© कोणीतरी आहे, इथं...!
By Sanjay Kamble
सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो.. तुम्ही कधी असं मध्यरात्री झोपेतून अचानक दचकून जागे झाला आहात का..? म्हणजे मध्यरात्रीच्या निरव शांततेत तुम्ही आपल्या बेडरूममध्ये अगदी शांत निवांत झोपलेला आहात.. दिवसभराच्या कामान शरीर पुरत थकुन विश्रांती घेतय आणि अशातच तुम्हाला एखादं विचित्र भयानक स्वप्न पडलय ज्यात तुम्ही असेच बेडवर झोपलेला आहात आणी एक काळी आकृती तुमच्या खोलीत शिरतेय. तुम्ही त्या आकृतीला पाहून थोडे घाबरता पण स्वप्नात. आणी काही समजायच्या आत ती आकृती तुमच्या अंगावर झेप घेते.. छातीवर बसून तुमचा गळा दाबायचा प्रयत्न करतय... किंवा स्वप्नात कोणीतरी तुमच्या मागे लागलंय. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही जिवाच्या आकांताने धावताय , किंचाळण्याचा प्रयत्न करताय पण तोंडातून आवाजच फुटत नाही. तुम्ही आता त्याच्या पकडीतून सुटण्याची केविलवाणी धडपड करताय, पण तुमच सार शरीरच जसं निकामी झालय... ते तुम्हाला संपवणार इतक्यात तुम्ही खडबडून जागे होता.. अंग अक्षरशः घामान चिंब भिजलेल असतं.... पण पुढच्या क्षणी तुमच्या लक्षात येत की तुम्ही ठीक आहात.... कोणीही तुमच्या छातीवर बसून तुमचा जीव घेत नाही... मनात थोडी भीती रहातेच आणि तुम्ही पुन्हा झोपायचा प्रयत्न करता.. काही वेळातच झोपुनही जाता.. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का ...? स्वप्नात तुम्ही ज्याला पाहील होत ते तुमच्या रूममध्ये अजुन असु शकत... हे केवळ एक स्वप्न नव्हत तर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होता... आणी जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर असं पुन्हा घडणार असतं आणि हे घडतही... हे मी का सांगतोय हे तुम्हाला समजेलच... कारण मागिल काही दिवसांपासून मी या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय... आता काही क्षणापुर्वीच पुन्हा मला तो प्रत्यय आलाय...
आजही गाढ झोपेतून 'नेहा' अचानक जागी झालीये... फक्त जागीच झाली नाही, तर एका झटक्यासरशी बेडवर उठूनच बसलीये... तीला काहीतरी भयानक स्वप्न पडलं असावं... त्यात आमच्या आलिशान बंगल्याच्या बाहेरील निर्जन रस्त्यावर काही भटक्या कुत्र्यांच्या केकाटण्याचा आवाज रात्रीच्या त्या निरव शांततेत अधीकच उग्रपणे ऐकू येत होता... त्यातलं एक कुत्र तर कोल्हेकुई व्हावी तसंच काहीसं ओरडत होतं.. कदाचित ते रडत असावं.. पण कुत्र्याच्या रडण्याचा तो भेसुर आवाज या रात्रीच्या समयी काळजात धडकी भरवण्यासाठी पुरेसा आहे.... कदाचित त्या आवाजानेच ती उठली असेल , की दुसरं काही कारण असेल हे लक्षात येण्यापलिकडच होतं.. त्या भितीनच तीच सर्वांग अगदी घामानं चिंब भिजलेल तर काळीजही अजुन जोरजोरात धडधडत होतं... चेहऱ्यावर आलेले मोकळे केस बाजूला करताच तीच्या कपाळावर जमलेले घामाचे थेंब पाहून तीच्या भितीची किंचित का असेना मला गंभिरता जाणवली.. नाईट लॅम्पच्या अंधुक प्रकाशात माझी नजर समोर भिंतीवर एका खिळ्यााच्या आधाराने टांगलेल्या घड्य्याळावर गेली... रात्रीचे साडेेेेतीन वाजून गेले होते.. पहाटे तीच्या मखमली रेशमी मिठीत विरघळून गेलो होतोच की इतक्यात ती कसल्याशा भितीन जागी झाली...
काही दिवसांपासून मी नोटीस करतोय ती अशीच रात्री अपरात्री दचकून जागी होतेय. आजही 'ती' अशीच जागी झाली... ती' , म्हणजे 'नेहा'.. माझी बायको... आता मलाच समजेनास झालंय की काय कराव.. कदाचित नवीन लग्न झालेय त्यामुळ कोणाची तरी नजर लागली असेल... नवीन म्हणजे दोन अडीज वर्ष झाली..... आता पन यावर काय उपाय करावा हेच कळत नाही. जेव्हा तीला जाग येते तेव्हा घामान चिंब भिजलेल तीच शरिरा अक्षरशः थरथर कपत असतं. कधी कधी तीच सारं शरीर कोणीतरी घट्ट जखडून ठेवल्यासारख होतं, मी तीला जाग करण्याचा प्रयत्न करतो पन तीच्या तोंडातून आवाजच फुटत नाही... मी कितीही हाका मारल्या तरी ती फक्त कण्हत असते...
आणी मग झटकन उठून बसते... थरथर कपत... कोण ते माहीत नाही पण 'कोणीतरी आहे' जे तीला त्रास देताय... आपल्या विस्कटलेल्या केसांनी झाकलेला चेहरा गुडघ्यांवर ठेवून क्षणभर तशीच बसते.. काही विचारलं तरी गप्पच रहाते. न काही बोलते ,न काही सांगते... बेडच्या बाजुला छोट्या टेबलवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या जग मधलं थोडंसं पाणी पिते आणि पुन्हा बेडवर माझ्या बाजूला येवून आडवी होते.. तीची अवस्था पाहून तिला मिठीत घ्यायचही धाडसही होत नाही.. तीच हे असं घाबरून जगणं मला खरंच असह्य होऊ लागलय... सुरवातीला काही वाटलं नाही पन हळूहळू तीचा त्रास वाढतच निघालाय...
काय उपाय करावा...?
चौरस्त्यावरील खडे घेऊन तीच्यावरून उतरून टाकावेत...?
लिंबू मधोमध कापून त्यात लाल भडक कुंकू भरून ते चौरस्त्यावर किंवा एखाद्या पुलाखाली टाकून यावं...?
लाकडी काड्यांनी विणलेल्या दुरडीत पांढरा भात, त्यावर गुलाल टाकुन त्यावर चिमूटभर काळी हळद टाकून, ते नदी , विहीर , तलाव अशा ठिकाणी ठेवून यावं ...?
की कोण्या चांगल्या डॉक्टर ला दाखवून औषध घ्यावी..?
कोणी तरी कांहीतरी उपाय सुचवा, जेणेकरून माझ्या बायकोला बरं वाटेल... टेबलवरच्या गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या जार मधल घोटभर पाणी पिऊन ती पुन्हा बेडवर आडवी झालीय...आणी आता बाहेर कुत्र्यांच केकाटणही थांबलय.... शांत अगदी शांत वातावरणात आहे... पण ही शांतता सुंदर नाही तर गंभीर आहे... या निरव शांततेत त्या भिंतीवरच्या घड्याळाचा आवाज तेवढाच काय तो येतोय...
टिक........टीक
टिक.......टीक
टिक.........टीक
टिक.........टीक
त्या सेकंद काट्याला पहात तीच्या बाजूला शांत पडलोय.. पण तीची एवढी काळजी करण्याचं आणखी एक कारण आहे... ते म्हणजे 'नेहा'ला दिवस गेलेत...आणी आता तीला सातवा महीला सुरू आहे... या अवस्थेत तीला असे भास होऊ नये यासाठी माझा खटाटोप आहे.... माझी बायको तशी धाडशी आहे पन भुताखेतांची तीला जरा भितीच वाटते...
त्या बाबतीत मुलकाची घाबरट... मी तीला प्रेमान 'ससा' म्हणतो.. ससा माहिती आहे ना...? किती धाडशी असतो....?
झाडावरच सुकलेल पान जरी अंगावर पडल तरी भितीनं सैरावैरा धावणारा ससा... अगदी त्या साशासारखीच तीची अवस्था..
आता नवीनच म्हणजे दोन वर्षांपूर्वी लग्न झालंय... ते ही अरेंज मॅरेज , म्हणजे जोडीदाराचे 'सुप्त गुण' तुम्हाला लग्नानंतरच समजणार...
लग्नानंतर दोन महिन्यांनी तीच्या मामाच्या घरी जेवायला गेलो तेव्हा मला तीच्यातील एक सुप्त गुण समजला... रात्री मामाच्या घरी जेवण आवरून निघायला जरा उशीरच झाला. तीचे मामा मामी रहायला आग्रह करत होते.. रात्रीचे दहाच तर वाजले होते आणि तासाभराचा रस्ता.. मला चुकून सुद्धा नव्हत रहायचं , पण नेहा मात्र रहायला तयार झाली. पण मी कसला ऐकतोय..मामा मामीचा निरोप घेऊन गाडीवरून घरी जायला निघालो खरा पण नेहा मात्र गप्पच होती. कदाचित तीला रहायचं होतं आणि मी नकार दर्शविला म्हणून नाराज असेल असं मला वाटलं... आमची गाडी गावच्या त्या ओबडधोबड रस्त्यावरून चालू लागली...
" नाराज आहेस..?" मी म्हणालो..
" शुsss" ती एवढंच म्हणाली..
" शु काय... बोल ना काहीतरी... बघ किती छान चांदणं पडलंय, त्यात गाडीवरून जाताना अंगाला झोंबणारा हा गार गार वारा... ही तरूण भरात आलेली रात्र आणी तु अशी माझ्या सोबत.. काय रोमॅंटिक क्षण आहेत ना..?" मी जरा मागे सरकत तीला चिकटायचा प्रयत्न करू लागलो...
" प्लिज काही बोलू नका..."
" हो बोलायची वेळ नाही, काहीतरी करायची वेळ आहे." म्हणतच तिच्या हातांच चुंबन घेतल.. तसा तीनं झटकन हात मागे खेचला.
" काही करू नका, ही जागा आणी वेळ तशी नाही.."
.. तसा मी अस्वस्थ झालो.
" म्हणजे..?"
" मला भिती वाटतेय हो......" तीच्या आवाजात कंप सुटलेला मला जाणवला...
" भीती..? कसली भिती वाटतेय..?." मी काळजीनं विचारलं... तसा तीन आपला उजावा हात पुन्हा माझ्या खांद्यावर ठेवत आवळला आणी डोळे गच्च बंद करून म्हणाली..
"पुढं काही अंतरावर एक ओढा आहे. तीथ काही झालं तरी तोंडातून शब्द काढू नका.."
" का....?" मी सहज विचारलं...
" तीथ बाधा होते लोकांना... मी खुपदा ऐकलंय..." तीच बोलणं ऐकून मी जरा मस्करी करायच ठरवल...
काही अंतरावरच ओढा आला होता तसा मी म्हणालो...
" नेहा.. ए नेहा. गाडीला काहीतरी झालय ग...?"
माझ्या बोलण्यान तीच्या काळजाची धडधड वाढली.. आणि मी गाडी बरोबर ओढ्यावरच नेऊन थांबवली.. ती एकसारखी देवाचा धावा करत होती... मला आता तीला जास्त भिती घालायची नव्हती... मी गाडी सुरू केली तोच एक ससा गाडीच्या प्रकाशात आला.. तो मुरून तीथच बसला... तो जागचा हालायला तयार नाही आणि नेहा मात्र एकसारखी...
" अहो... मागे चला.. ऐका माझं. पाया पडते.. पुढं काहीतरी विचीत्र घडणार असं माझ्या मनाला वाटतंय.."
मी गाडी पुढं घेऊ लागलो पन तो ससा काय जागचा हलेना.. तस मागुन एक दुचाकी येत असल्याचं जाणवलं... ती दुचाकी आमच्या बाजुला येऊन थांबली..
" मामा तुम्ही..." तीचे मामा गाडी घेऊन आले होते...
" गाडी बंद पडली म्हणून नेहा न फोन केलता..."
मी जरा रागातच वळुन नेहाला पाहील...
तुम्ही एक म्हण ऐकली असेल ना,
' आपल्या पायावर कु-हाड मारणं' बहुतेक यालाच म्हणत असावेत...
तीला भिती दाखवायच्या नादात, परत मामाच्या घरात. गपगुमान आलो असतो रात्री एकमेकांच्या मिठीत झोपलो असतो पन ' आयडिया केली आणि *** गेली '
मामा सर्वात थोरले , दोन मुलीच . दोघींची लग्न झालेली... रात्रीचे अकरा वाजले असतील... मानसी आतल्या खोलीत मामी सोबत गप्पा मारत बसली होती. तर मी आणि मामा बाहेर अंगणात... सुपारीच खांड आडकीत्यात धरत हाताने दाब दीला तसं खट्ट कन त्याचे तुकडे झाले... एक तुकडा आपल्या तोंडात घेतला तर दुसरा माझ्या समोर धरत मामांनी पानांच्या स्टीलच्या चमकदार पेटीच तोंड उघडले...
" मी तुम्हाला थांबा म्हणून सांगितलं त्याला एक कारण होतं..." सूपारीच खांड चघळत मामा बोलू लागले...
" म्हणजे...? मला नाही समजल..." त्यांनी दिलेला तो सुपारीचा तुकडा अजुनही माझ्या हातात तसाच होता...
" नेहा ला बाहेरच्या वा-याची जाणीव होते...'' बोलतच मामांनी तोंडातील पानाची पिचकारी पाय-याच्या बाजूला तयार केलेल्या छोट्या बागेत मारली..
" बाहेरच वारं..? ते काय असतं..?" मला मात्र प्रश्न पडला होता.. तसं मामा सांगू लागले..
" ती लहान असतानाच आमची आई म्हणजे तीची आजी वारली... त्या नंतर काही दिवसातच तीला रात्री झोपेत कोणीतरी आपल शरिर जखडून ठेवल्यासारख होऊ लागलं... झोपेत कण्हायची.. दचकून उठायची.... आजीचा जिव होता तीच्यावर.. आमच्या आबांनी नेहा ला आजीच्या फोटो समोर नेलं आणि हात जोडत म्हणाले..
" पोर झरझरतीया.. आस करू नग, नात हाय तुझी''
आणी खरच काही दिवसांनी तीला होणारा त्रास बंद झाला.. पन एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहा रहायला आली होती... आज जीथ तुमची गाडी बंद पडली होती त्या ओढ्यावरच उताराला एक विहीर आहे, त्या विहिरीत साप विरूळा, हे खुप आहेत त्यामुळ कोणी त्या विहिरीत पोहायला जात नव्हत... पन ओढ्यावर धुण धुवायला मात्र सारं गाव जायचं... त्या दिवशी माझ्या दोन्ही लेकी आणि नेहा धुण धुवायला गेल्या होत्या... दुपार झालेली. गायी म्हशी जनावर पाण्यावर घेऊन आलेली माणसं आणी धुणं घेऊन आलेल्या बायकाही होत्या ओढ्यावर... नेहा ओढ्याच्या काठावर झाडांच्या सावलीत बसून उन्हान चमकणार पाणी बघत होती... तीला ते खुपचं छान वाटत होतं.. तोच ओढ्यावर बांधलेल्या छोट्या दगडी पुलावरच्या रस्त्याच्या मधोमध एक तरुण बाई तीला उभी दिसली.. तीनं नेसलेल पांढर जरद नऊवारी लुगडं दुपारच्या रणरणत्या उन्हात अधिकच उठून दिसत होत... हातात गडद्द हिरवा चुडा तीच्या नितळ गो-या अंगावर अधिकच खुलून दिसत होता... मोकळे सोडलेले केस जवळजवळ गुडघ्यापर्यंत लांब होते.. कपाळावर टपोर लाल भडक कुंकू तीच्या पांढ-या पडलेल्या चेहऱ्यावर अधिकच उठून दिसत होत... ती बाई ओढ्याच्या पाण्यात पहातच चालत पुढं येत होती... काठावर बसलेल्या नेहा ची नजर तिच्यावरच होती.. ती बाई जसजशी जवळ येऊ लागली तशी एक गोष्ट नेहाच्या लक्षात आली.. होरपळून जाणार वैशाख वणव्याच्या या रणरणत्या उन्हात जिथ लोक क्षणभर उभ रहातानाही सावली शोधायचे तीथ ती मात्र कच्या खडकाळ रस्त्यावरून अनवाणी पायाने चालत येत होती... नेहाची नजर आता त्या बाईवरच खिळली होती... ती बाई तीच्या पासून वीस एक पावलांवर असेल ती बाई अजुनही ओढ्याच्या खळखळणा-या पाण्यात पहात होती.. तोच तीने झटकन आपली मान फिरवत नेहाकड पाहील... मोठे डोळे करून आपल्यावर स्थिरावलेली तीची ती रखरखती नजर पाहून नेहाच्या अंगावर काटा उभा राहिला.. जसजशी ती बाई चालत नेहाच्या दिशेन येऊ लागली तशी नेहा आजुबाजुला लोकांना पाहू लागली. पन जो तो आपापल्या कामात गुंग झालेला... ... नेहा त्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत होती पन जसं तीच शरिर अपंगच झाल्यासारखं काहीच हालचाल होत नव्हती... वरून रखरखत्या उन्हाचा तडाखा आणी समोर ती विचित्र स्त्री जी आता तीच्या जवळ उभी होती....
'नेहा.. कुठ निघालीस ग.?'
माझ्या थोरल्या पोरीन ओढ्याच्या खळखळणा-या पाण्यातुन चालत निघालेल्या नेहाला विचारलं.. पन काही न बोलता ती तशीच पुढ चालु लागली.. मध्यानीच्या सुर्याची किरण ओढ्याच्या पाण्यातून तीच्या चेहऱ्यावर पडून चमकत होती... आता दोन्ही मुली नेहाला हाक मारू लागल्या तशी आजुबाजुला जनावरं पाण्यावर घेऊन आलेली लोकही तीच्या कडे पाहू लागले... ती विहिरीच्या कठड्यावर उभी राहिली तसे दोघे तीघे पुरूष तीला पकडायला धावले... तीनं एक नजर वळून मागे पाहिलं आणि झटकन पाण्यात उडी घेतली... "
" कोण होती ती बाई...?" मी मामांना विचारलं
" शामु देसायाची सुन. दोन दिवसांपासून बेपत्ता होती... सगळीकड शोधल पण सापडली नाही.. नेहाला विहिरीतून काढताना तीच पण प्रेत हाताला लागलं... तीनं त्या विहिरीत उडी मारून जिव दिलता... त्या नंतर नेहा ला तीनं वरीसभर तरास दिला..."
मामांच्या तोंडून त्या रात्री मला नेहाचा सुप्त गुण समजला... तीला आपल्या आजूबाजूला असणा-या असामान्य नैसर्गिक शक्तिची साध्या भाषेत सांगायचं तर भुत , प्रेत यांची जाणीव होते... आजही ती अशीच कुणाच्या तरी जाणीवेने उठली.. एखादा आत्मा , भुतं यांचा वावर आमच्या बेडरूम मध्ये आहे..? मला तर काहीच सुचेनास झालंय... कारण आता हे रोजच झालंय माझ्यासाठी... तस मी तीला समजून घेतो पण मला त्या दिवशी तीचा खूप राग आला... ती प्रेग्नेंट आहे ही good news मला मिळाली आणि आनंदाच्या भरात मी तीला म्हंटल
"मुलाच नाव 'वृषभ' ठेऊ.." तशी ती किंचीत रागावली...भुवया आकसतच मला म्हणाली
" मुलगी झाली तर....?"
मी तर क्लियर केलं,
''मला मुलगाच हवा... वंशाला दिवा पाहीजे ना..? एवढी प्राॅपर्टी काय जावायाच्या घशात घालायची...? मुलगा हा हवाच..''
आणी या गोष्टी वरून आमच्या मधे जवळजवळ रोजच भांडण व्हायच. एकदा तर मी तीच्यावर हात उचलला.... एवढ्यावरच थांबलो नाही तर तीच्या मुलीला पोटात संपवायला बरच काही केलं .. मी तरी काय करणार.. बाबांना नातुच हवा होता.... आणी मी आपल्या बाबांचा शब्द ओलांडू शकत नाही... एकदा जबरदस्तीने अॅबार्शन साठीही नेलं, चार पैसे तोंडावर फेकल्यावर डॉक्टरही तयार झाला... पण आमचा नंबर आलाच होता की त्या दवाखान्यावर पोलिसांनी धाड टाकली... झालं, दवाखान्याला कुलूप लागलं..... साला एक प्लान काम करत नव्हता. रोज एक दोन पेग दारू पिणारा मी आता आख्खी बाटली दारू पिऊ लागलो..... टेंशन , टेंशन साला निस्तं टेंशन....आणी ते टेंशन कमी करायला दारू... मुलीचा तिरस्कार करायच तसं कारण पण होतं.. म्हणजे काॅलेजचे ते दिवस आठवले की , मी आता एका मुलीचा बाप होणार आहे याचीच लाज वाटते...
गल्लीत कट्ट्यावर मित्रांसोबत बसायचो तेव्हा रस्त्यावरून एखादी मुलगी जाताना दिसली तर आम्ही तीच्या वर काय काय कमेंट करत होतो ते आमचं आम्हालाच माहीत आहे... तीच्या शरिराचा एक एक अवयव लाळ घोटत न्याहाळत असायचो... नजरेनच तीच्या अवयवांची साईझ सांगायचं.. काॅलेजमधे तर कहर केलेला... पैजा , मुली पटवाच्या पैजा.
त्यात आमच्या ग्रुपमधे मी दिसायलाही सगळ्यात स्मार्ट , स्टायलीश आणी वडील पैशान गब्बर. ढिग पैसा. मग काय पैज लाऊन मुली पटवण्यात माझा कोणी हात धरत नव्हत.. आणि पोरींना काय..? पैसा दिसला की म्हाता-यालाही भुलतात.... हे सगळं आठवलं की आता आपण एका मुलीचा बाप व्हायच...? छे...! आणी विचार केला, आता नेहालाच संपवायची... म्हणजे तीच्या पोटातली मुलगीही संपेलच.... आता तुम्ही विचार कराल की एकदा म्हणतो बायकोची काळजी वाटते आणी एकदा म्हणतो की तीला संपवायचा विचार करतोय म्हणजे याच चाललय तरी काय..? सगळ सांगतो... तर एकदा मेडिकल मधून विषाची बाटली आणली... आणी तीला संपवायचा प्लान केला.... त्या दिवशी रात्री तीच्या जेवणात विष कालवून मी बाहेर हाॅलमधे पुन्हा दारू पित बसलो.. सकाळी उठून पाहील.. घरात रडारड सुरू होती... लोक जामलेले.. आई धाय मोकलून रडत होती तर शेजारच्या महिला तीला सावरत होत्या.. डाविकड नजर गेली आणि .... नेहा....? ती तर अगदी ठणठणीत होती... नेमकं काय झालय हे समजायला वेळ नाही लागला...
तीला विष घालून मारायला आणलेली बाटली अजूनही बाथरूमच्या खिडकीत रिकामी होऊन पडलीये.... पण त्या रात्री नेहा मात्र जरा हुशारच निघली.... मला मात्र दारू नडली ....
मी आता तीला काही बोलत नाही. खरच पुरूष किती निष्ठूर असला तरी त्याच्या पत्नीच मन त्याच्यासाठी तुटत असतंच... मी तीला इतका त्रास दिला, शिविगाळ केली, मारहाण केली पण तरी आजही तीच्या डोळ्यात माझ्या साठी पाणी येतंय...बेडवर उजव्या कुशीवर पडूनच तीची नजर भिंतीवर अडकवलेल्या माझ्या हार घातलेल्या फोटोवर स्थिरावलीये... मी मात्र तीच्या मागे बेडवर पडूनच तीला पहातोय.. डोक्यात एवढाच विचार घुमतोय की तीला होणारे हे भास कधी कमी होणार...? कोणती अदृश्य शक्ती आहे जीची जाणिव तीला होतेय आणि ती अशी रात्री अपरात्री दचकून उठतेय.. राहून राहून मला याच गोष्टीची काळजी वाटतेय, काळजी वाटण्याच कारणही तसेच आहे, म्हणजे आता मीच तीच्या पोटी जन्म घेणार आहे, तीच्या मुलीच्या रूपात...
समाप्त.....