( मी सायली कुलकर्णी . माझ्या पहिल्या कथेसाठी तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप आभार . माझी पुढील कथा सादर करत आहे . काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा .काही सुधारणा असतील तर अवश्य सुचवा .ह्या कथेतील सर्व पात्रे , घटना व स्थळे काल्पनिक आहेत .ह्या गोष्टीतून कोणतीही अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही .कथचे 7 पार्ट आहेत .चित्र -सौ .गुगल )
कथेचे नाव - मॉल (पार्ट 1)
अगदी चांगल्या दिवसाचा मुहूर्त पाहून सदाशिव खामकर यांनी त्या मेन रोड वर बांधलेल्या S.K.मॉल चे आज उदघाटन होते . मॉल चे जवळ जवळ 4-5 वर्ष बांधकाम चालू होते . मॉल बांधताना खूप अडचणी येत होत्या. कामगार टिकत न्हवते . मॉल उभा करताना कायम किरकोळ अपघात होत होते . असं वाटत होत हा मॉल उभा राहू नये अशी कुणाची तरी सुप्त इच्छा होती . पण अनेक अडचणी वर मात करत शेवटी S.K. मॉल उभा राहिलाच . 5 मजली मोठा प्रशस्त मॉल होता तो . पहिला मजला हा मोठ्या बाझार साठी दिला होता . दुसरा मजला हा जिम आणि लहान मुलांच्या खेळण्यासाठी दिला होता . तिसरा मजल्या वर थिएटर आणि Food मॉल होते . चौथा मजला हा कपडे , चपला , इलेट्रॉनिक वस्तूंचे दुकान यांच्या साठी दिला होता आणि पाचवा मजला छोट्या छोट्या Private कंपनीच्या साठी होता . मोठ्या लिफ्ट होत्या .तळमजल्या वर 4 चाकी व 2 चाकी वाहना साठी मोठे पार्किंग होते . त्या गावातील तो पहिला एवढा मोठा मॉल होता . सदाशिव खामकर आधीच खूप वैतागले होते कारण त्या मॉल च्या जागे साठी त्याना खूप त्रास झाला होता आणी त्यात भर म्हणून तो मॉल बांधताना खूप अडचणी आल्या होत्या . पण आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते . मॉल मधील सर्व दुकानें विकली गेली न्हवती . पण खामकराना विश्वास होता की ती सर्व दुकानें लवकरच विकली जातील किंवा भाड्याने जातील . हा प्रोजेक्ट यशस्वी पणे पूर्ण झाल्याने त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढला होता , आणि आता छोटे छोटे प्रोजेक्ट बंद करून अशेच मोठे प्रोजेक्ट करायचे असं त्यांनी मनोमन ठरवलं होते . S.K. मॉल खुप छान सजवला होता ,अगदी दृष्ट लागण्यासारखा पण तरी पण त्या मॉल कडे पाहिल्यावर अस्वस्थ वाटायचं . मॉल अगदी मेन रोड वर होता पण का कुणास ठाऊक मॉल मध्ये आत गेले की अस्वस्थ वाटायला लागायचे , घुसमटायला लागायचं .
आज मॉल च्या उदघाटनासाठी खूप मोठे मान्यवर मंत्री , मोठे सरकारी अधिकारी , मोठे पोलीस अधिकारी आणि समाजातील अनेक मोठी मान्यवर माणसे आली होती . मॉल च्या बाहेर चा रस्ता माणसांनी नुसता भरून गेला होता . सदाशिव खामकर त्या गावातील सफेद कपडे घालून सर्व काळी कृत्ये करणारी असामी . लोकांना जीवाची धमकी देऊन त्यांच्या जमिनी ढापणे , दारू अमली पदार्थ यांची विक्री करणे , मोठया मोठ्या व्यापाराना व्याजाने पैसे देणे आणि वेळ आली की ते पैसे दाम दुपाटीने वसुल करून घेणे असे त्यांचे सरळ साधे उद्योग . सर्व मोठ्या राजकाराणी,मंत्री आणि मोठ्या पोलीस अधिकारी यांच्याशी चांगले संबंध असल्यामूळे त्यांच्या सर्व चुकीवर आपोआप पांघरूण घातले जात असे , आणी त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मदतीची परतफेड पैश्याच्या मोठ्या स्वरूपात वेळेत केली जात असे . त्यामुळे खामकरानी त्यांना जे हवे ते मिळवलेच होते . पण ह्या S.K.मॉल ची जागा मिळवताना त्यांना खूप कष्ट पडले होते . काही केल्या त्या जागेचा मुळ मालक हरिभाऊ खिलारे ती जागा सोडतच न्हवता . त्याला भरपूर भीती दाखवून पण तो तयार होत न्हवता , मग काय शेवटी खामकरानी त्याची सर्व सूत्रे वापरून ती जागा मिळवलीच . आज त्याच जागेवर त्यांचा तो S.K. मॉल दिमाखत उभा होता . खामकर सर्व पाहुण्यांचे स्वागत करत होते . आलेल्या पाहुण्यांसाठी शाही खाण्याची सोय करण्यात आली होती . S.K. मॉल ची फित कापायची वेळ आली होती . सर्व मान्यवर , खामकर आणि त्यांचे कुटुंबीय मॉल च्या मोठ्या दरवाज्या जवळ आले . मान्यवरानी फित कापण्या साठी कात्री उचलली , ते फित कापणार इतक्यात अचानक फित जाळायला लागली . सर्व जण त्या गोष्टी मूळे घाबरले अगदी खामकर पण घाबरून गेले पण त्यांनी काही तरी जुजबी कारण सांगून वेळ मारून नेली . वातावरण परत पूर्ववत झाले . सर्व मान्यवर आत गेले आणी सर्व आश्चर्यचकित झाले कारण आज सकाळी फुलांची जी सजावट केली होती त्यातील सर्व फुले ही जळाली होती . आता मात्र खामकराना टेन्शन आले त्यांनी परत काही तरी जुजबी कारण सांगून वेळ मारून नेली . मॉल च्या सर्व खिडक्या , दारे उघडे असून पण आत भयंकर उकडत होते . पाहुण्यांना आणलेले खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले , पण 2 मिनटात बऱ्याच मान्यवरानी ते न खाताच परत ठेवले कसा काय कोण जाणे पण त्या सर्व अन्नला जळाका वास येत होता . कोणी बोलत न्हवते पण सर्वाना मॉल मध्ये आत घुसमटत होते . आणि अचानक खामकराना त्या गर्दीत ते 8 जण दिसले , निर्विकार चेहऱ्यानी ते खामकरान कडे पाहत होते . सर्वांचे हात, पाय बांधलेले , सर्वांच्या तोंडाल कोंबलेले कापड आणि ते खामकरान कडे पाहत होते ..
क्रमश ....