कथचे नाव- भिंत
लेखकाचे नाव- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
नमस्कार, मी विजय….विजय साठ्ये. मी कुठे रहातोय? काय करतो? ते फारसं महत्वाचं नाही. मी आत्ता कुठून तुमच्याशी संपर्क आणि संवाद साधतोय ते मात्र थोडं निराळंच त्रांगडं आहे. मी विस्कटून सांगतोच जरा. मी एक सडाफटिंग मनुष्य आहे. माझ्या आगेपिछे कोणी नाही. अविवाहित असल्याने बायकापोरांचेही पाश नाहीत. आईवडिलांच्या मृत्युनंतर मी इथे शहरापासून लांब अशा आडगावी एक जुनं घर खरेदी केलं…
वडिलांची सर्व प्रॉपर्टी लिक्विडेट केल्याने आता शंभर वर्ष जगलो तरी पुरुन उरेल इतका पैसा गाठीशी होताच माझ्या. हे घर मला आवडलं होतं. कोणा गंगाधर म्हामूणकर नावाच्या माणसाने हौसेने हा बंगला बांधला होता, तोही असाच माझ्यासारखा सडाफटिंग होता. बंगला बांधला, त्यात काही दिवस तो रहात होता आणि अचानक गायब झाला. तो कुठे गेला? काय झालं? ते समजलंच नाही. शेवटी त्याच्या लांबच्या वारसदाराने कायदेशीर सव्यापसव्य करुन ती प्रॉपर्टी स्वत:च्या नावावर करुन घेतली, तोच बंगला मी विकत घेतला….
या बंगलो स्कीमचा सगळ्यात शेवटचा बंगला म्हणजे माझा हा नविन बंगला…अतिशय सुबक आणि आटोपशीर. माझ्यासारख्या सडाफटिंगासाठीच जणूकाही मस्त डिझाईन केलेला. फक्त ग्राऊंड फ्लोअर, त्यात एक प्रशस्त लिव्हिंग रुम, लगत असलेलं किचन कम डायनिंग रुम, एक बेडरुम, एक कॉमन आणि एक बेडरुमला ऍटेच्ड असलेलं टॉयलेट बाथरुम…बास्स…बाहेर व्हरांडा. मागच्या अंगणात छोटीशी बाग, वर टेरेस….संपलं…या बंगल्याची (बंगलो स्कीम आहे म्हणून आपलं बंगला म्हणायचं हो…खरं तर हे घरकुलच इवलंसं) गंमत म्हणजे घराच्या तीन साईडने तारेचं कंपाउंड आणि मागे मात्र अर्धवट बांधलेली भिंत. हे काय गौडबंगाल आहे ते मला समजलं नव्हतं. घराला संपूर्ण वॉलकंपाउंडच नव्हतं….फक्त पाठची एकच भिंत….
रहायला आलो त्या दिवशी टॆरेसवर चक्कर टाकली. वरुन भिंतीपलीकडलं दिसत होतं….भिंतीच्या मागे एक विस्तीर्ण माळरान होतं…त्यानंतर अर्धा एक मैलावर झाडीझुडपं आणि लागून टेकाड होतं…कोणतंही नवं बांधकाम वगैरे काहीही नव्हतं…भिंत तशी बऱ्यापैकी उंच वगैरे होती हं….वर अगदी काचेचे टोकदार तुकडे वगैरे लावलेले होते. पहिल्या दिवशी घर मी स्वत: झाडूनपुसुन लख्खं केलं. रंग तसा ठीकठाक होता….एरव्हीच माझ्याकडे कोणी पाहुणे वगैरे येण्याची काही भानगड नव्हतीच म्हणा. दोनेक वर्षात रंग काढला नाही तरी हरकत नव्हती. मागच्या अंगणात गेलो…संध्याकाळचे साडेसहा वाजले असावेत, थंडीचे दिवस होते…संधीप्रकाश गडद होत चाललेला होता. वातावरणात छान गुलाबी पण थोडी उबदार थंडी होती. सूर्यास्तानंतर तासाभरात थंडी वाढण्याची शक्यता होती. मागच्या अंगणात झाडझडोरा नुसता वाढलेला होता….उद्या एखाद्या माणसाला लावून तो साफ करुन नवी झाडं लावायची होती असा प्लॅन होता. मी तेव्हा भिंतीशेजारीच उभा होतो…सहज म्हणून भिंतीकडे लक्ष गेलं आणि माझ्या ध्यानात आलं की भिंतीला एक वितभर लांबीची, आणि चारेक इंच रुंदीची भेग गेली आहे. आश्चर्य म्हणजे ही भेग मधेच पडलेली होती. म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत नव्हती….भिंतीपलिकडून पश्चिमेचा संधीप्रकाश थोडा दिसत होता. मी जवळ गेलो….उद्या गवंड्याला बोलावून ही भेग भरुन घेणं गरजेचं होतं…नाहीतर ती तड वाढत गेली असती.
मी भेगेच्या जवळ गेलो. सहज आरपार बघितलं….टेरेसवरुन भिंतीपलीकडलं माळरान, झुडपं मी मगाशीच बघितलेली असल्याने मला काय दिसणं अपेक्षित आहे? याचा एक जनरल अंदाज मला होताच. मी समोरुन एक दृष्टीक्षेप टाकला….आणि आतलं दृश्य थक्कं करुन टाकणारं होतं….इजिप्त किंवा तशा देशात दिसावं तसं एक विस्तिर्ण वाळवंट….अतिशय लख्खं सूर्यप्रकाश, त्या वाळवंटात उभ्या असलेल्या उंच इमारती, पण त्या इमारती थोड्या निराळ्या बांधणीच्या होत्या. सूर्यप्रकाशाने त्या इमारतींचे शेंडे चकचकीत न्हाऊन निघाल्यासारखे दिसत होते. लांबवर सोनेरी रंगाची गोपुरे दिसत होती. रुंद लांबसडक वाटा, त्यावरुन फिरणारी माणसं, त्या माणसांचं आनंदी चेहरे…एकंदरीत खुप सुंदर वातावरण होतं पलीकडे…..मी दोनेक मिनिटं मंत्रमुग्ध होऊन ते दृष्य मनात साठवत होतो. थक्कं झालो होतो….मी धावत धावत पुन्हा टेरेसवर गेलो…भिंतीपलीकडे नजर टाकली तर तेच जुनं दृष्य होतं…विस्तीर्ण माळरान, त्यामागची झाडी आणि टेकाडी….मी पुन्हा खाली आलो. आता फटीच्या जवळ जाऊन बघण्याचं धाडस होईना तरीही धडधडत्या छातीने पुन्हा आत बघितलं…तेच मगाचचं दृष्य…..माणसं अव्याहतपणे येत जात होती. ते दृष्य अगदी “लाईव्ह” होतं…टिव्हीवरची एखादी मालिका बघावं तसं काहीसं….पलीकडे भिंतीजवळ कोणी नसावं बहुदा कारण कसलीच चाहुल लागत नव्हती….मी कान देऊन ऐकलं तर तिथले आवाज मात्र मला ऐकू येत होते. त्या आवाजात कसलाही सूर नव्हता पण कसलेसे आवाज येत मात्र नक्की होते. शब्द ऐकू येत नव्हते पण त्या आवाजाला एक लय मात्र नक्की होती…..भिंतीपलीकडे एक निराळं काहीसं नांदत होतं हे नक्की….
दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळं आटोपून पुन्हा गेलो….पुन्हा तेच दृष्य….आज सबंध दिवसात एकूण सव्वीसवेळा मी ते दृष्य बघून आलो…एखाद्या रहदारीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात जसं दिसावं तसं दिसत होतं….माझ्या भिंतीच्या भेगेलाच लागून एक मोठा रस्ता जात होता. त्यावरुन माणसांची अव्याहत ये-जा सुरु होती. रस्त्याच्या पलीकडे त्या इमारती, लांबची गोपुरे, सोनेरी रंगाची….पण माझ्या एक लक्षात आलं की इथे (म्हणजे तिथे) सूर्यप्रकाशाची दिशा व तीव्रता सर्व वेळेस तीच आहे…..म्हणजे त्या विशिष्ट कोनातून दिसणारा प्रकाश व सावल्या या दरखेपेस तशाच दिसतात….मला भेगेतून सूर्य दिसत नव्हता…पण तो साधारण माझ्या पलीकडच्या विश्वात असा उंच तिरका असावा असं मला सावल्यांच्या कोनावरुन जाणवत होतं….आता तो सूर्य होता की आणखीन काही देव जाणे? पण सोनेरी प्रकाशावरुन तो सूर्यच असावा असं मला वाटलं……!!!!
मला हे काय जाणवतंय? हे कोणाशी शेअर करणं म्हणजे मूर्खपणाच होता….माझी एक मैत्रीण आहे….अपूर्वा नावाची. इंटेरिअर डिझानर आहे ती शहरात….नवं घर घेतलंय त्याचं जरा इंटॆरिअर करायचंय असं सांगून मी तिला आज इथे बोलावली आहे. बघूया….सकाळी साडेदहाला ती कार घेऊन आलीच, वेळेची तशी पक्की आहे ती. घरभर फिरुन ढीगभर सूचना दिल्या….कुठे कुठे काय काय बदल करायचेत ते सांगून झाले….चहा झाला आणि मग सहज मी तिला मागीलदारच्या अंगणात घेऊन आलो. तिला गार्डनिंगमध्येही रस होताच. मग “विजय, इथे ते अमुकतमुक फुलझाड लावूया…” “इथे पारिजातक लाव” वगैरे गप्पा सुरु झाल्या…बोलता बोलता आम्ही भिंतीजवळ आलो. तिची नजर त्या भेगेवर गेली….माझ्या छातीत धडधड सुरु झाली….मी काहीच बोललो नाही….”विजय, परवा कॉन्ट्रॅक्टर आला की त्याला ही भेग बुजवायला सांग आठवणीने…काय?” असं बोलत बोलत तिने सहज भेगेला डोळा लावला…माझ्या हृदयाचे ठोके आता मलाच ऐकू येत होते….”बघ की, तशी मोठी होत जाईल ही भेग….मागचं माळरान, झुडपं अगदी त्या टेकाडापर्यंत सगळं दिसतंय. वेळीच बंद करायला हवी…” इतकं बोलून तीने मागे वळून माझ्याकडे बघितलं…मी चाट पडलो….म्हणजे मला भास होत होता की काय? मी तिच्या नंतर लगेच भेगेला डोळा लावला तर मला जे दिसायचं तेच दृष्य होतं….वाळवंट,रस्ता, इमारती, सोनेरी गोपुरं वगैरे वगैरे…..मी गप्प झालो आणि बोलणं कंटिन्यू केलं. म्हणजे आत्ता जर मी अपूर्वाला हे सांगितलं तर ती दुसरं तिसरं काहीही न बोलता उद्या मला उचलून सायकॅट्रिककडे नेईल हे नक्की होतं….मला जे दिसत होतं ते अपूर्वाला दिसत नव्हतं….हा काय प्रकार आहे ते मला समजलं नाही….अपूर्वा गेली.
आठवडाभराने काम सुरु होणार होतं. उद्या तिचा कॉन्ट्रॅक्टर येऊन पेपरवर्क आणि सर्व्हे करुन जाणार असं ठरलं होतं. दुसऱ्या दिवशी त्या कॉन्ट्रॅक्टरलाही भिंतीपलीकडे काहीही दिसलं नाही तेव्हा मात्र मी थक्कं झालो….
कॉन्ट्रॅक्टर निघून गेला…..”अगले मंगलवार से काम शुरु करेंगे. अपूर्वा मॅडम को सब पेपरवर्क करके दिखाता हू”असं बोलून निघून गेला. मी पुन्हा भिंतीजवळ आलो. पुन्हा त्या फटीत डोकावून बघितलं….इतक्यात एकदम दचकलो…..याक्षणी त्या फटीपलीकडच्या विश्वात, त्या भिंतीच्यापलीकडे एक मनुष्य उभा होता…तो तिथून फटीच्या दिशेने बघत होता. भिंतीपासून जेमतेम फुटभर अंतरावरच होता…..मी डोकं मागे घेतलं…..मला आवाज ऐकू आला….”अहो…अहो साठ्ये……थांबा….घाबरु नका…” मी थोडं धाडस केलं आणि पुन्हा डोकावलो….तो तिथेच उभा होता…आता त्याचा चेहरा हसरा होता….त्याच्या चेहऱ्यावर आणि नजरेत एक विलक्षण आश्वस्तता होती…..”साठ्ये, अजिबात घाबरु नका” मी म्हणालो, “हे जे काही आहे ते घाबरण्याच्याही पलीकडे आहे. घाबरु नका म्हणजे काय? तुमचं ही विश्व फक्त मलाच दिसतंय…बाकी कुणालाही नाही….तुम्ही कोण?” मी एका दमात प्रश्नांची सरबत्तीच केली….
आता तो पलीकडूनच थोडा जवळ आला असं मला वाटलं….”मी…मी गंगाधर म्हामूणकर….तुम्ही रहाताय त्या बंगल्याचा जुना मालक….” तो ह्सत होता…..माझे पाय मात्र जड होत असल्याचा भास झाला….
…..पुढच्याच क्षणी मी भानावर आलो. दुपार झाली होती (म्हणजे इथे) मी पुन्हा एकदा फटीत डोकावून बघितलं, तो तिथेच होता….गंगाधर….गंगाधर म्हामूणकर. हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडेच टक लावून बघत होता. पुढे काही बोलावं असं माझं धाडसच झालं नाही. मी माघारी फिरलो. हा भास नव्हता हे एव्हाना नक्की होतं, जरी ते फक्त मलाच जाणवत असलं तरी तो भास नव्हता. कारण, भास एकदाच होतो…जेमतेम. हे मात्र सतत सुरु होतं. मी स्किझोफ्रेनिक होतोय की काय? मी स्वत:शीच प्रश्न केला. पण तसंही काही नव्हतं. कारण, स्किझोफ्रेनिक माणसाला भास कुठेही आणि कसेही होतात, तो असंबध्द बोलतो, वागतो. माझ्या वागण्यातून असं काही इतरांना जाणवत नव्हतं. निदान अपूर्वाला तरी ते जाणवलं असतंच, ती स्पष्ट बोलली असती मला. किंवा हक्काने एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेला असता गाडीत घालून. ती माझ्याशी नॉर्मल बोलत होती. आज सकाळीच फोन आला होता तेव्हा तिच्या प्रश्नांना मी नीट उत्तरंही दिली होती. मी केलेल्या सर्व इन्वेस्टमेंट्स मला आठवल्या…व्यवस्थित आठवत होत्या. मी इस्त्री कुठे ठेवली आहे? माझा आकाशी रंगाचा शर्ट आणि मागच्या महिन्यात घेतलेली डेनिम जीन्स कुठे आहे? हे देखील मला आठवत होतं…..देअर इज नथिंग ऍबनॉर्मल इनसाईड मी…..सगळं विचित्रपण एकवटलं होतं ते त्या भिंतीपाशीच…..
दुपारी हलकं जेवण घेतलं…आणि झोपलो. झोपेतही विचित्र भास होत होते….मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी थोडं वॉक घ्यावं या उद्देशाने मैलभर फिरुन आलो…आता पुढचे दोन दिवस त्या भिंतीकडे जायचं नाही हे मी पक्कं ठरवलं होतं. अपूर्वाचा फोन संध्याकाळी पुन्हा आला होता….व्हॉटसअपवर पडद्यांच्या काही डिझाईन्स, वॉशबेसिनची काही लेटेस्ट मॉडेल्स पाठवली होती, त्यातलं सिलेक्ट करुन मी रिप्लायही केला…दोन दिवस मी इतर कामं करत होतो. एकदा अपूर्वाच्या ऑफिसला जाऊन तिला ऍडव्हान्स चेकही देऊन आलो….माझं मन मात्र काही केल्या त्या भिंतीपासून अलिप्त व्हायला तयार नव्हतं हे मात्र अगदी खरं…
गुरुवारी मी मनाचा हिय्या केला आणि भिंतीजवळ गेलोच….आत नजर टाकली…तेच दृश्य होतं…आणि अचानक मला तो दिसला…गंगाधर म्हामूणकर….जणूकाही माझी वाटच बघत होता की काय देव जाणे?…..”साठ्ये, अहो कुठे गेलात अचानक…गेली तासभर वाट बघतोय मी….
” “तासभर? मी इथे दोन दिवसांनी येतोय म्हामूणकर….” मी धाडस करुन बोललो….
“ओह…ओह…बरोबर इथला तास म्हणजे तिथले दोन दिवस…यू आर राईट मिस्टर साठ्ये…बरोबर आहे तुमचं” म्हामूणकर म्हणाला
“प्लीज….” एव्हाना माझी भीड चेपली होती…”इथलं आणि तिथलं म्हणजे काय? मला नीट सांगा” मी म्हणालो
“सांगतो, पण दोन प्रॉमिसेस करा आधी….मध्येच असं संभाषण सोडून जाणार नाही याचं आणि भिंत पाडणार नाही हे”
“प्रॉमिस….मध्ये जाणार नाही. आणि जोपर्यंत मला तुमचा त्रास होत नाही तोपर्यंत मी भिंत पाडणार नाही” मी सुधारणा केली…
“हाहाहा….मी कशाला त्रास देईन हो तुम्हाला” गंगाधर म्हणाला, “उलट तुम्ही इथे यावं असं मला मनापासून वाटतं. मलाही असंच इन्व्हाईट केलं गेलं होतं…बापू काटदरेंनी…..आणि बापू काटदरेंना दिनकर शेवाळेंनी…आणि दिनकर शेवाळेंना गोविंद परांजपेंनी….” गंगाधर बोलत होता
“वेट…वेट….तुम्ही हे काय अगम्य बोलताय मला समजत नाही गंगाधर म्हामूणकर….” मी उत्तरलो
“सांगतो ना, अहो साठ्ये ही भिंत म्हणजे एक प्रवेशद्वार आहे….तिथून इथे येण्याचं….पण तो वनवे आहे. म्हणजे तिथून येथे येता येतं पण इथून तिथे जाता येत नाही हो….” माझा चेहरा अधिकच प्रश्नार्थक झाला…त्यावर गंगाधर म्हणाला, “नीट सांगतो ऐका….ही भिंत काही नवी नाहीये….ती खूप प्राचीन आहे. म्हणजे ती कोणी बांधली, कधी बांधली याचा काहीही ठावठिकाणाच नाहीये….भिंतीचे मालक बदलले की तिच्यावर नवं प्लॅस्टर केलं जातं, ती नवी वाटते….आपली बंगलो स्कीम झाली ना त्याच्याही शेकडो वर्षे आधीपासून ही आहे…
त्याआधीच्या मालकांच्याही आधीपासून ती आहेच. ती इथे कशी याच्या डिटेल्समध्ये लोकं कधी गेलेच नाहीत बघा…आहे ना भिंत तर असू दे….कोणीच ती पाडायचा प्रयत्न केला नाही….म्हणजे एक दोघांनी तसा प्रयत्न केला होता….ते आदल्या दिवशी हृदयविकाराने गेलेच आणि मग तो बेत तसाच बारगळला….ही फट ज्यातुन आपण एकमेकांशी बोलतोय ना ती देखील अशीच पुरातन आहे….हे एक्झॅक्टली काय आहे? ते कोणालाच माहिती नाही….”
“पण मला एक सांगा…..हे फक्त मलाच दिसतंय ते? अपूर्वाला माझ्या मैत्रिणीला, किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला हे कसं दिसलं नाही आतलं दृश्य?…टेल मी” मी विचारलं
“त्याचं कारण मला ठावूक नाही…काटदरे म्हणत होते की ज्यांना आत येण्याची संधी असते त्यांनाच म्हणे हे दिसतं. इतरांना दिसत नाही…..ते जाऊ दे…मी काय म्हणतोय….तुम्ही, मी काटदरे, दिनकर शेवाळे, गोविंद परांजपे आपल्यात एक धागा कॉमन आहे. कोणता माहितीये? तो असा की आपल्याला भिंतीपलीकडलं विश्व दिसतं आणि आपण सगळे अनमॅरीड आहोत….आपण सबंध आयुष्यात सुख असं रुढार्थाने बघितलंच नाही…अनुभवलंच नाही..तिकडच्या विश्वात. साठ्ये….बिलिव्ह मी…इथे या…इथे सर्व सुखं (आता म्हामूणकरांनी एक डोळा बंद करुन उजव्या नाकपुडीवर तर्जनीचं टोकं लावलं आणि लगेच पुढच्याच क्षणी अंगठा ओठाला लावून दाखवला…..समजलं ना…..म्हणजे बाई आणि बाटली हो…) हात जोडून उभी आहेत….इथे एकसे एक सुंदर ललना आहेत उपभोगासाठी सज्ज असलेल्या, इथे उत्तमोत्तम खाद्यपदार्थांची रेलचेल आहे……आस्वाद घेण्यासाठी आणि धुंद होण्यासाठी सुरेख चवीची मद्य आहेत, रहायला आलिशान घरं आहेत…मुख्य म्हणजे हे सर्व काही फुकट आहे कारण इथे पैसाच लागत नाही. सारं काही आपोआप मिळतं…” म्हामूणकर बोलत होते
मी आत्ममग्न झालो….खरंच आजवर शक्य असूनही मी या सुखांचा कधी विचारच केला नव्हता…..त्यांचं बोलणं इतकं प्रभावी होतं की मला त्या विश्वाची एका क्षणात अनिवार ओढ लागली. एरव्हीच इथे माझं कुणीही जीव लावावं असं नव्हतंच….दोनचार मित्रमैत्रिणी सोडलं तर होतं कोण माझं?…..काय झालं कुणास ठावूक….मी एका क्षणात निर्णय घेतला….”म्हामूणकर…आय वॉंट टू कम इनसाईड….मलाही यायचंय”
“गुड….मला माहिती होतं साठ्ये….तुम्ही यालच…” म्हामूणकर म्हणाले, “आता एक काम करा. मी केलं तसं घाईघाईने येणं न करता सर्व काही नीट व्यवस्था लावून मगच या….परवा याच वेळेला भेटतो मी. तेव्हा आत या” इतकं बोलून ते निघून गेले
पुढचे दोन दिवस खूप गडबडीचे होते. आता मला “तिथले” वेध लागले होते. मृत्युपत्र केलं, इतर काम पूर्ण केली. माझी जवळची मैत्रीण अपूर्वाच होती….तिच्याच नावे सारं काही केलं होतं मी….गुप्ता वकिलांकडे सर्व कागदपत्रे सेफ ठेवली होती…सकाळीच अपूर्वाला फोन केला…हे तिच्याशी शेवटचं बोलणं होतं हे मला माहिती होतं…तिला माहिती नसल्याने उद्यापासून काम सुरु करण्याबद्दलच ती बोलत होती. मी विषय बदलला…थोडं निरवानिरवीचं बोलल्यावर माझ्यावरच उखडली, “मेल्या अजून पन्नास वर्षे जगशील तुला काय धाड भरलीये मरायला…” असं काहीतरी बोलली. तिला बोलता बोलता, इन केस माझं काही झालं तर गुप्ता वकीलांना भेट असं बोलून ठेवलं….तिने रागाने फोनच बंद केला….
अंगणात गेलो….मागे वळून घराकडे एक नजर टाकली. मागे वळावं असे पाश शिल्लकच नव्हते….आणि मी मरणार कुठे होतो? मी जिवंत रहाणारच होतो….मी फटीत नजर टाकली….म्हामूणकरांसोबत इतरही बरेच लोकं आले होते. काटदरे, शेवाळे, परांजपे….आणि आणखीन बरेच जण होते….
“आटोपलं का सगळं नीट?….मग साठ्ये…आता एक काम करा…तुम्ही जिथे उभे आहात तिथे डावीकडे एक प्लॅस्टर उखडून आलेली वीट दिसतेय का?” मी बघितलं तर तशी एक वीट दिसत होती…मी हो म्हणालो
“मग आता त्या वीटेवर उजवा तळहात ठेवा आणि किंचित दाब द्या…..” म्हामूणकर म्हणाले
मी तसं केलं….आणि काय झालं ते समजलंच नाही….पण पुढच्याच क्षणी मी “तिथे” होतो…आता माझ्या अगदी जवळ ही मंडळी होती….सर्वजण हसतमुख आणि माझ्या स्वागताच्या तयारीत होते…..आता माझ्या मागे भिंत होती आणि तिला अगदी तश्शीच फट होती…..
इथे खरोखरच मस्त आयुष्य सुरु आहे….हो अगदी म्हामूणकर म्हणाले तसंच…मस्त ऐश सुरु आहे…..असे इथून तिथे आलेले आम्ही एकूण शहात्तर जणं आहोत….फक्त एकच करावं लागतं….जो क्रमाने तिथून पहिला आहे ना त्याला जेव्हा इथला कंटाळा येतो तेव्हा इथून जो पहिला आहे त्याने भिंतीजवळ उभं राहून नव्या मेम्बरला “आमंत्रण” द्यावं लागतं….नवा मेम्बर आला की ज्याला कंटाळा आलाय तो शहराच्या दुसऱ्या बाजूला अशीच एक भिंत आहे तिथे जातो आणि तिथून पलीकडे निघून जातो, त्याचं पुढे काय होतं ते आम्हाला समजत नाही….शहात्तर ही गणसंख्या मात्र कायम ठेवावी लागते….हा इथला नियम आहे.
आज तिथून पहिल्या मेंबरला कंटाळा आलाय….त्यामुळे आता माझी पाळी आहे….नव्या मेंबरला आमंत्रण द्यायची….म्हणून इथे आलोय भिंतीजवळ…..अपूर्वाला बंगला विकायचाय असं समजलंय….पण अजून खरेदीदार काही सापडत नाहीये…..तुम्हाला यायचंय का इथे?….एक काम करा….कागद पेन घ्या…मी अपूर्वाच्या ऑफिसचा पत्ता आणि नंबर लिहून देतो…..खरंच या इथे……खूप मजाच मजा आहे इथे….सिरिअसली….!!!!
(समाप्त)
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)