पॅरानॉर्मल इन्व्हिस्टीगेशन अँट हॉन्टेड फोर्ट (राजस्थान)
उन्ह चांगले टळटळीत रखरखत होते. माथ्यावर पूर्वोतर जाणाऱ्या पायऱ्या चांगल्याच तापल्या होत्या. पाठीवरची भलीमोठी कॅमेरा, आणि इतर साहित्य असणारी बॅग् सांभाळत त्याने एकदा पुन्हा त्या वर जाणाऱ्या आणि खाली उतरणाऱ्या पायऱ्याचे निरीक्षण केले.
नावाला चिटपाखरू सुद्धा दिसून येत नव्हते. संबंध वाटेवर कदाचित आपण एकटेच या दुपारी किल्ल्यावर जात आहोत. त्याने पुन्हा स्वतःच्या मनाला समजावले. घशाला पडलेली कोरड अजून काही क्षण, वेळ रोखून ठेवण्याचा तो अयशस्वी प्रयत्न करू लागला.
पश्चिमेला अथांग पसरलेल्या मरूधरेवरून रखरखित वाऱ्यासोबत गरम वाळूचे झोत आता इतक्या उंचीवर सुद्धा अंगावर येत होते. आता अजून किती चालावे लागेल?? उंचावर जाणाऱ्या पायऱ्याकडे पाहत तो मनाशी काही आडाखे बांधू लागला.
नजरेच्या पल्याड असलेल्या दृश्यरेषेच्या पलीकडे त्याला त्या रणरणत्या उन्हाच्या झळात काहीशी हालचाल जाणवली.
बरीच हिंमत जुळवून आणि श्वास नियंत्रीत करत तो किल्याच्या माथ्यावर जवळ पोहोचू लागला. हळूहळू पुढील दृश्य स्पष्ट दिसून येऊ लागले.
पूर्ण डोक्यावर पदर घेऊन झाडाला टेकून बसलेली ती महिला सोबत मोठाली चरवी घेऊन बसली होती. त्याने लांबूनच निरीक्षण केले. नक्कीच थंडगार ताक असावे?? अथवा कदाचित शेळीचे दूध?? किल्ला फिरण्यास येणाऱ्या पर्यटकासाठी कदाचित ही सोय असावी. अथवा कदाचित तिची रोजीरोटी असावी.. ते बाकी जाऊ दे आधी जाऊन पटपट दोन तीन ग्लास घशाखाली रिचवून सुकत पडून फाटत चाललेल्या गळ्याला ओलावा द्यावा त्याने विचार केला...
पाणी मिलेगा?? या जो भी है वो???
घोगऱ्या आवाजात त्याने हापत हापत तिला विचारले.
नही है. खतम हुआ है...
तिने डोक्यावरचा पदर अजिबात ढळू न देता त्याला सांगितले.
प्रचंड भ्रमनिरास झाल्यासारखी त्याची अवस्था झाली.
यहा कहा आसपास?? कुआ वगैरा??
त्याने गडमाथ्याचे निरीक्षण करून पुन्हा एकदा तिला विचारले.
नही है. पलीकडून तिचा शांत आवाज आला.
कमाल आहे या बाईची... नक्की काय आहे मग त्या चरवीत?? जर काही विकायचे नाही तर मग इतक्या भरदुपारी ही इथे काय करते आहे??
काहीश्या नाराजीच्या सुरात त्याने पुन्हा एकदा तिला न्याहाळले...
शरबत पीओगे?? शरबत है यहा...
तिचा पुन्हा मधाळ आवाज कानी पडला.
काय?? हिला कसे माहीत.. मी काय विचार केला तो हिच्याबद्दल.. तो काहीसा सांशक झाला.
हा चलेगा... जल्दी दो....
बिलोरी काचेच्या ग्लासमध्ये तिने ते लाल रंगाचे सरबत चरवीतून काढून ओतले. आणि तो ग्लास त्याच्या हातात दिला.
सुकत चाललेल्या घशात तो थंडगार द्राव उतरत गेला. पूर्ण गळ्याच्या सुकलेल्या भिंती त्याने भिजवून टाकण्यास सुरुवात केली.
और एक मिलेगा क्या?? थोडा मिठा बनाना इसबार?? हातातील ग्लास त्याने तिच्या हातात देऊन अजून सरबत पिण्याची इच्छा व्यक्त केली.
जी हुकूम....तिने झाडाशेजारी वळकटी खालची छोटीशी कट्यार काढली. आपल्या उजव्या हातात ती कट्यार धरून डाव्या हाताचे मनगट त्या चरवीवर चिरले.
टीप टीप करत त्या लालभडक रक्ताची धार त्या चरवीत जाऊ लागली.
ते दृश्य पाहून त्याची गाळणच उडाली.. डोक्यात प्रचंड गरगर होऊ लागली...
तिच्या डोक्यावरचा पदर जोराच्या वाऱ्याच्या झोताने दूर जाऊन पडला.. आणि चरवी घेऊन बसलेली बटबटीत डोळ्याची, पिंजारलेले केस अस्ताव्यस्त असलेली.. जराजर्जर चेटकीण त्याला दिसू लागली..
हुकूम इसबार पुरा मिठा है.
तिच्या बाहेर आलेल्या पिवळ्याजर्द सुळ्याना पाहून त्याची शुद्ध कायमची हरपून गेली.
समाप्त.
लेखक : संदिप मुणगेकर
इमेज क्रेडिट : unknown facebook gallery
इमेज : भानगड किल्ला राजस्थान