दरवाजे -Door Horry Story in Marathi
मोठ्या हिकमतीने सदाशिव अंगावरील नेसत्या वस्त्रानीशी आपले काचके बोचके सांभाळत गंगाबाईला सोबत घेत त्या रात्री घराबाहेर पडला होता. संबंध गावात जिथे तिथे एकच चर्चा सुरु झाली. अखेर इतक्या अवसेच्या मध्यरात्री सदाशिवला घर सोडायची वेळ का आली असावी?? कोणी मध्यरात्रीच्या सुमारास गावच्या वेशीबाहेर खडबडीत रस्त्यावरून चाललेली सदाशिवची बैलगाडी पाहिली. तर कोणी त्या दोघांना अंधारात पायी पायी जाताना पाहिले. तर कोणी म्हणे सदाशिव आणि गंगाबाईने नदीत उडी टाकली. खरंखोटं देव जाणो पण एक मात्र नक्क्की.... त्या रात्रीनंतर गावात सदाशिव पुन्हा केव्हाच दिसला नाही. गंगाबाईसुद्धा कोणालाच दिसली नाही.
सकाळी सकाळी रामप्रहरी गावच्या पारावर एकच गलका उडाला होता. बजातात्या मोठंमोठ्याने जमलेल्या मंडळीना तावातावाने काल रात्रीची गोस्ट ऐकवत होता.
रात्रीच्या सुमारास कांद्याला पाणी द्यायला वावरात गेलो होतो. दुरूनच हाताशी गाठोडी घेतलेली एक जोडी तरातरा स्मशानाच्या मागल्या बाजूने चालत निघाली होती. सांगताना बजातात्याचा आवाज वरखाली होत होता.
त्यात काय इशेश हितक !! त्यो सदाशिवच असणार... कुठूनतरी जमलेल्या टाळक्यातून आवाज आला.
आर पण असं काय घडले कि त्याने रातीला घर सोडून दिले?? पुन्हा कोणीतरी तोच प्रश्न विचारला.
कुठल्यातरी बाबाच्या नादाला लागला हाय त्यो... घर दार सर्वच फुंकून टाकले त्या गड्याने.. त्या नादात..... कोणीतरी खाजगीतील बातमी सांगून टाकली.
सगळ्याच अंधारात बाण मारलेल्या गमजा.. खर कारण कोणालाच माहिती नव्हते. सदाशिवचे कुटुंब प्रकल्पग्रस्त म्हणूनच या गावात हल्लीच काही वर्षापूर्वी पुनर्वसीत झाले होते. गावापासून लांब असणाऱ्या रानात सदाशिवने घर बांधले. त्याचा पोटापाण्याचा कोणता व्यवसाय होता हे कळायला मार्ग नव्हता. मुद्दाम संपूर्ण गावात तो अलिप्त असल्यासारखा वावरत असे..जास्त कोणाशी बोलणे नाही कि कोणात उठबस नाही.
असा हा सदाशिव एका रात्री दोनचार गावकऱ्याना दिसून कुठे निघाला होता याची कोणालाच कल्पना नव्हती.
संत्तुक हल्लीच तुरुंगातना सुटून आला होता. त्याचे खर नाव कोणते?? याची काही काही वेळा त्याला सुद्धा कोडे पडे.. शहरात एका मोठ्या बंगल्यात रात्रीची चोरी झाली. नेमक्या पोलिसी गस्तीमध्ये संत्तुक पकडला गेला. दीड वर्ष तुरुंगात काढल्यावर तो हल्ली गावात रिकामा पडून असे.
गावाशेजारी एका रानात एक भरले सरलेले घर बंद पडून आहे. सगळ्या चीजवस्तूसकट... !!
वाऱ्यावर उडून कानावर येणाऱ्या गावगप्पा त्याच्या कानावर सुद्धा आल्या होत्या.
थोडीफार हातसफाई करायला हरकत नाही.. निदान पुढची सहा महिने बिनघोर जातील.. तोंडातील जळत्या विडीचे थोटक हातातील बोटात पकडत त्याने डोके खाजवले.
सांज निवळली.. गावपांढरी घराघरात विसावली.
एक चांगले जाड गोणपाट संतूकने दुपारीच गावातून लांबवले. रात भरभर सरसरत गेली. घड्याळात रात्रीचे बारा वाजून आले तसा तो उठला. खिश्यातून चुनातंबाखू काढून एकदा डबल बार भरला. आणि वाऱ्याच्या वेगात तो रानात जाऊ लागला.
संपूर्ण गावात ढीम्म काळोखाचे साम्राज्य पसरले होते. कुठेतरी दुरून एखाद निपचित् पडून राहिलेले मरतुकड कुत्र अधूनमधून विव्हळत होत.
आता घर फोडायचे म्हणजे कटावणी सोबत असावी पण ती वापरायची वेळच त्याच्यावर आली नाही. संपूर्ण घर उघडे होते. दारात कडीकोयंडा नावालाच होता. कुलूपसुद्धा नव्हते.
आपण सर्व चोराअगोदर इथे पोहोचलो म्हणून त्याने स्वतःच्या नशिबाची वाह केली. दार अलगद ढकलून दिले.
गोणपाटात तांब्या पितळच्या वस्तू.. हाताला जे लागेल आणि जेवढे उचलता येईल अशा वस्तू त्याने भरभर भरायला सुरुवात केली.
पाच एक मिनिटात गोण अर्धीआधीक भरली. अजून काही किमती चीजवस्तू अंधारात सापडतात काय हे पाहण्यासाठी त्याने आजूबाजूला नजर फिरवली.
त्या लाकडी वाश्यात अंधारात काहीतरी चमकून जात होते. त्याने काडेपेटी पेटवली आणि त्या दिशेने तो हलकेच जाऊन पाहू लागला.
गहीऱ्या काळोखात आगीचे तेज पडताच ती सुवर्णमूर्ती झळाळली. त्या पिवळसर सोनेरी मूर्तीच्या परावर्तित प्रकाशात तो कोपरा चमकला.
संतूकचे पाय थरथरु लागले. इतक मोठं आयत घबाड्ड हाती लागताना पाहून तो काहीसा सरबरीत झाला. घाईत तो शेजारच्या माळ्यावरुन सरसर वर गेला. पोटमाळ्यावर संपूर्ण घराचे निरीक्षण करणारी ती मूर्ती त्या वाश्यातून तो बाहेर काढू लागला.
वाश्यात बसवून ठेवलेली मूर्ती अगदीच घट्ट बसवली गेली होती.
अर्रर्रर्र तिच्या आय#@ कशीबशी जोर लावून ती मूर्ती त्याने बाहेर काढली पण या झटापटीत त्या लाकडी वाश्याला त्याचची बोट सोलून निघाली. त्या रासवट हातांच्या बोटातून काळेनिळे पडलेले लालभड्क रक्त त्या लाकडी वाश्यांवर निथळू लागले. आपले बोट अशीच झटकत त्याने पुन्हा एकदा काडेपेटी शिलगावली.
एखाद्या शापित यक्षयोनीतील एखाद्या प्राचीन असुराची रचना असलेली ती मूर्ती.. संपूर्ण सोन्यात मढवलेली.... डोळे खास लालचुटुक माणिकमोत्याचे..... वजनाला प्रचंड भरीव अगदीच दोन चार किलो इतकी !!!
त्याच्या डोक्यात विचारचक्र धावू लागले. सोने पन्नास हजार तोळा म्हणजे किती पाच लाख कि धा लाख मरू दे... अगोदर सटकायला हव.....
पण काहीतरी बिनसल्याचे त्याला जाणवू लागले. त्या उदास निर्विकार दिसणाऱ्या मूर्तीच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे विखारी हास्य दाटू लागले होते. हातातील एकूणएक संवेदना बधिर होऊ लागल्या. बोट प्रचंड ठणकु लागली. डाव्या हाताची एकूण एक बोट पंजातून गळून गेल्याचे त्याला जाणवू लागली. हातातील मूर्तीचे एकाएकी तापमान वाढू लागले. कशीबशी त्याने ती गोणपाटात सारली. या विलक्षण झटक्यात आपली पंजाची एकूण एक बोट गळून गेल्याचे त्याने अंधुकश्या उजेडात पाहिले. आणि भिती त्याच्या डोक्यात दंगा करू लागली. छाती धडधडू लागली.. संपूर्ण श्वास वरखाली होऊ लागला.
उंदीर पकडायच्या सापळ्यात अलगद सापडलेल्या केविलवाण्या उंदरासारखि त्याची अवस्था झाली.
अचानक पोटमाळ्यावर धडधड होऊ लागली. लाकडी वासे... तुळया हादरु लागल्या.
पाठीमागून इतकं दिवस उघडे असलेले दार एकाएकी जोराचा धाप आवाज करत बंद झाले.
त्या लाकडी वाश्यामधून एक लाकडी वासा सरसकट खाली कोसळून गेला. संतूकच्या डोक्यात त्याचा आघात होऊन काही सेकंदात त्याचा खेळ आटपला. हळूहळू ते लाकडी वासे त्या मानवी रक्ताच्या ओघळाना शोषू लागले होते. ती असुरी मूर्ती पुन्हा जागृत झाली होती. ज्या सैतानी लाकडाना नियंत्रण करण्यासाठी तिला त्या वाश्याच्या खोबनीत बसवले गेले होते. त्याची मोठी किंमत संतूकला चूकवावी लागली होती.
मध्यंतरात....
सदाशिव आपली पत्नी गंगाबाईसमेत त्या विचित्र दिसणाऱ्या बाबापुढे बसला होता.
घर बांधतोस ठिक आहे पण जर पैका खोऱ्याने पायजेल तर अगोदर मी सांगेन तस करावे लागेल... या समोर दिसणाऱ्या वठलेल्या झाडाला कापून त्याचे वासे तुला घरात बांधावे लागतील...
याच झाडाचे का पण??
सदाशिव काहीसा नवलाईने बाबाला म्हणाला.
हे सतावलेले झाड आहे. सैतानी यक्षाचे झाड...
कायमच माझ्या तांत्रिक प्रयोगाला बळी पडलेलं... याचे वासे तुझ्या घरात बसवले कि आजूबाजूच्या जमीनीच्या आत दड्वून ठेवलेले अगदी भुयारात लपवून ठेवलेले गुप्तधन तुझ्या घरात येईल.. ती मूर्ती जिथवर त्या लाकडासोबत आहे ती राखण ठेवेल त्या सोन्याची.....
महिन्यातून एकदा रक्त द्यायचे तिला.. बस्स इतकच
राजीख़ुशीने सदाशिवने त्याचे घर पुन्हा नव्याने बांधून घेतले. त्या सैतानी यक्षाचे निवासस्थान असलेल्या वठलेल्या वृक्षाचे वासे घरकामाला वापरले.
त्या रात्री गंगाबाईचा माळ्यावर तोल गेला. खाचगळत ती त्या पोटमाळ्यावर आपटली. डोक्याला खोक पडली अंधारात कुठेतरी रक्ताची
धार त्या मूर्तीवर ओघळली. संबंध वासे जागृत झाले. घर हादरु लागले. तळघरात लपवून ठेवलेले सोने बाहेर येण्यासाठी दरवाजाला धडकु लागले.
मूर्तीतला धीरगंभीर यक्ष गंगाबाईसमोर आकार घेऊ लागला होता. रातोरात सदाशिव आणि गंगाने रानातले घर सोडून दूर कुठेतरी पलायन केले होते. अंधारात पळत पळत जाणाऱ्या त्या जोडप्याला बजातात्याने मात्र अचूक ओळखले होते.
समाप्त.
![©️](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/ta1/1/16/a9.png)
![®️](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/tcd/1/16/ae.png)
संदिप मुणगेकर
#MSR
कथा लिहायला आणि सुचायला खूपच वेळ कमी घेतलाय. चूकभूल माफी असावी.