गर्भवती भाग 1
लेखन अनुया सावंत हुद्दार
“लै दिस झाले नुसतं इकडं तिकडं फिरून, मी काय म्हणते याच गावात बस्तान बसवूया कमाई पण छान होते आहे”, डोंबाऱ्याच्या बायकोने आंबाच्या झाडाखाली विसावत आपल्या नवऱ्याला बोलली.
“हो ग म्या बी हाच विचार करत होतो”, नवरा बोलला.
“त्या अदुगर पोराचं बघा. ५ वर्षे झालीत अजून पाळणा हलना”, शेजारून म्हातारी तंबाखू चोळत बोलली.
म्हातारीचा बोलण पूर्ण होत न होत तेवढ्यात वरून एक पिकलेला आंबा त्या डोंबाऱ्याच्या बायकोच्या ओटीत पडला.
“देवाचा प्रसाद हाय यो म्हातारी बोलली आणि आंबा पडला. तु खा एकटी तो, माय खंडोबा येईल मग जन्माला” डोंबारी बोलला.
मग त्याच्या बायकोने तो आंबा खाल्ला आणि काय आश्चर्य काही दिवसातच तिला दिवस राहिले आणि गावात याची खूप चर्चा झाली. झाले मग गावातल्या ज्या कोणी गर्भवती होत नव्हत्या त्यांनी त्या झाडाचे आंबे खायला सुरवात केली एवढंच काय तर शेजारच्या पाजराच्या गावातून पण बायकांची रीघ लागली.
बघता बघता ते झाड म्हणजे सेलिब्रिटी होऊन गेलं TV वर पण त्याच्या बातम्या आल्या. पण या सगळ्या प्रकारात नाराज होता तो त्या गावातील भोंदू मांत्रिक शंकर कारण या झाडामुळे त्याचा धंदा बसला होता.
म्हणून एक दिवस रात्री सगळं सामसूम झाल्यावर तो त्या झाडाकडे गेला आणि त्या झाडाला खूप शिव्या घातल्या. मग शिव्या घालून घालून तो तिथेच झोपून गेला. मध्यरात्री त्याला अचानक जग आली बघतो तर काय त्याच्या अंगावर सगळं रक्त पडलं होतं. तो घाबरून गेला आणि झाडाकडे बघितलं तर त्याला आंब्यांच्या जागी रक्ताळलेली नवजात अर्भक दिसू लागली. आता मात्र तो खूप घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला आणि त्याच्या घरी आला.
भोंदू असला तरी त्याने अघोरी विद्येचा अभ्यास अर्धा मुर्धा का होईना केला होता तेव्हा उद्या सकाळी यावर आपण अधिक जाणून घेऊ म्हणून तो तसाच झोपी जातो.
सकाळी उठल्यावर त्याने स्नानदीक आटपले आणि जुन्या पोतडीतून त्याची जुनी टिपण वही बाहेर काढली ज्यात त्याने बऱ्याच अघोरी विद्या लिहिल्या होत्या. तेवढ्यात बाहेर टकटक झाली.
“कोण आहे या आत”, शंकर ने बाहेरील व्यक्तीस आत बोलावले.
तसा सोसाट्याचा वारा आत आला घरातल्या वस्तू सगळ्या इकडे तिकडे फेकल्या गेल्या आणि त्यासोबत आला एक आवाज “माझ्या रस्त्यात येऊ नकोस नाहीतर जिता सोडणार नाई”.
शंकर खूप घाबरला त्याने ती टिपणवही पुन्हा त्या पोतडीत बांधून ठेवली.काही वेळातच त्याचा सहकारी तिथे आला आणि घराची अवस्था बघून तो पण भेदरला आणि बोलला “शंकरशेठ ह्यो काय पसारा मांडलाय तुम्ही सकाळी रात्रीची जास्त झाली वाटतं”
“नाही नरसु मी नाय हे केल आईशप्पथ”, शंकर बोलला मग त्याने रात्रीपासून घडलेलं सगळं नरसु ला सांगितलं
नरसु पण घाबरला आणि बोलला मालक आपण काही दिवस माझ्या मामाच्या गावाला जाऊया तिथे जाऊन बरं वाटेल तुम्हाला. म्या सुट्टीचा सांगायला आलतु पण हे वंगाळ बघून तुम्हालाबी नेईन म्हणतो.
मग ते दोघेजण नरसुच्या मामाकडे जायला निघतात. चांगले 10 दिवस ते तिकडे राहण्याचं ठरवतात तसही मामाच्या मुलीचं लग्न असत त्यामुळे त्यांना आयतीच राहायची संधी मिळते. शंकरच मन मात्र अजूनही त्या आंब्याच्या झाडाचं आणि त्या आवाजाच विचार करत असत.
मग तो आणि नरसु लग्नघरी लागणाऱ्या तयारीत जुंपतात. बघता बघता लग्न दिवस उजाडतो नरसु आणि सहकार लवकरच तयार होतात. सगळी उरलेली काम ते दोघे उरकतात अजून थोडा वेळ शिल्लक असतो वरात यायला तेव्हा नरसु शंकर ला त्याच्या खोलीत जाऊन आराम करायला सांगतो. शंकर मग त्यांच्या खोलीत जातो. तो आराम।करायला डोळे मिटतो तेव्हा त्याला पुन्हा ते झाड दिसते आणि मग परत तो त्याची पोतडी बाहेर काढतो. जशी तो पोतडी बाहेर काढतो तशी एक बाई खाडकन दरवाजा उघडून आत येते आणि शंकरची मानगूट पकडते आणि बोलते “ सांगितलं होतं ना म्या माझ्या रस्त्यात यायचं नाही म्हणून आणि ती गळ्याचा फास आवळते शंकर हात जोडून डोळ्यानेच तिला अस करणार नाही असं विनावतो. “तू असा माननार न्हाईस दाव तुझी वही” अस बोलून ती बाई ती वही तिच्या हातावर घेते आणि डोळ्यांनी आग ओकून त्या वहिला जाळून टाकते. आणि तणतणत त्या रूममधून निघून जाते. शंकर ला आता दरदरून घाम फुटतो आणि मनातच तो विचार करतो आज वाचलो पण पुन्हा त्या झाडाच्या आणि त्या बयेच्या तावडीत येणार नाही काहीतरी वेगळा व्यवसाय करेन पण परत ती विद्या वापरायला जाणार नाही. स्वतःला शंकर मग सावरतो आणि खाली लग्न मंडपात येतो पण नवरी मुलीच्या शेजारी उभी असलेल्या बाईला पाहून त्याला तिथेच चक्कर येते कारण ती तीच बाई असते जिने त्याची मानगूट काही वेळापूर्वी धरलेली असते. नरसु आणि आजूबाजूचे लोक त्याला शुद्दीवर आणतात. माणसं पांगल्यावर तो नरसु ला सगळं सांगतो. पण नरसु बोलतो “अरे असं कसं बोलतंयसा? म्या बागतुय हिला मागल्या 1 तासापासून हि मेकअप करतीया चिंगीचा मंग कशी येईल ती तुमच्याकडं?”.
“खरंय तुझं ती नसेल आली पण तीच रूप घेऊन ती अवदसा आली होती. तीच रूप आणि डाव मी ओळखू नये म्हणून ती मला सारखी त्रास देतेय त्यामुळे मी आता काही काही परत तिच्या वाटेल जाणार नाही. लै बेकार प्रकरण आहे” शंकर बोलला.
त्यानंतर शंकर गावातल्या शाळेत शिपाई म्हणून रुजू होतो तर नरसु शेतमजूर म्हणून काम करू लागतो.
अशेच बरेच दिवस निघून जातात अचानक मग एक दिवशी गावात खबर फिरते की गावातल्या पोटूश्या बायकांच्या पोटात दुखू लागलय. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या झाडाचा आंबा खाल्ला होता फक्त त्याच गर्भवती बायकांना हा त्रास होत होता.
शंकर ही खबर एकूण घाबरतो त्याला ती रात्र आठवते जेव्हा त्याने झाडावर रक्ताळलेली अर्भक पाहिलेली असतात. तो मनात बोलतो आता ही बया काय कोणाला सोडणार नाही. पण तरीही एक निष्फळ प्रयत्न करूयात म्हणून तो रात्री पुन्हा त्या झाडाकडे जायचं ठरवतो.
क्रमशः