जीवनरस
सौ आरती अत्रे-कुलकर्णी
लेख आवडल्यास लाईक जरूर करावा. लेख कुठेही शेअर करायचा असल्यास नावासहित करावा.
हि कथा बरेच दिवस अर्धवट लिहून झाली होती. ह्या ग्रुपवर अर्धी कथा टाकून ती पूर्ण करायलापण मी सांगितली होती, पण सर्वानी मलाच वेळ मिळेल तेव्हा ती पूर्ण करण्यास सांगितली. कदाचित कथा आधी वाचल्यासारखी वाटेल, म्हणून हि प्रस्तावना !
:
:
तो:
तो त्या इमारतीपाशी आला, हातात एक छोटीशीच बॅग ७-८ दिवसांची. पाच मजली इमारत, इमारतीमध्ये राहणारे काही लोक, बाहेर खेळणारी मुले. आजूबाजूला झाडे, वाळत घातलेले कपडे, लावलेली वाहने.... अगदी नेहमीचेच दृश्य! त्याला कळेना "हि इमारत कुठे?", असे विचारल्यावर लोक वेड्यासारखे का पहात होते त्याच्याकडे?
"बाप्पारे, तिथे कशाला जायचे तुला?" असेही विचारले.
"लौकर निघ रे, रात करू नको बाहेर पडायला..." असा सल्लाही दिला त्याला.
इमारतीला मोडके लोखंडी गेट होते, कायमचे उघडे असलेले. त्यावर गंजलेले, पुसलेले इमारतीचे नाव. सर्व वयोगटातील लोक आजूबाजूला सहज वावरत होते. त्याने नीट पाहून घेतले आणि जिन्याच्या दाराशी येऊन उभा राहिला. नवीन माणूस पाहून जिन्याजवळच्या माणसाने हटकलेच "कोण रे तू? कुणाकडे आलास?"
"भाड्याने रहायला आलोय, वीस नंबरच्या फ्लॅटमध्ये" त्याने हसत सांगितले
"आबा..बाबा..बा... वीस नंबर? कुणी दिला तुला तो फ्लॅट भाड्याने...?" तो उघड्या तोंडावर पालथ्या मुठीने बोंब मारत म्हणाला.
"कुणी म्हणजे? घेतलाय आम्ही भाड्याने काही दिवसासाठी....पैसे भरलेत." तो जरा बेफिकिरीने म्हणाला.
"आम्ही? म्हणजे अजून कुणी हाय का सोबत?"
"मी आणि माझी बायको..." त्याला आता त्याच्या चौकश्यामध्ये अजिबात रस नव्हता पण तरीही तो त्याच्याशी बोलत होता.
"कुठे आहेत मग..मिसेस ?" तो मागे वळून गेटकडे पहात म्हणाला
"ती येईल पाच-सहा दिवसांमध्ये सगळे सामान घेऊन. मला ऑफिसला उद्यापासूनच जायचे आहे म्हणून मी आज आलो.."
"नीट चौकशी केली का भाडे द्यायच्या आधी?"
"केली कि! बायकोनेच केली.... "
"बरं..बरं.....असुदे! जपून राव्ह रे..."असे म्हणत तो आत गेला.
खरंतर त्याला अजून काही विचारावेसे वाटले पण नक्की काय विचारावे, हे समजेपर्यंत तो गेलाच माणूस. त्याने जिने चढायला सुरुवात केली. बाहेर मुलांचा गलका चालू होता. मध्येच एखादी आई मुलांना 'घरी या', म्हणून ओरडत होती. कोणी दार उघडून बाहेर जात होते, येत होते. त्याच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखे करत त्याचा मागोवा घेत होते. हा गृहस्थ नक्की कुठे जात असावा...असा विचार करत होते, एकमेकांना खुणावत होते. तीन मजले चढून झाले आणि तो चौथ्या मजल्यावर थांबला, हातातली बॅग खाली ठेवली. प्रत्येक मजल्यावर चार घरे होती. तीन मजले अगदी गजबजलेले होती, वर्दळ होती, माणसांचा वावर होता...पण इथे या मजल्यावर अगदी शांतता होती. सगळी घरे बंद, धूळ... त्याने बॅग उचलली आणि तो जिना चढू लागला. पाचवा मजला शेवटचा मजला असल्यामुळे पुढे जिना नव्हता, गच्चीही नव्हती. तो मजला तसा साफसूफ केलेला वाटला. तो चालत वीस नंबरच्या दारासमोर उभा राहिला. बॅग खाली ठेवली आणि खिशातील चावी काढून दार उघडले.
घर बऱ्यापैकी स्वच्छ केलेले होते. घरात सामान काहीच नव्हते.एकूण तीन खोल्या होत्या. बाहेरच्या खोलीत फक्त एक गादी, उशी आणि पांघरूण बाजूला गुंडाळी करून ठेवले होते. आत स्वयंपाकघर आणि एक बेडरूम होती. बाथरूममध्ये बादली, भांडे ठेवले होते. बायको म्हणालीच होती "रात्रीसाठी गादी आणि अंघोळीला बादली ठेवायला सांगतलीये, म्हणून..." नाही म्हणायला आतल्या खोलीत एक मोठा आरसा होता भिंतीवर, जुना झालेला. सगळीकडे खिडक्या होत्या पण बंद. म्हणाले तर काहीच भीतीदायक, भयानक नव्हते पण आनंददायी, उल्हसित व्हावे असेही काही नव्हते.
"ठीक आहे, इतक्या कमी पैशात तसे चांगलेच मिळाले आहे घर. बायको आली कि येईल घरपण..." असे म्हणत त्याने बॅग उघडली आणि फ्रेश झाला. कपडे बदलून सोबत स्टँडवरून विकत घेतलेले खाऊन घेतले. खिडक्या उघडल्या आणि गादी घातली.
नुकतेच तर लग्न झाले होते त्याचे, बायको अगदी लाखात एक होती. रोजच हनिमून... नुसत्या विचारानेसुद्धा त्याला बायकोची तीव्रतेने आठवण आली.अनाथ असलेल्या त्याला वाटले पण नव्हते कि कधी त्याचे लग्न होईल म्हणून. अगदी साधा, सज्जन माणूस...आपण बरे आणि आपले काम. अचानक कशी हि भेटली आणि लग्नाची गळ घातली.अगदी त्याच झाडाखाली जिथे भेटलो तिथेच एकमेकांना हार घातले.....आणि लगेच पहिली रात्र आली. ती अप्सरेहून सुंदर दिसत होती, लखलखत होती, डोळे कसे चमकदार दिसत होते. माझ्या अंगावरून तिचा लुसलुशीत हात फिरत होता, शरीरावरुन नजर.....आणि मग रोजच अशी बहारदार रात्र माझ्या आयुष्यामध्ये येऊ लागली. आज पहिलीच रात्र जेव्हा ती माझ्या सोबत नाहीये....
अचानक खिडकी उघडली आणि चंद्राचा प्रकाश आतपर्यंत झिरपला. सगळे घरचं त्या प्रकाशात चमकू लागले. झाडाच्या, माणसांच्या, गाड्यांचा सावल्यांचा खेळ भिंतीवर सुरु झाला.उगाचच घरात कोणीतरी वावरतंय...असे वाटू लागले. स्वयंपाकघरामध्ये भांड्यांची किणकिण होऊ लागली, बाथरूममधून पाण्याचा बादली भरण्याचा आवाज....तो स्वतःशीच हसू लागला. एकदा का बायको आली कि असेच आवाज येतील ह्या घरातून! विचार करत करतच त्याला झोप लागली. झोपेत दरदरून घाम आला आणि घशाला कोरड पडून तो एकदम जागा झाला. कोणीतरी जवळून गेले असावे असा वाऱ्याचा झोत आला, खिडकीचे दार अजूनही हालत होते... तो उठून बसला. नवीन जागा आहे, असे होणारच. उगाच खिडकी उघडी ठेवली, वाऱ्यामुळे हालत असेल... असे म्हणत तो कुशीवर वळून परत झोपला.
"लागली का झोप नीट?" सकाळी ऑफिसला जाताना जिन्याच्या दारातल्या अवलादीने हटकले.
'हो, लागली कि...." असे मोघम बोलत तो पटकन तिथून बाहेर पडला.
संध्याकाळी येताना नेहमीप्रमाणे खायला घेऊन आला. थोडासा ताजातवाना होऊन खाऊन गादीवर झोपला.पुन्हा एकदा बायकोची आठवण.... उगाच तिला पाच-सहा दिवसांनी ये सांगितले. सोबतच आणले असते तर बरे झाले असते. झाली असती थोडीशी अडचण पण रात्र तर एकट्याने नसती ना काढावी लागली....जरा डोळ्यावर झोप येत नाही तोच...हलकेच दार वाजले.
:
:
ती:
तिने हलकेच दार वाजविले. "अहो, दार उघडा..मी आल्येय.." आवाजात अधीरता, ओढ. त्याने हसून, मनात खुश होऊन दार उघडले. दारात त्याची बायको, डोक्यावरून अंगभर घेतलेला पदर...पटकन दारातून आत येत तिने दार लावले आणि त्याच्या मिठीत शिरली.
"काय ग...अचानक आलीस ते..' तिला घट्ट मिठींत घेत तो सुखावला.
"करमेना मला..."असे म्हणत मिठी सैल करत ती म्हणाली
"आणि मला फार करमत होत तुझ्याशिवाय...." तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला. तिचे डोळे चमकत होते.
"तुम्ही पडा. मी आलेच" असे म्हणत ती लगबगीने आत गेली. तो हसत हसत परत गादीवर पडला.
ती झपाट्याने आत गेली आणि आरश्यासमोर उभी राहिली.जुन्या आरशात तिचे पुसटसे प्रतिबिंब पडले होते. उघड्या खिडकीतून बाहेरचा उजेड येत होता.बघता बघता तिचा चेहरा भेसूर होत गेला...वयस्कर होत गेला...ती म्हातारी दिसू लागली, हाडे वर आली, केस पांढरेशुभ्र झाले, पिंजले, दंतविहीन झाली. तरीही ती स्वतःच्या रुपाकडे पाहून हसली.... "अजून दोनच राहिलेत! मग मी चिरतरुण राहणार...कायमचीच! म्हणूनच तर करत आहे ना हे सगळे मी!"
तिने हलकेच आरश्याला हात लावला...आरसा चमकला....त्याची प्रकाशाची रेषा बाहेरपर्यंत गेली.
"अगं, ये कि बाहेर..आत काय करतोयस?"
"आलेच कि..." ती झपाट्याने बाहेर आली. त्याच्या अगदी जवळ बसत म्हणाली "तुम्ही गेल्यापासून काही सुचेचना पहा मला..आले निघून मग.... मी काय म्हणत्ये, आताच सांगू नका कोणाला मी आल्याचे. लोक म्हणतील सामान नाही, गाडी-घोडे नाही आणि रात्रीला बाई कशी आली? मी दोन दिवसांनी परत जाईन आणि सगळे सामान घेऊन दिवसा येईन...तोवर गुपचूप राहीन इथेच."
"इथे काही नाही रहायला तुला, ना सामान ना किराणा... साधा चहापण करता येणार नाही तुला. मी सकाळी गेलो कि पार संध्याकाळी येतो...तेव्हा खायला घेऊन येणार मी....."
त्याच्या तोंडावर स्वतःचा मऊ हात ठेवत म्हणाली "आता...बोलतच बसणार कि जवळ पण घेणार मला..." म्हणत स्वतःच पुढाकार घेतला.
दुसरे दिवशी संध्याकाळी तो ऑफिसमधुला आलं तेव्हाच त्याला जरासे बरे वाटत नव्हते. सगळा दिवस आजारी असल्याची भावना दाटुन येत होती. पण तरीही बायको घरी आलीये, या कल्पनेनेंच त्याला आनंद होत होता. कुठेच न पाहता तो भराभर घरी आला. दार वाजवले तर दार उघडेच होते, तो आत आला आणि दार लावले आणि त्याचवेळी भराभर खिडक्याहि बंद झाल्या. आजूबाजूचे लाईट बंद झाले आणि आतल्या खोलीतून एकदम कालसारखी प्रकाशशलाका बाहेर आली.
"दार तुम्ही लावले पण आता मी सांगितल्याशिवाय तुम्ही ते उघडणार नाहीत, समजले?" आवाजात जरब होती, शक्ती होती.
तो'हो' म्हणाला... त्यालाही समजले नाही कि मी असे का म्हणालो, बायको असे का म्हणाली.
"२१ दिवसांचे माझे व्रत आता संपले. आज आपली शेवटची रात्र...' असे म्हणत ती बाहेर आली. जरी ती नेहमीचीच बायको असली तरी ती 'वेगळी' होती. तो घाबरला....
"कसले व्रत? शेवटची रात्र म्हणजे?"
"तुमचा जीवनरस शोषण्याची ....." असे म्हणत तिने तिचे रूप बदलले.
:
:
तो:
तो पुरता घाबरला. समोर दिसणारी नेहमीचीच पण तरीही वेगळी बायको पाहून तो मनातच चरकला.
"मी काय सांगते ते नीट ऐका...." असे म्हणत ती त्याला सांगू लागली. तो जणू आहेतिथेच उभा खिळल्यासारखा झाला होता. जणू त्याला कोणीतरी तसेच बांधून ठेवले होते. आज्ञा केली होती.
"आज माझे व्रत संपणार. गेले ३० दिवस मी एका व्रतामध्ये होते... त्याचाच भोग म्हणून मी माझे शरीर रोज अपर्ण करत होते. त्याचा शेवटचा विधी करण्यासाठी मला तुमच्यापासून १ दिवस लांब राहणे आवश्यक होते म्हणून मी आले नाही तुमच्यासोबत. कालही मी इथे आले, राहिले हे कोणालाच माहिती नाही. काल माझा भोग द्यायचा शेवटचा दिवस होता. म्हणूनच तुला आज दिवसभर त्रास होत आहे कारण त्याचवेळी मी माझा जीवनरस तुमच्या जीवनरसामध्ये बेमालूमपणे मिसळला आहे.
आजची रात्र हि तुझी शेवटची रात्र आहे. आज मी माझा जीवनरस आणि सोबत तुझा जीवनरस ओढून घेणार आहे. पुन्हा एकदा मला तारुण्य हवे आहे, चैतन्य हवे आहे, रसरशीतपणा हवा आहे, रक्त हवे आहे..... माझा भोग मला द्या, मला तुझा जीवनरस द्या....मला आज्ञा द्या... "
त्याच्या चेहऱ्यावरील भाव भराभर बदलत राहिले. तो पुरता घाबरला. आता कुठे नोकरी लागली, विवाह झाला आणि हे काय.... कोण कुठली हि मानव कि अजून काही? कसला जीवनरस, कसले तारुण्य... काय घेणार काय देणार ? कसला भोग हवाय हिला....?
"मला अजून काही प्रश्न आहेत..." तश्यातही त्याने धीराने विचारले
"अहो आश्चर्य! तुझे इतके धाडस कि मला विचारावे?... विचार!" असे म्हणून ती दातओठ खात त्याच्या दिशेने आली. तिचे ओठातून बाहेर आलेले सुळे त्याला आज पहिल्यांदाच दिसले. तिच्या डोळ्यात रक्त उतरले होते. तिचे सारे शरीर गवताच्या पात्यासारखे लावलवत होते. शेवटचे 'विचार' शब्द तर गगनभेदी आवाजात त्याच्या कानात ओतले गेले.
"कधीपासून सुरु झाले हे व्रत?"
"हम्म... अनेक वर्षे झाली, युगे लोटली त्याला. प्रत्येक मानवाच्या जीवनरसामधून मला त्याचे संपूर्ण आयुष्य मिळते जसे तुझे आयुष्य आहे ७८ वर्षे आणि आज तुझे वय आहे फक्त २५. म्हणजे तुझे उरलेले ५३ वर्षाचे आयुष्य आजपासून माझे. असे १५ आयुष्य मी उपभोगले आहेत. तू १६ आणि मग अजून १ शेवटच्या विधीसाठी कि मग मी चिरतरुण राहणार. मला अजून जीवनरसाची गरज लागणार नाही. माझे भोग तेव्हाच संपतील. त्यासाठीच हे शरीर मला तरुण ठेवावे लागेल तुझ्यासारख्या मानवाना भोग देण्यासाठी."
"तू म्हणतेस कि तू माझा जीवनरस घेणार म्हणजे माझ्या शरीराचे काय होणार?"
"फार हुशार आहेस रे तू! तुला मी मारून नाही टाकणार, तू मेलास तर हे माझे शरीरपण संपते कारण हा जीवनरस तुझा आहे ना! मला तुला जिवंत ठेवावेच लागेल जोवर शेवटचा विधी होत नाही तोवर... पण तुला कळणारही नाही कि तू जिवंत आहेस ते. तुझे शरीर इतके निरस झालेले असेल कि तुला कणभरही हालचाल करता येणार नाही. इतकेच काय तू तुझे डोळेही उघडून माझ्याकडे पाहू शकणार नाहीस."
"कुठे असणार आहे मी? या घरात? कि अजून कुठे?"
"बस्स! फार बोलतोस तू! मला उशीर होतोय.... " अचानक तिचा उजवा हात मोठ्ठा होत त्याच्या तोंडासमोर आला आणि त्यातील चाफेकळी उंचावून तिने दरडावून सांगितले.
"माझा जीवनरस घ्यायचा आहे ना तुला, त्याकरीता तुला मला उत्तर हे द्यावेच लागेल..."
"माझी खास जागा आहे. तिथे मी सारी शरीरे जपून ठेवली आहेत. दर ठराविक दिवशी मला तिथे जाऊन त्यांना अन्न-पाणी द्यावे लागले, ती शरीरे जगवावी लागतात. तुलाही तिथेच ठेवणार...दूर दूर पाताळात, जमिनीच्या आत आत, खोल खोल गुहेत, रात्रीच्या अंधारात, थंडगार कातळात, माझ्या मनाच्या तळघरात. असे म्हणून ती मोठ्याने हसू लागली. हळूहळू तिचे हसणे भीषण, बेसूर व्हायला लागले...इतके कि त्याने त्याचे डोळे बंद करून घेतले....
"आज्ञा...आज्ञा...आज्ञा " ती त्याच्याभोवती गोलाकार फिरू लागली. हळूहळू त्याच्याभोवती मोठी वावटळ निर्माण झाली. तो उंच उडाला, त्याने डोळे उघडले तर तो उंच उंच ढगात, वादळात, धुळीत कुठेतरी भरकटलेला होता. त्याचे शरीर वेडेवाकडे भरकटायला लागले होते. "आज्ञा...आज्ञा...आज्ञा "
दोन्ही हात कानावर ठेवत तो जोरात ओरडला"दिली" आणि अचानक सारे शांत झाले.
सकाळ झाली तरी तो बाहेर ऑफिसला जायला आला नाही तेव्हाच तिथल्या लोकांना शंका आली. याआधीही असेच काही १-२ रात्रीतून गायब झाले होते.
दुपारी एक बाई त्याची चौकशी करत आली आणि सरळ गेली २० नंबरच्या फ्लॅटकडे.
"बाई, कोण तुम्ही?" खाली येताच जिन्याच्या दारातल्या अवलादीने हटकले.
"माझे मिस्टर आलेत इथे २ दिवसापूर्वी रहायला. मी त्यांची बायको. त्यांनी बदली करून घेतली आणि आम्ही पुन्हा आमच्या गावी जातोय. त्यांचे सामान घ्यायला आले होते. " असे म्हणत झपाझप पावले टाकत ती निघून गेली. डोक्यावरचा पदर इतका खालपर्यंत ओढला होता कि मान वाकून वाकूनही तिचा चेहरा काही दिसला नाही.
:
:
ती:
ती आज त्यांना अन्न-पाणी द्यायला आली होती. ती १५ शरीरे जमिनीवर पडलेली होती. तिने येतानाच काही झाडांची पाने आणली होती. त्या पानांचा रस तिने सावकाश एकेकाच्या तोंडात टाकला. थोडा वेळ तशीच थांबली. एकेकाची शरीरे तपासली.
त्या पानांच्या रसाने साऱ्या शरीरात थोडीशी गती आली. तो शरीरे हालचाल करू लागली. तिच्या हे लक्षातही आले नाही कि त्या शरीराने आपली नेहमीची जागा बदललेली आहे. ती शरीरे एकमेकांच्या जास्त जवळ आहेत. स्वतःच्याच गुर्मीत ती वागत होती.
"पहा, प्रत्येकाने डोळे उघडून पहा माझ्याकडे... आजचे माझे हे रूप हे तुमचेच देणे आहे, तुमचाच जीवनरस आहे. त्यावरच हे शरीर पोसले गेले आहे.... अजून काही काळ, काही वर्षे. हे शरीर पुन्हा कमजोर होऊ लागले कि मला माझा शेवटचा बळी मिळेल, माझा भोग अर्पून मी तो विधी पूर्ण करीन ज्याची मला प्रचंड आस आहे... माझ्या गुरूने मला माझ्या जीवनातल्या १६व्या वर्षी तो विधी शिकविला होता. माझा स्वतःचा जन्म सम्पुनही बरेच वर्षे झाली. मी आतापर्यंत १५ शरीराचा जन्मजीवन उपभोगले आहे. हा जीवनरस संपला कि तो विधी पूर्ण करून मी तुम्हाला कायमचे मुक्त करेन.... " हे सारे आपल्या गगनभेदी आवाजात बोलताना ती एक एक शरीरासमोरून पुढे सरकत होती. प्रत्येक शरीरासमोर आपल्यावर तिचे रूप बदलत होते. त्या शरीराचा जीवनरस घेण्यासाठी तिने जे रूप घेतले होते ते तिचे रूप साकार होत होते. सारे १५ शरीरे ते दृश्य पहात होते.
आणि अचानक काहीतरी झाले आणि तिच्या शरीरातून जोरदार कळ आली. त्या वेदना तश्याच सहन करत तिने आजूबाजूला पहिले. तिला दिसले कि एका शरीराने एका दगडाने त्याच्या शेजारच्या शरीरावर हल्ला केला होता. हे असे आधी कधीच झाले नव्हते. त्यांची शरीरे तिने इतकी कमजोर, अशक्त केलेली होती कि ती हालचालही करू शकत नव्हती. मग...?
इतक्यात त्या शरीरचा जीव मुक्त झाला. ती कळ येऊन तशीच उभी होती तो तिने तो आत्मा हवेतून उडत गुहेच्या बाहेर जाताना पहिला.
माझा जीवनरस, माझा बळी..... ती जोरात ओरडली. तोच दुसरी कळ आली. त्याच्या शेजारचे शरीर त्याच्यावर हल्ला करत होते. आणि अचानक सगळीच शरीरे शेजारच्या शरीरावर हल्ला करू लागली. तिने पहिले, ती धावली, त्याच्या हातातील अणुकुचीदार दगड तिला काढून घ्यायचे होते पण तिला प्रचंड वेदना होत होत्या . ती हालचालही करू शकत नव्हती. अतीव वेदनेने ती किंचाळत होती. तिला पहिल्यांदाच लक्षात आले कि प्रत्येक शरीराने हातात दगड घेतला आहे, ती शरीरे एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेली आहेत आणि आताच आपण दिलेले अन्न-पाणी त्यांना जी शक्ती देऊन गेले आहे त्याचा ते उपयोग करत आहेत. गेले कित्येक महिने ही शरीरे एकमेकांच्या हळूहळू जवळ येत होती.
एक एक करत तिला आत्मे हवेतून उडत बाहेर जाताना दिसत होते. कृश, जीर्ण झालेल्या शरीराला मारायला असा कितीसा वेळ लागणार? प्रश्न होता तो शक्तीचा! हाच विचार केला होता त्याने. ती जेव्हा त्यांना तो पानांचा रस देईल तेव्हाच दुसर्याने हल्ला करायचा आणि मारून टाकायचे सगळ्यांनी एकमेकांना. कारण स्वतःचे स्वतःला मारणे अवघड असेल. आपल्यासोबत ती पण मरून जाईल आणि नाही मिळणार तिला शेवटचं बळी, नाही होणार शेवटचा विधी आणि नाही द्यावा लागणार तिला भोग!
एक एक करत १५ आत्मे मुक्त झाले.... आणि १६ वा आत्माही लवकरच गुहेतून बाहेत उडाला!