ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची...
लेखन : अभिषेक शेलार
भाग : 2
भाग 1 पासून पुढे सुरु…
ओट्यावर ठेवलेल्या माठातून पाणी घेण्यास ग्लास बुडवणार इतक्यात… कोणीतरी रडत असल्याचा आवाज त्यांना त्यांच्या मागच्या बाजूने येऊ लागला… काहीसे आश्चर्यचकित होऊनच त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली… स्वतःच्या डोळ्यांवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता… कारण ती रडणारी व्यक्ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणीही नसून त्यांची सून म्हणजेच सरिता होती… नऊवारी साडी… मोकळे सोडलेले केस… हातात हिरवा चुडा… आपले दोन्हीही पाय पोटाशी घट्ट आवळून गुडघ्यांच्या मध्ये डोके खूपसून ती रडत होती… तिच्या त्या भेसूर रडण्यातून असंख्य वेदना जाणवत होत्या… तिला पाहून शकुंतलाबाई आश्चर्यचकित तर झाल्याच, परंतु आता एक प्रकारची अनामिक भीती त्यांच्या मनात दाटून आली होती…
"सरिता!!" काहीशा घाबरलेल्या स्वरातच त्यांनी सरिताला हाक मारली, परंतु तिचे रडणे काही थांबले नाही… त्या शांत वातावरणात तिचे ते भेसूर रडणे अधिकच भयावह वाटत होते… सचिन दमलेला असल्याने तसेच प्रतापरावांनी डायबेटिसची औषधे घेतली असल्याने त्या दोघांना झोपेतून उठवण्याची शकुंतलाबाईंची अजिबात इच्छा नव्हती.
शेवटी न राहून त्या सरिताजवळ गेल्या व तिच्यासमोर येऊन बसल्या… सरिताचे रडणे अजूनही थांबले नव्हते… "सरिताss!!" सरिताच्या डोक्याला स्पर्श करतच शकुंतलाबाईंनी तिला हाक मारली… आणि वीजेचा तीव्र झटका बसावा तशा त्या मागे फेकल्या गेल्या… ज्याक्षणी त्यांनी सरिताला स्पर्श केला त्याचक्षणी तिने इतकावेळ गुडघ्यांमध्ये खुपसलेली मान वर केली आणि शकुंतलाबाईंच्या काळजात धस्स झाले… त्यांच्या अंगातील त्राणच संपला… जीव इथेच जातोय की काय असेच त्यांना वाटू लागले… कारण… काळजाचा थरकाप उडवेल असेच समोरील दृश्य होते… संपूर्ण जळालेला चेहरा… अर्धवट जळालेले केस… चेहऱ्यावर तसेच संपूर्ण शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या… काही ठिकाणी तर मांस अक्षरशः फाटून खाली लटकत होते… डोळे नव्हते… त्याजागी होत्या त्या फक्त रिकाम्या खोबण्या… देव्हाऱ्यातील त्या लाल रंगाच्या बल्बच्या प्रकाशात सरिताचे ते रूप अधिकच भयानक दिसत होते… तिचे ते विभत्स रूप पाहून शकुंतलाबाई पुरत्या हादरल्या होत्या… त्यांनी सचिन तसेच प्रतापरावांना हाक मारण्याचा अतोनात प्रयत्न केला, परंतु ना त्यांच्या तोंडून आवाज फुटत होता व ना त्यांना बसल्या जागेवरून उठता येत होते… घामाने त्यांचे संपूर्ण शरीर ओलेचिंब झाले होते… त्यांचे मरण त्यांना त्यांच्या डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसत होते…
मघासपासून ऐकू येत असलेल्या सरिताच्या रडण्याचे आता एका विचित्र हास्यात रूपांतर झाले होते… काहीवेळाने तिच्या संपूर्ण शरीरातून धूर येऊ लागला… बघता बघता तिचे शरीर आगीच्या प्रचंड ज्वाळांमध्ये सामावू लागले… तिच्या एकेका अवयवाची जळून राख होऊ लागली… आणि अचानक… तिचे संपूर्णतः जळालेले मुंडके धडावेगळे होऊन शकुंतलाबाईंच्या समोर येऊन पडले… आणि संपूर्ण घरात एकच किंकाळी ऐकू आली…
"अग आई काय झाले?? कोणते वाईट स्वप्न पाहिलेस का??" झोपेतच सचिनचा आवाज त्यांना ऐकू येत होता… डोळे उघडून पाहिले असता सचिन त्यांच्याशेजारी बसून त्यांना झोपेतून जागे करत होता… म्हणजे आतापर्यंत जॊ थरारक प्रसंग त्यांच्यासोबत घडला होता ते केवळ एक स्वप्न होते??... हो स्वप्नच ते… काळजाचा थरकाप उडवेल असे स्वप्न… एखाद्याचे शरीरच काय तर आत्माही कापून उठेल असेच ते स्वप्न होते… त्या स्वप्नाने शकुंतलाबाई मात्र संपूर्णतः हादरून गेल्या होत्या… त्यांच्या घशाला कोरडं पडली होती… हृदयाच्या ठोक्यांचा वेगही वाढला होता… भीतीने सर्वांगाला घाम सुटला होता… "अग शकुंतला काहीतरी बोल… एवढे कोणते भयानक स्वप्न पाहिलेस तू?" प्रतापराव उदगारले.
शकुंतलाबाईंच्या चेहऱ्यावरील भीती ते दोघेही स्पष्टपणे पाहू शकत होते. "हे घे आई, पाणी घे… म्हणजे थोडे बरे वाटेल तुला" पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देतच सचिन म्हणाला. "ती…ती इथेच आहे !! मेली नाहीय ती… आपल्यातच आहे ती… मुक्ती नाही मिळालीय तिला." अत्यंत घाबरलेल्या स्वरात व काहीशा थरथरतच शकुंतलाबाई म्हणाल्या. "अग आई कोण ती?? कोणाबद्दल बोलतेयस तू??" प्रश्नार्थक नजरेनेच सचिनने विचारले. "सरिता !!" शकुंतलाबाईंचे हे उत्तर ऐकून सचिनच्या काळजात धस्स झाले… "अग ते फक्त एक वाईट स्वप्न होते...आणि वाईट स्वप्न तर सर्वांनाच पडतात...त्याचा इतका विचार करण्याची काहीही आवश्यकता नाहीय...आणि सरिता जिवंत कशी असेल?? ती तर मेली आहे… हे तुलाही माहित आहे." शकुंतलाबाईंची समजूत काढतच सचिन म्हणाला… परंतु त्या आता काहीही ऐकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या…
बेडवरुन लगबगीने उठून त्या किचनच्या दिशेने जाऊ लागल्या… "अग आई कुठे जातेयस?" काळजीपूर्वक स्वरातच सचिनने विचारले… सचिन व प्रतापरावही त्यांच्या मागून किचनमध्ये गेले… "हे बघा !! इथेच बसली होती ती… खूप विक्षिप्तपणे हसत होती माझ्याकडे पाहून… मला खूप भीती वाटतेय… आपण हे घर सोडून जाऊयात… तिचा आत्मा मुक्त नाही झालाय" असे म्हणून शकुंतलाबाई रडू लागल्या. "अग आई असे काहीही नसते… हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही… तू चल, झोप जरा आता… वाटल्यास मी तुझ्या बाजूला बसून राहतो थोडावेळ म्हणजे तुला भीती नाही वाटणार." शकुंतलाबाईंना बेडपाशी घेऊन जातच सचिन म्हणाला. आपल्या पत्नीची झालेली ती अवस्था पाहून प्रतापरावांच्या डोळ्यांतही काळजीवजा भीतीने दाटून आली होती…
संपूर्ण रात्र सचिन त्याच्या आईच्या शेजारी बसून राहीला, परंतु शकुंतलाबाईंना काही झोप आलीच नाही… रात्रभर त्या तळमळत होत्या… स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होत्या… दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना खूप ताप भरला… अशक्तपणामुळे धड चालण्याचीही ताकद त्यांच्यात नव्हती, त्यामुळे सचिनने त्यांच्या family डॉक्टरांना फोन करून घरीच बोलावून घेतले… डॉक्टरांनी त्यांना तपासून काही औषधे लिहून दिली, परंतु त्या औषधांचा तसूभरही परिणाम त्यांच्यावर झाला नाही… त्याच रात्री त्यांची तब्बेत अधिकच खालावली… ताप,उलट्या, चक्कर तसेच संपूर्ण अंगाची आग होणे अशा एक ना अनेक व्याधींनी शकुंतलाबाईंना अगदी जखडून टाकले… त्यामुळे त्याच रात्री सचिनने त्यांना जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले…
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर लागलीच डॉक्टरांनी त्यांना तपासले… त्यांच्या शरीरात खूपच अशक्तपणा असल्याने त्यांना सलाईन लावण्यात आले… रात्री ठीक 9 वाजता हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने जेवणाचे ताट शकुंतलाबाईंच्या पुढ्यात आणून ठेवले, परंतु ताप तसेच तोंडाला चव नसल्याने त्यांना जेवण्याची अजिबात इच्छा होत नव्हती…पण पुन्हा औषधे घ्यायची असल्याने सचिन व प्रतापरावांनी काहीशी जबरदस्ती करतच त्यांना जेवण्यास भाग पाडले…
शकुंतलाबाईंना ज्या वॉर्डमध्ये admit केले होते तो केवळ 3 बेड्सचा एक छोटासा वॉर्ड होता… जेवता जेवता शकुंतलाबाईंचे लक्ष त्यांच्या समोरील बेडवर असलेल्या वृद्ध महिलेकडे गेले… पांढरेफटक मोकळे सोडलेले केस...सावळा रंग… संपूर्ण शरीरावर पडलेल्या सुरकुत्या...अंगावर मळकट पांढऱ्या रंगाची maxi… डोळ्यांतील बुबुळ अगदी बारीक… एखाद्या हडळीप्रमाणेच तिचे रूप होते… भिंतीला डोके टेकून ती एकटक शकुंतलाबाईंकडे पाहत होती… तिची ती भेदक नजर पाहून शकुंतलाबाईंच्या काळजात चर्रर्रर्र झाले… तिच्याकडे कानाडोळा करतच त्या जेवू लागल्या… त्या जेवल्यामुळे सचिन व प्रतापरावांनाही थोडे हायसे वाटले… त्या दोघांनीही मग थोडे थोडे जेवून घेतले… रात्री पेशंटसोबत थांबण्यास एकाच व्यक्तीला परवानगी असल्याने सचिनने आईसोबत थांबण्याचा निर्णय घेतला व प्रतापरावांना घरी जाण्यास सांगितले…
मध्यरात्रीचे साधारण 2:30 वाजले असतील… एका बेडवर शकुंतलाबाई तर मधल्या रिकाम्या बेडवर सचिन झोपला होता… अचानक कसल्याशा आवाजाने शकुंतलाबाईंना जाग आली… कोणीतरी जोरजोरात श्वासोच्छ्वास करत असल्याचा तो आवाज होता… नीट ऐकले असता तो आवाज सचिनच्या शेजारील बेडवर झोपलेल्या त्या वृद्ध महिलेचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले…त्यांनी पुन्हा झोपण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या आवाजाने त्यांना काही केल्या झोप लागत नव्हती… त्यांनी सचिनला जागे करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो गाढ झोपला होता… शेवटी नाईलाजाने त्यांनाच बेडवरुन उठावे लागले...अलगदच त्या बेडवरुन खाली उतरल्या… संपूर्ण हॉस्पिटलमध्ये स्मशान शांतता पसरली होती, परंतु त्या वृद्ध महिलेचा तो श्वासोच्छ्वासाचा आवाज त्या शांततेचा भंग करत होता… वातावरण अधिकच गहन बनत चालले होते… मिट्ट काळोखात चंद्राचा येत असलेला मंद प्रकाश तितकेच काय ते प्रकाशाचे अस्तित्व… हळूहळू पावले टाकत शकुंतलाबाई त्या वृद्ध महिलेच्या दिशेने जात होत्या… एखाद्या प्रेताला झाकून ठेवावे अशाप्रकारे डोक्यापासून ते पायापर्यंत तिने चादर ओढून घेतली होती… शकुंतलाबाईंनी प्रथम हाताने थोपटून तिला जागे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा तो प्रयत्न असफल ठरला… शेवटी नाईलाजाने त्यांची चादर जोरातच खेचून तिच्या अंगावरून बाजूला केली आणि समोरील ते दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली… काळीज पिळवटून टाकेल असेच ते दृश्य होते… चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरभर पसरलेले किडे तिच्या एकेका अवयवाला पोखरून काढत होते… तोंड व डोळे उघडेच होते… तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विभत्स असे हास्य दिसत होते… ते भयंकर दृश्य पाहून शकुंतलाबाईंच्या काळजात धस्स झाले… जीव इथेच जातोय की काय असेच त्यांना वाटू लागले… शरीरातील सारे बळ एकवटून जोरजोरात किंचाळत त्या वॉर्डबाहेर पळू लागल्या… धावता धावता समोरून येणाऱ्या एका नर्सवर त्या जोरात आदळल्या… "अहो काय झाले तुम्हाला?? इतक्या घाबरलेल्या का दिसत आहात तुम्ही?" नर्सने विचारले. "तिथे...आमच्या वॉर्डमध्ये ती म्हातारी…" धापा टाकतच शकुंतलाबाई सांगत होत्या… "अहो कोण म्हातारी?? कोणाबद्दल बोलताय तुम्ही?? मला काहीच कळत नाहीय...तुम्ही आधी शांत व्हा पाहू." नर्सने त्यांना थोडे शांत करतच म्हटले… इतक्यात सचिनसुद्धा धावतच तेथे पोहोचला… "अग आई काय झाले तुला?" सचिनने घाबरतच विचारले… एव्हाना हॉस्पिटलचा बराचसा staff तसेच पेशन्टसोबत असलेली लोक तेथे जमा झाली होती… "सचिन !! बर झाले तू आलास...तू सुद्धा पाहिलेस ना त्या म्हातारीला?? अरे मी केव्हापासून हिला तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय…" "कोण म्हातारी?? कोणाबद्दल बोलतेयस तू आई?" शकुंतलाबाईंचे वाक्य अर्ध्यावरच तोडत सचिनने विचारले. "अरे असे काय बोलतोयस तू सचिन?? तू झोपलेलास त्याच्या शेजारच्या बेडवरच नव्हती का ती म्हातारी?? मी जेवत होते तेव्हासुद्धा खूप विभित्सपणे पाहत होती माझ्याकडे." शकुंतलाबाई म्हणाल्या. "अग आई हे कसे शक्य आहे?? कारण तुला इथे admit केल्यापासून त्या बेडवर कोणीच नव्हते." सचिनचे हे उदगार ऐकून शकुंतलाबाईंच्या पायाखालील जमीनच सरकली… लगबगीने त्यांनी वॉर्डच्या दिशेने धाव घेतली व समोरील दृश्य पाहून भीतीची एक लहर त्यांच्या नसानसात भिनली… कारण इतकावेळ ज्या म्हातारीला त्यांनी पाहिले होते… जिच्याबद्दल त्या इतकावेळ सर्वांना सांगू पाहत होत्या… प्रत्यक्षात मात्र तेथे कोणीही नव्हते...विस्फारलेल्या डोळ्यांनीच शकुंतलाबाई त्या रिकाम्या बेडकडे पाहत होत्या…
"काय गोंधळ चाललाय इथे?" झोपमोड झाल्याने काहीशा भडकलेल्या स्वरातच डॉक्टर म्हणाले… हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यानेच त्यांना बोलावून आणले होते… "ओ मिस्टर !! हा सर्व काय प्रकार चालवलाय तुम्ही?? सांभाळा तुमच्या आईंना जरा… त्या काय बरळतायत त्यांचे त्यांना तरी कळतेय का?" डॉक्टर आता जरा चिडूनच बोलत होते… "काही नाही डॉक्टर...ते त्यादिवशी तिला एक वाईट स्वप्न पडले तेव्हापासून…" "हे पाहा, आम्हाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही… पण त्यांच्या या वागण्याचा हॉस्पिटलमधील इतर पेशंटसनासुद्धा त्रास झाला...आणि त्यात काही पेशंटस तर खूप गंभीर आजारांनी त्रस्त आहेत… तुमच्या आईच्या या अशा वागण्यामुळे त्यांचे जर काही कमी-जास्त झाले तर त्यास जबाबदार कोण??... ते काही नाही आम्ही उद्या सकाळीच यांना डिस्चार्ज देतो...तुम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा." स्पष्टपणेच डॉक्टर सचिनला म्हणाले. "Please डॉक्टर !! असे नका म्हणू… इथे admit केल्यापासून माझ्या आईच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसत आहे… आज तिने नीट जेवणसुद्धा केले, नाहीतर काल तर अन्नाचा एक कणसुद्धा तिच्या पोटात राहत नव्हता." सचिन डॉक्टरांना विनंती करतच म्हणाला. "अहो त्यांची तब्येत सुधारत असली तरी त्यांच्यामुळे इतरांच्या तब्येतीवर परिणाम होणार असेल तर काय फायदा?? बाकी मला काही माहित नाही पण आम्ही त्यांना इथे नाही ठेवू शकत...I am sorry !!" इतके बोलून डॉक्टर तिथून तडकाफडकी निघून गेले… चारचौघात आपल्या आईचे असे हसू झाल्याने सचिनला खूप वाईट वाटत होते…
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच शकुंतलाबाईंना डिस्चार्ज देण्यात आला… घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत हळूहळू खालावू लागली… त्यांची ती अवस्था पाहून सचिन व प्रतापरावांचे मन अगदी तिळतिळ तुटत होते… "आईला पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे का?? पण तिथेही असेच वागली तर?? तिथेही असाच गोंधळ घातला तर??" सचिन स्वतःशीच विचार करत होता… तो दिवस असाच निघून गेला…
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रानूआजी शकुंतलाबाईंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घरी आल्या होत्या...त्यांची ती अवस्था पाहून रानूआजींनाही खूप वाईट वाटले… पॅसेजमध्ये उभे राहून सचिन त्याच्याच विचारांमध्ये मग्न होता… "सचिन !! शकुंतलेची हालत बघवत नाहीय रे." सचिनच्या खांद्यावर हात ठेवतच रानूआजी म्हणाल्या. "आजी !! तुम्हीच सांगा आता मी काय करू?? मला काहीच समजत नाहीय." काहीसा भावुक होतच सचिन म्हणाला. "हे बघ सचिन, कदाचित तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीस; परंतु काहीवेळेस गोष्टी दिसतात तितक्या त्या सरळ नसतात." सचिनची समजूत काढतच रानूआजी म्हणाल्या. "म्हणजे?? मला समजले नाही." सचिनने प्रश्नार्थक नजरेनेच विचारले. "मला मान्य आहे, आता आपण 21 व्या शतकात आहोत परंतु आजही काही गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही विज्ञानाच्या पलीकडे आहेत… ज्याप्रमाणे आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जा आहेत, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जाचाही वास आहे…"
"तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे आजी??" रानूआजींचे बोलणे अर्ध्यावरच तोडत सचिनने विचारले. "म्हणजे तुझ्या आईसोबत जे काही घडत आहे, ते सध्यातरी Normal नाहीय असेच मला वाटतेय. कारण असाच काहीसा प्रकार काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीसोबत घडला होता, त्यावेळी आम्हीसुद्धा बरेच डॉक्टर केले परंतु तिच्या तब्येतीत काहीच फरक पडला नाही" रानूआजी सांगत होत्या. "मग तुम्ही काय केले?" सचिनने विचारले. "आमच्या गावापासून साधारणत: 5 किलोमीटर दूर 'कणकपूर' नावाचे एक गाव आहे… त्या गावात 'वासुंधरनाथ' म्हणून एक खूप मोठे सिद्धपुरुष आहेत… त्यांच्या मठात खूप दूरवरून लोक येतात आणि ते ही त्यांच्या सर्व भक्तांच्या समस्यांचे अगदी व्यवस्थित निराकरण करतात. माझ्या बहिणीला आम्ही त्यांच्याकडेच घेऊन गेलो होतो, तेव्हा त्यांनी मठात एक छोटीशी पूजा घातली… त्यानंतर तिच्या तब्येतीत खूप फरक पडला...हे बघ शकुंतला माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तू सुद्धा माझ्या मुलासारखा आहेस, त्यामुळे मी फक्त तुला मार्ग दाखवला पण शेवटी निर्णय तुझा आहे." इतके बोलून रानूआजी थांबल्या. "सचिन !! आपण इतके उपाय केले पण काही फरक पडला नाही… आता विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण हा उपाय करून पाहावा असे मला वाटते."इतकावेळ शांतपणे उभे राहून सर्व ऐकत असलेले प्रतापराव म्हणाले. "खरतर माझा या सर्व गोष्टींवर विश्वास नाहीय, पण आईसाठी मी आता काहीही करायला तयार आहे… आपण आज रात्रीच निघू… सुट्टीबद्दल मी बॉसशी बोलून घेतो." खूप वेळ विचार केल्यानंतर मनाशी पक्का निर्धार करतच सचिन म्हणाला.
ठरल्याप्रमाणे सचिन त्याच रात्री कारने त्याच्या आई-वडिलांना घेऊन कणकपूरकडे जाण्यास निघाला… तेथे पोहोचण्यास त्यांना तब्ब्ल 6-7 तास लागणार होते… दिपेश, दिप्ती तसेच सोसायटीतील बरेच सदस्य त्यांना सोडण्यास इमारतीच्या खाली आले होते… सर्वांचा निरोप घेऊन तेथून निघण्यास सचिनला रात्रीचे 11:30 वाजले… त्या तिघांना निरोप देऊन दिपेश व दिप्ती घरी आले व थोडी कामे आटोपून झोपी गेले…
परंतु आजची ही रात्र सचिन व दिपेशच्या आयुष्यातील एक "काळरात्र" ठरणार होती, याची पुसटशीही कल्पना त्या दोघांना नव्हती…
रात्री झोपेत असताना अचानक दिपेशला जाग आली… त्याने घड्याळात पाहिले तेव्हा बरोबर 1:30 वाजला होता… आजूबाजूला पाहता पाहता त्याची नजर घराच्या मुख्य दरवाज्याच्या खालच्या फटीवर स्थिरावली… दरवाजाखाली असलेल्या फटीतुन त्याला बाहेरील बाजूस लख्ख प्रकाश दिसत होता… त्याला थोडे आश्चर्यच वाटले… इतक्या रात्री हा लख्ख प्रकाश कुठून येत असावा हे पाहण्यासाठी तो बेडवरुन उठला व अलगदच त्याने दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय….
क्रमशः