©राजश्री बर्वे
स्तब्ध निसर्गातील शांततेचा तो गूढ असा आवाज मला फार आवडतो. शहरात तो कधीच अनुभवायला मिळत नाही. म्हणूनच तर मी इथे येतो. ह्या वाड्यात. असेल पडका. असेल जुना. काय फरक पडतो? मला आवडतं इथे येऊन रहायला. शहरातल्या त्या गर्दीत आंबलेल्या शरीराने आणि थकलेल्या मनाने काहीच मनासारखं करता येत नाही. म्हणून मग हे अधून मधून इकडे येऊन रहाणं सुरु केलं आहे. हा वाडा तसा वडिलोपार्जित. पडला होता तसाच. पण आता मी येतो, राहतो म्हणून जरा जीवंत वाटतो.
तसाही मी सडाफटिंग माणूस. आमच्या मागे रडणारं कोणीही नाही. एकटा जीव सदाशीव. आता मी एकटा ह्याचं लोकांना भारी वाईट वाटतं. जो तो मला बोहोल्यावर चढवायला आसुसलेला. आता मी का ह्यांच्या घरचं खातोय? पण नाही. सतत आपला लग्नाचा विषय. कंटाळा आणतात ही माणसं. मलाही लग्न करायचंच होतं की. ब्रम्हचारी रहायचा विषयच नव्हता मनात. पण आवडलेली ‘ती’ मिळाली नाही आणि ज्या मिळू शकल्या असत्या त्या आवडल्या नाहीत. आता तर चाळीशीही उलटली. त्यामुळे तो विषय मनातून बाजूला केलाय. मस्त रहावं आनंदात. मनमौजी बनून. चित्र काढावी वेगवेगळी. फेसबुकवर टाकावी. खूप छान रिस्पॉन्स येतोय ह्या सोशल मीडिया वरून. पूर्वीसारखं राहिलं नाही आता. ती प्रदर्शनं भरवा. लोकांना बोलवा. हॉलचं भाडं तरी निघतंय ना, ह्याचं टेन्शन घ्या. काही काही नाही. फक्त वेगवेगळ्या साईट्स, ग्रुप्स वर जा, फोटो अपलोड करा. आवडलं चित्र तर लोक करतात कॉन्टॅक्ट. मग त्यांना पर्सनलवर त्या चित्राचे अजून काही फोटो टाकायचे. किंमत सांगायची. पैसे मिळाले की कुरिअर करून टाकायचं चित्र. संपला विषय. इतकं सोप्पं झालं आहे सगळं.
गेल्या महिन्यातलाच प्रसंग. कस्टमरचा फोन आला. त्याला चित्र आवडलं म्हणून वेगवेगळ्या अँगल मधून फोटो काढून पाठवले होते. तरीही त्याला अजून काहीतरी हवं होतं.
“चित्र छान आहे पण अजून जिवंत हवं.” त्याचा मेसेज.
“म्हणजे नक्की काय?” माझा प्रश्नात्मक रिप्लाय.
“म्हणजे असं की तुमच्या चित्रात फक्त निसर्ग आहे. स्तब्ध असा. काहीतरी मिसिंग वाटतंय. मला विशेष कळत नाही पण कुठलीच भावना दिसत नाही त्यात. चित्र जीवंत वाटण्याकरता काहीतरी थोडा बदल कराल का?”
“बरं. बघतो. प्रयत्न करतो.”
जिवंतपणा हवाय म्हटल्यावर तिची आठवण आलीच. पण अशी आठवण आली की मी प्रयत्नपूर्वक ती बाजूला करतो. उगाच का झुरत बसायचं तिच्यासाठी? त्यापेक्षा चित्राचा विचार करावा. असा काही विचार करायचा असला की मला व्हिस्कीची आठवण येतेच. शिवाय तिची आठवण घालवण्याकरता पण बरी पडते हो व्हिस्की. जास्त नाही. फक्त दोन किंवा तीन पेग. मग मस्त झिंग चढते.
चित्रात काय बदल करायचे त्याचा विचार करत झोपी गेलो. सकाळी उठलो आणि तीनताड उडालोच. चित्रात आपोआप बदल झाला होता? हो की! आता ते अधिक सुंदर दिसत होतं. मला प्रश्न पडला मी रात्री स्वतः झोपेतून उठून हा बदल केला की काय? पटकन त्या नवीन चित्राचे दोन तीन फोटो काढले आणि कस्टमरला पाठवून दिले. त्याच्याकडून वर केलेला अंगठा आला. समाधानाची पावती मिळाली. मीही खुश झालो.
हल्ली मला एक जाणवतंय ते सांगू का? विश्वास बसेल तुमचा? बहुतेक नाही बसणार. तरीही सांगतोच. इथे म्हणजे ह्या वाड्यात काढलेली चित्रं ही पूर्णपणे माझी चित्र नसतात. म्हणजे त्यात कोणीतरी येऊन काहीतरी बदल करतं आणि त्या बदलामुळेच की काय त्या चित्राला एक वेगळंच सौन्दर्य प्राप्त होतं. अहो खरंच ! आता मघाच्याच चित्राचं बघा ना. मी सकाळी उठलो तेव्हा त्या चित्रात एक बदल झाला होता. अगदी छोटा. मी काढलेल्या त्या रानात एक छोटंसं निळं फुलपाखरू दिसत होतं. उगाच का मी चमकलो होतो ते चित्र बघून. आधी थोडा घाबरलो. असं कसं झालं काही कळेचना. मग माझी मीच समजूत घातली. बहुतेक रात्री तोच विषय असणार मनात. त्यामुळे मीच झोपेत उठून काढलं असणार. कारण एखादं फुलपाखरू काढावं असा विचार आला होता माझ्या मनात रात्री. किंवा मग व्हिस्कीचे चार पेग रिचवले त्याची करामत असणार. असो. चित्र छान झालं होतं. कस्टमरला आवडलं होतं. अजून काय हवं?
*****
आता मात्र कमाल झाली. त्या दिवशी झालं ते झालं पण प्रत्येक चित्रात हे बदल कसे होतायत? त्या दिवसापासून. ते फुलपाखरू काढलं त्या दिवसापासूनच होतंय असं. नक्की. पण तेव्हा तर चित्रात जिवंतपणा हवाय अशी कस्टमरची डिमांड होती. तेच अंतर्मनात जाऊन बसलंय का माझ्या?
जास्त करून निसर्गचित्रंच असतात माझी. नदीची, धबधब्याची, डोंगरदऱ्यांची, समुद्राची, वाळवंटाची अशीच सगळी. माझ्या चित्रात माणूस, पक्षी, जनावरं असं कुणीच नसतं त्यात. तिचंही हेच म्हणणं होतं. माझ्या चित्रात काहीतरी कमतरता जाणवते म्हणे. पण मला मात्र तसं कधीच जाणवलं नाही. मला माझी चित्रं कधीच अपूर्ण भासली नाहीत. म्हणून माझ्या मनात असतात तशीच काढतो मी चित्रं. बहुतेक वेळा चित्र पूर्ण करूनच झोपतो. पण मग रात्र संपते. दुसऱ्या दिवशी उठून पहावं तर चित्रं बदललेलं असतं . पूर्ण नाही थोडंसंच.
म्हणजे एका चित्रात नंतर कोणीतरी पैंजण काढलेले होते. तर दुसऱ्या एका चित्रात मोगऱ्याचा गजरा होता. एका चित्रात तर मी अतिशय सुंदर अशी आपल्याच धुंदीत नागमोडी वळणं घेणारी पाऊलवाट काढली होती. अगदी परिपूर्ण असं चित्र झालं होतं ते माझ्या दृष्टीने. पण दुसऱ्या दिवशी बघतो तर कोणीतरी त्या पाऊलवाटेवर सुंदरसं मोरपीस काढलेलं दिसत होतं. मीही बघतच राहिलो त्या चित्राकडे. अगदी पुढे होऊन ते मोरपीस उचलावंस वाटेलं इतकं सजीव वाटत होतं ते. नंतर अजून एक चित्र काढलं होतं मी. समुद्राचं. लाटेने नुकत्याच भिजवलेल्या किनाऱ्याचं. सोनकेशरी किरणांनी स्पर्श केलेल्या चकचकीत वाळूचं. दुसरे दिवशी उठून बघतो तर त्या वाळूत पाऊलखुणा होत्या. आणि अशा की जणू आता कोणी चालत गेलं आहे त्या चित्रावरून. खरंच खूप सुंदर दिसत होतं ते चित्र रात्रीच्या चित्रापेक्षा. पण कोण करत असेल माझ्या चित्रात बदल? ह्या प्रश्नाचं उत्तर काही मिळेना. दुसऱ्या कोणी काढलं म्हणावं तर दरवाजाला कडी असते. आता रात्री मीच झोपेत उठून काढत असेन तर देव जाणे. कारण भुतंखेतं, आत्मा वगैरेवर तर विश्वासच नाही माझा. आता ठरवल्याप्रमाणे सीसी कॅमेरा लावून घ्यायला हवा.
अजून एक लक्षात आलं ते असं की आधी काढलेलं चित्र जर झोपायच्या आधी अपलोड केलं तर त्याला एवढा रिस्पॉन्स येत नाही पण तेच चित्र बदलल्यानंतर अपलोड केलं रे केलं की लगेच मागणी येते. काय जादू आहे काही कळत नाही. ह्या सगळ्या गेल्या दीड दोन महिन्यातल्या गोष्टी. मी हे कुणाला सांगायलाही जात नाही. कारण मला खात्री आहे कुणाचा विश्वास बसणार नाही याची. हे तर हे. पुढचं सांगितलं तर तुम्ही अजूनच चक्रावून जाल. मी तर खूपच गोंधळून गेलो आहे.
झालं असं की ते फुलपाखराचं चित्र विकल्यानंतर लगेच काही दिवसात त्या कस्टमरचा परत फोन आला. ते निळं फुलपाखरू त्या फ्रेममधून बाहेर आलं होतं म्हणे.
“थोडं फडफडलं, बागडलं आणि मग परत फ्रेममध्ये जाऊन बसलं.” तो कस्टमर म्हणाला.
“व्हॉट? इज इट ट्रू? कसं शक्य आहे?” माझा विश्वासच बसत नव्हता. पण तो शपथेवर सांगू लागला. मग मी तरी काय बोलणार? समथिंग वॉज रॉंग. काहीतरी गडबड आहे. त्या चित्रात किंवा ह्या वाड्यात नाहीतर त्या कस्टमरमध्येच. तरी मी म्हटलं जाऊदे. त्याला भास झाला असेल. पण नंतर जेव्हा इतर कस्टमर्सचे फोन आले तेव्हा मात्र माझ्या डोक्याचा भुगा झाला. ते पैंजण ज्याच्या चित्रात होते त्याला म्हणे पैंजणाचा छुमछुम असा आवाज येत होता.
“ओह माय गॉड ! कसं शक्य आहे? तुम्हाला भास होत असेल.”
“छे हो ! मला एक वेळ भास झाला पण माझ्या पत्नीलाही ?” हे ऐकून मी गप्पच बसलो.
काही दिवसांनी अजून एक फोन. त्याला चित्रातल्या गजऱ्याचा वास येत होता. चवथ्याला चित्रातल्या पाऊलखुणा वाळुसकट बाहेर टाइल्सवर उमटलेल्या दिसल्या होत्या. पाचव्याला चित्रातलं मोरपीस चेहऱ्यावरून फिरवताना होतो तसा स्पर्श होत होता.
मी प्रत्येक फोनगणिक आश्चर्यचकित होत होतो. खरंच हे सगळं असं घडत होतं? म्हणजे चित्रात ज्या गोष्टी मी काढत नव्हतो त्या गोष्टींचं अस्तित्व त्यांना जाणवत होतं? याचं कारण काय असेल? असं तर नसेल की त्या गोष्टींमध्ये इतका जिवंतपणा असेल की तो जिवंतपणा सत्यात उतरत असेल. किती वेगळीच कल्पना आहे नाही? चित्रातल्या जिवंतपणाचा अतिरेक. चित्रातल्या गोष्टी सचेतन होऊन बाहेर येत असतील तर असं चित्र चांगलं की वाईट? तिलाही असंच चित्र अपेक्षित होतं?
आता मला चित्र काढायचीच भीती वाटत होती. याचं कारण असं की आतापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टीच आपोआप चित्रात येत होत्या. जिवंतपणा आणत होत्या पण परवाच्या माझ्या चित्रात रक्ताचे थेंब ठिबकताना दिसले होते जे मी काढलेच नव्हते. बरं. ते चित्र मी लगेच अपलोडही केलं होतं. त्याची किंमतही भरपूर ठेवली होती. गंमत म्हणजे एवढी किंमत ठेवूनही लगेच गिऱ्हाईक मिळालं होतं. अगदी सांगितलेल्या किमतीला तो तयार झाला. जराही घासाघीस नाही. पण नंतर मात्र मी घाबरलो. रक्त वगैरे म्हणजे नकोच वाटलं मला. उगाच काहीतरी भलतंच घडलं तर? पण कस्टमर मागेच लागला. ऐकेचना. इतका की त्याने स्वतःहून भाव वाढवत नेला. अगदी डबल केला. शेवटी मी हार पत्करली. म्हटलं बघू. थोडं बिनधास्त होऊन बघूया. काय होईल फार फार तर. फक्त दोनच तर थेंब आहेत रक्ताचे. खून तर नक्कीच नाही होणार. मग हो म्हटलं. सौदा ठरला. चित्र विकलं गेलं.
काही दिवस गेले. त्याचा काही फोन आला नाही. मनाला बरं वाटलं पण तात्पुरतंच. बिलकुल चैन पडेना. फोन करावा का? पण विचारणार काय फोनवर? त्यापेक्षा सरळ घरीच जावं. पत्ता होताच आणि घर जवळंच होतं. मनाचा हिय्या करून गेलो. ‘फीडबॅक घ्यायला आलो. आपलं चित्र कस्टमरच्या भिंतीवर कसं दिसत हे अधूनमधून जाऊन बघतो मी. ह्या बाजूला आलोच होतो म्हणून आलो.’ असं काहीसं सांगायचं असं ठरवून गेलो.
त्याने दरवाजा उघडला. मी ओळख सांगितली. त्याने चित्र दाखवलं. तो चित्रावर बेहद्द खुश होता. त्याला काही वाईट अनुभव आला असं काही म्हणाला नाही. मी सुटकेचा निश्वास टाकला. घसा उगाच कोरडा पडला होता. मी पाणी मागितलं. त्याने आतून आणून दिलं. त्याच्या हाताला बँडेज दिसलं. मी चरकलो.
“हे काय?”
“काही नाही हो. त्या चित्राकरता खिळा मारत होतो भिंतीवर. बहुधा लागला. दोन थेंब रक्त आलं एवढंच.”
एवढंच? मी हादरलो. चांगलाच सटपटलो. साधं रक्तं. पण तेही जिवंत झालं? हे थेंब तरी मी कुठे काढले होते? आता मला घाम फुटला. खिळा लागून रक्त येणं हा तसा साधा प्रसंग. त्याने चित्रातल्या रक्ताच्या थेंबांचा आणि त्याच्या बोटावर आलेल्या थेंबांचा काही संबंध नाही लावला ते माझं नशीब. तो काही बोलला नसला तरी मी मात्र मनातून घाबरलो होतो.
त्याने दिलेलं पाणी पिता पिता मी उगीचच खोली न्ह्याहाळू लागलो. तिथे कोपऱ्यात ठेवलेल्या नक्षीदार टेबलावरील फोटोवर माझी नजर पडली आणि मी उडालोच. त्याचा फोटो होता तिच्यासोबत. म्हणजे हा तिचा नवरा? किती वर्षांनी पाहिलं तिला? आजही तशीच दिसतेय. कॉलेजमध्ये दिसायची तशी. ते फुलपंखी दिवस आठवले. मी परत एकदा त्याच्याकडे पाहिलं. आता वेगळ्या नजरेतून. नाही म्हटलं तरी मत्सर वाटलाच. माझ्या हृदयाचा तुकडा त्याच्याजवळ होता. आता मी जरा कानोसा घेतला. आत ती आहे का त्याचा. तेवढ्यात तो म्हणाला,
“अजून एक काम होतं तुमच्याकडे.”
“बोला ना.”
“अजून एक चित्र काढून हवं होतं. शक्यतो चार दिवसांत. आमच्या बेडरुमकरता. आमच्या हिला गिफ्ट द्यायचं आहे वाढदिवसाला. आता ट्रीपला गेलीय. शक्यतो ती यायच्या आत जमवाल का? तिला हे तुमचं चित्र खूप आवडलं होतं. विशेष करून ते उजव्या कोपऱ्यातल्या पिवळ्या गुलाबातून गळणारे ते दोन रक्ताचे थेंब. त्यामुळे चित्रात जिवंतपणा आलाय असं म्हणाली ती. काही खास विचार करून काढलं असणार असंही म्हणाली.”
ते ऐकून मला तो प्रसंग आठवलाच. कॉलेजात असताना आमची छान मैत्री होती. तिच्याकरता मी फक्त मित्र होतो. पण माझ्याकरता ती सर्वस्व होती. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. ठरवलं आज विचारायचंच. खूप खपून एक चित्र काढलं होतं तिच्याकरता. नेहमीप्रमाणे माझ्या आवडीचं निसर्गचित्र. तिला दिलं. वाटलं होतं हरखून जाईल. पण अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. मी माझं मन मोकळं करायच्या आतच ती म्हणाली,
“काय रे तू? कधी सुधारणार तुझी चित्रं.? नुसता निसर्ग दाखवतोस. पण कुठेही जिवंतपणा नाही, रसरशीतपणा नाही. रागावू नकोस पण कुठलीच भावना जिवंत होऊन येत नाही तुझ्या चित्रात. ना स्वच्छंदीपणा, ना कलात्मक अविष्कार, ना हळुवारपणा, ना शृंगार. बरं चांगल्या भावना नाहीत तर नाहीत पण राग, द्वेष, उदासीनता, क्रूरता अशा तरी भावना दिसायला हव्यात ना. पण त्याही नाहीत. असतं काय त्यात? तर फक्त कोरडा, शुष्क, निस्तेज असा निसर्ग. अगदी तुझ्यासारखाच.” हे बोलताना ती डोळा मारून हसलीही. तिच्या दृष्टीने ती मस्करी होती. पण मी मात्र विझलो होतो. पुढे तिला काही सांगण्याची माझी हिंमतच झाली नाही. त्या दिवशी तर नाहीच पण नंतरही नाही. मला कळलं होतं, मी आणि माझी चित्रं दोन्ही तिला आवडत नाही.
आज इतक्या वर्षांनी ती अशी भेटत होती. फोटोतून. आताही तिच्या वाढदिवसानिमित्त चित्र काढायची संधी मिळाली होती. ही संधी मी दवडणार नव्हतो. आता मी जे चित्र काढणार होतो ते तिला आवडायलाच हवं. आणि हो. ह्या चित्रात जिवंतपणा हवा, भावना हव्यात. अगदी ओतप्रोत भरलेल्या.
घरी गेल्या गेल्या मी उत्साहात चित्र काढायला बसलो. काय बरं काढावं? मला सुचेना. तेवढ्यात एक सुंदर कल्पना सुचली. थ्री डायमेन्शनल पेन्सिल स्केच काढायचं आणि त्यात माझ्या आधीच्या चित्रांमधून जिवंत होऊन आलेल्या, कस्टमरना खूप आवडलेल्या गोष्टी एकत्र आणल्या तर ते चित्र किती मस्त होईल. ते स्वच्छंदी फुलपाखरू, धुंद करणारा तो मोगऱ्याचा गजरा, अंगावर रोमांच उठतील अशा स्पर्शाचं मोरपीस. ह्या कल्पनेने मला अगदी भुरळ घातली आणि मी लगेच कामाला लागलो.
कॅनव्हासवर प्रथम नव्वद अंशात उघडलेलं स्केचबुक काढलं म्हणजे लॅपटॉप उघडला की कसा दिसतो तसं. स्केचबुकच्या उभ्या पानातून एक झाडाची फांदी बाहेर आलेली दाखवली. त्या फांदीवर एक झोपाळा काढला. झोपाळ्यावर तिचं चित्र काढलं झोका घेतानाचं. तिच्या पायात पैंजण, केसात गजरा माळलेला. हातात मोरपीस जे ती आपल्या चेहऱ्यावरून फिरवत होती. तिच्या समोरून जाणारं फुलपाखरू. मला अजून एक कल्पना सुचली. ह्या चित्राकडे बघून तिला माझी आठवण यायला हवी असं मला प्रकर्षाने वाटलं. मग मी चित्राच्या उजव्या बाजूला फक्त दोन डोळे काढले. अगदी माझ्या डोळ्यांसारखे. राखाडी निळसर रंगांचे.
पूर्ण चित्र ब्लॅक अँड व्हाईट होतं फक्त माझे डोळे निळसर रंगाचे. ओह वाव ! सुपर्ब ! मीच माझ्या चित्रावर बेहद खुश झालो. थ्री डी असल्याने ते चित्र खूपच सुंदर दिसत होतं. जणू काही आपल्या समोर तीच झोपाळ्यावर बसली आहे असं. आणि ते डोळे! ते तर अगदी खरे वाटत होते. त्या चित्राकडून माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्या कस्टमरच्या फ्रेममधून बाहेर आलं तसं ह्या फ्रेममधूनही बाहेर येईल हे फुलपाखरू? मोगऱ्याचा दरवळ सुटेल तिच्या बेडरूममध्ये? मोरपिसाचा स्पर्श होईल तिच्या चेहऱ्याला? आणि हे सगळं अनुभवताना ते चित्रातले निळे डोळे पाहून तिला आठवण होईल का माझी? मी स्वप्नात वहात चाललो होतो.
त्या धुंदीत मी ते चित्र त्याला कुरियर करून टाकलं कारण त्या थ्री डी चित्राचा टू डी फोटो काढून मला त्या चित्राचा अपमान करायचा नव्हता. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून तिचं समाधान व्हायला हवं अशी माझी इच्छा होती. फक्त प्रॉब्लेम एकच होता. हे पूर्ण चित्र मी काढलं होतं. अगदी अख्खच्या अख्ख. त्यात कुणाचाही इंटरफिअरन्स नव्हता. पूर्वीच्या चित्रांसारखा. मग असं असताना वाटत असेल का ते चित्र जिवंत? हा एकच प्रश्न मला सतावत होता.
तीन दिवस होऊन गेले तरी अजून त्या चित्राचा अभिप्राय आला नाही म्हणून मी अस्वस्थ होतो. शेवटी ठरवलं मनाचा हिय्या करून परत जायचं. मी निघणार तोच त्याचा फोन आला. त्याच्याकडून जे कळलं त्याने तर मी पार दुःखात गेलो. त्याचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले.
“माफ करा हं. पण तुमचं चित्र मी परत पाठवलं आहे कुरीयरने. तुम्हाला पैसे ट्रान्सफर केले होते ते परत नाही दिलेत तरी चालेल.”
“का पण? काय झालं?”
“काय कोण जाणे. पण तिला नाही आवडलं.” तो एवढंच म्हणाला.
“पण कारण काय?” हे विचारल्याशिवाय मला चैन पडलं नसतं.
“ह्या चित्रात ओढून ताणून भावना भरल्याचा प्रयत्न दिसतोय आणि तरीही ते निर्विकार, निरसच दिसतंय असं काहीसं म्हणाली ती. डोळे निळे असूनही निस्तेज, कोरडे वाटत आहेत असंही म्हणाली. सॉरी हं. तुम्हाला वाईट वाटलं का? मला चित्र परत पाठवून तुमचा अपमान करायचा नव्हता. फक्त वाटलं की तुम्ही निदान दुसऱ्या कुणाला देऊ तरी शकाल.” तो पुढेही काही बोलत होता पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. वीस वर्षांपूर्वी माझ्या चित्रांची जी स्थिती होती ती आजही तशीच होती. शुष्क, कोरडी माझ्यासारखीच.
****
ते चित्र माझ्याकडे परत आलं. तिच्या परीक्षेत मी परत नापास झालो. मी चित्र उघडलं आणि पाहिलं. मलाही त्यातलं फुलपाखरू, गजरा, मोरपीस काही म्हणजे काही जिवंत वाटत नव्हतं जे चित्राच्या बाहेर येईल. मी कुठल्याच कामाचा नाही. माझ्याकडे तिला आवडावं असं काहीच नाही. नैराश्य माझ्या मनात मावेनासं झालं. नैराश्याने माझं मन ओलांडून सगळा मेंदू पण काबीज केला. कपाळावरची नस ताडताड उडायला लागली. मी व्हिस्कीचा ग्लास भरला. पेगमागून पेग रिचवत राहिलो. किती वेळ कोण जाणे. डोळ्यांवर ग्लानी आली. तिथल्याच सोफ्यावर जरा आडवा झालो. थोड्या वेळाने जाग आली. नशेत काय काय केलं ते आता आठवतसुद्धा नव्हतं. तारवटलेल्या डोळ्यांनी त्या ‘सो कॉल्ड’ जिवंत चित्राकडे पाहिलं तर त्यात आता बदल झाला होता. आता त्या डोळ्यातून निळसर राखाडी बुब्बुळं बाहेर आलेली दिसली. मेलेल्या माणसासारखी. आता ते डोळे मेलेल्या माणसाचे वाटत असले तरीही त्या चित्रात मात्र मघापेक्षा जास्त जिवंतपणा होता. तिला अभिप्रेत असलेला.
माझ्याही नकळत मी आत अडगळीच्या खोलीत गेलो. तिथे पडलेला जाड असा दोरखंड उचलला आणि बाहेर आलो. स्टूल घेतलं आणि त्यावर चढून पंख्याला दोरखंड बांधला. आता अगदी थोडाच अवकाश होता. ते चित्रातले बुब्बुळं बाहेर आलेले डोळे इतके जिवंत आणि रसरशीत होते की ते आता चित्राच्या बाहेरही दिसणार होते. अगदी दोन क्षणात.
*****
©राजश्री बर्वे
आम्ही पार्लेकर (विशेषांक २०१९)
डेड एन्ड ह्या कथासंग्रहातून
Continue Reading