🙏🙏 भाग:- तिसरा 🙏🙏
गढी उघडुन व वावर सुरु होऊन पाच-सहा दिवस झाले ही गोष्ट आक्कासाबास मानवली नाही व त्यांनी पहिला झटका आपल्या मृत्यूच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी गणपालाच दिला.त्सानंतर त्याचा रात्रीचा गढीत वावरच सुरु झाला पण पुढचे चार पाच दिवस रचना बाई व वायकोळे साहेब भिकुबाकडनं नाव वल्हवायचं शिकण्याकरिता रातीला नदीवरच राहू लागले व उत्तर रातीलाही जायतीत सराव व जलविहाराचा आनंद घेऊ लागले.भिकुबाच्या खोपटात त्यांनी दोन आरामखुर्च्या व टेपरेकार्डर कायमस्वरुपी ठेवुन दिला. उत्तर राती घडीचा चांद उगवला कि नावेवर आरामखुर्च्या टाकुन मस्त बर्मन दा ची गाणी ऐकत चांदणं पित ते स्वर्गात रमु लागले.
पाच सहा दिवसानंतर आॅफिसात उशिर झाल्यानं त्यांनी रचनाबाईस रात्रीचं नदीवर जाणं रद्द करावयास लावुन घरीच झोपले.जेवनं उरकवुन बेडमध्ये मस्त झोप लागली.बारा नंतर उमाकांत ला पाण्याची तहान लागल्याची जाणीव झाली व ते उठले.बेडच्या खिडकीतुन घडीचा चांद उगवत असल्याचं त्यांना दिसला .खिडकीतुनच गावातुन कुत्री एकदम भुंकत भुंकत गढीकडेच येत आहेअसं त्यांना जाणवलं.ते उठले हाॅलमध्ये व तेथुन किचनमध्ये येऊन घटाघटा पाणी प्याले व परत बेडमध्ये येऊन लोडळे.तोच कुत्र्याचाआवाज आता अगदी गढीवरच चालुन येतोय कि काय असं त्यांना जाणवलं. खिडकीतुन चंद्रकिरणाची तिरीप रचनाबाईच्या चेहऱ्यावर पडत होती व रचना कसलं तरी गोड स्वप्न पाहत असावी.कारण झोपेतच तिच्या चेहऱ्यावर हसु फुटत होतं.तितक्यात गढीवरुन अगदी जवळुन टिटीव टिव, टिटीव टिव असा कर्कश आवाज करत टिटवी उडत गेली.कुत्र्याच्या भेसुर आवाजात हा आवाज भिषणता अधिकच वाढवत गेला.उमाकांत शांत पडुन झोपायची तयारी करु लागला.तितक्यात बेडच्या गच्चीवर कुणीतरी चालण्याचा आवाज आला.त्याला वाटलं आपणास भास झाला असावा.पण थोड्या वेळानंतर पुन्हा तसाच आवाज आणि तोही तिव्रता अधिक.इतक्या रात्रीत वरती कोण चालत असेल? कुत्री मात्र गढीकडेच तोंड करुन रडत होती.उमाकांतने विचार केला कदाचित कुत्री वैगेरे चढली असावित ,त्यांच्याच पायाचा आवाज येत असावा व हि बाहेरची कुत्रीही त्यांना पाहुन भुंकत असावित.विचार कत तो झोपण्याचा प्रयत्न करु लागला.काही वेळ तसाच कुत्र्याच्या भेसुरी रडण्याची झालर असलेल्या स्तब्धतेत गेला.पुन्हा पावलाचा जोरजोराच्या आवाजासोबत पैंजणाची छुमछुमही आता ऐकु येऊ लागली.आता मात्र कुत्री नसावीतच हि पक्की खात्री पटली.मग नेमकं कोण?हे पाहण्या करिता तो उठणार तोच रचना बाईनं झोपेतच आपला हात त्याच्या छातीवर टाकला.त्या मधुर मिठीनं म्हणा किंवा भितीनं म्हणा त्या आवाजाकडं दुर्लक्ष करत तो रचना बाईच्या मिठीतच विसावला .मिठीची पकड जसजशी घट्ट झाली तशी त्याच्या डोळ्यावर झोपही अवतरली.
सकाळी उमाकांत अगदी आॅफिसची वेळ झाली व तेही रचना बाईनं जबरीनं उठवलं तेव्हाच उठला.पण त्यानं रात्रीच्या प्रसंगाकडं दुर्लक्षच केलं. आफिसात काम करतांना त्याला मात्र तोच आवाज कानात घुमतोय असा भास होवु लागला.
अंग जडावल्यानं आजही त्यांनी नदीवर जाणं टाळलच.तसच गणपानंही गढीवर येणं टाळलं. आज उमाकांत लवकर जेवणं करुन क्रोसीन घेऊन झोपण्याची तयारी करु लागला.पण रचनाबाईचा जस्मिन टच अत्तराचा सुगंध व सुगंधीत मधुर बोलणं झोपुच देईना .अशातच साडे अकरा वाजुन गेले मग झोप दाटली.एक दिड तासाची झपकी झाली असावी.उमाकांतच्या तोंडाला काल सारखीच कोरड पडली.पाणी पिण्याकरिता उठणार तोच कालच्या प्रसंगाच्या आठवणीनं त्याच्या अंगावर काटा आला.तरी किचन मधुन पाणी पिऊन आला व बेडवर झोपणार तोच अचानक कुत्राचं जोरजोराणं गढीकडे धावणं व भेसुर हेल काढत कालसारखंच रडणं त्याला ऐकु आलं.तो कान टवकारुन सावध झाला.तोच गढीचा उर्वरीत बराच भाग तसाच बंद होता त्या दिशेकडुन घुबडाचा घुत्कार ,टिटवीचं कर्कश टिवटिवणं,व रानातुन कोल्हेकुई या सर्व आवाजाची एकत्र विचीत्र सरमिसळ
वाढु लागलीव पैंजनाच्या छुमछुमच्या साथीनं पावलाचा आवाज.गच्चीवर सुरु झाला.उमाकांतच्या छातीत धस्स झालं.चालुच पाणी पिऊनही त्याच्या घशात पुन्हा कोरड पडली.तो पडुन कान देऊन ऐकु लागला. आता पावलाचा आवाज व छुमछुम जिन्यानं खाली उतरतेय हे त्यानं ओळखलं.त्याला उठुन बघावं कि काय ?तेही कळेना.त्यानं हिम्मत करुन उठुन हाॅल मध्ये आला .कारण गच्चीवरुन खाली उतरणारा जिन्याचा दरवाजा हाॅलमधल्या भिंतीतच उघडत होता.गढीचं बांधकाम खुपच जुनं असल्यान जिना मावुनही भित राहिल इतक्या भिंती रुंद होत्या. हाॅल मधल्या दरवाज्याजवळ तो कान देऊन ऐकु लागला.पण आता आवाज बंद झाला.बराच वेळ तो तसाच सुम तिथच थांबला पण काहिकाहिच हालचाल वा आवाज नंतर आला नाही.मग तो बेडमध्ये येऊन पडला. तोच पुन्हा जिन्यातुन पायाचा आवाज व छुमछुम.आता मात्र उमाकांतला दरदरुन घाम फुटला.काय करावं त्याला उमजेना.तितक्यात " परत्या ,सोड हरामखोरा सोड! वहिनी आहे मी तुझी सोड!" असा आवाज जिन्यातुन आला.उमाकांतचा सारा प्राण कानाजवळ गोळा होऊ लागला.जिन्यातुन आवाज घुमतच होता."परत्या हराम खोरा सोड नी माझ्या रितुला नेऊन कुठं ठेवलस सांग मेल्या मुडद्या थोडी तरी गढीच्या परंपरेची लाज.ठेव सोड मेल्या हरामखोरा!" तोच आवाज व कोंबडीला भुजंगानं पकडल्यावर कोंबडीची जी केविलवाणी अगतिक घुसमट होते, अगदी तशीच घुसमट बराच वेळ जिन्यात चालु होती.हळुहळु घुसमट व आवाज कमी कमी होऊ लागला.
उमाकांत उठला व हिम्मत करुन जिन्याकडं जाऊ लागला तोच त्याला जिन्याकडुन काहीतरी पांढरी आकृती मागच्या पक्कया घराकडच्या व गोठ्याकडच्या दरवाज्याकडं जातांना दिसली.
त्यानं तिथला बल्ब लावला नी तो जागेवर उडालाच.नेहमी बंद असणारा दरवाजा अर्धवट उघडा असुन त्याच्यातुन एक हात अडकलेला दिसत होता.उमाकांत जागच्या जागी बोबडी वळलेल्या आवाजात किंचाळला.नी त्या आवाजाने रचना बाई जागी झाली.पाहते तर उमाकांत बेडवर नाही.ती उठुन आवाजाच्या दिशेने हाॅलकडे आली तर बल्ब लावलेला व उमाकांत बंद दरवाज्याकडं जणु कुणी तरी त्याला ओढतय व तो निसटण्याचा प्रयत्न करतोय या स्थितीत दिसताच " अरे तु काय करतोयस इथं, चल बघु बेडमध्ये.इकडं कशाला आलास तु?" रचना ने त्याला हात लावुन उठवायचा प्रयत्न करु लागली.तर तो पुर्ण घामानं डबडबलेला व घामानं कपडे पुर्ण ओले झालेले तिला दिसले.तिनं त्याला बेडवर आणुन बसवलं व पाणी पाजलं.पंख्याचा स्पीड वाढवला व पदरानं चेहरा पुसु लागली.त्यानं तिला सगळी हकिकत सांगताच ती जोरजोरानं हसत "अरे तुला भास झाला असेल किंवा स्वप्न पडलं असेल.झोप बघु " . अग ऐक माझं तुला खर वाटत नसेल तर बघ जरा तो दरवाजा आपण आलो त्या दिवसापासुन बंद आहे ना!पण तो आता उघडा आहे बघुन ये." रचना नं पुन्हा जाऊन दरवाजा पाहिला तर बंद व सगळी कडे शांतता.तिनं येऊन ,"काय उमाकांत दरवाजा तर बंद आहे.तुला भास झालाय झोप तु नी सकाळी डाॅक्टरास तब्येत दाखव तु एकदा.असं म्हणत तिनं त्याला आपल्या बाहुपाशात घेतलं व तिकडे पुर्वे दिशेला सूर्य आपल्या बाहुपाशात घेणार होता.
प्रतापराव मात्र रचनाबाईच्या पुर्ण पाळतीवर होता.नाव वल्हवायचं , रात्री फिरणं सारी माहिती त्याला कळत होती व आता तर पाखरू गढीत आलं म्हणजे पुर्ण आपल्या टप्प्यात आलंय.आता सापळा टाकावयास त्यानं सुरवात केली.गढीत सामान टाकला त्या दिवसापासुन ते जिल्ह्याला गेलेच नाही वलवाडीतच मळ्यात किंवा मित्राकडं मुक्कामाला होते.व अचुक संधीची वाट पाहत होते शेवटचा बार उडवण्याकरिता.कारण गेल्या नऊ दहा महिन्यापासुन रचना मास्तरणीनं त्यांची झोप उडवली होती.
सकाळी गावातल्याच डाॅक्टरास वायरमन आॅफिसातच घेऊन आला.योगायोगानं प्रतापराव ही तिथच हजर होते.डाॅक्टरानी चेकअप करुन जागरण वैगेरे झालय का? काही प्रवास ?अशी विचारणा केल्यावर प्रतापरावच उत्तरले,"रातीचे आमचे इंजिनियर साहेब जायतीच्या पात्रात मासं धरतात" काय डाॅक्टर काहीही विचारतात.तेव्हा डाॅक्टरांनी "मी सिरी्सली विचारतोय .कारण लक्षणं मलेरियाची दिसतात" उमाकांत ने मनोमन नदित फिरतांना नक्कीच डास चावले असतील व जागरण तर होतच आहे.डाॅक्टरांनी तात्पुरते इलाज करुन ब्लड चेक करण्याकरिता व उपचाराकरिता जिल्ह्याला जायचं सांगितलं.उमाकांत ला वाटलं आपणच शिंदे वायरमन ला सोबत घेऊन जाऊन चैक करुन परत येऊ रात्रीपर्यंत.रचनेला इथच ठेवुन जाऊ.तसं त्यांनी प्रताप रावांना सांगितलं व विचारणाही केली."प्रतापराव गढीत काही विचीत्र घटना घडलीय का हो?" प्रताप रावांनी नकार देऊन , का?काही झालं का?असं विचारलं.लगेच सहसा दुसऱ्याला का उगाच सांगावं असा विचार करत " काही नाही तसं.बरं जाऊ द्या लक्ष ठेवा आमच्या मॅडम वर जर आम्हास उशिर झालाच यायला तर.प्रतापरावाची गत तर कोल्ह्याला नेऊन द्राक्ष्याच्या मळ्यात सोडावं तशीच झाली.पण तसलं काहीच न दाखवता." बसं का साहेब!आमची मैत्री काय कामाची?मग.नी हो मुक्कामाची पाळी आलीच तर शिंदे ,साहेबांना सरळ दादासाहेबाच्या बंगल्यावरच ने.आम्ही हवं तर आज रचना मॅडमाची काळजी घेण्याकरिता गढीवरच झोपु.लगेच प्रतापरावांनी शिंदेला एकाकी गाठत व हातात काही ठेवत साहेब रात्री मुक्कामाला जिल्ह्यातच ठेव असं पक्क केलं व प्रतापराव मळ्यात निघुन गेले.
उमाकांत साहेब शाळैत येऊन रचनाबाईस मी जिल्ह्याला दवाखान्यात जाऊन येतो रात्रीला परत येतोच .पण उशीर झालाच वा मुक्कामाची पाळी आलीच तर तु गढीत थांब तसं प्रतापरावांना सांगितलय किंवा मुख्याध्यापक बाईकडं थांब,असं सांगताच रचनानं त्याचं काही एक न ऐकता शिंदे वायरमन सोबतच त्या ही जिल्ह्याला यायचा हट्ट धरु लागल्या.दुपारी भिकुबाच्या नावेनं कासेवाडीला जाण्याकरिता साहेब जायतीच्या काठावर आले.दोन दिवसापासुन रातीचं फिरायला साहेब व मास्तरीण ताई आल्याच नाही म्हणुन तोही चिंतेतच होता.एरवी त्याला काहीच वाटलं नसतं पण गढीवर राहायला गेल्यापासुन व गणपाचा किस्सा पासुन तोही घाबरलाच होता.म्हणुन साहेब पाहताच व काय झालं हे कळल्यावर त्यानं गणपाकडं नावेचा ताबा दिला व तोही सोबत निघाला.उमाकांत ने त्याला परतवण्याचा भरपुर प्रयत्न केला पण भिकुबानं ऐकलच नाही.
प्रताप राव आज एकदम खुश होते.त्यांना इंजिनियर साहेब जिल्ह्याला गेले व रचना बाई गढीवर आहेत व आपल्याला आज गढीवरच मुक्काम करायचाय या खुशीत त्यांनी संध्याकालीच मळ्यात उच्च दर्जाची मनसोक्त रिचवली व स्वप्नात इतके रंगुन गेले कि आपण एक वर्षापासुन गढीवर मुक्काम केला नाही हे ही विसरुन गेले.
रात्री नऊच्या सुमारास प्रतापराव मळ्यातुन गावात आले.गढीचा बाकी भाग रिकामाच होता.जेथे सरदेसायाचं कुटुंबातलं कुणीही दिवसा आलं तर राहत.पण एक वर्षात प्रतापरावाशिवाय कुणीच आलं नव्हतं.तेथेच ते आधी गेले.जाता जाता उर्वरीत जो भाग साहेबास व रचना मॅडमला दिला होता तिकडे त्यांनी कानोसा घेतला.मधला किचनमधला एक बल्ब चालु होता.त्यांनी बाहेरुनच ," मॅडम घाबरु नका मी इथच मुक्कामाला आहे, काही मदत लागली तर सांगा." असं सांगितलं.तसं किचन मधुनच "प्रतापराव बरं झालं आमचे साहेब सांगुन गेलेत कि जर रात्री नाही आलो तर तुम्ही राहणार म्हणुन". हे ऐकल्याबरोबर मदिरेच्या कह्यात अर्धवट असलेल्या प्रतापरावांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या.कारण शिंदेच्या हातात कोंबलेले पाचशे रुपये इंजिनियरला कोणत्याही स्थितीत आज वलवाडीत येऊच देणार नाही हे त्यांना पुरतं माहित होतं.ते रात्र होण्याची वाट पाहु लागले.
रचनेच्या स्वप्न महाली रंगलेले प्रतापराव अकरा केव्हा वाजतील व गाव केव्हा शांत होईल ही वाट पाहु लागले.त्यांना एक एक क्षण जड होऊ लागला.हळुहळु शांतता पसरली व प्रतापराव उठले. त्यांनी रचना बाई झोपलेल्या गढीतल्या हाॅलचा दरवाजा हळुच ठोठोवला.छातीत धडधडही होतीच कि जर रचने नं अचानक जोरात आरोळी मारली तर....पण त्यावेळी काय करायचं याचा ही पक्का विचार त्यांनी करुनच ठेवला होता.दरवाजा ठोठोवताच जास्त वेळ न जाताच दरवाजा उघडला. मॅडम" पाणी संपलय !देता का जरा" ."मग का नाही या कि आत" असं म्हणताच प्रतापरावाला सुखद आनंदाचा धक्काच बसला.ते हळुच आत गेले.बाईची एखाद डुलकी झाली असावी.त्यामुळं बाई बल्बच्या उजेडात आहे त्यापेक्षा अधिकच खुलत होत्या व ते पाहुन प्रतापरावाची मदिरा आणखीनच खुलली.रचना बाईनं पाणी देतांना आपली हाताची बोटं मुद्दामहुन लावली तोच प्रताप रावांना जोराचा झटका बसला.व ते विचार करु लागले कि पाखरु टिपायला आपल्याला खुपच प्रयत्न करावे लागतील या हिशोबात असतांना इथे तर पाखरुच आधी तयार असुन तेच आपल्याला टिपतय.
प्रतापरावांनी ही मग खुलुन थेट लाटेवरच स्वार व्हायचं ठरवलं.रचना बाईनी ग्लास बाजुला ठेवत." मी आले त्या दिवसापासुन तुमच्याशी बोलु बोलु करतेय पण तशी संधीच येत नव्हती" तितक्यात प्रतापरावच "मग बाई आज आख्खी रात पडलीय बोला ना" तिरक्यात बोलले.रचना बाईनी जवळ बसत प्रतापरावाचा हातच हातात घेतला व " प्रतापराव चला कि नदीवर,मस्त नावेनं जायतीत निवांत फिरु,इथं माझा जिव गुदमरतोय" असं म्हणताच प्रतापरावांना आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन.याप्रमणच झालं.पण तरीही "बाई नदीवर ते भिकुबा थेरडं असेल नाव कशी घेणार?" असा प्रश्न केला.ते पाहु मी सांगेन त्या बाबाला कि मीच एकटी आलीय तुम्ही बाजुला थांबायचं व भिकुबा खोपटात शिरला कि हळुच येवुन नावेत बसायचं.
प्रतापराव तयार झाले व रचना बाई प्रतापरावांना घेऊन कुणालाच न दिसता जायती कडं जाऊ लागली.खोपटात आज गणपाच होता.तो गाढ झोपला होता.नाव काठावरच नांगरुन खुठीला बांधली होती.अजुन घडीचा चंद्र उगवलाच नव्हता.प्रतापराव थोडं दुर उभे राहिले .रचना बाई एकट्याच खोपटात जाऊन परतल्या नाव सोडुन घेत पाण्यात ढकलु लागली. भिकुबा खोपटातुन बाहेर आलाच नाही हे पाहताच प्रतापराव पळतच आले व नावेत बसले.नाव पाण्यात खोल डोहाकडे झेपावली .नाव रचनाबाईच वल्हवत होती. नाव जशी दोन्ही काठाच्या मधोमध आली तसं तिचा वेग मंदावला व ती विश्वतीर्थाकडे जाऊ लागली.आता रचनाबाई परतापकडं असं काही पाहू लागल्या कि जस आता माझं काम झालं मी मोकळी तुला काय करायचं ते कर.परताप ही पिसाळला व तो रचनाकडं झेपावत पिसाळल्यावाणी करु लागला.
" प्रतापराव पोहायला पाण्यात उतरायचं का?" या रचनाबाईच्या सवालानं प्रतापला बुचकळ्यात टाकलं.कारण इतक्या राती आंघोळ व ती पण जायतीच्या या खोल डोहात कि ज्या खोल डोहात पट्टीचे पोहणारे भोई ,कोळी लोक ही दिवसादेखील हिम्मत करत नसत.जायतीनं आता पर्यंत या डोहात किती लोकांना सामावुन घेतलं होतं हे लातुरातुन आलेल्या बाईस माहित नसलं तरी प्रतापला माहित होतं म्हणुन तो का कु करु लागला.पण मदिरेच्या व विषयाच्या लाटेवर स्वार असणाऱे प्रतापराव पाखरु नाराज होईल व अशी सुवर्णसंधी आपल्याच मुर्खपणानं वाया जाईल या हेतुन तयार झाले.त्यांनी कपडे काढले तोच रचनाबाईनं त्यांना पाण्यात ढकललं व स्वताही पाण्यात उडी घेतली.प्रतापरावाच्या मनात थोडी शंका निर्माण झाली कि रात्रीच्या वेळी जायतीच्या भरलेल्या डोहात एक स्री उडी मारण्याची हिम्मत करुच शकत नाही.तितक्यात उगवतीला घडीचा चांद उगवला व त्या प्रकाशात रचनेचा चेहरा त्याला दिसताच थंड पाण्यातही उकळलेल्या तेलाच्या कढईत भजे तळावं तसच आपण तळलं जातोय कि काय असं त्याला जाणवलं."आक्कासाब "!, " अलकनंदा!" तु? साहेबाला न जुमानता रचनाबाई जिल्ह्याला दुपारीच निघुन गेली होती हे प्रतापरावाला माहित असण्याचं कारणच नव्हतं. आपल्याला अकरापासुन खेळवणारी रचना नसुन अलकनंदा आहे हे लक्षात येताच तो झटक्यात सुर मारुन वलवाडीच्या काठाकडं झेपावला.पण आक्कासाब पुन्हा समौरच." मेल्या हरामखोरा परत्या ! माझी रितु कुठाय? तु घेऊन गेलास ना!". प्रताप नं पुन्हा दिशा बदलवत काठाकडं जाण्याचा जिकरीचा प्रयत्न केला.आता आक्कासाब नं परत्याच मानगुट पकडलं व त्याला खोल डोहात बुडवू लागली.जायतीच्या पात्रात घडीच्या चांदच्या साक्षीनं एक खेळ रंगला.पण तो खेळ कोंबडी भुजंगाऐवजी मगरी व कोल्ह्याचा होता.भुकेल्या मगरीनं पाणी पिण्यास आलेल्या कोल्ह्यास पकडावं तसच सुडानं पेटलेल्या आक्कासाब नं कामात मग्न परत्या कोल्ह्याला पकडलं.प्रतापराव झटापट करुन डोहाच्या वर आला.व श्वास घेऊन विनवू लागला."आक्कासाब चुकलो.एकवेळ माफ करा.पण तितक्यात खोल डोहात बुडू लागला. प्रतापराव पहाटेला पुर्वेला शुक्राची चांदणी उगवेपर्यंत एकसारखा विनवत होता" आक्कासाब सोडा मला!सोडा मला! पण विश्वतिर्थाजवळ प्रतापनं अखेरचा श्वास सोडला पण आक्कासाब नं त्याचं मानगुट सोडलं नाही.
सकाळी गणपाला आपली नाव प्रतापरावाचं मढं विश्वतिर्थाजवळ दिसले.वलवाडीत व जिल्ह्याला बातमी गेली.जिल्ह्याहुन गुणवंतरावव त्याच्याकडंच मुक्कामाला असलेले वायकोळे साहेब , रचनाबाई आवळाई भिकुबा सारे आले.उशिरानं फ्लाइटनं संपतराव महानंदा रीतु जिल्ह्याला व तिथुन वलवाडीत आले. संपतरावांनी रितुला कडेवर घेत प्रतापराव सरदेसायास जायतीच्या काठावर अग्नीडाग दिला.बऱ्याच वेळेनंतर लोक परतु लागल्यावर गणपानं आधी रीतुच्या हाती खराटा देत सारी सरकटली तेव्हा जायतीच्या पाण्यात मोठा भवरा उसळला नी गरगर फिरत खोल डोहात सरकत विसावला.मग गणपानं प्रतापरावाची सारी सरकटण्याकरिता संपतरावाच्या हाती खराटा दिला.