जेव्हा भुताची भेट होते.
कोजागिरी वरुन एक जुनी मजेशीर घटना आठवली.
तेव्हा आम्ही खापरखेडा रहिवासी होतो.दरवर्षी अगदी धडाक्यात कोजागिरी साजरी करायचो.एक दिवस खेड्यात राहण्याचा आनंद घेण्यासाठी नागपूर हुन भाऊबहीनी आई,बाबा,मामा मामी सर्व जण खापरखेड्यात यायचे.मस्त गेट टुगेदर साजरा व्हायचा.खापरखेड्यातल्या एम एस ई बी क्वार्टर बिल्डिंग च्या चवथ्या मजल्यावरच्या टेरेस वर,वा काय वातावरण होतं त्याकाळी,चारी बाजूंनी झाडेझुडपे,छोटी गावे,दुरवर अंधारात पसरलेली माळरान,तिथली भयाण शांतता, टेकड्यांच्या रांगा,आणि रामटेक गडावरची जिथे टिपुर जळतो तो उंच मनोरा.तिथे जळणारा अग्नी रात्रीच्या अंधारात अगदी उठून दिसायचा.रातकिडे,निशाचरी पक्षी ,यांचे आवाज वातावरणात घुमत असायचे.मधेच दुरून कोल्हेकुई ऐकु यायची.या सर्वांचा आनंद घेत आमचा हास्यविनोद,गप्पाटप्पा,अगदी धमाचौकडी चालु असायची.ज्याची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघायचो.वीटांची चुल पेटवायची, त्यासाठी काड्या शोधत फिरायचे.हे काम माझ्या भावांवर म्हणजे यांच्या साळ्यांवर सोपवल्या जायचं.एवढी थंडी असायची त्याकाळी.गच्चीवर गाद्या, पांघरूण नेऊन घातली जायची.मग एका चुलीवर मुंगोडो किंवा आलुबोंडे आणि एकावर दुध आटायला ठेवलं जायचं.दुध आटवायच काम मिस्टरांकडे असे.
असंच एका वर्षी कोजागिरी ची तयारी चालू होती.मामे भाऊ जो तेव्हा चोवीस पंचवीस वर्षांचा होता.(आता पंचावन्न चा आहे). म्हणाला मी दुधाच तापेलं ,भांड ज्यात पाच लिटर दूध होतं ते गच्चीवर घेऊन जातो.आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहयचो.आमच्या वरच्या माळ्यावर जे कुटुंब राहायचं त्यांची तरुण मुलगी मतीमंद होती.कार्ली नाव होतं तिचं.मुख्य म्हणजे संपूर्ण बिल्डिंग मध्ये अंधार असायचा.फक्त आमच्या मजल्यावर च लाईट होते.भावाने दुधाच तापेलं उचललं वर घेऊन जाऊ लागला.त्याच्या मागे माझी मुलगी जी तेव्हा असेल पाच वर्षांची त्यांच्या मागे निघाली.तो जसा तिसऱ्या मजल्यावर गेला त्याला समोरून दोन्ही बाहु पसरुन त्यांच्या कडे कुणी येत आहे असे दिसले.मुळात तिथे अंधार,आणि काळी आकृती.शिवाय पौर्णिमा, ऐकीव भुताच्या गोष्टी,तो एवढा घाबरला, त्यांच्या तोंडातून आवाजही फुटेना.नुसता आ आ असा जोरात किंचाळत पायऱ्यांवरून धावत खाली निघाला.त्याच्या मागे माझी मुलगी मामा थांब ,मामा थांब ओरडत येत होती.पण तो कसला ऐकतोय .त्याचा आवाज ऐकुन आम्ही सर्वच धांवत आलो.पण एवढ्या गडबडीतही पठ्ठ्याने हातातल दुधाच भरलेलं भांड पडु दिलं नाही हे विशेष.मग आम्ही जाऊन बघितलं तर तिथे कार्ली हसत उभी होती.अंधारात तिच्या काळ्या चेहऱ्यावर पांढरे दात चमकत होते.आणि तिचा उद्देश त्यांच्या हातातल दुधाच भांड घ्यावं हे असावं . म्हणुन तिने हात पसरले असेल.हा पठ्ठ्या वेगळंच समजला ,आणि भुतं समजुन घाबरला.हे बघुन आमची हसुन हसुन पुरेवाट झाली.
ती कोजागिरी सर्वांच्या चांगलीच आयुष्य भर लक्षात राहीली.
डॉ.सुलेखा अ.सरोदे.