आसनगाव रेल्वेस्टेशन वरील घड्याळात अकराचा टोल झाला.एरवी यावेळपावेतो स्टेशनाच्या फलाटावर ठाणे- कल्याणवरून येणाऱ्या चाकरमाने, इतर कामगाराची वा शहापुर परिसरातुन मुंबईकडं परतणाऱ्यांची तुरळक गर्दी दिसायची.पण आज अगदी बोटावर मोजता येतील एवढेच पॅसेंजर व इतर लोक जीव मुठीत धरुन बसलेले होते.सह्य पर्वतातुन येणारा थंडगार वारा व मरणाचा तुफानी पाऊस लोकांसहित साऱ्या स्टेशन परिसराला अक्षरश: झोडपत होता.जणु साऱ्या सह्य पर्वतातले मेघ आसनगावातच जमा होऊन ढगफुटीच झाली होती.प्रपातासमान जलौघ अभ्रातून कोसळत होते.रेल्वेरूळ पाण्याखाली बुडण्याच्या बेतात होते.सोबत थंडगार तुफानी वारा सुं सुं साय साय करत जलौघांची दिशा बदलवत होता.दोनेक भिकारी आपली भिजलेली फाटकी गोधडी आवरत तिकीट खिडकी कडं सरकत होते .पाच-सात प्रवाशी आपलं लगेज सावरत थुडथुड करत त्यांना दटावत बाजुला करत आधीच स्टेशनमास्तराच्या कॅबीनमध्ये घुसुन अंग आकसुन बसले होते.मध्येच सुपरफास्ट गाडी आली व जड आवाजात निघून गेली.एरवी तिच्या आवाजानं सारं स्टेशन दणाणून गेलं असतं पण पावसाच्या आवाजानं गाडीचा आवाज सर्दी झाल्यागत सर्दाळलेलाच वाटला. फलाटावरील खांब्यांचे लाईटही आज जो पिवळा प्रकाश फेकत होते तो ही जणु या मरणाच्या पावसात भिजून सर्दाळला होता.आता कमी होईल या आशेवर लोकं होते पण त्यावर जोरदार पाणी फिरवत पाऊस वाढतच होता.आजुबाजूची झाडं तर शरण गेल्यागत पाण्याच्या भारानं माना टाकुन वाऱ्याच्या दिशेन जड भिनाट वाहत होते.
कसारा घाटाकडं जाणारी लोकल आली तशी एक केळेवाली केळ्याचं खाली ढालं डोक्यावर उपडं ठेवत धावतच गाडीत शिरली.तोच बालानं दादऱ्यावर पुर्ण भिजलेल्या सदानंदाला बखोट धरुन उठवत "सदादा बस कर रे आता !किती रिचवशील ,पुरे आता!,चल शेवटची लोकल आहे वाटतं हिच्यानं कसारा जाऊ .तिथनं पुढे पाहु.इथं फास्ट थांबत नाही मग ?",अशी विनवणी करत सारखा उठवत होता.
"बाला,जिंदगानीनं या जिवाला आधीच उठवलं फक्त तुझ्यासाठी तगलोय मी!तर दोस्ता तु ही उठवायला लागला!,नको रे उठवू.या साऱ्यांनी मिळून मला उठवलंच रे.निदान तु तरी नको ना उठवु."सदानंद नशेतच बरडत दादरा धरुन फतकल मांडुन बसला होता.अंगात उच्च प्रतीची भिनत असल्यानं पावसावर व वाऱ्यावर त्यानं मात्र मात केली होती.पण बाला घेतच नव्हता म्हणुन भिजुन त्याची कुल्फी झाली होती व रात्रही वाढत होती.आता परत मित्राकडं जाणंही बरोबर नव्हतं कारणं उदघाटनाचा कार्यक्रम आटोपुन तो ही झोपण्याच्या तयारीत असेल.व मुंबई हुन रुमवरून निघतांना गजा अण्णांनी पाठवलेली 'लगेच घरी ये',ही तारही सदानंदाला दाखवली होतीच.पण सदानंदानं "घरी"असा वैफल्याचा उसासा टाकत जाऊ वाटलं तेव्हा सांगत मित्राच्या दवाखान्याच्या उदघाटनाला कालच शहापुरला आणलं होतं.आता मात्र सदानंद दादऱ्याच्या खाली पाय सोडत लोकलकडं पाहत "बाला ही लोकल अण्णाच्या घरी धनवाडीला घेऊन जाईल पण ज्या धनवाडीत 'सुलेखा-माझी सुली' नाही त्या धनवाडीत मी काय करु.मी थकलोय रे आता शोध घेऊन घेऊन.कुठं शोधू मी?,शोध थांबला आता.आता मीच परततो. पुरे आता हे जिणं" बरडू लागला.
त्याचं हे ह्रदय फाडणारे बोल ऐकुण बालाची थंडी कुठेच पळाली व तो अधिकारवाणीनं म्हणाला "सदादा काय हे अभद्र बोलतोस".
"अरे बाला संतापु नको ना.आणि बघ हे अभद्र वैगेरे असले जड,फालतु शब्द काय धरून बसलास बाबा.तु माझा मित्र ना?, नाही तर बघ साल्या त्या सल्याला.आज दिप अमावास्या तरी उगाच लोक नाही सांगत असतांना मुद्दाम आजच्याच दिवशी दवाखाना ओपन केला.काय साॅलीड डेरींग केलीय त्यानं.म्हणे दिवटी अमावास्या अशुभ असते.त्याचं नावच पहा नारे ' सलीम जाॅन कदम ' साला नावातच तीन तीन धर्म घेऊन फिरतोय.आई यवन बाप ख्रिश्चन तर आज्या हिंदू.तरी डाॅक्टर झालाय तो.आणि बाला तु सारखा अभद्र घेऊन काय बसलास'सदा बरडतच होता.
सदानंदनं दादराचा कठडा धरुन उठत खिशातून विनस्टन काढुन लाइटरनं पेटवली व पडत्या पावसात धूर फेकू लागला. दूर रुळावर अमावस्येच्या अंधारातही लाईटच्या फिक्कट पिवळसर प्रकाशात कुणीतरी उभं असल्याचं दिसलं.इतक्या तुफानात कुत्रदेखील निवारा शोधत असतांना रुळावर ही काय करत असावी.विनस्टनच्या झुरक्यानं फुल्ल टल्ली असुनही सदानंदला तरतरी आलीच होती.म्हणुन त्यानं त्या स्रीकडं बोट दाखवत "बाला माझ्यासारखीच ती ही उबगली असावी कि काय बघ ती पण गाडीचीच वाट बघतेय बघ.तिला जाऊन सांग सदानंदही येतोय त्यालाही येऊ दे सोबतच धडक देऊ रेल्वेला".
बालानं तिकडं नजर वळवली तर साडी हवेनं उडत होती.पडणाऱ्या पावसातही कुठलीच घाई नाही या पावित्र्यात ती दोन्ही रुळामध्ये स्टेशनापासुन दूर उभी होती. बालाही चक्रावला.त्याला सोबत घेत सदानंद दादरा उतरू लागला व धबाधबा कोसळणाऱ्या पावसात त्या बाईकडं सरकु लागले.तरी ती शांत निश्चल उभीच.तितक्यात कर्र कडकडकडकटाटकडsssssकरत प्रकाशाचा लोड आभाळातुन डोंगराच्या शिखरावर झेपावला.त्या प्रकाशज्योतात कानठळ्या बसुन काळजाचा थरकाप झालाच पण त्याही पेक्षा जोराचा धक्का त्या प्रकाशात त्या बाईकडं पाहुन दोघांना बसला.
"सुले तु?,आणि इथं ?"
परमेश्वरा जिच्यासाठी मी आज सरणावर चढणार होतो तिच माझ्याआधी सरणावर चढत होती"सदानंदानं थरथरत टाहो फोडला.
सुलेखालाही त्यापेक्षा जोराचा धक्का सदाला पाहुन बसला व तीच्या कोरड्या बावेसमान झालेल्या बावेतुन सह्य पर्वतातील पावसासारखेच अश्रुओघ फुटले.सदानंदानं तिला तिथंच कवेत आवळलं व तो आभाळातील ढगापेक्षाही मोठ्या आवाजात तो हमसू लागला."सुले चार वर्षांपासून रोज मरत मरत जगत आलो गं मी.कुठं गेली होतीस मला सोडुन?"सदानंद आवेगातच विचारु लागला.तो नजारा पाहुन बालाचेही अश्रु पावसात मिसळले.कदाचित हा मिलन सोहळा पाहण्यासाठीच पाऊस तळमळत असावा व त्याच तिरमिरीत तो अख्ख्या सृष्टीला झोडपत असावा.तोच सुलेखानं भानावर येत आपण काय ठरवलं होतं याची जाणीव झाली असावी म्हणुन मिठीतुन अंग सोडवलं.
"बावळटांनो कसारा घाटातुन गाडी येतेय बाजुला सरका आधी मग हवं तर मी ही रडू लागतो सोबत.पण आधी स्टेशनात चला",बालानं रडतच त्यांना विनवलं
बालानं स्टेशनाबाहेरुन कसाबसा चहा शोधुन आणुन जबरीनं सुलेखाला पाजला व स्वत:ही प्याला. सुलेखाला कुठं जायचं म्हणुन खोदुन खोदुन विचारलं पण तिलाच समजत नव्हतं. घरुन निघतांना जबना आत्याकडं धनवाडीला जायचं किंवा या जगाचा कायमचा निरोप घ्यायचा या इराद्यानं ती निघाली होती.पण आता जगाचा निरोप घेणं तुर्तास शक्य नाही म्हणुन ती पडणाऱ्या पावसाकडं पाहत उभी राहिली.
"बाला,मरणाला मिठी मारायला निघाली होती ती.चल मुकाट्याने बाहेर जा व कसं ही करुन टॅक्सीचा बंदोबस्त कर.आधी ठाण्याला फ्लॅटवर जाऊ मग पुढचं पाहू."सदानंदानं सुलेखाची मर्जी न विचारताच बालाला फर्मावलं.सुलेखानंही विरोध न करता मौन पाळलं.
बाला भर पावसात स्टेशनाबाहेर पडला वपुढच्या दहा मिनीटात टॅक्सी घेऊन आला.
दुसऱ्या दिवशी सदानंद बालाला फ्लॅटवरच ठेवुन सुलेखाला घेऊन डहाणू घोलवडच्या आपल्या चिकूवाडीतल्या फाॅर्म-हाऊसवर निघाला.सुलेखाला आपलं वारु आता कुठंही भरकटलं तरी निदान नावाडी आहे हेच खुप असा विचार करत ती शांतपणे मागोमाग निघाली.
डहाणु तालुक्यातील थरगाव हे गजा अण्णा सावंतांचं सासरवाड.येथे त्यांनी पंचवीस एकराची जमीन विकत घेऊन चिकू लागवड केली होती.शेतातच फार्महाऊस बांधून राहण्याची उत्तम सोय केली होती.सदानंदानं सुलेखाला याच फार्म हाऊसवर नेलं. गेले चार दिवस इकडं बालाशिवाय कुणीच फिरकलं नाही. चार दिवसापासुन धरती जशी आभाळाला शरण जाऊन संपृक्त होत होती त्याप्रमाणच सुलेखानंही समर्पण केलं. कारण या चार वर्षात मधुनं नकार देऊनही ओरबाळच होतं. सदा तर तिची पहिली निसर्गदत्त उर्मी होता. शिवाय मरणाच्या दारातुन फिरल्यानंतर पुढचा आधार आता तोच होता. घडीचीही उसंत न घेता आभाळ सारखं गळत होतं. धरणी ही जणु अजुन तृषार्त मी या अविर्भावात आभाळाकडं पाहत होती. त्यानंच धरणीच्या कुशीतुनही प्रतिसाद म्हणुन झरे फुटू लागले. पर्वत, नद्या नाले ओढे वगळी फेसाळू लागले तसा आभाळाला आणखी जोर चढू लागला व ते धरणीला बिलगू लागलं.आता बहराचं दान देण्यासाठी धरा सज्ज झाली होती. या युद्धात मात्र सारं चराचर बेहाल झालं तसेच बालाचेही हाल झाले व पुढेही होणार होते.
तार पाठवुनही सदानंद आला नाही म्हणुन गजा अण्णा व विमलाईनं शंकरलाच ठाण्याला पिटाळलं होतं. ठाण्याहून आल्या पावली तो थरगावला गेला.धनवाडीत घडलेला सारा वृत्तांत कथन करताच बाला पुरता घाबरला. त्यानं सदानंदला कळवलं. पण त्याच वेळी काळजी घेऊनही शंकरनं सुलेखाला पाहिलंच. 'ही पोर इथं कशी?' शंकरच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
सदानंद व शंकर लगेच धनवाडीला निघाले. रात्री बालाही सुलेखाला घेऊन धनवाडीला निघाला. भुसावळहून मात्र तो वेगळया गाडीनं गजा अण्णाच्या माडीवर परतला नी सुलेखा वेगळ्या गाडीनं धनवाडीतच जबना आत्याच्या घरी गेली.
@@@@@@@@@@@
सदानंद झेलम एक्सप्रेसनं भुसावळहून दिल्लीकडं रवाना झाला. वातानुकुलीत डब्यात त्याला आठ दिवसातील सगळी धावपळ आठवली. ज्या धावपळीनं फार्महाऊसमधल्या सगळ्या मृण्मयी आठवणी विसरायला लावल्या होत्या. आता प्रवासात त्याला एक दिवस निवांतपणा मिळणार होता.
थरगावहुन परतल्यावर त्याला सारा प्रकार समझल्यावर हना सावंताच्या कुरापतीनं आज त्याला दिल्लीला रवाना व्हावं लागत होतं. व चार वर्षानंतरच्या विरहानंतरही पुन्हा आणखी एक दोन वर्षाचा वियोग सहन करावा लागणार होता आता.
सातपुडा पर्वत आणि तापी,नदीच्या दरम्यान धनवाडी हे टंच गाव वसलेलं. तापीच्या पाण्यानं या भागात पिकणाऱ्या केळीत अलगच गोडवा भरला असल्यानं इथली केळी दिल्लीपार प्रसिद्ध. सारा गाव खोऱ्यानं केळीचे पैसे कमवत होता. त्यात गावातले गजा अण्णा सावंत व हना अप्पा सावंत हे सख्खे चुलतभाऊ अख्ख्या गावाला विकत घेण्याची कुवत राखुन होते. मात्र दोघात गेल्या दहा पंधरा वर्षापासुन हाडवैर निर्माण झालं होतं व दिवसेंदिवस त्यात भरच पडत होती. गजा अण्णाची मोठी मुलगी हना अप्पाच्या बहिणीच्या मुलासोबत प्रेम करुन बसली. प्रेम बहरत गेलं. मात्र त्याच भाच्याशी हना अप्पा आपल्या मुलीची सोयरिक करुन आला. गजा अण्णानं चुलत बहिण भाच्याला पाया पडुन विणवलं पण त्यांनी सरळ हना अप्पाकडं निर्देश केला. अण्णानं हना अप्पाचेही पाय धरले पण व्यर्थ. मामला पेचिदा झाला महिने उलटू लागले तशी परिस्थिती गंभीर झाली. सांगुनही उपयोग झाला नाही हनानं धुमधडाक्यात आपली मुलगी उजवली. इकडे अण्णाची मुलगी त्या दिवसापासुन मामाच्या गावाला गेली ती गेलीच. तापी मार्गानं तिच्या अस्थी गजा अण्णानं अरबी समुद्रात विसर्जीत केल्याचं गावाला दोनेक वर्षानंतर कळालं. गजा सावंत व हना सावंत यांच्यासोबतच गावाचंही सुतक तुटलं. गजासोबत जे राहिले ती जुनी सावंतवाडी व हनासोबत जे गेले त्यांची नवी सावंतवाडी उदयास आली. दोघा चुलतभावाची वाटणी तर आधीच झाली होती. पहिल्या इयत्तेपासुन तर पदवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेली शिक्षणसंस्था अण्णांनी घेतली तर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला बजरंग कुस्तीचा आखाडा हना अप्पानं घेतला. दिड-दिडशे एकर शेती दोघांना आली. त्यात थरगावची चिकूवाडी गजाण्णाला तर आसाममधील चहा मळे दोघांच्या वाटणीला कमी अधिक फरकानं मिळाली. आणि इथुनच उभी राहिली जन्मजात दुश्मनी.
हना अपापाचा आखाडा त्याचा मुलगा संभा पहिलवानाला हरवत सदानंदानं चार वर्षापुर्वीच बसवलाहोता. त्याचा वचपा हना घेतला.दुसरा मुलगा गुणवंतला कलेक्टर झाला. त्याचा जाहीर सत्कार गावात ठेवला. वाजत गाजत अख्ख्या धनवाडीत मिरवणुक निघाली. मिरवणुक गजा अण्णाच्या दारात आली.विमलाईनं विचार केला की शत्रु जरी असला तरी जिल्ह्यात पहिला कलेक्टर आपल्या गावातून व तो ही आपल्या भाऊबंदकी तुन होतोय. चला औक्षण करुन कौतुक केलंच पाहिजे. तिनं पुजेचं ताट केलं व निघाली. मिरवणुकीच्या गाडीवर गुणवंत सोबत हना सावंत होताच. त्यानं संतापत ताट उधळलं. "ये भवाने माझा आखाडा बसवुन आता पुजा करतेस व्हय. चल बोलव त्या गज्याला. माझा कलेक्टर आलाय त्याच्या छाताडावर नाचायला. आणि हो जिला पोटची पोर सांभाळता येत नाही अशा........ कडनं पुजा करुन घेऊ आम्ही. चल निघ तोंड काळं कर येथून." हना कुत्सित हासत बोलला. विमलाई तर धाडकन पडली. गर्दीतल्या काहींनी तिला उचलुन बाजुला नेलं. आपल्या मुलीचा असा उल्लेख होताच गजा अण्णा संतापात बाहेर आले. त्यांचं सारं अंग थरथरत होतं. कानाच्या पाळ्या लाल झाल्या. डोळे आग ओकू लागले.
तोच हनानं गरळ ओकलं." अय ढुसनीच्या काय रागात येतोय. राग येत असेल तर हा हना खुल्ला चॅलेंज करतो आधी पोराला कलेक्टर बनवुन दाखव मग आमच्या नादाला लागायचं. आणि हो ते तुझं पोर तर पुरतं कामातुन गेलंय त्याला काय कलेक्टर बनवशील तू? चल सटका इथनं. वाजव रे ये बँडवाल्या माझा कलेक्टर आलाय."
असं म्हणताच टिपरु दणाणु लागलं. नवी सावंतवाडी बेभान झाली व गजा अण्णासमोर बिभत्सपणे आरोळ्या मारत नाचु लागली.
गजा अण्णाच्या संतापाचा अतिरेक झाला व तिथंच त्यांना लकव्याचा जोराचा झटका आला जो त्यांचा एक हात व पाय घेऊन गेला व वाचा ही बोबडी करून गेला.
या घटनेनंतर तार मिळुनही सदा नशेतच राहत असल्यानं असेल मामुली तब्येत बिघडली असं समजत पितच राहिला व सलिमच्या दवाखानाच्या उद्घाटनाला शहापुरला निघुन गेला. त्यानंतर सुलेखा भेटलीव परत थरगाव.
शंकरसोबत परतल्यावर सारा प्रकार कळताच व अण्णाची स्थिती पाहताच घरातल्या पिढीजात तलवारीला त्यानं हात घातला व अंगणातल्या चौकात एक सणसणीत आरोअळी ठोकताच सारी जुनी सावंतवाडी लाठ्याकाठ्या घेऊन आली. "सदादा आम्ही तुझ्याच इशारतीची वाट पाहतोय तु फक्त हो म्हण नव्या वाडीची चटणी झाली समजच"हना सावंतानं सदा गावात येताच दोन्ही पोरांना गायब केलं होतं व स्वत्ः नव्या वाडीच्या मल्लाच्या मध्ये जीव मुठीत धरुन बसला होता. कारण सदा चार वर्षात वाया गेला होता तरी सदा काय चिज आहे हे ते जाणुन होते.
गजा अण्णानं लंगडत लंगडत साऱ्यांना शांत करत बोबड्या बोलात दमटवलं. "सदानंद खरच गजाचा असशील तर हनाचं चॅलेंज स्विकार. असं ही तु तयारी करतच होताच पण आता बनुनच दाखव. हा धिंगाणा नको".
, गजा अण्णा शांत बोबड्या बोलात म्हणाले.
क्रमश:...........