गॅरेज
माझे गावातले गॅरेज तसे छोटे पण व्यवस्थित चालले होते.आजूबाजूला नव्यानेच सुरु झालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे गावात बरीच वर्दळ वाढली होती. गावात एकच गॅरेज असल्याने मला गॅरेजची जागा अपुरी पडत असल्याने मी नव्या जागेच्या शोधात होतो.
जागेच्या शोधात असताना मला माझ्या मित्राने - संदेशने मला गावाच्या थोडे बाहेरच असलेले एक छोटे गोडाऊन उपलब्ध आहे असे सांगितले. गोडाऊनच्या मालकाला त्यात स्वारस्य नसल्याने व मालक दूरच्या गावी असल्याने ते १-२ वर्षे बंदच होते. किंमतही तशी वाजवी होती. संदेश मालकाच्यावतीने जागेसाठी गिऱ्हाईक बघतच होता.
एके दिवशी संदेशबरोबर जाऊन मी जागा बघूनही आलो. जागा तशी बरी होती. थोडीफार डागडुजी करून, मला हवे असलेले थोडेफार फेरफार करून वापरण्याजोगी होती. मालकाशी फोनवर थोडीफार घासाघीस करून मी ती जागा विकतही घेतली. मालक सुभान जाधव तसा तुसडाच वाटला. जागेच्या कागदांवर सही करण्यासाठी व चेक घेण्यापुरता तो येऊन गेला. जागेत काही बदल करायचे असतील ते करा पण पूर्वेकडची भिंत काही केल्या तोडायची नाही, कारण काय तर त्याच्या पलीकडे दूरवर एक स्मशानभूमी आहे असे थोडेसे दरडावूनच सांगितले.
असो, तर मी एका महिन्यात सगळी तयारी करून गॅरेजचे उदघाटनही केले. जुन्या गॅरेजचे काम माझ्या एका विश्वासू सहकार्यावर सोपवून मी नव्या गॅरेजवर लक्ष केंद्रित केले. मला मिळालेला मेकॅनिक याकूब नवीनच असल्याने त्याला शिकवण्यात बराच वेळ जाऊ लागला. एखाद्या गिऱ्हाईकाला घाई असेल कधी कधी रात्री उशीरा पण थांबावे लागायचे.
आणि तो दिवस का रात्र उजाडली. मी व याकूब आम्ही दोघे कामात गर्क होतो. गावच्या सरपंचाची फॉर्च्युनर सर्व्हिसिन्ग करून दुसऱ्या दिवशी द्यायची होती. बरीच रात्र झाली असावी, आमच्या हातातील हत्यारे काय आवाज करत असतील तोच आवाज, बाकी भयाण शांतता होती.
आणि मला छुम छुम असा पायातील पैंजणाचा आवाज आला. मी दचकून याकुबकडे बघितले त्याच्याही तोंडावर तेच भाव !
या अश्या वेळी या गावाबाहेर कोण येणार? आणि तीपण एखादी स्त्री? मी गाडीखालून बाहेर येऊन आजूबाजूला बघितले. कोणीच दिसेना.
मैने भी कुछ आवाज सुना, आपने भी क्या? असे मला याकूब घाबरत विचारू लागला.
कुछ नहीं शायद दुसरा कुछ होगा असे म्हणून मी दुर्लक्ष केले व आम्ही कसेबसे गाडीचं काम संपवून घराकडे धूम ठोकली.
दुसऱ्या दिवशी याकूब यायच्या आतच मी गॅरेजवर गेलो. शटर वर करून आत गेलो आणि माझी पाचावर धारण बसली. सरपंचाच्या गाडीच्या विंडशिल्डवर व "त्या" भिंतीवर रक्ताळलेल्या हाताचे ठसे होते.
आम्ही गॅरेज जाताना व्यवस्थित कुलूप लावून बंद केले होते त्यामुळे कुणी आत घुसण्याची शक्यताच नव्हती.
मी घाईघाईने बालदीत साबण व पाणी घेऊन फडक्याने सर्व खसाखसा धुवून काढले. पाण्याचा होज घेऊन संपूर्ण गाडी व भिंत परत धुवून काढली.
याकूबचे तेवढ्यात आगमन झाले. त्याने माझ्याकडे आश्चर्याने बघितले - गाडी परत का धुतली म्हणून. पण काही न बोलता तो त्याच्या कामास लागला.
त्यानंतर आम्ही गॅरेज रात्री लवकर बंद करायला सुरुवात केली. काही दिवस तसेच काही विचित्र घटना न घडता गेले. मनात धाकधूक असायची पण नेटाने काम सुरु ठेवले.
याकूब 2 दिवसासाठी रजेवर गेला होता. कामाच्या तंद्रीत मला उशीर कसा झाला ते कळले नाही. तसे फक्त ११-११३० वाजले असतील. मी हातपाय धुवून परत जाणार तेवढ्यात मला भिंतीवरील एक वीट गायब असल्याचे दिसले. आजूबाजूला वीट पडलेली पण दिसत नव्हती. कदाचित वीट निखळून बाहेरच्या बाजूला पडली असेल, उद्या सकाळी बघू असा विचार करून मी निघणार तेवढ्यात तोच छुम छुम असा आवाज ! माझ्या तोंडाला कोरड पडली, मी कसाबसा थरथरत मागे न बघता रामरक्षा म्हणत बाहेर पडून मोटारसायकलवर बसून धूम ठोकली.
गडबडीत मी गॅरेजचा दरवाजा बंद करून कुलूप लावायलाही विसरलो.
बिछ्यान्यावर पडल्या पडल्या हा काय प्रकार आहे, उद्या संदेशला घेऊन गॅरेजवर जाऊ, त्याला काही माहिती असेल तर कळेल अशा विचारात रात्र घालवली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच संदेशला घरी बोलावून घेतले. त्याला थोडीफार माहिती दिली. त्याचीपण तंतरली.
पण दिवसा उजेडी जायचे म्हणून तोपण माझ्याबरोबर यायला तयार झाला.
कालच्या रात्री दुकानाचा दरवाजा उघडाच ठेवला होता. आम्ही दोघे हलक्या पावलांनी आत गेलो, जसे काही कोणी अजून आत असेल. पुढेच असलेल्या गाडीला वळसा घालून आम्ही मागे गेलो तोच अत्यंत कुबट असा वास आला व आम्हा दोघांनाही उलटी झाली. आता भिंतीवरच्या ५-६ विटा गायब होऊन तिथे मोट्ठे भोक झाले होते. भिंतीजवळ जाऊन मी तोंडावर रुमाल धरून पाय थोडे वर केले. मोबाइलच्या बॅटरीने आत बघितले आणि आतील दृश्याने मला भोवळ आली. आतमध्ये एका स्त्रीचा सापळा असावा बहुतेक, कारण तिच्या रक्ताळलेल्या साडीचे अवशेष अजूनंही दिसत होते. मी तिथेच भान हरपून खाली पडलो. त्यावेळचे मला शेवटचे आठवणारे म्हणजे संदेशचे हादरलेले शब्द - "हॅलो ....पोलीस स्टेशन?... मी...मी...मी.. संदेश मिसाळ, इथे...बहुतेक खून झालाय...."