© कर्म.
#By_Sanjay_Kamble
आॅफिस मधे माझ्या बाजूच्या टेबलवर बसलेले माझे एक सहकारी मोठ्याने वर्तमानपत्र आम्हा सर्वांना ऐकू जावं या हेतून वाचत होते. तस कुतूहलापोटी मी ही मान पुढ करत वर्तमानपत्रात थोडं डोकावून पाहिलं तर त्या मुलाचा फोटो दिसला... दिसायला अगदी स्मार्ट, थोडा उभा चेहरा, चकचकीत दाढी मिशा, डोक्यावरचे काळेभोर केस स्टाईलने उभे केलेले... डोळ्यावर मोठ्या चौकोनी फ्रेमचा चष्मा...काॅलेजच्या आयकार्डवरचाच फोटो छापला असावा..
इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता.... आत्महत्येच नेमकं कारण दीलं नसलं तरी आम्ही आपापले तर्क लढवायला सुरुवात केली...म्हणजे जसं आपण सर्वच एखाद्या सामान्य केसमधे नेहमी आपले तर्क वितर्क लढवत असतो... जस प्रेमात अपयश आल्यान आत्महत्या केली असेल...? कमी मार्क्स..? रॅगिंग....? किंवा घरच्यांच्या बोलण्याचा राग वगैरे.... कदाचित यापैकी एखाद्या एका कारणामुळच आत्महत्या केली असावी...
ड्युटी सुरू झाली आणी जो तो आपापल्या कामात गुंग झाला... पण माझ्या डोक्यात आज दिवसभर तीच बातमी आणि त्याच मुलाचा विचार घुमत राहीला... कारण सकाळी सकाळी एखादी अशी गोष्ट घडली, पाहीली किंवा वाचली तर दिवसभर राहुन राहुन तेच आठवत रहातं... म्हणजे निदान मला तरी...
तसं आज कामही खूप असल्यान वेळेच भानच राहील नव्हत.. दिवसभर भयंकर उकाड्यान हैरान केलेलं तर संध्याकाळ होता होता आसमानात काळ्याभोर ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली.. आॅफिस मधुन निघायला आज चांगलाच उशीर झालेला...मी बाहेर पडायला आणी वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात करायला एकच गाठ पडली... घोंघावणा-या वा-यासोबत पावसाचे टपोरे थेंब तडतड करत रस्त्यावर बरसु लागले....
घोंघावणा-या वा-यासोबत काळ्याकुट्ट आभाळात अचानक आक्राळविक्राळ आकार घेत उमटणारी लख्ख प्रकशाच्या रेषेसोबतच कानठाळ्या बसवणा-या आवाजान काळजात धडकीच भरायची....अशाच एक लख्ख झळकलेल्या विजेसोबतच रस्त्याकडेला असलेल्या खांबावरच्या ट्रान्सफॉर्मर मधे एक स्फोट झाला.... चर्रर्र चर्रर्र आवाजासोबत काही सेकंद त्या जोराच्या मुसळधार पावसातही दिपावलीच्या आतीशबाजीसारख्या उठणाऱ्या ठिणग्यांनी परिसर उजळून निघाला आणी प्रकाशाचा एकमेव आधार असलेली लाईटही गेली... त्यासरशी वादळी वाऱ्यासोबत कोसळणाऱ्या पावसालाही रात्रीच्या लख्ख काळोखान आपल्या कवेत घेऊन अदृष्य केल... आता दिसत नसला तरी तो होता... कोसळत होता, मनमुराद बरसत होता.. आणी माझ्या काळजात धडकी भरवत होता... . रात्रीचे अकरा वाजून गेले असतील . कामाच्या ठिकाणाहून माझे घर साधारण पंचवीस किमी व असेल... तसाही जाॅब नवीनच असल्याने कोणतेही कारण न सांगता उशिरापर्यंत काम कराव लागायचं... आणी माझ्या साठी हे नेहमीच होतं...
आमच्या कंपनीचे वयस्कर वाॅचमन हातातील टॉर्चच्या प्रकाशात आॅफिसला नीट लाॅक करून गेटच्या आतच त्यांना बांधून दिलेल्या छोट्याशा खोलीमध्ये अंगावर चादर गुरफटून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे भुवया उंचावून पहात आपल्या शर्टच्या वरच्या खिशातून एक साधी विडी काढून माझ्यासमोर धरली आणि मला ओढण्याचा आग्रह करू लागले, तशी मी नकारार्थी मान हलवली...
"घे रे बाळ, थंडी हा या पावसाला. बीडी ओढलीस तर तेवढं चांगलं वाटल..."
" मी बिडी सिगारेट वगैरे व्यसन नाही करत .. म्हणजे अजून तरी..."
एवढ बोलून दोन्ही हात पैंटच्या खिशात घालून मान किंचित वर करत निराशपणे पाऊस उघडायची वाट पहात त्याच्या खोलीतल्या दारात उभा राहिलो.. पण आज पाऊस उघडेल अशी काहीच चिन्ह दिसत नव्हती.. वेळ पुढे सरकत होती तसा घरी जायला आणखी उशीर होत होता... मनात विचार आला..
'किती वेळ वाट पहायची..?'
आणी मनाशी निश्चय करत निघायचं ठरवलं... अंगात पावसाळी जॅकेट अडकवल, डोक्यावर टोपी घातली... जॅकेटची चेन सर्रकन ओढली आणी बाहेर पडताना वाॅचमनच्या टेबलवर ठेवलेल्या वर्तमानपत्रातील त्या बातमीवर नजर गेली , तशी काही वेळ लक्षातून गेलेली ती बातमी पुन्हा डोक्यात घुटमळू लागली... पण दुर्लक्ष करतच मी बॅग पाठीवर अडकवली आणि गेटमधून बाहेर पडलो...
गेटच्या बाहेर झाडाखाली उभी माझी बाईक पावसात भिजत होती... सिट किंचीत स्वच्छ करून बाईक सुरु केली आणी घरचा रस्ता पकडला.. काळोख दाट असला तरी रस्ता तसा चांगलाच होता, काही ठिकाणी आजुबाजुला वादळी वाऱ्यामुळ उन्मळून पडलेली झाडं, तसेच रस्त्यावर पाण्यासोबत वाहुन आलेला प्लास्टीकचा कचरा, पालापाचोळा सारं काही गाडीच्या हेडलाटच्या प्रकाशात स्वच्छ दिसायचं.. हे सार पाहाताना किंचित भिती वाााटत होतीीच... ईतक्या रात्री ड्यूटीवरुन परतयची सवय नव्हती त्यामुळे मन काहीीस अस्वस्थ होतं... कााारण आमच्या गावाच्या रस्त्यावर दिवसाही फारशी वर्दळ नसते त्यात एवढ्या रात्री वाहन जवळजवळ नसतातच ... गाडी रस्त्यावरून धावू लागली तसा काही सेकंदातच मी अगदी पावसाच्या पाण्याने चिंब भिजलो....
या ओसाड निर्जन रस्त्यावरून भयान काळोखाला भेदणा-या माझ्या गाडीच्या हेडलाईट च्या प्रकाशात चमकणारे शुभ्र पावसाच्या पाण्याचे थेंब पाहताना पावसाची भीषणता अगदी स्पष्ट जाणवत होती...
जोराचा पाऊस असल्याने माझ्या गाडीचा वेग तसा सामान्यच होता...त्यात आजूबाजूला नजर गेली की धोधो बरसणाऱ्या पावसापासून स्वताला वाचण्यासाठी झाडाच्या आश्रयाला उभं थंडीने कुडकुडणारं चिंब भिजलेल कुत्र्याच पिल्लू दिसलं की मनाला वाईट वाटायचं... आणि त्यासरशी मनात एखादा विचार यायचा...
' खरच, काय आयुष्य असतं ना..'
वाहनांची वर्दळही जवळजवळ नव्हतीच.. मी अगदी निवांत आपली बाईक चालवत होतो, तोच अचानक माझी गाडी झटके खात काही अंतर पुढे जात बंद पडली....
'हीला काय झालं आता..?' म्हणत गाडी तशीच ढकलत रस्त्याच्या कडेला घेतली. चावी बंद चालू करत किक मारायला सुरुवात केली, पण काही केल्या गाडी सुरू व्हायचं नाव घेईना ... वरुण राजाचं रुद्र रूप आणि अशातच निर्जन ठिकाणी बंद पडलेली माझी बाईक. एकूणच सर्व परिस्थितीची न राहवून ही भीती वाटू लागली .. बाईकच्या किका मारतच होतो की समोर लक्ष जाताच काळजात धस्स झालं.. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला सावरल. काही अंतरावर बसच्या जुन्या बसस्टॉपशेजारी कोणी तरी उभ दिसल.. बाईकच्या किक मारतच मी त्या आकृतीला न्यहाळायला सुरवात केली...तस मागील रस्त्यावरून येणाऱ्या एका वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे मला ती आकृती आता किंचित स्पष्ट दिसू लागली.. तीस ते पस्तीस वयाची एक महिला हातात छत्री घेऊन रस्त्याकडेला उभी होती.. अंगावर एकदम साधी साडी नेसलेली , उजव्या खांद्यावर काळ्या रंगाची एक लेडीज पर्स अडकवलेली तर डाव्या हातात छत्री आणि पांढऱ्या रंगाच्या मोठ्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग दिसत होत्या..
दूरवरून येणारे ते वाहन जवळ येताच त्यांनी त्या वाहनाला थांबवण्यासाठी आपला हात पुढे केला पण ती गाडी सुसाट वेगाने तशीच निघून गेली पण गाडीच्या टायर्समधून उडालेल पावसाचं पाणी अंगावर येताच आपली साडी हिरमुसलेल्या नजरेन पहात त्या रस्त्यापासून जरा मागेच उभ्या राहिल्या..ते वाहन निघून गेले तसा पुन्हा एकदा काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरला...
मी आता मनात ठरवून ठेवलं की बाइक सुरू झाल्यानंतर या महिलेला तिच्या घरी सोडून मग आपल्या घरी जायचं... तसंही माझ्या जागी दुसरे कोणीही असत तरी हेच केलं असतं.. ...
पावसाचा जोर किंचित कमी झालेला.. मी गाडीचा प्लग काढून साफ केला आणी गाडी सुरू करू लागलो इतक्यात मागून दोन मोटारी येत असल्याचे लक्षात आल... कदाचित कॉलेजच्या मुलांचा ग्रुप असावा. जोरात ओरडत शिट्ट्या मारत भरधाव वेगाने वेडी-वाकडी वळणे घेत त्या मोटारी एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या...
सुसाट वेगात त्यातली एक मोटार माझ्या जवळून अगदी घासुनच गेली... काही बोलणार तोच धाडकन आवाज झाला आणि रात्रीची ती भयाण शांतता भेदत हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका आर्त किंकाळीन आसमंत भरून गेला... एखाद्या मुक्या जनावराला मारहाण करताना जिवाच्या आकांताने त्यांने फोडलेला हंबरडा ऐकला असेल तर तसंच आवाज त्या महिलेचा येत होता....
कारण रस्त्याच्या कडेला उभ्या त्या बाईंना त्यातल्या एका मोटारीची जोरदार धडक बसलेली ... त्या रस्त्यावर कितीतरी फुट उंच उडून रस्त्यावर गडगडत जाऊ लागल्या पण त्या मोटारी तशाच वेगात त्यांच्या अंगावर पुन्हा झेपावल्या.. पुढच्या चाकात अडवून त्या बाई 12ते 15 फुटापर्यंत मोटारी सोबतच फरपटत गेल्या ... मी मागून ओरडत धावू लागलो पण दोन्ही मोटारी त्या बाईला चिरडून झटक्यासरशी निघूनही गेल्या... त्या भयान आवाजानंतर पुन्हा एकदा निरव शांतता पसरली. रात्रीच्या निरव शांततेत जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या त्या स्त्रीचा वेदनांनी कण्हत असलेला आवाज घुमू लागला...
त्या भयानक काळोखात पावसाची रिपरिप सुरूच होती ... समोर घडलेल्या त्या अपघातान माझं तर सर्व अंग थरथर कापत होतं.. पायामधली शक्तीच संपली होती.. पण तसाच धीर एकवटून त्यांच्याजवळ गेलो... काळोखान भरलेल्या आभाळात लख्खकण आभाळात विज चमकली त्यासरशी सफेद प्रकाशात त्यांच जखमांनी भरलेलं शरीर दिसलं, आणी हातापायात गोळाच आला... त्या मात्र भरल्या डोळ्यांनी आपले जखमी हात माझ्यासमोर जोडत मदत मागु लागल्या... घाबरून चालणार नव्हतं... प्रसंग ओढवला की धीर एकवटावाच लागतो... एक गोष्ट आज समजली होती ती म्हणजे...
' जीथे तुमची गरज असते , परिस्थिती तुम्हाला तीथ नेऊन ठेवतेच.' त्याला काळ म्हणा, आलेली वेळ म्हणा, अथवा लक-बॅडलक म्हणा....
त्यांना तसेच दोन्ही हातांनी उचलून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसवत मी घातलेले पावसाळी जॅकेट काढून त्यांच्या अंगावर घातल...
'' हे हे हे बघा . क, क काळजी करू नका... मी काही मदत भेटते का पहातो...''
त्यांना थोडा धीर द्यायचा प्रयत्न करत असलो तरी मी मात्र आतुन हादरून गेलो होतो ... झाडाखाली वेदनांनी कण्हत त्या भितीन अक्षरशः थरथर कापत होत्या.. त्यांच्या जखमांमधून येणाऱ्या रक्ताने माझे हात आणि कपडेही आता भिजले होते.
अॅम्बुलेन्स ला कॉल करण्यासाठी खिशातून मोबाईल काढला पण लक्षात आलं की पावसाच्या पाण्याने भिजून तो कधीचा बंद झालाय..काही मदत भेटते का पहायला त्यांच्या जवळून उठत होतोच की त्यांनी माझा हात आपल्या जखमी रक्ताळलेल्या हातांनी घट्ट धरत थरथरत्या केविलवाण्या आवाजात बोलू लागल्या
"प्लीज, प्लिज मला हवा वाचवा हो.. उद्या दिवाळीच्या सणासाठी माझ्या मुलांसाठी कपडे आणि खाऊ आणला होता... काही वर्षांपूर्वीच दारूच्या नशेत माझा नवरा गेला . आता माझं काही बरं वाईट झालं तर माझी मुलं पोरगी होतील.. काही करा पण मला वाचवा... मला मरून नाही चालणार.."
बोलतानाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.. जड झालेल्या आवाजात असह्य वेदना आणि आपल्या मुलांसाठी काळजी स्पष्ट जाणवत होती... मी मानेने होकार देत रस्त्यावर विखुरलेलं त्यांचं साहित्य एकत्र करत त्यांच्या जवळ आणून दिलं .. आणि पुन्हा काही मदत भेटते का पहायला रस्त्यावर उभा राहिलो पण दूरवर कोणतंही वाहन दिसत नव्हतं... घाईघाईने माझ्या बाईकच्या किका मारत ती सुरू करण्याची केविलवाणी धडपड करू लागलो, पण व्यर्थ होतं... झटकन डोक्यात एक विचार चमकून गेला... आणी पुन्हा धावत्या महिलेजवळ आलो... पोटाशी कवटाळून धरलेली त्यांची पर्स मागितली तशा त्या बाई माझ्यासमोर हात जोडत बोलू लागल्या...
"माझ्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी आणलेले पैसे आहेत ते प्लीज ते पैसे घेऊ नका..."
मी काहीच न बोलता त्यांच्या पर्समधील साहित्य शोधायला सुरुवात केली... आणि माझ्या कामाची वस्तू मला मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता इमर्जन्सी सेवेच्या नंबरला १०८ ला कॉल केला आणि घटनेची माहिती दिली.. पुन्हा मोबाईल त्यांच्या पर्समधे ठेवत पर्स त्यांच्या हातात दिली... पण त्या कसलीच प्रतिक्रिया देत नव्हत्या.. कदाचित खूप रक्त गेल्यान हळूहळू त्या बेशुद्ध होत चाललेल्या... मी त्यांना आवाज दिला तशा किंचित आपले डोळे उघडत माझ्याकडे पहात म्हणाल्या..
" येथून पाच सहा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेलाच माझं लहानसे घर आहे .(गळ्यातील लोकेट पुढे करत म्हणाल्या)
हा माझ्या मुलांचा फोटो. त्या पिशवीमध्ये माझ्या मुलांसाठी घेतलेली कपडे आणि खाऊ आहे, त्यांना आठवणीने द्या आणि सांगा तुमची आई लवकर परत येईल... इतकं कराल माझ्या साठी..?"
त्यांचा हात घट्ट पकडत थोडा धीर देऊ लागलो पण त्या बेशुद्ध झाल्या... काही बोलणार तोच सायरनचा आवाज येऊ लागला.... मी तर देवाला हातच जोडले.... झटकन रोडवर धावलो.. पांढऱ्या रंगाची मारूती ओमनी गाडी आणी वर निळ्या रंगाचा गोल फिरणारा बल्ब रात्रीच्या काळोखात देवदुताप्रमाणच वाटत होता.... रस्त्याच्या आडवा जात ॲम्बुलन्स थांबवली तसे सफेद कपडे घातलेले हॉस्पिटलचे दोन कर्मचारी हातात स्ट्रेचर घेऊन खाली उतरले... त्यांना हात जोडतच मी त्या जखमी महिलेजवळ आलो... आणि धक्काच बसला .. ते कर्मचारी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले ,पण माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.. कारण त्या झाडाखाली तीन जखमी महिला नव्हती... मात्र तिच्या अंगावर घातलेलं माझं पावसाळी जॅकेट तिथेच पडल होत... आम्ही तिघांनी मिळून त्यांना खूप शोधलं पण त्या कुठेच दिसत नव्हत्या... पंधरा-वीस मिनिटं शोधून त्या ॲम्बुलन्स चे कर्मचारी मला वेड ठरवून निघून गेले.... काय चाललय समजत नव्हतं कारण हो फोन तर त्या महिलेच्या मोबाईल वरूनच केला होता... त्या महिलेला जखमांमुळे नीट बोलता येत नव्हतं.. नीट चालता किंवा हालचाल ही करता येत नव्हती ,मग क्षणात कुठे निघून गेल्या ...??'
डोकं सुन्न झाल होत.. थोडावेळ थांबून मी ही माझ्या बाईकच्या दिशेने परतलो आणि पुन्हा एकदा दचकून जागेवर उभा राहिलो.... थोडं निरखून पहात मी हळूहळू माझ्या बाईकच्या दिशेने चालताना माझ्या लक्षात आले की त्या महिलेच्या पांढऱ्या कॅरीबॅग माझ्या बाईकच्या हँडलला अडकवलेल्या होत्या.... मी आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं...
' मग त्या कॅरीबॅग कोणी अडकवल्या असतील...?'
ह्या विचारात मी गाडीची किक मारली आणि आश्चर्य, एकाच किक मध्येच गाडी स्टार्ट झाली... त्या महिलेने दिलेल्या पिशव्या त्यांच्या घरी द्यायला निघालो पण त्यांचं घर कसं ओळखायचं...,? हा प्रश्न मात्र हा मनाला भेडसावत होता.....
पावसाची उघडझाप सुरू होती त्या ठिकाणाहून पाच-सहा किलोमीटर पुढे आलो असेन .. रस्त्याच्या आजूबाजूला तुरळक वस्ती दिसत होतीच.. पण रात्रीचे दोन अडीच वाजून गेलेले त्यामुळ एवढ्या रात्री कोणाला पत्ता विचारायचा याच विचारात होतो... अचानक बाईकच्या पिवळसर हेडलाईटच्या प्रकाशामध्ये कोणीतरी रस्त्याच्या डाव्या बाजूला एका झाडाखाली उभ दिसलं..... त्यांना पाहताच झटकन बाईकचा ब्रेक मारला तसं मागच चाक स्लिप झालं गाडी काही अंतरावर जाऊन तिरकीच थांबली.. झटकन बाईक मागे वळवली आणि झाडाखाली उभ्या त्या दोघांकडे पाहिल...
झाडाच्या आसऱ्याला दहा ते बारा वर्षाची एक मुलगी आणि सात आठ वर्षाचा एक लहान मुलगा एकमेकांना घट्ट धरून पावसाच्या पाण्यात चिंब भिजत तसेच उभे होते...बाईक साईड स्टॅंडवर लावली आणि त्यांच्या जवळ गेलो.. भितीनं की थंडीने माहीत नाही पण दोघही थरथर कापत एकमेकांना आधार देत उभे होते...
" ए बाळांनो... एवढ्या रात्री इथे काय करताय... आणी घर कुठ आहे तुमचं..?"
मी दोन तीन वेळा एकच प्रश्न विचारला पण दोघेही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते... आपल्या लहान भावाला घट्ट मिठी मारून ती मुलगी फक्त माझ्याकड पहात होती... तसं झटकन डोक्यात विचार चमकून गेला, माझ्या लक्षात आल... काही वेळापूर्वी महिलेन लॉकेट मधील फोटो दाखवले होते ते याच बहीण-भावांचे होते...
" बाळांनो... काळजी करू नका... तुमची आई लवकर येईल... चला घरी..."
बोलतच त्यांच्या आईने दिलेल्या खाउच्या पिशव्या त्यांच्या हाती दिल्या..
" बरं बाळा घर कुठ आहे तुमचं..?"
तसं त्या मुलीने आपली मान मागे वळवली.. मी त्या दिशेला पाहील.. एक कच्चा रस्ता दिसत होता.. पण अंधारात असल्याने काहीच नीट दिसत नव्हतं.... त्यांना सोबत घेऊन मी चालत पुढे निघालो. तसं समोरचा चित्र हळुहळु स्पष्ट होऊ लागल... काही अंतरावरच एक गाडी उभी होती.. थोडं विचित्र वाटलं की रस्ता सोडून ही गाडी खाली काय करतेय..? कुतूहलापोटी थोडं पुढे जाऊन पाहील..... तर एक गाडी घराची भिंत पाडून त्या घरात घुसली होती.. घराच्या आतल्या समोरच्या भिंतीवर पांढ-या बल्बच्या प्रकाशात घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या दिसत होत्या.. आणि पुन्हा डोक्यात एक वीज चमकून गेली... कारण मघाशी हीच गाडी त्या बाईला जोराची धडक देऊन गेले होती.... भिंत पडल्यान गाडीच्या काचा फुटून लाल वीटा पुढच्या सिटवर विखूरल्या होत्या... गाडीत मात्र कोणीच दिसत नव्हतं... विखुरलेल्या साहित्यातून वाट काढत गाडी जवळ गेलो आणी आत डोकावून पाहिलं तसं कॉलेजच्या तरूणाच एक आयकार्ड दिसलं.. हात पुढे करत ते कार्ड उचलून पहाणार इतक्यात माझी नजर जमीनीवर माझ्या पावलांकडे गेली आणि काळजाचा ठोकाच चुकला.... हृदय पिळवटून टाकणारा ते दृश्य पाहून अंग शहारलं... जसा सर्वांगावर एक काटाच उभा राहिला..... माझ्या पायाखाली रक्ताचा सडा साठला होता.. जरा निरखून पाहिल आणी सुन्नच झालो.. त्या गाडीच्या पुढच्या चाकाखाली दोन प्रेत पडली होती.. चाकाखाली विखुरलेल्या साहित्यातून निटस काही दिसत नव्हत पण रक्तान माखलेल्या कपड्यांवरून सारं काही समजतं होतं... त्या गाडीन झोपेतच त्यांना चिरडून त्यांचं आयुष्य संपवलेल... ते दृष्य पाहून माझी विचार करायची शक्तिच संपलेली... काय करावं सुचेनास झालेलं... भितीनं काळीज तर जोरजोरात धडधड होत... बाहेर उभ्या त्या बहिण भावाला तिथंच थांबायला सांगत मी पडत धडपडत त्या जागेवरून बाजूला होताना दोन तीन वेळा माझा तोल गेला... भयानक दृश्य या आधी कधीच पाहिलं नव्हतं.... अक्षरशः अंगावर सरसरून काटा येत होता... स्वताला सावरत पुन्हा त्या चाकाखाली नजर गेली... त्या प्रेतांवरील कपडे आणी बाहेर उभ्या त्या दोघांचे कपडे...? हे कसं शक्य आहे... ती प्रेत त्या बहीण भावाची होती.... काय सुरू आहे समजण्यापलीकडच होत.. असं वाटत होतं की हे सगळं स्वप्नच आहे.. कधी गाडीच्या चाकाखाली पडलेली दोघांची प्रेते पहात होतो तर कधी बाहेर उभ्या त्या दोघांना... असं वाटत होतं की मी वेेेडा होईन... तोच आणखी एक धक्का बसला, आता मात्र भितीने वाचाच गेली.. डोळे मोठे करून मी हतबल होऊन समोर फक्त पाहत होतो... त्या मुलांच्या मागे अंधारातून कोणीतरी चालत पुढे येत असल्याचं जाणवलं... एका महिलेची आकृती स्पष्ट होत पुढे येऊ लागली... झटकन लक्षात आलं, हीच ती बाई जीचा एक्सीडेंट झाला होता, पण अगदी व्यवस्थित होती... कााही न बोलताा त्या महिलेेन आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून एक नजर माझ्याकड पाहिलं.. काहीच न बोलता मी फक्त धडधडत्या काळजाने त्यांच्याकडे पहात होतो.. तशी त्या महिलेची नजर माझ्या हातातील आय कार्ड वर त्याली... आयकार्ड, जे मगाशी मी गाडी मधून घेतलं होतं... त्या कार्ड वरचा फोटो पाहून मात्र माझ्या डोक्यात लाला मुंग्यांचे वारूळ उठलं आणि आज सकाळचा प्रसंग आठवला...
"वेडाच्या भरात एका बड्या उद्योगपतीच्या मुलाने बिल्डिंगच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली.."
माझ्या बाजूच्या टेबलवर बसलेले माझे सहकारी मोठ्यांनी वर्तमानपत्र वाचत होते... वर्तमानपत्रात पाहिलेल्या मुलाचा फोटो आणि हाय कार्ड वरचा फोटो एकच होता.. त्या बाईकडे आणि मुलाकडे पाहिलं आपल्या मुलांना जवळ घेत ती काळोखात कुठेतरी नाहीशी झाली पण या प्रसंगान मी मात्र जागेवर बेशुद्ध पडलो.....
कसल्याशा आवाजान जाग आली. जसं कोणितरी मला साद घालत होत... डोळ्यांवर झापडं होत... हळुच डोळे उघडून पाहील तर डोक्यावरचं आर्ध छप्पर गायब होतं. आजुबाजुला वाढलेलं गवत आणी पडलेल्या भिंतीचे अवशेष, लालसर शेवाळलेल्या विटांचा खच पडलेला... आजुबाजुची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो तसा पुन्हा कानावर आवाज पडला....
आवाजाच्या दिशेने पाहिल तर बाजूलाच एक साठ पासष्ट वर्षे वयाची व्यक्ती उभी होती... आणी लक्षात आलं की जमिनीवरील खुरट्या गवतावर पडलोय... झटकन उठून उभा राहिलो मी काही बोलणार तोच ती वयस्कर व्यक्ती म्हणाली...
"तुलाच नाही खूप लोकांना इथं हा अनुभव आलाय. एक वर्ष होऊन गेलं असेल या घटनेला... एका भिषण अपघातानं या घरातल हसतखेळत कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं.. दारूच्या नशेत एका कॉलेजच्या पोरान गाडी या घरात घातली... घरात झोपलेल्या दोघा बहिण-भावाला त्या गाडीन चिरडून टाकला.. अपघातानंतर सगळं गाव गोळा झालेलं... त्या मुलांची आई घरी परतली तर तीला काय आणी कस सांगायचं हा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला... सकाळी समजलं की रात्रीच त्यांच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि सकाळपर्यंत इतकी वाहने तिच्या अंगावरून गेली की तिची ओळख पटत नव्हती... त्या बड्या बापाच्या अवलादींनी पोलिसांना पैसा चारून केस मिटवली... पण कधीतरी त्यांना आपल्या कर्माची फळं मिळतीलच..."
त्यांचं बोलणं ऐकून सर्व गोष्टींचा उलगडा झाला... काहीच न बोलता मी तिथून बाहेर पडलो... माझी बाईक रस्त्याकडेला तशीच उभी होत.. रात्रीचा वादळी वाऱ्यासह आलेला पाऊस केव्हाच थांबलेला... आभाळ आता स्वच्छ झालं होतं... बाईक वर बसत त्या पडझड झालेल्या घराकड पाहिलं...खूप वाईट वाटत होतं.. दारूच्या नशेनं आणि पैशाच्या मस्तीन एक हसतं खेळत कुटूंब पूर्णपणे उध्वस्त करून टाकलं.. पण आपल कर्म आपली पाठ कधीच सोडत नाहीत... कधी ना कधी आपल्या वाईट कर्मांची शिक्षा आपल्याला मिळतेच... फरक एवढाच आहे की ती कोणत्या रूपात मिळेल हे सांगता येत नाही...
समाप्त...
( सदर कथेचे काॅपीराईट लेखकाकडे सुरक्षीत आहेत,)