सुसाईड... वी.............
(काल्पनिक लघुकथा)
दुपारचे कडक ऊन उघड्या खिडकीतून तिच्या तोंडावर अगदी तीव्रतेने पडलं होतं....समोरच्या टेबलावर बसलेला कॉन्स्टेबल तिचा तो उन्हाने चमकणारा चेहरा आणि एकटक टेबलावर बघणारी नजर बघून ताडकन उठला आणि त्याने ती खिडकी बंद केली...जाता जाता मॅडम एवढं लक्ष देऊन काय वाचत आहेत ह्याकडे त्याकडे त्याने मान तिरपी करून बघितले....इंस्पेक्टर रुपाली एका फोटोकडे एकटक बघत होत्या....एका तरुणाचा फोटो होता तो....मुलगा तसा स्मार्ट होता....आणि खूप काही गुंतागुंतीची केस नव्हती....आत्महत्या होती ती....शहरापासून दूर एका विहिरीत त्याचे प्रेत तरंगताना 4 दिवसांपूर्वी आढळून आले....शरीरावर कसल्या मारहाणीच्या खुणा वैगेरे काहीच नव्हत्या शिवाय त्याच्या घरच्यांनीही कबूल केलं होतं की मागील काही दिवसांपासून अजित हा डिप्रेशन मध्ये होता....आपल्याच दुनियेत काहीतरी बडबडत रहायचा....एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ञाकडे त्याची ट्रिटमेंट सुरू होती.....त्याचा खून वैगेरे काही भानगड नव्हती कारण अजित तसा सरळमार्गी मुलगा होता.....घरच्यांचाही कुणावर संशय नव्हता त्यामुळे साहजिकच ही आत्महत्या होती साधी सरळ केस होती....कॉन्स्टेबलच्या कपाळावरच्या आठयांनी त्याची टोपी जराशी वर सरकली
"मनोरुग्ण पोरगा ह्यो...बायकांची छेड काढायचा...रेल्वेत मीच पकडलेला त्याला....बर झालं घाण गेली...पण मॅडम दोन दिवस झालं ह्याच केस मध्ये का डोकं घालून आहेत काही कळत नाही"
असा काहीसा विचार मनात आणून कॉन्स्टेबल आपल्या कामाला लागला...इकडे इंस्पेक्टर रुपाली मात्र अजूनही त्याच विचारात मग्न होती....वाऱ्याची हलकीची झुळूक तिच्या कानामागून डावीकडून उजवीकडे...उजवीकडून डावीकडे सतत वाहत होती....त्या हलक्याश्या मंद वाऱ्याच्या झुळुकी बरोबर रुपलीच्या डोळ्याच्या बाहुल्या देखील इकडे तिकडे होत होत्या...कुणीतरी काहीतरी महत्वाचं कानात सांगावं आणि आपण लक्ष देऊन ते ऐकावं असेच काहीसे हावभाव तिच्या चेहऱ्यावर होते
"का आत्महत्या केली असेल ह्याने??....किती छान भयकथा लिहत होता....मी नेहमी वाचत होते....अचानक अस काही करेल असं वाटलं नाही....चेहरा किती निरागस आणि स्वच्छ आहे....घरचे बोलतात की मानसिक त्रासाखाली होता....खर नाही वाटतं....लिखाण किती प्रगल्भ आणि समोर घडतंय अस वाटत होतं.....काहीच कळत नाही ह्याच्याबद्दल.....आणि आता ऐकू येणारा हा आवाज त्याचाच असेल का???.....हो ह्याचाच असेल....चेहरपट्टीला अगदी शोभून दिसतोय हा दबका आवाज....काहीतरी सांगत आहे की मला भास होत आहेत....एकदा जाऊन बघतेच तिथे"
रुपालीने आपली बाईक काढली.....आत्महत्या केलेल्या अजितच्या विचारात तिच्या डोक्यातील चक्रे चालत होती....तिने त्या विहरीजवळ जाऊन अजितची बॉडी बाहेर काढली होती....एखादी अशी विहीर आपल्या शहरात आहे आणि ह्याची कुठेच चर्चा कशी नाही???विचारचक्र सुरू होतं सोबत बाईकची चक्रे सुद्धा वेग घेऊ लागली....रुपालीला कसलेच भान नव्हते....काहीतरी अजब घडत होते....आपण अजितचा इतका का विचार करतोय हेच तिला कळत नव्हतं....तिचं मन अगदी खंबीर होतं अनेक तुकडे होऊन पडलेले मृतदेह तिने पाहिले होते...एका दोघांना तर तिने स्वतः गोळ्या घातल्या होत्या पण ह्यावेळी त्या विहरीत तरंगणारा अजितचा मृतदेह बघून तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं.....दोन तीन दिवस तिला कसलेच भान नव्हतं....भर दिवसा रस्त्यावर विद्रुप रक्ताळलेले चेहरे तिच्याकडे रोखून बघत आहेत असच काहीसं तिला वाटू लागलं..ज्या मृतदेहांच्या केसेस तिने सोलव्ह केल्या होत्या तेच मृतदेह आजूबाजूला दिसत होते..त्या अजित सारखी आपली अवस्था होत आहे का??...छे..छे..अस काही नाही मी खंबीर आहे सगळ्या समस्यांना तोंड द्यायला.....अस मनात पक्कं करून तिची बाईक वेगाने शहराबाहेर जाऊ लागली.....ह्या सगळ्या विचारात तिने दोन ट्राफिक सिग्नल तोडले होते....काहीतरी हाती लागलंय ह्या आशेने ती एका क्लोज केस मागे परत लागली होती.....अखेर ती त्या विहिरीजवळ आली....आजूबाजूला भयाण शांतता.....न जाणो मानवी अस्तित्वापासून अगदीच लांब असलेली ही विहीर.....आजूबाजूला एकही मानवी अस्तित्वाची खूण नव्हती एखादा उडून आलेला प्लास्टिकचा तुकडा देखील इथे दिसत नव्हता.....स्वप्नांचा पाठलाग करत रुपाली परत तिसऱ्या वेळी ह्या इथे आली होती कालच रुपालीला हे स्वप्न पडलं होतं....तीच ही विहीर.....जुन्या पद्धतीची.....चंद्राचा उजेड होता विहिरी समोरच्या मैदानात अनेक जण तिच्याकडे बघत उभे होते पाठमोऱ्या अजित ने मान फिरवून तिच्याकडे बघितले आणि आपल्या हातातील कागदाची घडी घालून त्याने तो कागद एका दगडाखाली ठेवला आणि मागे न बघताच तो विहिरीच्या दिशेने जाऊ लागला....कठड्यावर उभं राहून त्याने विहिरीत उडी घेतली ....रुपाली डोळे विस्फारून बघत होती....काही क्षणाने अजित एखाद्या धुरासारखा त्या विहिरीतून वर आला आणि त्या गर्दी समोर उभा राहिला.. रुपालीला जाग आली होती.....आता भरदुपारी प्रत्यक्ष समोर तीच विहीर दिसत होती....रुपाली त्या विहिरीजवळ जाऊ लागली.....एक चपटा लांबीला जास्त असलेला दगड वाटेत पडला होता....स्वप्नात अजितने ह्याच दगडाखाली कसला तरी कागद ठेवला होता.....दगड तर मोठा दिसत होता....आकारावरून तरी एखाद्या धडधाकट पुरुषाला हालेल अस वाटत नव्हतं.....रुपालीने आजूबाजूला बघितलं...नजर जाईल तिथं फक्त मोकळं आणि तापलेलं मैदान दिसत होतं....रुपालीने एकदा त्या चपट्या लांबलचक दगडाकडे बघितले आणि तिने काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे असं ठरवून तो दगड सरकवण्याचा प्रयत्न केला....तो भलामोठा दगड तिच्या हलक्याश्या धक्क्याने बाजूला झाला....खाली एक कागद दिसत होता....काही सेकंदात ती दोन वेळा चकित झाली.....तिने तो कागद हातात घेतला.....आता तिने त्या दगडाला परत हात लावला आता मात्र तो दगड जराही जगाचा हलेना.......रुपालीने परत जोर लावला पण मगाशी सहज एका धक्क्याने हाललेला दगड आता मात्र त्या जमिनीचा एक भाग असल्यासारखा वजनदार झाला....हा तिसरा धक्का....स्वप्नात बघितलेला कागद...सहज हललेला आणि आता जड झालेला हा दगड....काहीतरी विलक्षण आणि विचित्र घडत होतं.....एक खळखळणारा आवाज रुपालीच्या कानावर पडला....हातातला कागद घेऊन ती त्या आवाजाच्या दिशेने त्या विहिरीजवळ पोहोचली......निळंशार खळाळनारं पाणी....एखाद्या समुद्रासारख्या लाटा त्या विहिरीत उसळत होत्या....विहिरीच्या दगडावर आपटून आवाज करत होत्या....शक्य नव्हतं हे.....हे अस उसळनारं पाणी म्हणजे एक चमत्कार होता.....वातावरण काहीसं बदलत होतं......पाणी अजूनही उसळत होतं.....अचानक उन्हाचा दाह कमी झाला होता.....त्या उसळणाऱ्या पाण्याचे बारीक थेंब हवेला थंड करत होते.....रुपाली मागे सरकली....तिला काहीसं जड जड वाटत होतं.....दोन वेगळ्या गोष्टीत मेंदू विभागला होता.....एक मन इथून जाण्यास सांगत होत तर एक मन इथेच थांबून अजित विषयी जाणून घेण्यासाठी विनवत होतं.....रुपालीने तो कागद समोर धरला....खूप काही लिहलं होतं....रुपाली बाजूच्या एका दगडावर बसली....तिने आजूबाजूला बघितले.....तिथे आधी काहीच नव्हते पण आता मात्र शेकडो चप्पलांचा खच दिसू लागला.....नव्या जुन्या बांधणीची अनेक चप्पल बूट दिसत होते काहीतरी वेगळेपण होत त्या जागेत सारखं बदलत होतं.....पण ह्या सगळ्या चमत्कारिक गोष्टीचे रुपालीला काहीच नवल वाटत नव्हते....तिला आता तो कागद वाचायचा होता तिने तो शुभ्र कागद हातात घेतला.....वरती अजित पाटील अस नाव लिहलं होत.....ही सुसाईड नोट असू शकते किंवा अजितच्या आंतरिक भावना....काहीही असू शकत....हा शुभ्र कागद त्याच्या मृत्यूचे गूढ उकलणार होता....रुपलीचे शब्द आता कागदावर फिरू लागले
"हा कागद कुणाला सापडेल की नाही काय सांगता येत नाही....पण त्या शक्य तितक्या ह्या जा...ग........पा...सु......दु.......लांब.....र.....हा.......
(एक दोन सुरवातीच्या लाईनी कागदावर दाबून लिहल्या सारख्या वाटत होत्या जणू कुणीतरी हे लिहण्यापासून अजितला रोखत होतं)
तो वेडावाकडा जबरदस्तीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करून रुपाली पुढे वाचू लागली
"प्रेमाचं भूत एकदा माणसाच्या डोक्यावर चढलं की सहसा उतरत नाही म्हणतात.....आणि मी तर ह्या प्रेमासाठी खऱ्या खुऱ्या भूतांनाच डोक्यात घेतले.....माझ्या डोक्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता किंवा मी विकृत नव्हतो.....मी फक्त ह्या भुतांचा गुलाम झालो होतो....ते सतत माझ्या डोक्याशी खेळ खेळत होते.....आपलं अस्तित्व मला दाखवत होते.....माझ्या आजूबाजूला फक्त हीच शक्ती होती....तेच माझ्या डोक्यात राहून बाहेरचं सगळं जग माझ्या डोळ्यांनी बघत होते.....ते कधी माझ्या डोक्यावर हावी झाले कळलंच नाही ते सगळं इथं आल्यापासून सुरू झालं.....ह्या पाण्याचा साठ्याचा उल्लेख मी करू शकत नाही कारण तो "वी" वरून येणारा शब्द लिहायला घेतला की माझे हात थरथरतात.....मी कुणाला इथल्या जागेबद्दल सांगू शकत नाही कारण माझ्या काहीच लक्षात नसतं.....एखाद्या सामान्य बुद्धीचा स्वमग्न मुलगा होतो मी...."होतो" च लिहायला पाहिजे कारण जेव्हा कुणी हे पत्र वाचत असेल तेव्हा मी इथे नसेन.....तर एक स्वमग्न असलेला मुलगा मी.....कधीही स्तुतीच्या पात्र नव्हतो....कुणी माझ्याबद्दल चांगलं बोलावं अस कधी वाटलंच नाही.....विरंगुळा म्हणून काहीतरी लिहायचो सोशल मीडियावर.....काल्पनिक विषयात भारीच रस होता....अगदी अशक्त हाडकुळा असलेला मी....माझ्या काल्पनिक जगात अगदी 100 जणांना भारी पडायचो.....काही भयकथा लिहू लागलो.....पण खरं सांगू का हा भयकथा विषय माझ्यासाठी खूपच डेंजर होता....पण लिहणे भाग होतं....तिला त्या भयकथा आवडायच्या.....ती माझी नियमित वाचक होती....खूप मस्त तारीफ करत होती.....तिचा प्रोफाइल फोटो कित्येकवेळा मी चोरून बघत होतो....आवडायची ती मला....त्यामुळे भयकथा ह्या विषयाचे भय वाटत असले तरी मी त्या लिहायचो.....कस आहे ना....इतरांचं माहीत नाही पण सतत निघेटिव्ह विचार केले तर काही प्रमाणात ते निघेटिव्ह विचार डोक्यावर हावी होतात.....मी ज्या भुतांची कथा लिहायचो ती इतक्या एकाग्रपणे लिहायचो की तर पात्र माझ्या आजूबाजूला वावरत आहे असं वाटायचं रात्री अचानक जाग आली की माझ्या कथेतील ती भुतं छतावर आपले लांबलचक दात विचकत माझ्याकडे बघत आहेत असा भास सतत व्हायचा कित्येक रात्री मी ह्यामुळेच जागून काढल्या.....वाचणाऱ्याला त्या थरारक वैगेरे वाटत असतील पण लिहणारा कमालीचा प्रभावित होतो.....तरी त्या फेसबुकवाली साठी मी लिहतच होतो....आता 23 वय म्हणजे काय ते हार्मोन्स बदल वैगेरे ते सगळं आलंच ना.....असच एक कथा लिहताना एक स्त्री पात्रावर मी एक कथा लिहली ...खूपच मादक वर्णन केलं होत मी तिचे.....वास्तविक अस बोल्ड लिहणे हा माझा प्रांत नव्हता पण ते लिखाण मी कस केलं माझं मलाच कळलं नाही....लोकांना खूपच आवडलं ते.....आणि तिलाही.....तिने तर प्रचंड तारीफ केली त्या कथेची.....मग काय मी हवेतच होतो.....ह्या स्त्री कथेमुळे कदाचित मी तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये ही जागा मिळवली होती....पुढे जाऊन मनात ही मिळवली असती......पण....पण.....तिने माझ्या डोक्याचा ताबा घेतला होता.....ती फेसबुकवाली नव्हती ती तीच होती एकदम सुंदर आणि मादक.....मी एक स्टोरी आठवण्यासाठी किमान 15 दिवस घेतो..कथेची सगळी जमवाजमव करायला 15 दिवस लागतातच....पण "वी" पासून तिथून जवळच असलेल्या हायवे वरून जाताना काही सेकंदात हे पात्र माझ्या डोक्यात आलं आणि 15 मिनिटात कथा पण तयार झाली.....सांगितलेली कथा लिहायला सोप्पी असते....त्या रात्री झोपेत तिनेच ही कथा मला सांगितली अगदी हातात हात घेऊन.....तिने आपलं नाव सारिका सांगितलं....एकदम सुंदर...तिच्या हाताचा थंडगार स्पर्श मला स्वप्नात असतानाही खरा वाटत होता.....मग सकाळी कॉलेज मधून आल्यानंतर मी लगेच ती कथा लिहायला घेतली तिने जशी सांगितली होती अगदी तशीच.....आणि तिचं मादक वर्णन माझ्याकडून कसं लिहल गेलं ते माझं मला कळलं नाही.....कथा तर लिहून झाली पोस्ट झाली....फेसबुकवालीला आवडली....माझं काम झालं होतं आणि कथेतील सारिकाचं सुद्धा....पण सारिका गेली नाही....ती माझ्या आसपास असायची....म्हणजे इतरांच्यासाठी अदृश्य....पण माझ्या कल्पनेतलं ते पात्र मला अगदी स्पष्ट दिसत होतं.....सकाळ पासून रात्री पर्यंत....सकाळी ती माझ्याबरोबर कॉलेज मध्ये यायची मला नजरेने खुनवायची....कधी घरी सोफ्यावर बसलो असताना आपला पदर पडून तिचे ते मादक चाळे चालूच असायचे.....मी तिला कथेत इतकं मादक दाखवलं होतं त्यामुळे तो तिचा गुणधर्म असल्या सारखीच ती होती.....हा भास नव्हताच....मी जेव्हा काल्पनिक कथा लिहायचो तेव्हा ती भयानक भुतं फक्त रात्रीच माझ्या आणि तेही स्वप्नात यायची पण हे प्रकरण काही वेगळचं होतं...सारिका अगदी माझ्याबरोबर फिरायची..आता मला पण ती आवडू लागली होती....एखादी प्रेयसीच आपल्या सोबत आहे असं काहीसं भासत होत....ती भले खरी नव्हती पण तो अनुभव मात्र सुखावणारा होता....तिचा तो थंडगार स्पर्श अंगावर शहारे आणणारा होता.....तिची ती मादक नजर बोलताना ओठांची नाजूक हालचाल मला आता आवडू लागलं होतं.....त्या काल्पनिक पात्रा बरोबर माझे संवाद होऊ लागले.....ती इतरांच्यासाठी नसली तरी माझ्यासाठी सर्व काही होती.....आता मित्रांत आणि घराच्यात माझ्या ह्या एकट्याने बोलण्याच्या चर्चा होऊ लागल्या.....बाबांनी तर मला दवाखान्यात सुद्धा नेलं....आईचे अंगारे वैगेरे सुरूच होते.....मित्र चिडवत होते....वेड लागलंय वैगेरे....वैगेरे....पण वेड लागण्यासारखीच होती ती......त्यांनीही तिला बघितलं असत तरी हेच बोलले असते.....असो....कल्पनेत रमणार्या माणसाची बौद्धिक पातळी त्यांना कशी कळणार???.....रात्र रात्र जागून काढली होती तिच्याशी बोलताना......प्रेम झालं होतं म्हणा ना.....कथेत जरी मी तिला चेटकीण दाखवलं असलं तरी आता ती माझ्यासाठी एक स्वप्नपरी होती.....लोकांच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष करतच होतो....साहजिक अभ्यासाकडेही दुर्लक्ष झाले.....तिच्यासोबत बोलणे हसणे सुरूच होते.....वास्तविक जगाच्या शब्दात सांगायचं झालं तर "वेडेचाळे".......
15 एक दिवस माझा हा नित्यक्रम सुरू होता.....आता मात्र सारिका कमीच दिसू लागली होती......15 दिवस अगदी तिने वेड लावलं होतं.....पण आता मात्र ती फक्त एकदाच सकाळी येऊन परत जायची....कुठे जायची काय माहित....शेवटी माझी कल्पना होती ती तिला आठवलं की परत दिसेल ह्या हेतूने मी डोक्यावर जबरदस्तीचा ताण द्यायचो पण ती काही केल्या येत नव्हती.....2 दिवस ती काही दिसली नाही तेव्हा मात्र माझी खूप चिडचिड झाली होती माझ्या खोलीतल्या अनेक वस्तू मी आपटून फोडून टाकल्या होत्या ....खूप आवडायची ती मला...तिसऱ्या दिवशी कॉलेजला जात असताना सारिका दिसली तिने मला लांबूनच पाहिलं आणि मागे फिरून ती चालू लागली....तिच्या मागे मी देखील चालू लागलो तिची ती लाल रंगाची शरीराला घट्ट गुंडाळलेली साडी तिची ती मादक चाल....ती अदा न्याहाळत मी किती किलोमीटर चाललो होतो हे माझं मलाच माहीत नव्हतं....बराच वेळ चाललो असेन कारण घड्याळाच्या वेळेत तब्बल 2 तास फरक दाखवत होता.....एका "वी"..................पाण्याच्या साठ्याजवळ ती उभी होती माझ्याकडे बघत तिने त्या कठड्यावर चढून पाण्यात उडी घेतली.....मी तसा धावतच गेलो त्या कठड्याला पकडून आत बघू लागलो.....सारिका पाण्यावर तरंगत होती.....तिचा पदर बाजूला झालेला तीच ते शरीर पाण्याने भिजल होतं त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती.....तिला बघताच माझ्या मधील कामवासनेचा उद्रेक झाला.....आताच्या आता तिला मिठीत ओढव असा काहीसा विचार मनात येत होता....तसा तिचा होकारच असता कारण ती माझी होती माझीच एक कल्पना......ती मला आपल्या बोटाचा इशारा करून त्या पाण्यात बोलावत होती....मी सुद्धा न कळत त्या दगडी कठड्यावर चढलो आणि ना कोण जाणे डोक्यात एक तीव्र कळ आली....मी सरळ खाली उडी घेऊन जमिनीवर आलो.......
"नाही....नाही....हे काही खर नाही.....मला पोहता कुठे येतं??.....माझा जीव घ्यायला आलीय ती.....खरोखरची चेटकीण आहे"
अक्षरशः धावतच घरी आलो.....स्वतःला धन्यवाद देतच आलो.....जराश्या चुकीने जीव गेला असता...दोन तीन दिवस अगदी सामान्य गेले ...बरं वाटत होतं.....त्या धोक्यातून वाचलो ह्याचं कुठेना कुठे समाधान होतच.....पण सारिका परत डोळ्यासमोर येऊ लागली पण आता तिचा चेहरा डोळ्यासमोर नव्हता....आता डोळ्यासमोर होतं ते तिचं भिजलेलं शरीर.....तेच नजरेसमोर येत होतं.....परत मन भरकटत होतं.....वासनेचा उद्रेक होत होता....काहीही बडबडत होतो.....नीट जेवलो ही नव्हतो ना 2 दिवस घरी गेलेलो.....आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रिया आता सारिका भासू लागल्या.....मनाला खूप आवर घातला.....घरच्यांनी एका नाल्याच्या शेजारून मला घरी आणलं....तेव्हा सुद्धा विचित्र बडबडत होतो.....वडिलांनी मानसोपचार तज्ञाकडे माझी ट्रीटमेंट सुरू केली पण फरक काहीच नव्हता.....सगळीकडे तो सारिकाचा आवाज आणि सगळीकडे तीच दिसत होती.....त्या क्लिनिक मधल्या नर्समध्ये सुद्धा सारिका दिसत होती न राहवून तिचा हात पकडला....तेव्हा मात्र आयुष्यात पहिल्यांदा वडिलांचा मार खाल्ला....आई रडत होती.....भलतच घडत होतं.....काही दिवसांनी मला घरी आणलं.....सगळीकडे बातमी पसरली होती की मला वेड लागलं आहे.....पण ते खरं नव्हतं.....सारिकाने माझा ताबा घेतला होता.....आणि त्या "वी" साठ्यातील ते पाणी.....चमत्कारिक होतं ते....सतत डोळ्यासमोर तिचे ते भिजलेले अंग.....वासना सतत भडकलेली......घरातून बाहेर पडलो ह्या सगळ्यांपासून दूर जाण्यासाठी नजर खाली होती पण ओले हात माझ्या खांद्यावर माझ्या पाठीवर फिरत आहेत असे भास होऊ लागले....हात सारखा पॅंटेत जात होता.....परत त्या बाजारात जेवढ्या स्त्रिया दिसत होत्या त्या सगळ्या सारिकाच भासत होत्या....मग एकीच्या हाताला पकडून ओढण्याचा प्रयत्न केला.....शुद्धीत नव्हतोच....त्यात लोकांनी जबरी मारहाण केली.....पोलिसांनी दिवसभर बसवून घेतलं त्यात ती एक इंस्पेक्टर बाई ती सुद्धा भिजलेल्या आणि अंगाला चिटकलेल्या लाल साडीची सारिका दिसत होती.....तिने आमच्या घरी फोन लावायला सांगितले.....बायकांची छेड काढणारा विकृत.....अस लोक बोलू लागले....पेपरवाले फोटो घेऊ लागले.....आईवडिलांना तोंड दाखवायला जागा नव्हती.....मग जिने हे सगळं चालू केलं तिलाच एकदा जाब विचारावा म्हणून पोलीस स्टेशन मधून पळून आलो तो सरळ इथेच.....आता त्या पाण्याच्या साठ्यात डोकावून बघितले....सारिका जणू माझ्या स्वागतालाच उभी होती पण आता तिच्या शरीराभोवती त्या लालभडक साडीचा विळखा नव्हता....अगदी एखाद्या प्राचीन शिल्पाप्रमाणे ती नग्न उभी होती.....वास्तविक जगात मी परत जाऊ शकत नव्हतो कारण मी तिथे विकृत होतो पण इथे....इथे मला सारिका मिळणार होती....तिच्या शरीराचा तो स्पर्श.....हे निळंशार पाणी आणि त्यावर उभी असलेली सारिका....हा माझ्या जीवनातील अंतिम थांबा असतील कदाचित.....माझा मुत्यु हेच सारिकाला प्राप्त करण्याचे एकमेव माध्यम असेल.....आणि कदाचित तिथेच माझ्या भरकटलेल्या मनाला शांती मिळेल तिच्या मिठीत......एवढेच सांगणे आहे......कदाचित कुणाला ही चिट्ठी सापडेल किंवा नाही......पण ह्या जागेपासून अंतर ठेवलेले बरे आहे...........
-अजित-
इंस्पेक्टर रुपालीचे डोळे पाण्याने डबडबले होते.....
"हे सगळं खरं असेल का??.....इलाज चालू होता म्हणे....कदाचित मनावर ताण आला असेलही....काय माहित....पण ही जागा जरा चमत्कारिक आहे"
रुपालीची नजर आजूबाजूला फिरत होती
एक आवाज रुपालीच्या कानावर पडला....ह्रदयाच्या आठवणींच्या कोपऱ्यात कुठेतरी हा आवाज लपला होता....
"आईचा आवाज??"
रुपाली जागेवरून उठली.....ती शाळेत असतानाच तिची आई तिला सोडून गेली होती.....रुपाली तशी आदिवासी भागातली राहणारी होती लहान असताना रुपाली अंगणात खेळत असताना एका बिबट्याने तिच्यावर हल्ला केला होता पण रुपालीची आई घरातून धावत आली आणि बिबट्याशी भिडली रुपालीचा जीव तर वाचला पण रुपालीची आई गंभीर जखमी झाली....रक्तस्त्राव झाला....दवाखान्यात नेईपर्यंत तिचा जीव गेला होता....रुपाली आईवर खूप प्रेम करत होती....तिच्याच इच्छेनुसार ती इंस्पेक्टर झाली होती.....तिचा आवाज कानावर पडला....तीच अंगाई....तेच गोड गाणं....रुपालीने विहिरीत डोकावून बघितलं.....त्या शांत पाण्यावर तिची आई बसली होती......तिचे ते स्मितहास्य रुपाली परत बघू शकत होती.....त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या.....त्या पाण्यातून हलकासा धूर येत होता त्या धुरात रुपालीच्या आईची स्मितहास्य करणारी प्रतिमा.....तो धूर रुपालीच्या नाकात जात होता....आईकडे बघून तिचे डोळे भरून आले होते....ती मागे फिरली आणि तिने कागद उचलला.....आता तो कागद पूर्णपणे कोरा होता....अजितने लिहलेला मजकूर पूर्णपणे गायब होता....आता रुपाली त्या कागदावर लिहू लागली
"आज माझी इच्छा पूर्ण झाली....माझी आई मला भेटत आहे....तिला भेटायला मी खाली उतरते आहे.....खाली जाऊन तिला कडकडून मिठी मारेन आणि सांगेन की बघ तुझी मुलगी इंस्पेक्टर झाली आहे
----रुपाली-----
रुपालीने कागदाची घडी घातली आणि तो दगड अगदी सहज उचलून त्या दगडाखाली ती चिठ्ठी ठेवून दिली...पायातून बूट काढले...तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते ती धावत गेली आणि तिने सरळ त्या विहिरीत उडी मारली.....पाणी उसळत होतं.....रुपालीच्या नाकातोंडात पाणी शिरत होत....काहीकाळ उसळणारं ते पाणी थंड झालं..काहीसं अजून शुद्ध झालं.....आणि आता त्या पाण्याची पातळी अजून एक फुटाने वाढली होती.....रुपालीचा देह तळाशी जात होता...काहीसे छोटे अमानवी जीव तिच्या त्या मृतदेहाभोवती गोळा होत होते त्यांचे ते लालभडक डोळे कशाची तरी वाटच बघत होते....रुपालीची शेवटची हालचाल झाली आणि ती तळाशी पोहोचली...तिच्या देहातून एक पांढरी आकृती तिचा आत्मा बाहेर पडू लागला..त्याच बरोबर माश्याच्या आकाराच्या त्या तीक्ष्ण दातांच्या राक्षसी जीवांनी तिचा तो आत्मा ओरबाडून खायला सुरवात केली......पातळातील जीवांनी आपली भूक तात्पुरती भागवली होती.............(समाप्त)
लेखन :- शशांक सुर्वे