पेस्ट कंट्रोल....
लेखक - अक्षय शेडगे...
"पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी गरजू मुलांची आवश्यकता..." अशी वर्तमानपत्रात बातमी वाचत बसलेला दिनेश.... शुभमकडे पळतच गेला...
"ए शुभ्या... जायचं का ह्यांच्याकड? आता घरी बसून लय वैताग आलाय..." हातातली बातमी दाखवत, दिनेश अपेक्षेने शुभमकडे बघत होता....
"जाऊ बाबा, खिश्यात दमडी नाही राहिली आता..." बातमी वाचून शुभम म्हणला....
१२००० पगार, दोघांमध्ये १ गाडी, त्या गाडीचा पेट्रोल खर्च वेगळा मिळणार... असं एकूण काम होत ... दोघं जिगरी खुश झाले ... जोमाने काम करू लागले... त्यांना पेस्ट कंट्रोलचं औषधं आणि पंप हा घरी घेऊन जायला परवानगी होती ... सकाळी फोन यायचा आणि ते थेट त्या पत्त्यावर पोहचायचे....
बघता बघता दोघांना ६-७ महिने झाले काम करून.... काही ओळखी झालेल्या.... मग हे दोघं सुट्टीच्या दिवशी खाजगी ऑर्डर घेऊन पेस्ट कंट्रोलची कामं करू लागले... यामधून त्यांना वरचे पैसे भरपूर मिळायचे....
असाच एके दिवशी सकाळी सकाळी त्यांना फोन आला.... त्या ग्राहकाला काहीही करून त्याच दिवशी पेस्ट कंट्रोल करायचे होते... कारण त्याला बाहेरगावी जायचं होते.... तो दुप्पट पैसे द्यायला तयार झाला ...
"आर, शुभ्या ... ह्या माणसाकडं गेलो तर आज दांडी होईल .... काय करायचं तूच सांग?" प्रश्नार्थक तोंड करून दिनेश बघू शुभमकडे लागला....
"काय नाय होत... जाऊ ह्या माणसाकडं... मी बघतो पुढचं..." असं शुभम म्हणला...
दोघेजण त्या पत्त्यावर पोचले....
तो तीन मजली बंगला होता... तळमजला, पहिला मजला, आणि त्या वरती टेरेस होते... पण ते पूर्णपणे झाकले होते... व तिथे देखील काही सामान होते....
शुभमने खिशामधून मोबाईल काढला... आणि कंपनीमध्ये फोन लावून... " आमची गाडी पोलिसांनी पकडली आहे .. थोडा वेळ जाईल..." असे कळवले....
दोघेजण बंगल्यात शिरले.... तिथे एक वयस्कर माणूस होता... सोफ्यावर बसलेला ... एकूण तळमजल्यावर जास्त सामान होते ... त्या दोघांना त्या माणसाने पाणी वगैरे दिले... व तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता... असं सांगितलं ...
शुभम आणि दिनेशनी पंप आणि औषधं तयार करायला सुरुवात केली.... इतक्यात दारातून एक मुलगी पळत पळत घरात आली .... "बाबा पोलीस, बाबा पोलीस.... बघा केवढी मोठी बंदूक आहे... ओ... ओ काका... आम्हाला नका मारू ना" असं जोरजोरात ओरडू लागली... आणि त्या माणसाच्या पाठीमागे जाऊन त्याला घट्ट बिलगून एका डोळ्याने ह्यांच्याकडे बघू लागली....
"सानु बाळा.... हे दादा पोलीस नाहीत.... आपल्या घरात झुरळं झालीत ना... त्याच औषधं मारायला आले आहेत ग... नको घाबरु त्यांना..." असं म्हणत त्या माणसाने तिची समजूत काढली....
एकंदरीत त्या मुलीचे वय ३० पेक्षा जास्त होते... त्यामुळे ती मतिमंद आहे... हे एव्हाना दिनेश आणि शुभमला समजले होते....
"एक काम कर दिन्या... तू टेरेसपासून सुरू कर... मी तो पर्यंत पहिला मजला उरकतो.... मग दोघं मिळून तळमजला बघू... तिथं लय सामान हाय..." असं शुभम ने दिनेशला सांगितलं... व दोघे आपापल्या कामाला निघून गेले ....
पहिल्या मजल्यावर पोहचताच...शुभमने दरवाजा उघडला.... त्या खोलीमध्ये जास्त सामान नव्हतं ... एक बेड... आतल्या बाजूला किचन होत .. पण ते पूर्णपणे रिकाम... आणि गॅलरीच्या दिशेने तोंड केलेला बैठी पाळणा .... पण शुभमच्या नजरेला एक गोष्ट अशी दिसली.... जी थोडी वेगळी होती... ती म्हणजे ... समोरच्या मुख्य भिंतीला एक ६ फूट उंचीचे छायाचित्र होते.... एका विवाहित स्त्रीचे होते ते.... हिरवी साडी... हातभर बांगड्या... गळ्यात विविध प्रकारचे दागिने....कपाळावर गोल कुंकू ... आणि चेहऱ्यावर स्मितहास्य.... ते छायाचित्र हे थोडा वेळ बघितलं तर जिवंतच भासेल... असं होतं.... शुभम एकटक त्या छायाचित्रकडे बघत होता.... थोड्या वेळाने तो भानावर आला ... आणि आपल्या कामाला सुरुवात केली ... पण... काम करत असताना त्याच लक्ष नेहमी त्या छायाचित्राकडे जात होत.... संपूर्ण बेडचं पेस्ट कंट्रोल संपायला आल होत ... ते चित्र त्याच्या पाठमोऱ्या दिशेला होत ... तो त्याच्या कामात व्यस्त झाला होता ... इतक्यात त्याच्या कानाजवळून थंड हवा गेल्याच त्याला जाणवलं..... त्याने मागे वळून बघितलं .... आणि त्याच्या अंगातून प्राण निघून गेल्यासारखं त्याला वाटलं ... कारण पूर्णपणे भिंत व्यापलेलं ते चित्र... आणि त्या चित्रामधील ती बाई गायब झाली होती....भिंतीवर फक्त रिकामी फ्रेम राहिली होती....
हे बघून शुभम खूप घाबरला .. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते ....
आणि त्याच्या नजर फिरली .... त्याला दिसलं की.... गॅलरी बंद होती... हवा जास्त नव्हती त्या खोलीत .. तरीही समोर असलेला पाळणा... जोरजोरात हलत होता ... जणू त्याच्यावर कोणतरी बसलं आहे....
शुभम बंद दरवाजा उघडण्यासाठी धावणार इतक्यात दरवाजा आपोआप उघडला.... आणि तिकडून ती मुलगी.... धावत धावत पाळण्याकडे, आई - आई ओरडत गेली .. आणि ती जवळ जाताच पाळणा जागीच थांबला... आणि ती बसल्यावर पुन्हा हलू लागला....
हे बघून शुभमच्या तोंडून जोराची किंचाळी फुटली ... व त्याला चक्कर आल्यासारखं झालं.... त्याने डोळे उघडले तेव्हा तो तळमजल्याच्या खोलीत होता ... दिनेश त्याच्याकडे काळजीने बघत होता.... तो माणूस आणि ती मुलगी दोघेही तिथेच होते..
"ए बाबा,, ती बाई कोण आहे? फोटोमधून डायरेक्ट गायब झाली.... माझा तर जीवच गेला असता.." शुभम थोडा भांडण्याच्या सुरात ओरडला....
"सांगतो मी... सगळं सांगतो... फक्त तू आधी शांत हो .. आणि थोड पाणी पी..." काही हावभाव न देता तो माणूस शून्यात बघू लागला.....
"मी सदानंद.... ही माझी मुलगी.. "सानू"... आणि वरती जो फोटो तुला वाटला... तो फोटो नाही... तर प्रसिध्द चित्रकाराने रेखाटलेले चित्र आहे... माझ्या पत्नी "मालिनी"चं..., आमची सानू जन्मापासूनच अशी आहे... त्यामुळं आम्ही तिला खूप जपत आलोय... ही दुनिया किती वाईट असू शकते हे तिला माहीतच नाही .. मलिनीचा खूप जीव आमच्या सानुवर... सानूनंतर कोणतं अपत्य तिने होऊन नाही दिलं, तिची पूर्णपणे काळजी घेता यावी यासाठी .... ७ वर्षापूर्वी... कॅन्सर सोबत लढता लढता माझी मालू स्वर्गवासी झाली .... पण करणार काय ओ ती... तिचा जीवाचा तुकडा इथ जो राहिला होता... मग तिला कसं करमेलं तिकडे...." असं म्हणत ते थोडे भावनिक झाले...
"म्हणजे? नक्की काय बोलताय तुम्ही?" शुभमने त्यांना प्रश्न केला...
"अरे, मालिनी गेल्यापासून सतत तिचे भास होऊ लागले.... सानुच्या अवतीभोवती तर हमखास ती आहेच असं वाटायचं... मला सगळं समजून गेलं... म्हणून तिचा पाळणा आणि बेड वरच्या मजल्यावर ठेऊन दिला... आणि तिच्या स्वयंपाक घरासोबत काहीच छेडछाड नाही केली... सगळं वर जसच्या तसं आहे... ती सानुच्या काळजीपोटी इथेच थांबली आहे... आणि मलापण ती इथेच हवी आहे.... तुम्ही जेवढ काम केलं त्यासाठी धन्यवाद ... हे घ्या तुमचे ठरलेले पैसे... आपण येऊ शकता.."
हे ऐकून दोघांनी वेळ न दवडता... पैसे घेतले आणि तिथून निघून आले.... मनामध्ये सानुसाठी थोडी माया दाटून आली होती... पण झालेला प्रसंग आठवून... ती माया बाहेर न काढता... त्यांनी घरचा रस्ता पकडला....
धन्यवाद...