#भुताची_कोंबडी
गावाला सकाळची जाग मंदिरातल्या कल्ल्यानच आली. मंदिरातल्या गुरवाची बायको पाहटं धुण्याला नदीवर गेलेली. तिथून आली तशी घरातलं रांधलेलं सार आण बका-बका खाल्ली आन उंबर्यात बसून घुमायला लागली. सकाळ सकाळी दारातून शेताकड येणा-जाणारा सारा गाव गुरवीनी कडं तिरका बघून जात होता. ती बी परतेकाला निरखून बघत होती. एका लयीत तिचं घुमनं आन येणा-जाणाऱ्याला न्याहाळण सुरूच होतं.
देवळातली पूजा उरकून गुरव दारात आलं तर ही बया दारातच बसून घुमत होती. तिचे लाल झालेलं डोळे. ईस्कटलेली केसं आन तिची लय बघून सारा घोळ गुरवाच्या लक्षात आला. लागलीच त्यानं चार माणसं गोळा केलीत. ती पाच जण संगतीन गुरविणी ला देवळा कड वढत वढत न्यायला बघत होतीत. खरं ती बाय काय जागची हालली नाय. त्या पाच जणांची दमछाक बघून अजून पाच-सा जण न बोलवता जमलीत. आन इथन गावात कल्ला सुरू झाला.
ती धाच्या धा जणं गुरविणी ला अक्षरशः उचलून देवळात ठेवीत आन ती बया त्याच जोरानं आरडत देवळाच्या बाहेर यायची. उशीर झाल आसच सुरू होतं. निम्मं गाव ह्यो खेळ बघत हुता. चिल्ली-पिल्ली तर पॉट धरून हासाय लागलीत. गुरव बी आता हैराण झाला व्हता. त्यानं देवळातला भंडारा तिला लावला तरी ती शांत हुइना. नारळ फिरवून टाकला तरी बी गप्प बसना. तंत्र-मंत्र म्हणलं तरी तीच गत. जमलेली सारी बाया-बापडी तोंडात बोटं घालुन समदं बघत होतीत. सगळीच दमलीत. तीच नुसतीच घुमनं सुरूच होत.
तवा गर्दीतून एकान आवाज दिला " हाळावरच्या तात्या ला बोळवण धाडा की गुरव. ह्य झाड त्याच्याशिवाय कोणाला ऐकायचं नाय"
'तात्या ! तात्या का म्हणून माझी मदत करल' गुरवान मनोमन विचार केला. 'गावात जादूटोणा-काळीविद्या करतो म्हणून मीच तर त्याला गावाबाहेर हाळावर रवाना केलंत. पण आता नडीला बोलावलं तर पायजेच. ह्य भूत उरावर घेऊन बसायचं हाय काय तेवा'.
हाळावर तात्याला बोलावणं गेलं. सकाळ सरली. दुपार निम्म्यात आली तेवा तात्याच आगमन झालं. 30-35 शीचा तात्या. पांढरा सदरा आन पांढरी पॅन्ट घातलेला तात्या आन त्याचा खांद्यावर बसलेली त्याची आवडती कोंबडी 4-5 वाजता देवळाजवळ आलीत. तात्याची कोंबडी खास होती. उलट्या पकाची कोंबडी होती ती. तीच त्याला भुतं काढायला मदत करायची आसं गावभर हुतं.
गुरविण अजून बी घुमत देवळा समोर बसून होती. तिचा जोर तसाच्या तसा व्हता. तात्या गुरविणी च्या समोर बसला. मान डावीकड उजवीकड करून तिला न्याहाळू लागला. तशी दोघांची तोंड देखली ओळख व्हती पण हे आतलं भूत तात्याला वळखायच होतं. ते भुतं बी टक लावून तात्याला नजर देत होतं.
"काय रं वळख पटतीया का नाय अजून"
आजूबाजूची लोक चवीनं समोरचा देखावा बघू लागलीत आता. सकाळ पासन भूत पहिल्यादा काय तर बोललं होतं.
" वळखल आसत तर कवाच नायनाट केला असता तुझा. बांधून टाकलं आसत तुला बी माळ्यावर. कोण हायस तू आन गुरव बाईला का धरलंयस बोल"
"का रं ! बांधून टाकणार होय मला ? आता बांधा-बिनदायचा धंदा सुरू केलास होय. पह्यल्या सारखं खोटी वचनं वायदं देऊन भुतं काढायचं बंद केलंस जणू "
तात्या जरा हापापला 'कसली वचनं अन कसली वायदं. कुणाला काय शबुद दिलता आता म्या? कनच भूत मागं फिरून आलंया आता काय माहित' मनोमन तात्या विचार करू लागला.
" तुझं माझं काय असलं ते मग गुरव बाईसनी का म्हणून धरलयास."
" हिनं..... हिनं पाट मोडला माझा. म्हणून हिला धरलं. सुटलो तसा तुला हुडकतुया शेवट तूच आलास नव्ह इथं" आसं म्हणून त्य भूत गडागडा हासाय लागलं. जमलेला गाव घाबरा-घुबरा झाला. आतापतूर तात्या भुताच्या मागावर असायचा आन आता ह्य कनच भूत हाय जे तात्या च्याच माग लागलंय आस म्हणत सगळे कुजबुजू लागली.
इकडं तात्या पन इचार करू लागला. त्याचा त्यालाच ताळमेळ लागत नव्हता. आता आठवत बसायला वेळ नवता. तात्यानं पुढचा सवाल टाकला
"बाईसनी सोडायचं काय घेशील.... आपापल्या हिशोबाचं परत बघू "
"आर रांडच्या तू मला काय देणार रं भिकाऱ्या...... हावऱ्यागत तूच माझ्या कोंबड्या ठिउन घेतल्यास आन आता मला द्यायची भाषा करतोयास व्हय रं"
सारा गाव चिडीचूप होऊन ऐकत होता. तात्या आता जरा सावरून बसला होता.
"ह्या गुरविणी न बी हाव दावली. उजडायच्या पारास माझी कोंबडी दामटली हीनं. माझ्या समद्या कोंबड्या वापीस करायच्या नायतर ह्या गुरव बाईला काय मी सोडत नाही"
त्या भुताच्या शेवटच्या आवाजात गर्जना व्हती. धमकी होती. हिकडं गुरव बी भ्यायला होता. 'काय बी कर पर माझ्या बायकोला वाचीव आशा दिनवाण्या नजरेनं तो तात्या कड बघत व्हता.
त्याच झालं असं होतं की खूप आधी तात्यान एक भूत उतरवायला भला मोठा उतारा सांगितला होता. त्यामध्ये सात कोंबडयांचा पण समावेश होता. त्या पीडित घराने आहे तसा उतारा तात्या कड सोपवला. परत तात्या च मन बदललं. त्यानं त्यातली एक कोंबडी स्वतः जवळ ठेवली रातच्याला कापायची म्हणून. एका कोंबडीन काय फरक पडणार आसा विचार होता त्याचा.
तात्याची एक ट्रीक होती. उतारा ठेवला की तो तिथंच राखत बसायचा. आणि भूत उतारा न्यायला आलं की तिथल्या तिथं त्याला फरशी खाली दाबायचा (ऐकीव)… त्या भुताच पण तेच केलं होतं त्यान मग त्या भूतान मला एक कोंबडी कमी दिली म्हणून उलटायचा प्रश्नच नव्हता. मग आजच्या पहाटे गुरव बाई धुण्याला गेल्यावर तिला एक गलेलठ्ठ गुबगुबीत कोंबडी दिसली. आसपास आणि सोबत कोणीच नव्हतं. बाईंनी कोंबडीचा गळा पिलगाळला. तिला धुण्याच्या पाटीत ठेऊन वरून धुतलेले कपडे ठेऊन झाकून घरी आणलं आणि घरी येऊन घुमा-घुमी सुरू झाली. तिने मारलेली कोंबडी त्याच भुताची होती म्हणे.
त्यानंतर तात्याने काय तो उतारा करून यावेळी कोणती ही हाव न करता तो उतारा ठेवला आणि परत न फिरन्याचा वायदा ही करून घेतला. भुताच्या उताऱ्याला उलट्या पंखाच्या कोंबडयांच का देतात याच शास्त्र आणि लॉजिक तर माहीत नाही पण तसं करतात हे नक्की माहीत आहे. वरती खूपशा गोष्टी इलॉगिकल वाटतील/ आहेतच पण खऱ्या आहेत आणि भुताखेतांच्या गोष्टीत लॉजिक लावत बसलं की त्यातली मज्जा जाते.
#सत्यघटनेशीप्रेरित
By Trupti Shinde-Yewale