बळी
दिवसभर अंगाची लाहीलाही केलेला सूर्यनारायण हळूहळू उतरणीला लागला होता. सोसाटयाचा वारा जोरदार सुटून काळेकुट्ट आभाळ भरून आले होते. आभाळ लाल रंगाचे होऊन त्यात तांबडा रंग फुटला होता. दिवसभर दाणापाणी वेचून घरट्याकडे माघारी निघालेले पक्षी भांबावून जाऊन आकाशात सैरावैरा उडत होते.
बांधाच्या पलीकडे जमिनीवर सुकून पडलेला पालापाचोळा, गवताच्या सुकलेल्या काड्या एकमेकांना घुसळून काढत मध्येच वावटळीत रूपांतरीत होत होत्या.
सर्जेराव नी त्याचा सालगडी महादू शेतावर सुकलेल्या पेंढयाच्या राशी भराभर बांधत बैलगाडीत टाकत सूटले होते...लेकाच्या उरक की झटदिशी... कशाला येळेची खोटी कराया लागल्यास बा... पावसाचा काय अंदाज नाही. सर्जेराव महादू वर खेकसला.. व्हय जी मालक.. झालच की.. पाच एक मिनिटात महादुने पेंढा भरत बैलगाडी भरून टाकली.
मघापासून त्या तांबड फुटलेल्या आभाळाचे हळूहळू काळ्याकुट्ट ढगात रूपांतर झाले होते.त्या संपूर्ण भागात आभाळात काळ्या ढगांची गर्दी जमा
झाली होती. अधूनमधून विजा चमकत होत्या.
सर्जेरावने बैलगाडी जुंपून भरधाव गावच्या दिशेने सोडली होती. अन काही क्षणानंतर पावसाचे थेंब त्यांच्या अंगावर पडू लागले. दिवसभर उन्हात तापुन थकलेल्या भुईवर आभाळातुन टपोऱ्या थेंबाचा अभिषेक होऊ लागला.
सर्वत्र पहिल्या पावसात भिजलेल्या मातीच्या गंधाचा नाकाला हवाहवासा वाटणारा घमघमाट सुटला गेला..काही अवधीतच जोरदार पावसाला सुरुवात झाली. चैत्रवैशाखाच्या भाजून काढणाऱ्या उन्हात दोन महिने रापलेल्या धरतीस पाऊस मनसोक्त भिजवून काढू लागला.
सर्जेरावनी बैलगाडी गावच्या वेशीवर असलेल्या भैरोबाच्या देवळाच्या पारापाशी आडोश्याला थांबवली...बैल सोडून जवळच्या खांबाला बांधून डोक्यावर उपरणे ठेवत तो आणि महादू देवळात दुडूदुडु पळत येत विसाव्याला थांबले.
म्या काय म्हणतुया मालक यंदाच्या वरसाला गेल्या वक्तासारखी लौकर पेरणी करू नगासा..पावसाचा काहीएक नेम नाय, अशीच हूलकावणी गेल्या वर्षीला देऊन लेकाच्याने जिवाला घोर लावून ठूला हुता.. पेरणी बिगीन आटपून ऐन वक्ताला धा-पंद्रा दिस गायब, उभ पेरलेल बियाणं काळवंडल की मालक
महादुने काळजीच्या सुरात सर्जेरावास विचारणा केली...
बघूया.. या टायमाला थोडं थांबायलाच हव..पोट कापून पीक जगवायचा धंदा परवडन्याजोगा राहिला नाही आताच्या काळात....
आभाळाकडे पाहत एक दीर्घ उसासा टाकत सर्जेराव महादूला म्हणाला..
त्याच्या डोळ्यासमोर गेल्या वर्षी झालेला नुकसानीचे चित्र दिसू लागले होते.
वर आभाळ फाटले होते.धो धो पाऊस कोसळत होता. विजा कडाडत होत्या. त्या ढोर अंधारात मध्येच वर आकाशात अचानक विजेचा लक्ख प्रकाश होई..
तेवढ्याच त्या अंधुकशा उजेडात ते एकमेकांशी बोलत देवळात थांबले होते.
काही वेळाने पाऊस उघडला.. सर्जेरावने बैल गाडीला जुंपली.. वावरातुन गावाकडे जाणाऱ्या त्या वाटेवर भरपूर चिखल झाला होता.. रस्त्यावर मध्ये मध्ये खळग्यात पाण्याची डबकी साचली होती.. बैल चिखल तूडवत हळूहळू गाडी गावच्या दिशेने ओढत नेत होते..
गावात ढिम्म काळोखाचे साम्राज्य पसरले होते. शाळेजवळच्या पायवाटेवर महादू सर्जेरावचा निरोप घेत घराकडे निघून गेला... बैलगाडी वाड्यात आणून त्याने बैल सोडुन गोठ्यात दावणीला बांधले. हातपाय धुऊन घरात पाऊल टाकले.. त्याला पाहून रखमाने आत जाऊन पाणी आणून दिले.. स्वयंपाकघरात जाऊन चूल पेटवून भाकरी थापायला सुरुवात केली..त्यान हातपाय पुसले.. सदऱ्याच्या खिशातून तंबाखूची डबी काढून चुन्याला नख लावले..तंबाखू चोळून त्या तंबाखूचा तोबरा भरत तो दाराबाहेरच्या लाकडी मेजावर बसून मक्ख चेहऱ्याने शून्यात तंद्री लावून पुढील भविष्याचा विचार करू लागला.आतल्या खोलीत त्याचा पाच वर्षाचा मुलगा छबू खेळत होता. त्याच खरे नाव संग्राम...लग्नानंतर वर्षभरात जन्मलेल्या पहिल्या मुलाच्या अकाली दोन वर्षांनी झालेल्या निधनाने त्या माऊलीनी हाय खाल्ली होती...
बरोबर दहा वर्षाच्या कालावधीनंतर गावोगावच्या देवांचे उंबरठे झिजवल्यानंतर रखमेची कुस उजवली गेली होती.वाड्याला वारस मिळाला होता.. छबूराव कंदीलाच्या उजेडात कंदीलाच्या काचेवर येणाऱ्या छोट्या चिलटाना पकडत बसला होता... हळूहळू रात्र सरू लागली होती.. पावसाने परत उचल खाल्ली होती.
भुकेची आठवण झाल्यावर सर्जेराव उठून आत स्वयंपाकघरात गेला. रखमेने ताट वाढायला घेतलं होते.. पाटावर ताट ठेवून त्याने हातांच्या ओंजळीत पाणी घेऊन त्या ताटाभोवती सोडले. जोंधळयाची भाकरी मेथीच्या भाजीसोबत खुरडून सर्जेराव मख्ख चेहऱ्याने कसेबसे ते जेवण संपवू लागला.
अवो त्या जिला बँकेतुन आज काही लोक होते.. हि चिट्टी देऊन गेलेत, जेवताना रखमेने त्याच्या हातात ती चिट्टी सरकावली...
आता म्या अडान्याला त्यातले काय कळतंय...तूच चार बुक शिकली आहेस, वाच पाहू काय लिव्हले त्यात... सर्जेराव रखमावर खेकसला.
रखमेन... ते चिटोर वरून फाडून आतली चिट्ठी बाहेर काढली... अन ती वाचू लागली...
कर्ज, मुदत, जप्ती अन लिलाव असलं काहीतरी त्यात लिहिले होते... ते शब्द ऐकताना त्याच्या कपाळावर आठ्या पडत जात होत्या.. माथ्यावर घर्मबिंदू जमा होऊ लागले. निस्तेज चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरून त्याला डोळ्यासमोर शेतीच्या होणाऱ्या लिलावाचे चित्र दिसू लागले.
जिल्हा बँकेतुन त्याने गेल्यावर्षी शेतीची कागदपत्रे देऊन जमीन गहाण टाकत मुदत कर्ज उचलले होते.. गेला संपूर्ण खरीप हंगाम पाऊसाच्या लहरीपणाने वाया गेला होता. हाताशी आलेले उभे पीक पुराचे पाणी वावरात भरल्याने नाहीसे झाले होते...रब्बीच्या हंगामाने काहीसा दिलासा दिला होता.. पण तो कर्ज फेडून पुन्हा नवी बेगमी करण्यासाठी पुरेसा नव्हता.
अन बँकेच्या नोटीसीनुसार फक्त पंधरा दिवसाची मुदत हाती राहिली होती.
जेवण अर्धवट सोडून सर्जेराव उठला अन बाहेर जाऊन तंबाखू चोळून बाकड्यावर जाऊन बसला. आता पुढे काय कराव..कसे निभवाव.. याची चिंता करत शून्यातला चेहरा घेऊन तो विचार करू लागला...
रात्रीचे दहा वाजले असावेत... छबू चे अजून कंदीलासोबत खेळने चालू होते... पाच वर्षाच ते निष्पाप, निरागस लेकरू.. आपल्या भावविश्वात रमत त्या कंदीलासोबत खेळत होते... भूरभूर छोटी छोटी पाखरे उडत येत अन त्या कंदीलाच्या गरम काचेवर चिटकून जळून जात होते.
लहान पाखरांचे प्रारब्ध तेच तस दुर्देवी अल्पायुषी....आयुष्याचा अंत माहिती असतानाही आगीशी खेळत हसत हसत स्वाहा होणारे " क्षणभंगूर आयुष्य "!!
खेळ रंगात आला होता अन अचानक खेळता खेळता छबूच्या कानात काहीसे पुसट ऐकू आले,
"येतोस का" त्याच्या सोबत खी... खी... खी.. खी..असे विकृत हसण्याचे आवाज त्याला कानात हळूवारपणे ऐकू आले. तो एवलासा जीव ते शब्द ऐकून दचकून गेला असावा... पाठी कोणीही नाही... मग आवाज कुठून आला असावा... आजूबाजूची त्याने चाहूल घेतली.कुणीच नाही इथे.... माय आत स्वयंपाकघरात.. आबा बाहेर मग कोण बोलावतेय?? भीतीने शहारून छबू ने आत जाऊन मायला पकडले. त्याची गेले कित्येक दिवस हिच अवस्था असावी बहुधा.. रखमेने त्याला कडेवर घेऊन सर्जेरावला आत बोलावले...
इतक्यात त्याच्या कानात पुन्हा तोच अनपेक्षित आवाज ऐकू आला... येतोस ना?? ये ये लवकर?? भीतीने त्याचे सर्वांग थरारले... सर्जेराव आत येताच छबूने जोराचा हंबरडा फोडला. आबा त्यो बोलावतोय ? त्यो हसतोय? त्याला रडवेला पाहून सर्जेरावची अवस्था कावरीबावरी झाली.. कोण कोण बोलावतोय? कशाला बोलावतोय?? काय झाल तूला? छबूला रडवेला झालेला पाहून सर्जेराव बावरला.
कुणीबी नाही रे सोन्या.. . अर गुलामा...सोन्या असं कोण नाही बोलावत..तू ये झोपवते तूला... रखमेने त्याची समजूत काढत त्याला मांडीवर घेऊन डोक्यावरुन हात फिरवत आपल्या कुशीत निजवले. रात्रभर ते अजाण बालक त्या माऊलीच्या उबदार कुशीत घाबरतच निजले.
रात्रभर सर्जेराव तळमळत होता. डाव्या कुशीवरून उजव्या कुशीत वळवळ करत होता. त्याच्या डोक्यात विचारचक्रे फिरू लागली.... नक्की काय भानगड असावी?? अचानक छबूला वारंवार कोण हाका मारू लागला होता?? परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर प्रकरणाचा शोध घेणे आवश्यक होते. पहाट होत आली होती... अन तोही निद्रेच्या अधीन झाला.
क्रमश...