.
गुरुनाथला महत्वाच्या मिटींगसाठी लोणावळ्याला जायचे होते, मिटींगची वेळ
सकाळी १० वाजताची असलेमुळे त्याला रात्रीच लोणावळ्याला पोहोचने आवश्यक
होते, कंपनीचे चेअरमन व इतर वरीष्ट अधिकारी एव्हाना लोणावळ्याला पोहोचले
होते मात्र मिटींगमध्ये करावयाच्या प्रेजेंटेशनची तयारी करता करता
संध्याकाळ झाल्यामुळे गुरुनाथला घरी पोहोचायला वेळ झाला होता आणि त्याला
निघण्याची सर्व तयारी करुन लवकरात लवकर निघणे आवश्यक होते आणि गुरुनाथ
एकेक गोष्टी आठवुन बॅग भरत होता आणि निघण्याची तयारी करीत होता, त्याची
पत्नी सुप्रीया दोन दिवसांपुर्वी माहेरी गेलेली होती त्यामुळे सर्व तयारी
गुरुनाथलाच करावी लागत होती.
गुरुनाथ पुण्यात सुप्रीया व दोन वर्षाचा मुलगा प्रणीलसह रहात होता , तो
एका मल्टीनॅशनल कंपनीत मार्केटींग मॅनेजर होता आणि त्याला गलेलठ्ठ पगार
होता, कंपनीने त्याला वापरण्यासाठी स्वतंत्र कार दिलेली होती ,फ्लॅट
मात्र त्याने स्वतः विकत घेतलेला होता आणि कामात झोकुन देण्याचा त्याचा
स्वभाव असलेमुळे कंपनीतील मार्केटींग विभागाचा आलेख चढता होता, त्याचा
शिस्तप्रिय स्वभाव व कामात झोकुन देण्याची वृत्ती यामुळे तो अल्पवधीतच
उच्च पदावर पोहोचला होता.
गुरुनाथने कारमध्ये बॅग टाकली व त्याने पार्कींगलॉटमधुन कार काढली आणि तो
लोणावळ्याला जाण्यासाठी एकटाच निघाला, आज नेमका ड्रायव्हर काही घरगुती
कारणामुळे त्याच्यासोबत आलेला नव्हता आणि त्यामुळे गुरुनाथ कार ड्राइव्ह
करीत एकटाच लोणावळ्याला निघाला होता, त्याची कार लोणावळ्याकडे वेगाने पळत
होती, आणि त्याच्या मनात त्याही पेक्षा वेगाने उद्याच्या मिटींगमधील
कामकाजाबद्दल विचार चालु होते त्याने टोलनाका पार केला आणि तो एक्सप्रेस
वे वरुन लोणावळ्याकडे निघाला, काही किलोमिटर अंतर पार केल्यावर
एक्सप्रेसवेवर एक कार रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली व त्या कारजवळच
उभी असलेली एक तरुणी लिफ्टसाठी इशारा करीत होती, गुरुनाथने कारचा वेग कमी
केला व थोडे पुढे जावुन कार उभी केली , ती तरुणी कारकडे पळत आली ,
गुरुनाथने डाव्या बाजुची काच खाली केली त्याचवेळी ती तरुणी विनंती करु
लागली की तिची कार अचानक बंद पडली आहे व कार चालु होण्याची काहीही
शक्यता नसलेमुळे तिला लिफ्ट हवी होती, गुरुनाथने अधिक विचार न करता तिला
कारमध्ये बसावयास सांगीतले व तो निघाला, काही क्षण दोघेही एकमेकांची
काहीही बोलले नाहीत, गुरुनाथ मात्र हळुच चोरुन तिच्याकडे पाहात होता, ती
तरुणी होतीच तशी, ती २०-२२ वर्षाची असावी, तिचा पेहराव, तिने मोकळे
सोडलेले केस, तिची गोरीपान कांती , ती अगदी एखाद्या मॉडेल सारखी दिसत
होती आणि तो विचारात पडला की इतक्या रात्री ती एकटीच कशी काय प्रवास करीत
होती, सोबत कोणीही कसेकाय नाही आणि त्याच्या विचाराला खंडीत करीत ती
तरुणीच मंजुळ आवाजात बोलली, '' तुम्ही मुंबईला जाताय का ? '' गुरुनाथने
झटक्यात उत्तर दिले '' नाही हो , मी लोणावळ्याला जातोय, उद्या मिटींग
आहे, लॉजवर सुट बुक केलेला आहे " ती लगेच उत्तरली " हो का, मलाही
लोणावळ्यालाच जायचे होते, कार बंद पडली नसती तर एव्हाना मी घरी पोहोचलेही
असते '' गुरुनाथनेही मान डोलावली व तो आता काय बोलावे या विचारात पडला,
लोणावळा अजुन २५-३० किलेमिटर दुर होते आणि अर्ध्या तासात ते लोणावळ्याला
पोहोचणार होते.
एक्सप्रेसवे वरुन डाव्या बाजुने कार वळवुन गुरुनाथ लोणावळ्याच्या
रस्त्याला लागला, काही वेळातच एका ठिकाणी थांबायला सांगुन ती तरुणी
म्हणाली " तुम्ही मला येथेच ड्रॉप करा, माझे घर जवळच आहे मी जाते आणि हो
लिफ्ट देवुन मला मदत केल्याबद्दल थॅंक्स '' गुरुनाथला तिचा सहवास संपणार
म्हणुन रुखरुख लागुन राहीली होती, व खरेतर त्याला तिचा सहवास आणखी हवा
होता म्हणुन तो तिला म्हणाला " अहो इतक्या रात्री इथे काय उतरताय मी
तुम्हाला घरासमोर नेवुन सोडतो ना " आणि तो नको नको म्हणत असताना
गुरुनाथने कार तिच्या घराकडे वळवली आणि तिने दाखवलेल्या रस्त्यावरुन तो
कार पुढे घेवु लागला, अधुनमधुन तो तिरका कटाक्ष टाकुन तिच्याकडे बघत होता
पण तिच्या लक्षात येणार नाही याचीही काळजी घेत होता, काही वेळाने दाट
झाडी लागली, आणि वळणावळणाचा रस्ता सुरु झाला, गुरुनाथबराच वेळ कार चालवत
होता आणि दाट झाडांच्या आत जेथे एखाददुसरा बंगला दिसायचा आणि एका
बंगल्यासमोर तिने त्याला थांबायला सांगीतले, तो एक जुनाट बंगला होता,
बंगल्याच्या दुतर्फा झाडी होती, बंगल्याला मोठे नक्षीदार आणि जुने गेट
होते त्यानंतर बरेच मोकळे पटांगण आणि मग टुमदार बंगला उभा होता, ती सोबत
होती म्हणुन त्याला फारसे काही वाटले नाही परंतु एकंदरीत तो बंगला व
त्याच्या आजुबाजुचा परीसर भयाण वाटत होता, त्याने कारचा हॉर्न वाजवला
आणि बंगल्याचा वॉचमन पळत आला त्याने गेट उघडले आणि ती तरुणी कारमधुन खाली
उतरली, आता परत ती आपल्याला दिसणार नाही म्हणुन गुरुनाथ मनातुन थोडासा
खट्टु झाला होता पण त्याने अधिक विचार न करता गेटमधुन कार आत घेतली व ती
वळवुन तो परत निघणार होता त्याचवेळी ती म्हणाली '' अहो रात्र बरीच झाली
आहे आणि इतक्या रात्री जाण्यापेक्षा तुम्ही आजची रात्र इथेच थांबा आणि
सकाळी उठुन तुमच्या लॉजवर जा '' गुरुनाथलाही तेच पाहीजे होते, त्याने
फारसे आढेवेढे न घेता रात्रभर तिच्या बंगल्यात राहण्याचे कबुल केले व
गाडी पार्क करुन वॉचमनला बॅग आत घ्यायला सांगुन तो तिच्यासोबत बंगल्याकडे
निघाला, मानातुन तो खुप आनंदुन गेला होता पण चेह-यावर त्याने तसे भांव
येवु दिले नाहीत, गुरुनाथ उद्याची मिटींग पुरती विसरुन गेला होता.
वॉचमनने दार उघडले, दोघांनीही आत प्रवेश केला, ते हॉलमध्ये आले , हॉल
आकर्षकरित्या सजवलेला होता, हॉलच्या फरश्या चकाचक होत्या, राजेशाही
पध्दतीचा सोफा, पॉलीश केलेल्या लाकडी खुर्च्या , बंगल्यात टांगलेले
किंमती झुंबर, जुन्या वळणाचे लाईटस, हॉलमधुनच दुस-या मजल्यावर जाण्यासाठी
सागवानी पाय-या, पाय-याला गुळगुळीत झालेले सागवानी कठडे, पाय-याच्या
मधोमध टाकलेला लाल रंगाचा पट्टीदार गालीचा, हॉलमध्ये मधोमध टाकलेला सुंदर
नक्षीदार गालीचा हे सर्व पाहुन राजकन्येसारखी दिसणारी ती तरुणी या
राजवाड्यासारख्या घरात राहते हे गुरुनाथला खुप आनंद झाला, त्यानंतर
वॉचमनने दोघांना प्यायला पाणी आणुन दिले व त्यानंतर काही वेळ दोघेही
गप्पा मारत बसले, हॉलच्या खिडक्या उघड्या होत्या त्यातुन थंडगार हवा येत
होती आणि या गप्पा आणि तिचा सहवास संपुच नये असे गुरुनाथला वाटत होते,
तिने गुरुनाथले सांगीतले, किचनमध्ये फ्रिज आहे, बाजुला रॅकमध्ये वाईन
आहे, आत थंड पाणी आहे, बर्फ आहे तुम्हाला काय हवे ते घ्या मी वर झोपायला
जाते, तुम्ही हॉलमध्ये झोपा किंवा इथेच स्वतंत्र रुम आहे तेथे झोपा,
सकाळी मी तुम्हाला लवकर उठविन आणि ती जायला निघाली, गुरुनाथने एकदम तिचा
हात हातात घेतला आणि तिला आणखी थोडा वेळ बसण्याचा आग्रह केला, त्याच्या
डोळ्यातील वासनेचे भाव पाहुन ती एकदम चमकली पण चेह-यावर तसे भाव येवु न
देता तिने आपला हात सोडवला व बेडरुमकडे जायला निघाली, अचानक हात धरुनही
ती चिडली नाही म्हणुन गुरुनाथही मनातुन आनंदला त्यावेळी ती पाय-या चढत
होती, पाय-या चढत असताना पाठीमागुन दिसणा-या तिच्या कमनीय देहाकडे पाहात
असताना गुरुनाथ नव्या स्वप्नात गढुन गेला होता.
ती बेडरुमकडे निघुन गेल्यानंतर गुरुनाथने कपडे बदलले, आणि त्याचे पाय
किचनकडे वळले, त्याने रॅकमधुन वाईनची बाटली काढली , फ्रिजमधुन थंड पाणी
आणि बर्फ घेतला आणि एक लार्ज पेग बनवला आणि खाण्यासाठी काही मिळते का ते
शोधु लागला परंतु न मिळाल्यामुळे पेग हातात घेवुन तो हॉलमध्ये येवुन
बसला, त्याला तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते आणि तिच्या विचारात
दंग होवुन त्याने एकामागुन एक दोन पेग संपवले आणि काही वेळे तिथेच बसुन
राहीला , आता त्याला वाईन ब-यापैकी चढली होती परंतु तिच्या विचाराने
त्याल झोप येत नव्हती, त्याच्या मनात विचारांचे काहुर माजले होते, वर
जावुन तिला एकदा भेटावे आणि परत तिचा मुलायम हात हातात घ्यावा, तिला कवेत
घ्यावे असे त्याला तिव्रतेने वाटु लागले होते, तिचा तो कमनीय देह आठवुन
तो वेडावला होता, त्याच्या मनात वासनेचे काहुर माजले होते, त्याक्षणी तो
त्याची पत्नी सुप्रीया, मुलगा प्रणिल, उद्याची महत्वाची मिटींग हे
सारेकाही विसरुन गेला होता आणि त्या विचारातच तो ताडकन उठला आणि पाय-या
चढु लागला, पाय-या चढुन तो तिच्या बेडरुम समोर आला आणि त्याने
दरवाज्याच्या फटीतुन तिला पाहण्याचा केविलवाना प्रयत्न चालवला होता आणि
त्याचक्षणी एकदम दार उघडले, गुरुनाथ धडपडुन पुढे आपटला, त्याच्या नाकाला
मार लागला , नाकातुन रक्त येवु लागले आणि डोक्यातुन एक वेदनेची कळ
उमटली, त्याही परीस्थीतीत त्याने वर मान करुन बेडकडे बघीतले आणि त्या
तरुणीकडे पाहताच त्याला दरदरुन घाम सुटला, तिचा एकंदरीत अवतार पाहुन तो
गर्भगळीत झाला, त्याचा श्वास घशातच अडकला, त्याला उठुन उभे राहण्याचेही
कळेना, तो इतका घाबरला की त्याच्या तोंडातुन एकही शब्द फुटत नव्हता,
त्याला थोड्या वेळापुर्वी भेटलेली, ती सुंदर तरुणी आता फारच भेसुर दिसत
होती, तिचा चेहरा इतका विद्रुप दिसत होता की त्याला भितीने काहीच सुचत
नव्हते, तिच्या अंगावर पांढरा गाउन होता, तिच्या डोळ्यातुन रक्त येत
होते, तिचे दोन्ही सुळे बाहेर आलेले होते, तिच्या उजव्या हातात कु-हाड
होती, तिचे भेसुर आणि लालबुंद झालेले डोळे तिने त्याच्यावर रोखले होते
आणि त्याच वेळी बंगल्याच्या बाहेर जंगलातुन चित्रविचीत्र आवाज ऐकु येवु
लागले, कोल्हेकुई, कुत्र्यांचे केकाटने, मधेच घुबडाचे आवाज, त्यात भरीस
भर म्हणुन वा-याचा सुं-सुं आवाज, वा-यामुळे खिडक्यांचे आवाज आणि यामुळे
तेथील वातावरणच भेसुर होवुन गेले होते, त्या तरुणीने गडगडाटी हास्य केले
आणि तिने त्याच्याकडे एकेक पाउल पुढे टाकत ती भेसुर आवाजात बोलु लागली, "
तुही त्यातलाच, वासनेचा किडा, तुमच्यासारख्या लोकांना वासनेशिवाय काहीही
दिसत नाही, तुमच्या डोक्यात एकदा वासना शिरली की तुम्ही सारकाही विसरता,
बायको, पोरं, नितीमत्ता सारकाही विसरता, ते तिन नराधमही त्या दिवशी
सारंकाही विसरले, त्या दिवशी एक्सप्रेसवेवर माझी गाडी खरोखरच खराब झाली
होती, मी हात दाखवुन त्यांची गाडी थांबवली मला त्यांनी त्या दिवशी अशीच
लिफ्ट दिली आणि बळजबरीने त्यांच्या या बंगल्यावर घेवुन आले आणि माझ्यावर
अत्याचार करुन त्यांनी मला मारुन टाकले आणि जंगलात पुरुन टाकले, हा
बंगलाही त्यांचाच पण आज तिघेही या जगात नाहीत, हा सुडाचा प्रवास असाच
चालु राहणार आहे, तु जर चांगला वागला असतास तर मी तुला काहीही केले नसते,
तु सकाळी जावु शकला असतास पण तुही तसाच निघालास ,वासनांध माणसां तुलाही
जगण्याचा काहीही अधिकार नाही, " आणि असे म्हणत तिने डाव्या हाताने
गुरुनाथच्या गळ्याला पकडुन त्याला वर उचलले आणि ती एकेक पाय-या उतरु
लागली, या सर्व प्रकारामुळे गुरुनाथ पुरता हादरुन गेला होता, आता पुढे
काय होणार या विचाराने आपण हिच्या तावडीतुन सुटु शकु का ? या विचारांचे
काहुर त्याच्या मनात माजले होते आणि तेवढ्यात सर्व शक्ती एकवटुन त्याने
तिच्या हाताला जोराचा झटका दिला आणि आपली सुटका करुन घेतली आणि तो वेगाने
दरवाज्याकडे पळाला, तिने परत गडगडाटी हास्य केले आणि ती एकेक पाउल टाकत
त्याच्या दिशेने निघाली.
गुरुनाथने अखेर दरवाजा उघडला आणि तो त्वरेने बाहेर पळाला, बाहेर किर्र
अंधार होता, वॉचमन कुठेच दिसत नव्हता, तो अंदाजानेच कारच्या दिशेने पळाला
पण कारजवळ जावुनही काही उपयोग नव्हता कारण कारची चावी आत अडकली होती आणि
ती दारात उभी होती, वेळ न दडवता तो गेटकडे पळाला पण गेटही लावलेले होते
त्यामुळे तो गेटलाही धडकला पण तरीही सर्व शक्ती एकवटुन तो गेटवर चढला आणि
उडी मारुन तो रस्त्याकडे पळाला, गुरुनाथ आता पळत पळत मुख्य रस्त्यावर
आला होता , तो शरीराने आणि मनाने पुरता हादरुन गेला होता आणि त्याचवेळी
त्याला मागुन एक कार येताना दिसली त्याने हात केला , कार थांबली , कारचा
दरवाजा उघडला आणि तो पटकन आत शिरला आणि त्याने दरवाजा लावुन घेतला, कार
निघाली आता त्याच्या जिवात जिव आला होता, तिच्या तावडीतुन त्याची सुटका
झाली होती, त्याने आभार मानण्यासाठी कारच्या ड्रायव्हरकडे पाहीले आणि
त्याच्याकडे पाहताच त्याच्या छातीत जोराची कळ उठली, सारे अंग घामाने
डबडबले कारण ती तरुणीच गाडी चालवत होती...पुढे कितीतरी वेळ गुरुनाथ
मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होता, पण किर्र अंधा-या रात्री कोणीही
त्याच्या मदतीसाठी आले नाही.
दुस-या दिवशी त्याच रस्त्यावर कार उभी होती, कारचे दरवाजे सताड उघडे
होते, कारमध्ये छिन्नविछीन्न अवस्थेत गुरुनाथचा मृतदेह पडला होता,तेथे
गर्दी जमली होती, पोलीस पंचनामा करीत होते, लोक हळहळ व्यक्त करीत होते
त्याचवेळी कारजवळुच ती तरुणी परत हायवेकडे निघाली होती...नव्या
वासनांधाकडे परत लिफ्ट मागायला.......हा सुडाचा प्रवास असाच चालु राहणार
होता....