माध्यम.....
आज मार्तंड आणि मल्लिकाचे लग्न आहे. दोघे एकाच कॉलेजमध्ये होते, त्यामुळे त्यांची निदान अर्धी बॅच तरी हजर होती सोहळ्याला. बऱ्याच वर्षांनी पुन्हा सर्व एकत्र भेटत होते. त्यामुळे त्यांच्या उत्साहाला नुसतं उधाण आलं आहे.
मल्लिकाच्या मैत्रिणी सारा, करिष्मा तीला मेकअप करण्यात मदत करत होत्या. कुबेर, साजन, आकाश, मार्तंडच्या रूममध्ये चावट गप्पा मारत होते. वैभव, अमर हॉल बाहेर उभे राहून एकीकडे सिगारेट फुकत घसा शेकत होते, आणि दुसरीकडे येणारे जाणारे आयटम बघत डोळे शेकत होते. सर्व जण आपापल्या परीने लग्न एन्जॉय करत होते. फक्त अनिता एकटीच चेहऱ्यावर मुखवटा घालून वावरत होती.
अनिता आणि मार्तंड कॉलेजच्या आधीपासून एकमेकांना ओळखत होते. एकाच बिल्डिंगमध्ये दोघं राहत होते. योगायोगाने कॉलेजही एकच होतं दोघांचे. दोघे एकत्र मार्तंडच्या बाईक वरून जायचे यायचे. मार्तंड हा कॉलेजचा बॉक्सिंग चॅम्पियन, त्यामुळे दिसायला तसाच आडदांड, उंच आणि थोडा आडवा, सावळा, पण एकदम मॅनली लूक. त्या उलट अनिता. अगदीच नाजूक साजूक. गोरा रंग, नाजूक जीवणि, स्वप्नील डोळ्यांची हसतमुख. मात्र मनातल्या मनात मार्तंडलाच आपलं सर्वस्व मानणारी. आणि तीच्या भावनांपासून कायमच अनभीज्ञ मार्तंड.
कौशल, अनिताचा कॉलेज फ्रेंड. अनिताला त्याने पहिल्यांदा मार्तंडच्या गाडीवर पाहिलं आणि तेव्हाच तो तीचा आशिक बनून गेला. थोडी ओळख झाल्यावर त्याने रीतसर अनिताला प्रपोज पण केलं होतं. मात्र अनिताने केवळ सॉरी बोलून विषय संपवला होता. कौशलला हे अपेक्षित होतंच. न सांगता त्याला तीच्या मनातील मार्तंडबद्दलच्या भावना समजल्या होत्या. अनिता मनातल्या मनात मार्तंडला कमीटेड आहे हे फक्त त्यानेच ओळखलं होतं.
मल्लिकाने एका बॉक्सिंग मॅच मध्ये मार्तंडला पाहिलं. ती मॅच तो जिंकला. त्याच दिवशी बिनधास्त तिने सर्वांसमोर त्याला प्रपोज केलं. तोच थोडा लाजून तिथून पळाला. पण काहीच दिवसात त्याने होकार दिला. त्या निमित्ताने त्याने कॅन्टीन मध्ये सर्वाना पार्टी देऊन ऑफिशीअल घोषणा पण केली त्यांच्या प्रेमाची. त्या दिवशी अनिता खूप रडली कौशलच्या खांद्यावर डोकं ठेवून. कौशलने पण वेळेचा गैरफायदा न घेता तीला आधारच दिला.
काही महिने असेच गेल्यावर परत एकदा कौशलने अनिताला विचारून पाहिलं. पण आजदेखील ती स्वतःच्या निर्णयावर ठाम होती. तीने स्पष्ट शब्दात कौशलला सांगितलं की आपण चांगले मित्र आहोत, पुढे देखील मित्र म्हणूनच राहू. मार्तंड माझा नाही होऊ शकला म्हणून मी तुझा विचार करेन ह्या भरवशावर राहू नको प्लीज. तुला मी फार आडमुठी, शिष्ट वाटत असेल, मी खूप भाव खातेय असं वाटत असेल, तर तसं नाही. तुला माझ्या वागण्याचा राग येत असेल तर सॉरी, तुला तुझा मार्ग मोकळा आहे. आपली मैत्री तुटली म्हणून मला वाईट वाटेल काही दिवस, पण माझ्या निश्चयापुढे दुसरं काही नाही.
कौशल म्हणाला असं काय बोलतेय अनिता तू? आपली मैत्री देखील एवढी तकलादू नाही, तुझ्या नकाराने लगेच तुटायला. मी तुझ्या भावनेचा आदरच करतो, इथून पुढे पण करत राहीन. आपण कायम मित्र म्हणून राहू एकत्र. हा शब्द कौशलने मनापासून पाळला शेवटपर्यंत.
त्यामुळेच आज मार्तंडच्या लग्नात पडतील ती सर्व कामे, मग ती जेवणाचा कॉन्ट्रॅक्टर ठरवणे, मार्तंड बरोबर पत्रिका वाटणं, शॉपिंग, अनिता मन लावून करत होती. मल्लिका साठी बनवलेले मंगळसूत्र आणि इतर दागिने देखील तीच घेऊन आली तीच्या ओळखीच्या ज्वेलर कडून. मात्र तीच्या मनातील पोकळी फक्त कौशलच एकटा समजू शकत होता.
लग्न यथासांग पार पडलं. वरात वाजत गाजत गल्लीत येऊन ठेपली. आता निदान अर्धा एक तास तरी लागणार होता जोडप्याला गृहप्रवेश करायला. तेवढ्या वेळात मार्तंडची बेडरूम सजवुन ठेवायची जबाबदारी अनितावर होती. कौशलपण तीच्या मदतीला होताच.
दोघेपण रूममध्ये आले आणि प्रथमच अनिताचे डोळे पाणावले. दोघं रूमला फुलांच्या माळा बांधत होते. बेडवर मखमली चादर घातली गेली. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या सुट्या करून पसरायचे काम चालू होतं. एकेक पाकळी खुडताना अनिताच्या मनाचे तुकडे तुकडे होत होते. तीची अवस्था पाहून कौशल तीच्या पाठीवर हात फिरवून तीला शांत करत होता. अनिताने त्याला घट्ट मिठी मारून आपल्या अश्रूना वाट करून दिली. थोडं शांत झाल्यावर त्यांनी बेडरूम मधील डिम लाईट चालू केले. एकवार सगळं मनासारखं झाल्याची खात्री करून घेतली आणि बेडरूमला बाहेरून कडी घातली. पण आपलं मन आतच अडकून पडलंय असंच अनिताला वाटत होतं.
अनिता घरी निघून आली. घरी येऊन कपडे वगैरे न बदलता ती तशीच पसरली सोफ्यावर. खूप एकटं एकटं वाटत होतं.
खूप वेळ असाच गेला. अनिता काही तरी घडण्याची वाट पाहत अस्वस्थ फेऱ्या मारत होती गॅलरी मध्ये. आणि इतक्यात तीला कसलीतरी चाहूल लागली.....
मार्तंडच्या घरी पाहुणे राऊणे जेवेपर्यंत निदान बारा तरी वाजून गेले. मार्तंडच्या बहिणीने मल्लिकाला तयार करून रूममध्ये सोडलं. पाठोपाठ मार्तंड आतमध्ये आला. त्याने बेडरूमला कडी घातली. मागून येऊन त्याने मल्लिकाला मिठी मारली.
इकडे अनिताला तीच्या मानेवर मार्तंडचा उष्ण श्वास जाणवला.
मल्लिकाने त्याला समोरून मिठी मारली. मार्तंडने तिच्या ओठावर आपले ओठ टेकले.
अनिताला ओठावर मार्तंडच्या मिशा टोचल्या. नकळत तीच्या चेहऱ्यावर एक खूनशी हसू पसरलं.
मार्तंड मल्लिकाच्या शरीराला स्पर्श करत होता पण त्याची अनुभूती मात्र अनिताच्या मनाला जाणवत होती.
इतक्या वर्षाची अनिताची प्रतीक्षा अखेर आज संपली. आजवर आयुष्यात तीने फक्त आणि फक्त मार्तंडचा विचार केला होता. तो मार्तंड दुसऱ्या कुणाचा कसा काय होऊ शकणार होता?
शरीर जरी मल्लिकाचे असले तरी तिच्या आत मन मात्र अनिताचे असणार आहे. परकाया प्रवेशच जणू.
बिचारी मल्लिका, आता केवळ एक माध्यम म्हणून जगणार होती. अनिताने एका मांत्रीकाकडून दोन काळे मणी बनवून घेतले होते जे तिच्या मंगळसूत्रा मध्ये होते. त्यायोगे तिच्या शरीरावर आता फक्त अनिताचा अंमल होता.
आज खऱ्या अर्थाने मार्तंड अनिताचा होणार होता.
प्रेमात आणि युद्धात सर्वच माफ असतं ना !
समाप्त
राजेंद्र भट