#मोहिनी#
माझ्या प्रिय आजीचं निधन झाल्यामुळे माझं B. Sc. II year चे माझे प्रॅक्टिकल बुक अपूर्ण होते. प्रॅक्टिकल परीक्षा जवळ आल्याने ते लवकर पूर्ण करणे आवश्यक होते. माझ्या वर्गात राजन कांबळे नावाचा अतिशय हुशार, टापटीप आणि मनमिळाऊ स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याचे प्रॅक्टिकल बुक पूर्ण होते. बायोलॉजीचे बोपुलवार सर म्हणाले, "संजय, कांबळेकडून प्रॅक्टिकल बुक घे आणि तुझे प्रॅक्टिकल बुक पूर्ण कर". सरांचा तो विचार मी तत्काळ अमलात आणायचा असे ठरविले.
#अतकुर# छोटे गाव.. ' धर्माबाद ' येथून सुमारे सात ते आठ किलोमीटर असलेले हे खेडे राजनचे गाव होते. राजनकडून प्रॅक्टिकल बुक आणण्याचा निश्चय केला. "शुभस्य शिघ्रम" असा विचार केला आणि लगेच त्याच्या गावाकडे निघालो. साधारण साडेपाच वाजले होते. उन्हाळ्यात दिवस उशिरा मावळतो हे लक्षात होते. दोन तासात परत येऊ असा विचार केला आणि मी निघालो. तरीही शंकेच्या स्वरात एक मित्र पुटपुटला; "संजू,'आता कुठे जातोस"? उद्या सकाळी जा. मी म्हणालो, नको. आताच जातो. प्रॅक्टिकल बुक पूर्ण करण्यास फक्त तीन दिवस हाताशी आहेत असे म्हणालो आणि जास्त विचार न करता सायकलवर अतकुरच्या दिशेने मी निघालो.
#अतकुर गाव अगदीच खेडेगाव. यापूर्वी मी कधीही "अतकुर" या गावी गेलेलो नव्हतो त्यामुळे त्या गावाची किंवा रस्त्याची मला काहीही माहिती नव्हती. रस्त्यात सर्वत्र खड्डेच खड्डे... "रस्त्यातील खड्डे की खड्ड्यातील रस्ता" शोधत माझी सायकल निघाली होती. सायकलही म्हणत होती जाऊ दे जोरात!!. रस्त्याच्या कडेने झाडी असल्याने भुरू भूरू गार वारा वाहत होता. अचानकच कधीतरी वाऱ्याची हलकीशी झुळूक येत होती आणि अंगावर छानसा शहारा उमटून जात असे. उन्हाळा असला तरी वातावरण छान मोहक वाटत होते. मी विचार केला; जर या वेगाने गेलो तर निश्चितच आपण अंधार पडण्यापूर्वी परत धर्माबाद येथे येऊ शकतो.
पण हाय रे दुर्दैव ???? अचानकच सूर्य महाराज अस्तंगत होण्याची चिन्हं दाखवत होते. दिवसाचा उजेड कमी होत होता आणि स्वतःची सावली क्षीण होत होती. सूर्य महाराज आता लवकरच बुडणार याची खात्री झाली होती. हाच विचार करीत असताना सहजच माझी नजर समोर गेली आणि पहातो तर काय? समोर एक आकृती!! रस्त्याजवळ असलेल्या झाडाजवळ उभी... हातात टिफीनचा डब्बा.. बहुधा बाईच. अंदाज खरा निघाला. बाईच!!!. दिसायला गोरी गोमटी,रेखीव भुवया, टपोरे डोळे. एकूणच नाजूक आणि आकर्षक असा आखीव रेखीव बांधा. काळ्या मऊशार केसात माळलेला गजरा. लालचुटुक ओठ आणि कुणाच्याही अंतरंगाचा ठाव घेणारी डोळ्यांची जोडगोळी. पण एवढी सुंदर बाई!!! अशा अवेळी आणि सामसूम रस्त्यावर कशाला उभी असेल? तिच्या त्या मूर्तिमंत सौंदर्याकडे दुर्लक्ष करत मी पुढे निघालो. तोच मागून मंजुळ आवाज आला. भाऊ, मला येऊ द्या.. आवाजात खूपच गोडवा होते. तरीही हे #बाईचे झेंगट नकोच म्हणून मी कानाडोळा करीत होतो. तेव्हा पुन्हा एकदा तोच आवाज आला. "अहो भाऊ, मला येऊ द्या". आता मात्र मला काहीच कळेना. एवढ्या संध्याकाळी एक घरंदाज आणि आकर्षक दिसत असलेली बाई माझ्यासारख्या अपरिचित माणसाला अशा अवेळी आणि हमरस्त्यावर बोलते काय? आणि बिनधास्त येऊ द्या असे म्हणते काय? मी सायकल थांबवली.एव्हाना ती माझ्याकडे येत आहे अशी चाहूल लागली. ती जवळ येताच मी तिला स्त्री दाक्षिण्य राखून अदबीने म्हणालो, कुठे जायचे आहे?. अतकुर... तिने छान मंजुळ आवाजात सांगितले. बोलताना तिची दंतपंक्ती चमकत होती आणि माझ्या मनाला मोहून टाकत होती. ती म्हणाली, "मला अतकुर येथे जायचे आहे". "मी मागे बसते" असे म्हणत ती एव्हाना सायकलच्या मागच्या सिटवर बसली. तिच्या त्या चपळ क्रियेकडे मी अनिमिष नजरेने पाहिले. एकाच क्षणी तिची आणि माझी खऱ्या अर्थाने नजरानजर झाली. तरीही मी त्या सौंदर्याच्या जास्त मोहात न पडता सायकल सुरू केली. अर्थात मी सायकल सुरू करण्यापूर्वी तिला एक सूचना केली की, तिने तिचा थांबा येईपर्यंत एकही शब्द बोलायचा नाही..
इकडे माझी सायकल सुरू आणि मनात वेगळे विचार सुरू. मन म्हणत होते, या परिस्थितीत अशा सुंदर आणि मनमोहक स्त्री बरोबर मला कुणी पाहिले तर काय होईल? हे गाव पूर्वी कधीही आपण पाहिले नाही. या रस्त्यावर कुणीही आपल्याला ओळखत नाही. या बाईचाच काहीतरी डाव नसेल कशावरून? असे अनेक संभ्रम मनात निर्माण होत होते. कदाचित हिची एखादी टोळी असेल आणि आपल्यालाच लुटून नेतील असाही क्षुद्र विचार त्या क्षणी माझ्या मनात येऊन गेला. तसे पाहिले तर माझ्यासारख्या विद्यार्थ्याजवळ लुटण्यासारखे काहीच नव्हते. म्हणजे दहा रुपये सुद्धा नव्हते. आपल्याजवळ काहीच मिळाले नाही म्हणून रागाने हिचे साथीदार एखाद-दोन चापटा मारतील आणि आपल्याला सोडून देतील असाही एक क्षुल्लक विचार त्या क्षणी मनी चमकला. "मन चिंती ते वैरी न चिंती" या विचाराने स्वतःशीच माझे मनाचे खेळ चालले होते. अशाच विचारात साधारण एक सव्वा तास गेला. याच विचारांच्या साखळीत असतानाच पुन्हा तोच मंजुळ आवाज कानी आला. "भाऊ, जरा थांबा".. मला उतरायचे आहे. मी सायकल थांबवली. तिने अलगद खाली उडी मारली याची मला जाणीव झाली; तरीही मी मागे पाहण्याचा मोह जाणीवपूर्वक टाळला. आजूबाजूला तिच्या आणि माझ्या व्यतिरिक्त या वेळी कुणीही नव्हते. अर्थात तेवढा गडद अंधार पडला नसल्याने ती कुठे जाणार? कशी जाणार? किंवा तिचे घर कुठे आहे? मी हे विचारण्याचे अगाऊ धाडस केले नाही आणि मला त्याची गरजही वाटली नाही. मी जास्त विचार न करता किंवा न घुटमळत सायकल सुरू करून पुढे निघालो. साधारण सात वाजले होते. एक तर रस्ता खराब आणि त्यात सायकलवर ही #स्वरूप सुंदरी असल्याने मित्राच्या गावी जाण्यास मला अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागला.
मी राजनच्या घरी पोचलो. कांबळे घरी नव्हताच. शेतात गेला होता. त्याचा छोटा भाऊ घरी होता. त्याला थोडक्यात प्रॅक्टिकल बुक बाबत सांगितलं. काहीही अडचण न सांगता त्याने लगेच प्रॅक्टिकल बुक दिले. थोडेशे जुजबी बोलणे झाले आणि मी परतीच्या मार्गाला निघालो. आता बराच अंधार पडला होता आणि मलाही परत धर्माबाद येथे लवकर पोचायचे होते. कांबळेच्या भावाला मला काहीतरी सांगायचे आहे असे एका क्षणी उगीचच वाटले....पण तसा भास झाला असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
मी सायकलवर बसलो आणि सायकल सुरू केली. अगदी पंधरा वीस मिनिटात मी त्याच जागी आलो; ज्या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी मी त्या सौंदर्यवान बाईला सोडले होते. आता मात्र माझी दिशा बदलली होती. त्या बाईला मी उजवीकडे सोडले होते आणि आता मी डावीकडून जात होतो. क्षणभरासाठी अगदी निखळ आणि अभिजात सौंदर्य लाभलेल्या त्या बाईचा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला!! फक्त क्षणभर आणि अगदी क्षणभरच. "एखादी स्त्री इतकी सुंदर कशी काय असू शकते"?! याची मी कल्पना करीत होतो. देवाने तिची निर्मिती केल्यानंतर बहुधा तो साचा मोडून टाकला असावा असे वाटून खुदकन माझे मलाच हसू आले. खरेच ते स्वर्गीय लावण्य होते आणि ते पुन्हा कधी पाहण्यास मिळेल अशीही शक्यता कधीच नव्हती असेही वाटत होते. अर्थात एका क्षणासाठीच मला तिचा विचार आला...पण तो विचार मी लगेच झटकून टाकला. ते मूर्तिमंत सौंदर्य पुन्हा पाहता येणार नाही असा विचार करून मी दीर्घ सुस्कारा टाकला आणि! आणि! आणि!..अचानक मागून तोच परिचित गोड आवाज आला. "भाऊ, मला येऊ द्या". त्या मंजुळ स्वरांनी माझ्यावर बहुधा #मोहिनी टाकली होती आणि त्यामुळेच की काय? मला भास झाला असे वाटले. परंतु अगदी कानाच्या जवळ पुन्हा तोच मधाळ स्वर. "भाऊ येऊ का"?? आता मात्र माझी भीतीने गाळण उडाली. कोणत्याही पत्थरदिल माणसाच्या काळजाचे पाणी पाणी करणारा क्षण. माझी अवस्था फारच घाबरलेली. हृदयाचे ठोके सशाच्या हृदयापेक्षा जोरात पडत होते पण चेहऱ्यावर उसने अवसान आणून मागे पाहत मी स्वतःला सावरत होतो. तीच बाई माझ्यापुढे हातात टिफीन डबा घेऊन पुढे उभी होती. माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. कारण एवढ्या अंधाऱ्या रात्री एक बाई माझ्यासमोर उभी ही कल्पना तशी भीतीदायक होती. आपल्या नशिबात आज काहीतरी वेगळेच वाढून ठेवले आहे अशी शंका आली होती. कुठली तरी दैवी अथवा दानवी शक्ती आपल्यासमोर उभी आहे याची मला खात्री झाली होती. आता फक्त "वेळ" ठरविणार होती की माझा *काळ* आला की नाही. एव्हाना ती मागच्यापेक्षा जास्त सुंदर आणि मनमोहक दिसत आहे असाही विचार त्या क्षणी माझ्या मनात येऊन गेला. "वास्तव कधी कधी कल्पनेपेक्षाही भयंकर असते" हे त्या क्षणी मला मनोमन पटले. कारण काही क्षणापूर्वी अतिशय सुंदर वाटणारी स्त्री? मला आता फारच भयंकर आणि भीतीदायक वाटू लागली. दोन सेकंदातच मी भानावर आलो. बाईने छान हसतच पुन्हा विचारले भाऊ, मला येऊ द्या. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना मला दुसरा पर्यायच नव्हता. एक अतर्क्य शक्ती माझ्याशी बोलत होती आणि आपण या शक्तीचे जर ऐकले नाही तर आपल्या जीवाचे बरे वाईट आत्ताच होणार हे मला पक्के माहित झाले होते. त्यामुळे मी तिला नाही असे म्हणू शकलो नाही. ती अलगद माझ्या मागे बसली. जीवाची भीती आणि विचारांचे काहूर. मनामध्ये नुसता कल्लोळ माजला होता. ज्या बाईला आपण थोड्या वेळापूर्वी सोडतो काय? तीच बाई पुन्हा आपल्याला त्याच जागी परंतु विरुद्ध दिशेला दिसते काय? आणि पुन्हा सायकलवर 'मला येऊ द्या' म्हणते काय? तेही टिफीन सह. मला चक्रावून टाकणाऱ्या या गोष्टींमुळे आज आपल्याबाबत काहीतरी अघटित घडणार आहे असे असा विचार करीतच सायकल चालवत होतो.
मी मनाशी ठरविले की आल्या प्रसंगाला आपण व्यवस्थित तोंड द्यायचे. त्यामुळेच एवढ्या गहन आणि कठीण प्रसंगात सुध्दा मी पूर्ण साहस गमावले नव्हते. देवावर अविचल श्रध्दा असल्याने यातूनही काहीतरी मार्ग निघेल असे मनोमन वाटत होते. अशा विचारात अगदी दहा पंधरा मिनिटेच गेली असतील इतक्यात माझ्या मागून एका गाडीचा प्रकाश आमच्या दोघांवर पडला. गाडीवर लाईट पडल्यापडल्या माझ्यामागे बसलेली ती बाई अचानक माझ्या डाव्या बाजूने उडी मारून पुढे पळत गेली आणि धाडकन कुणीतरी पाण्यात उडी मारली आहे असा मला आवाज आला. मला काही सुचेनासे झाले. सगळी मती गुंग झाली होती. अचानक मागून आलेली टू व्हीलर माझ्या सायकल समोर येऊन थांबली. अंधारात एखादा प्रकाश चमकून गेल्यानंतर तो अंधार आपल्याला जसा जास्तच गडद वाटतो तसेच आता तो अंधार मला जास्तच गडद वाटत होता. त्या बाईचा विचार आणि अचानक आलेली ही टू व्हीलर!!!. सगळ्या अनपेक्षित घटनांनी माझे डोके भणाणून गेले. मला काही कळण्याच्या आतच त्या टू व्हीलरवर बसलेल्या एका व्यक्तीने माझ्या कानफटीत मारली आणि त्याच क्षणी मी बेहोश झालो.
काही वेळातच डोळ्यावर पाण्याचा शिडकावा टाकल्याने मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय!!! समोर साक्षात माझा मित्र #राजन कांबळे आणि त्याच्या बरोबर अजून दुसरी व्यक्ती!! माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. राजन काहीतरी समजून गेला; पण काहीही बोलला नाही. त्याने स्वतःच माझी सायकल झाडाला टेकून ठेवली आणि मला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. राजनच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत याची मला जाणीव झाली होती.. आणि माझ्या डोक्यातही सारखा त्या बाईंचा विचार... ती बाई कुठे गेली? ती बाई पुढे का पळाली? त्या बाईचा नेमका उद्देश काय होता? अशा विचारतंद्रीत आम्ही राजनच्या घरी पोहोचलो. कांबळेच्या घरी येईपर्यंत एकही शब्द आम्ही तिघेही एकमेकांना बोललो नव्हतो. मी मात्र उत्सुकता आणि भीतीयुक्त दृष्टीने हा सारा प्रसंग समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.
राजनच्या घरी पोहोचलो. राजनने घरातील लोकांना चहापाणी करण्यास सांगितले. राजन सारी परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत होता. मग राजननेच बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, "संजू, तू माझ्या घरून निघाला आणि मी नेमका घरी आलो". गाडी लावणार होतोच, इतक्यात भाऊ म्हणाला की, तुझा मित्र आत्ताच प्रॅक्टिकल बुक घेऊन गेला. त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत तशीच सुरू असलेली गाडी तुला गाठण्यासाठी दामटली. मला उगीचच काहीतरी जाणीव झाली की, कदाचित तुझ्या बाबतीत काहीतरी अघटित होऊ शकते; म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता या मित्राबरोबर तुझ्या पाठीमागे आलो. त्याने त्याच्या भावाला मला एकट्याला त्या वाटेने का जाऊ दिले? याबद्दल तीव्र स्वरात संताप व्यक्त केला. तेव्हा त्याच्या भावाने त्याला सांगितले की, मला विनाकारण त्यांना घाबरून सोडायचे नव्हते..डोक्यात शंका निर्माण करून उगीचच भीती निर्माण करण्याची मला गरज वाटली नव्हती. म्हणून मी त्यांना काही पूर्वसूचना दिली नाही. त्याचवेळी मी मित्राला म्हणालो, अरे, "बहुतेक तुझ्या भावाला काहीतरी सांगायचे होते; हे मी ताडले होते परंतु त्याकडे मीच दुर्लक्ष केले". त्यामुळे त्यात तुझ्या भावाचा काहीही दोष नाही असे म्हणाल्यावर तो शांत झाला. काही वेळाने त्याने मला विचारले. अर्थात त्याला अंदाज आलाच होता. पण तरीही त्याने मला विचारले, काही अनपेक्षित अथवा विशिष्ट घटना तुझ्याबाबत घडली का? मी त्याला हो म्हणालो आणि धर्माबादपासून सुरू झालेली सर्व घटना त्याला तपशिलासह सांगितली. घरातील सर्व सदस्य माझा प्रसंग कान देऊन ऐकत होते. प्रत्येक प्रसंगाला त्यांच्या अंगावर काटे उभे राहत होते.
सारा घटनाक्रम सांगितल्यावर तो म्हणाला. संजू, तुझे आयुष्य बलवत्तर होते; म्हणूनच तू आज वाचला. नाहीतर आज तुझी खैर नव्हती. तो जे सांगत होता यावर माझा विश्वास बसत होता परंतु या गोष्टीचा नेमका माझ्याशी असलेला कार्यकारणभाव अजूनही कळला नव्हता. त्याला म्हटले, परंतु हे माझ्या बाबतीतच का?
तेव्हा राजन याने भूतकाळातील घटना सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, धर्माबाद येथे पूर्वी एक सूतगिरणी होती. त्या सूतगिरणीमध्ये कामगार असलेल्या तरुण मुलामुलीचे प्रेम जमले. परंतु काही कारणास्तव त्या दोघांचे लग्न होऊ शकले नाही आणि त्यामुळे निराश होऊन त्या मुलीने एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तू जिथे बेहोश पडला होतास ना!!. तिथून थोड्याच अंतरावर ती विहीर आहे. आतापर्यंत तीन चार मुले त्या विहिरीत पडली आहेत आणि मुख्य म्हणजे ती मुले या गावातील नव्हती आणि तूही या गावातील नाही..त्याने असे म्हणत मला घट्ट मिठी मारली. मी शहारून गेलो. तो पुढे म्हणाला; संजू, तू फार नशीबवान आहेस म्हणूनच अशा कठीण प्रसंगात तू वाचला असे म्हणत त्याने माझ्यासाठी देवाचे आभार मानले आणि मलाही त्याच्या घरातील देवघरात जाऊन देवांचे दर्शन घेण्यास सांगितले.
मित्रांनो, त्यावेळी मला खात्री झाली की जगामध्ये जर देव असेल तर दानव सुद्धा असतात. दैवी शक्ती असेल तर असुरी शक्ती सुद्धा असते. मी मनोमन त्या देवदूत बनलेल्या माझ्या मित्राचे, देवाचे आणि कुठल्याही प्रसंगात तोल ढळू न देण्याचे संस्कार देणाऱ्या आई-वडिलांचे आभार मानले आणि असा प्रसंग माझ्या बाबतीत पुन्हा कधीही न घडो अशी देवाकडे प्रार्थना केली.
*ताजा कलम*- माझ्या या अनुभवावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा अशी माझी कुठलीही अपेक्षा नाही. परंतु अपरिचित गावात, अपरिचित रस्त्यावर आणि अपरिचित ठिकाणी आणि त्यातही तुम्ही एकटे जाताना नेहमीच काळजी घ्यावी ही अपेक्षा नक्कीच ठेवतो.
Repost
©® Sanjay Chandrakant Ajegaonkar
सर्वाधिकार सुरक्षित...
*शब्दांकन*- संजय चंद्रकांत आजेगावकर....