शेकोटी... *
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- दि. ०३.०५.२०१७
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे...
आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती मला माझ्या पोलिसात असलेल्या काकानी सांगितली होती. ह्याधीही त्यांनि सांगितलेली विहीर ही कथा ज्या गावात घडली त्याच गावातली ही कथा आहे. साधारणतः आता त्या गोष्टीला ४० वर्ष होऊन गेली आहेत.
त्यांची पोस्टिंग तारापूर अणुशक्ती केंद्रावर असल्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरून जावे लागत असे. त्याकाळी रस्त्याला स्ट्रीटलाईट नसायची ना आता सारखी ब्याटरी असायची, सर्वाना कंदीलावर अवलंबून राहावे लागायचे कारण प्रकाशाची इतर काही साधने नसायची. ना त्यावेळी आत्तासारखे फोन असल्याने माणूस एकदा घरातून बाहेर पडला की तो घरी परत येईपर्यंत त्याचा पत्ता नसायचा.
काकांची रात्रीची ड्युटी असल्याने ते ९ च्या सुमारास कामावर जायला निघायचे. गावातले ९ म्हणजे मध्यरात्री सारखेच असायचे, सगळीकडे स्मशानशांतता पसरलेली असायची. पूर्वीच्याकाळी थंडीच्या दिवसांत लोक रात्री शेकोट्या पेटवायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला शेकोटी घ्यायला बोलवायचे. त्यावेळी शेकोटीत माणुसकीची ऊब जाणवायची पण आत्ताच्या वेळी फक्त शेकोट्या उरल्या आहेत. अशाच एका रात्री जेवण व्हायला उशीर झाल्याने काकांनी शिदोरी सोबत घेतली होती. त्यादिवशी शुक्रवार असल्याने मटणाचा बेत होता.
काका घरातून निघणार इतक्यात बाहेर मांजरीच्या रडण्यासारखा आणि गुरगुरण्या सारखा आवाज आल्यामुळे आजी काकांना म्हणाली की आज तू कामावर जाऊ नकोस कारण आज मला काही ठीक वाटत नाहीय. त्यावर काका म्हणाले की काय होत नाही आणि मी नाय भीत कोणालाच. असे म्हणून काका घरातून निघाले आणि निघता निघता त्यांचा पाय अडखळून पायाला ठेच लागली आणि रक्त निघू लागले. काय झाले म्हणून आजी येऊन पहाते तर काय काकांच्या पायातून रक्त निघत होते. आजी म्हणाली थांब मी हळद फटकी आणते असे म्हणून ती घरात गेली.
काका तसेच तिची वाट पाहात उभे असताना त्यांचा लक्ष अचानक समोर असलेल्या चिंचेच्या झाडाकडे गेलं आणि ते पाहताच राहिले. चिंचेच्या झाडावर त्यांना मोठ्या सावलीसारखं काहीतरी दिसत होतं आणि ते बहुदा त्यांच्याकडेच पाहात होत की तो भास होता देव जाणे. तिकडे पाहत असताना त्यांचं भानच हरवलं होत. तितक्यात आजी हातात दिवा आणि हळद फटकी घेऊन आली तरी त्यांच लक्ष नव्हतं, ती हळद फटकी लावणार इतक्यात तिला जे दिसलं ते पाहून ती जोरात किंचाळली आणि तिच्या किंचाळण्याने काका पण भानावर आले.
आजी आणि काका ह्यांनी पाहिलं की एक काळी मांजर काकांच्या पायाची जखम चाटत होती जवळपास सर्वच सांडलेल रक्त तिने चाटून साफ केलं होतं. ते पाहून काका आणि आजी दोघेही स्तब्ध झाले होते. त्यांनी अशी मांजर ह्याआधी कधीहि पाहिली नव्हती. मांजर एकदम काळीभोर होती, तिचे डोळे रक्तासारखे लाल होते, तोंड रक्ताने माखल होत आणि ती सारखी काका आजी आणि त्या जखमेकडेच पहात होती. अस ऐकिवात आहे की काही जारण मारण करणारी माणसं असली रूप घेऊन येतात. आजीने मांजरीला हाकलण्याचा प्रयत्न केला पण ती जायला तयारच नव्हती आणि सारखी त्या जखमेलाच तोंड घालत होती. शेवटी आजीने चिडून जवळच पडलेली एक काठी हातात घेऊन, " मर मेली अवदसे" असे म्हणून ती काठी मांजरीच्या डोक्यात हाणली तशी मांजर जोरात कॅव करून पळून गेली. अस म्हणतात की शिव्या दिल्या कि भूतं पळून जातात.
आजी परत काकांना म्हणाली की आज काय ठीक नाही दिसत आहे म्हणून तू जाऊ नकोस परंतु तरीही तिचे न ऐकता काका निघालेच. खूप थंडी पडली असल्याने गावातील घरांतील सर्व माणसे लवकर झोपी गेली होती तरीही गाव संपेपर्यंत मात्र वातावरण एकदम सुरक्षित वाटत होत, पण जसजशी गावाची वस्ती संपून समुद्रकिनारा लागला तसं काकांना जरा विचित्र वाटू लागलं होतं. काकांना सारखा तो मांजरीचा प्रसंग आठवत होता. आता काकानाही अस वाटत होत की आज त्यांनी कामावर यायलाच नको होत. पण आता अर्ध अंतर कापल्याने माघारी फिरणं शक्य नव्हतं.
काका जोरात सायकल चालवत होते तरी आज रस्ता संपतच नाही असे वाटत होते. खूप थंडी पडली होती आणि सायकल चा वेग मंदावल्यासारखा झाला होता. इतक्यात काकांना दूरवरुन किनाऱ्यालगत एक जागेवर आग पेटवल्यासारखी दिसत होती. जसजसे ते त्या जागेच्या जवळ पोहोचले तसतशी आग मोठी होत गेली आणि आता तिकडे काही बाया माणसे पण दिसू लागली होती. काका जवळ जाऊन पोहोचलो तसे त्यांना त्यातील एका माणसाने हाक मारून सांगितले की याकी पाव्हण जरा शेकोटी घ्या किती थंडी पडलीय या बसा इकडे. तेवढी आम्हाला पण सोबत होईल. आग तशी खूप मोठी नव्हती, बरीचशी लाकडे जळून गेली होती आणि विस्तव जास्त उरला होता.
काकांनी विचार केला की बसूया जरावेळ शेकत आणि त्यांना विडीची तलफ पण लागली असल्याने त्यांनी तिथे बैठक मारली. तेवढ्यात तो मघासचा माणूस परत बोलला कि कुठले पावणे तुम्ही आणि इतक्या रातच्याला काय करत आहात. जेवले बिवले की नाही. तो एकच माणूस फक्त बोलत होता आणि बाकी सर्व माणसं शांत होती. त्याच बोलणे ऐकून काकांना शिदोरीची आठवण झाली. ते म्हणाले नाही जेवलो आज सोबत शिदोरी आणलीय! तसा तो माणूस बोलला कि मग जेवून घ्या इथेच काय मटण मच्छी आणलीय का? काकांना त्याच बोलणं ऐकून जरा विचित्रच वाटलं की ह्याला कस वाटल कि आपण मटण आणलं आहे. काकांना विचारात पाहून तो माणूस जसकाही त्याला काकांच्या मनातलं कळाल असावा असं म्हणाला की अहो पाव्हण असच विचारलं आज शुक्रवार आहे म्हणून.
काका हसले आणि बोलले हो मटण भाकर आहे! तस तो बोलला अरे वा वा आम्हाला पण मटण लय आवडते. आम्हीपण आज मटणाचाच बेत केला आहे घ्या तुम्ही पण असे म्हणून काकांच्या समोर भांड पकडल. काका त्यात हात घालणार इतक्यात कसला तरी वास आल्याने त्यांनी हात आवरता घेतला आणि म्हणाले नको. तसा तो माणूस हसायला लागला आणि काय आश्चर्य की इतक्यावेळ गप्प असणारे सर्वच माणसं हसायला लागली. त्या माणसाच्या जवळच एक बाई बसली होती आणि तिच्या डोक्याला एक फडकं गुंडाळल होत. तेवढ्यात त्या माणसाचं लक्ष काकांच्या जखमेकडे गेलं तसं तो माणूस तिकडे बोट दाखवून म्हणाला अहो पाव्हण हे काय झालं कुठे लागलं बिगल कि काय? बघू बघू काय झालं म्हणता म्हणता त्याने जखमेलाच हात घातला आणि फडकं सोडलं. तशी जखम परत वाहू लागली. ते होत असताना काकांना अस दिसलं कि त्या माणसाजवळ बसलेली बाई त्या जखमेकडे टक लावून पहात होती. तिचे डोळे पण लाल निखाऱ्यासारखे वाटत होते. काकांना अचानक त्या मांजरीची आठवण झाली आणि जराशी भीती पण वाटली पण त्यांनी तस दर्शवल नाही. त्यांना अस दिसल कि त्या बाईची चूळबुळ सुरु झाली होती. इतक्यात तो माणूस म्हणाला माझ्या बाय ला पण डोक्याला लागलंय सांगू का काय झालं तिला.
त्याच बोलणं ऐकून काकांना आठवलं की आजीने त्या मांजरीला डोक्यात फटका मारला होता. काकांना आता भीती वाटू लागली होती की आपण कुठे येऊन फसलोय. काकांना घशाखाली आता घास उतरत नव्हता. त्यांना अस दिसलं कि क्षणा क्षणाला त्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव जाऊन एक प्रकारचे खुनशी भाव येऊ लागले होते. काकांना आता कळून चुकलं होत की आजी म्हणत होती तेच बरोबर होत. आज यायलाच नको होत पण आत काही उपयोग नव्हता. आपण एका खूप मोठ्या संकटात सापडणार आहोत असे त्यांना वाटत होत. म्हणून काका आता मनातल्या मनात भीमरूपी स्तोत्र म्हणायला लागले होते.
तेवढ्यात तो माणूस म्हणाला अहो पाव्हण कसला एवढा विचार करतायेत जेवा की लवकर लवकर आम्हाला पण आता खूप भूक लागलीय असे म्हणून तो माणूस आणि बाकीची सर्व माणसे काकांना खालून वरून न्याहाळत होती असे काकांना वाटले. हे ऐकून काकांना आता थंडीतही घाम फुटू लागला होता. तेवढ्यात तो माणूस म्हणाला की आता कशाला घाबरताय माझ्या बाय ला मारताना काही वाटलं नाही का? आणि तो जोरजोरात हसू लागला. काका जरी घाबरले होते तरी ते पोलिसात असल्याने हिम्मतवान पण होते. ते झटकन उठले आणि त्यांनी तीकडाचाच विस्तव तसाच झटकन हातानी उचलला आणि त्या माणसांवर उधळला. त्यांच्या हाताला जरास भाजल पण त्या अनपेक्षित झालेल्या हल्ल्याने ती सर्व माणस किंवा भूत म्हणा, त्यांच्यात एकाच कल्लोळ मजला आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन काकांनी चपळाईने सायकल उचलली आणि वेगात कामाच्या दिशेने पळवली.
त्यांनी सहज मागे वळून पाहिले तर ती सर्व माणसे आणि बाया ज्यांनी अजिबात कपडे घातले नव्हते सर्वजण त्यांच्या मागे लागले होते आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. काका आता जोरजोरात भीमरूपी स्तोत्र म्हणू लागले तसे त्या सर्वांचा वेग मंदावला तसे काका अजून वेगाने निघाले. शेवटी काका सुखरूप कामाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांच्या अस लक्षात आलं की त्यांचा जेवणाचा डबा त्याच जागेवर राहिला होता. दुसऱ्यादिवशी सकाळी काका लवकरच ड्युटी संपवून परत त्याच बाजूने घरी परत असताना त्यांना त्या जागेवर त्यांचा डबा दिसून आला. ते डबा उचलून घेणार इतक्यात एक झाडुवाला माणूस त्यांना म्हणाला की अहो तिकडच काही उचलू नका ते जळालेलं प्रेत आहे कशाला अवदसा घरी नेताहेत. त्याचे शब्द ऐकून काका जागेवरच बसून पडले. त्यांना जबरदस्त झटका लागला होता. कालच त्यांनी त्या जागेवर बसून जेवण केलं होतं, त्याच आगीत बिडी पेटवून प्यायली होती आणि जवळच पडलेल्या मंडक्यातून पाणी प्यायलं होत. जरावेळाने ते तिथून कसे बसे उठले आणि घरी पोहोचले. त्यानंतर काका ८ दिवस तापाने आजारी होते.
मित्रांनो कित्येक गावांच्या समुद्रकिनारी आजही अशा शेकोट्या पेटत असतात. कधी तुम्हाला पण कोणी असच शेकोटीला बोलावले तर ह्या स्टोरी ची आठवण नक्की ठेवा आणि जायचं की नाही ते ठरवा...
धन्यवाद...