हाताऱ्या लोकांना त्रास द्यायला !
अरे, आपण कुठे त्रास दिला ? गंमत तर केली.
ह्या..म्हणे गंमत केली. ती वरून येतांना जिन्यात पडली असती तर...तुलाच पाप घडलं असतं आणि आईने चांगला ठोकून काढला असता !
दादा, पण आई कुठे गेली रे..आणि बाबांचाही पत्ता नाही. हवं तर मारू दे तिला मला, पण तू शोध ना आईबाबांना !
काही वेळ मुसमुसण्याच्या आवाजांनी ती पोकळी भरून गेली.
ए चल, आपण शोधुया परत आईबाबांना!
पण तू प्रॉमिस कर, पुन्हा आजसारखा त्रास देणार नाहीस कोणाला !
प्रॉमिस दादा..पण आईबाबाना लवकर शोधशील ना!
हो रे, चल आता...
ही कुठून जातील आता..वरून जायला तर जागाच नाही. ते दोन्ही आपल्याला ओलांडून जातील की पुरता निकाल लावून पुढे सरकतील ?
सीताक्काने डोळे बंद करून दोन्ही हातांनी कान गच्च दाबले...अशाने मृत्यूच्या वेदना फारशा जाणवत नाहीत हे त्यांचे शास्त्र होते.
पण वाटेतल्या सीताक्काकडे ढुंकूनही न पाहता त्या दोन लहानखुऱ्या, पांढुरक्या सावल्यांचे आकार हवेतून पुढे सरकले.
काही वेळाने सीताक्का भानावर आली. कानावरील घामेजलेले तळहात तिने पदराला खसाखसा पुसले. मोठा आवंढा गिळला. जिन्याचा कठडा धरून ती कणाकणाने शरीर वर खेचू लागली. तिथून फ्लॅटपर्यंतचे अंतर तिला कित्येक मैलाचे भासत होते.
आत्यंतिक जिकिरीने स्वतःच्या खोलीत पोहचून तिने स्वतःला अंथरुणावर लोटून दिले. अजूनही स्वतःच्या काळजाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती.
ते दोन आवाज...ते परके नाहीत. इथेच, अनेकदा ते आपल्या कानावर पडले आहेत. त्या आवाजांनी अनेकदा आपल्याला हाक घातली आहे. कोण..कोण बरे असावीत ती ?
दोन बोटांच्या चिमटीत सीताक्काने भिवयांचा मधला भाग पकडला, दाबला.
हो..आलं लक्षात ! ही सान्याची मुले...
साने..त्यातही मालती साने...तिची रसरशीत अंगकांती सहजच सीताक्काला आठवली. तिचा हसतमुख आणि मेहनती नवरा रमेश ! ही दोन मुले त्यांचीच नक्की..
बिचारे रमेश आणि मालती...सीताक्का भवनच्या चार नंबर ब्लॉकमधून एकाएकी नाहीसे झाले होते. मग पोरांना आईबापांची आठवण येणारच !
कशी कुढत होती दोघे ?
क्षणभराने सीताक्का शहारली.
ती मुले..ती तरी कुठे मानवी रुपात होती ? सरळ हवेत तरंगत होती की !
आपल्या डोक्यावरून हवेत पुढे सरकली. ना कुठला स्पर्श, ना अस्तित्वाची ठळक जाणीव....नुसत धूसर वलय आणि कुजबूज !
पण मग आपणच का ? त्यांचं अस्तित्व आपल्यालाच का जाणवावं ? ती अलिप्त राहून काहीतरी सांगण्याचा, समजावून देण्याचा प्रयत्न करीत होती हे निश्चित ! काय सांगितलं त्यांनी ?
आणि ते जेव्हा लक्षात आलं...
सीताक्काच्या कपाळावरची शीर थडथड उडू लागली. भीतीची थंडगार लहर तिच्या कानातून मेंदूपर्यंत सरसरत गेली.
साने पतिपत्नी आणि ती दोन्ही मुलेही या जगात नव्हती हे नक्की..पण आईबाप कुठे गेलेत हेही त्या निष्पाप जीवांना जीव जाईपर्यंत कळले नव्हते. मृत्यूनंतरही ती बालके आईबापाचा शोध घेत होती.
त्या उलगड्याने डोकं पार शिणले तेव्हा सीताक्काच्या पापण्यांवर झोप पेंगुळली..तोवर फटफटलं होतं.
गालावर काहीतरी ओलसर वळवळ जाणवली तशी सीताक्काची झोप चाळवली. कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर ओणव झाल्याचा भास होऊन ती ताड्कन उठून बसली.
(क्रमशः)
सीता भवन - Marathi Story - Part 1
सीता भवन-bhutachi gosht |