जुल्मी संग आख लडी....
तो कधीच मेन हिरो वगैरे नसायचा. पूर्वी च्या जुन्या सिनेमा मध्ये जशी मेहमुद च्या साईड रोल ची क्रेझ असायची.तशी त्याच्या साठी खास भूमिका लिहिली जायची. सहा फूट उंची, तलवार कट मिशा, थोडा सावळा रंग, अगदी गावरान टाईप लुक, आणी ह्या सर्वाच्या अगदी विरुद्ध निळे निळे डोळे,
कुठलीही स्त्री, मग ती कुठल्या ही वयाची असो साहिल च्या नजरेने घायाळ झाली नाही असं होणं अगदीच अशक्य. ह्याच्या संगतीत आलेली स्त्री अक्षरश:झूरून झुरून मरत असे. तरी पण त्याच्या साठी जीव ओवाळून घ्यायला अजुन पण किती तरी जणी तयार होत्या एका पायावर. क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा असं मानणाऱ्या खूप जणी होत्या. खऱ्या अर्थाने तो लेडी किल्लर होता.
सध्या तो फार वाईट मनस्थिती मध्ये होता...
फिल्म इंडस्ट्री मध्ये आल्यावर त्याच पाहिलं नाव जोडले गेले होत टीना सोबत . ती त्याच्या पहिल्या सिनेमाची हिरोईन होती. पुढे दोन सिनेमे दोघांनी एकत्र केले. त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेम जमलं. दोघे आता लग्न करणारच असच सर्वाना वाटत होत. पण अचानक काही तरी निमित्त झालं आणी टीना 15 दिवसात हे जग सोडून गेली. टीनाला अचानक क्षयाची बाधा होऊ शकते हे एक गुढच होत.
ह्या धक्कया मधून सावरायला साहिल ला मदत केली मीताने. ती साहिल च्या नवीन चित्रपटाची निर्माती होती. खरं तर ती खूप दिवसापासून साहिल साठी तडफडत होती. केवळ त्याचा सहवास मिळावा म्हणून तिने सिनेमाचा घाट घातला होता .
रोज शूटिंग च्या वेळी त्याच्या साठी ती घरून डबा घेऊन यायची. पॅक अप झाल्यावर त्याला घेऊन लॉन्ग ड्राईव्ह ला जायची. आता हळू हळू तो पण तिच्या मध्ये गुंतत चालला होता. टीना गेल्याच दुःख थोडं थोडं कमी होत होत. मीताने त्याला लग्ना बद्दल विचारायाचं ठरवलं. त्या साठी शूटिंग संपल्यावर ती त्याला घेऊन घरी आली.
दोघां साठी पेग बनवला. त्याच्या समोर बसून तीने विचारलं आपण लग्न करायचं? तुला आवडेल माझ्या बरोबर संसार करायला? तो म्हणाला तुला आवडेल का माझ्या मध्ये हरवून जायला ! ती म्हणाली मला आयुष्य भर तुझ्या निळ्या डोळ्यात हरवायला आवडेल.
तो तिच्या डोळ्यात डोळे मिसळून म्हणाला टीना ला पण माझ्या निळ्या डोळ्यांमध्ये असच स्वतःला हरवून जायचं होत. म्हणून ती पण अशीच माझ्या डोळ्यात डोळे घालून बसली होती जशी आता तू बसली आहेस आणि हळू हळू ती स्वतःच अस्तित्व हरवून बसली. ती त्या क्षणीच जगातुन नाहीशी झाली होती. फक्त तीच शरीर मी जिवंत ठेवलं काही दिवस माझ्या वर काही आरोप नको यायला म्हणून.
तुझं पण आता असंच होत आहे. मी तुझ्यामधला जीवन रस शोशुन घेतला आहे माझ्या डोळ्या मधून. जगाला दाखवायला म्हणून तुझं शरीर जिवंत राहील. मग ते पण नष्ट होईल काही दिवसात.
तिला तिथेच टाकून तो परतला स्वतःच्या घरी. कारण उद्या मीता आजारी पडणार काही दिवसासाठी, मग त्याला तिची काळजी घ्यायला यावे लागेलच ना ! उद्या डॉक्टर निदान करणार, अचानक मीताच्या शरीरातील रक्त कमी कमी होत आहे. सगळी धावपळ आपल्यालाच करायला हवी. उद्या पासून थोडे दिवस चेहरा पाडून राहायला हवं,
मग भेटेलच परत कोणी तरी आपल्या निळ्या डोळ्यात स्वतः ला हरवून बसायला .
लेखक राजेंद्र भट