प्रेमळ भूत
मला रात्री शांततेत काम करायला आवडतं. साधरण 3 वाजता झोपण्यापूर्वी मी अंघोळीला गेलो. एका बेडरूममध्ये बायको झोपली होती. दुसरा बेडरूम बंद होता. घरात कोणीच नव्हते. दोन रूम असल्यातरी टॉयलेट बाथरूम एकच आहे. तेही हॉल व कीचनला जोडणार्या पॅसेजमध्ये!
आम्ही पहिल्या मजल्यावर राहतो आणि आमच्या डोक्यावर प्रचंड चिल्लीपिल्ली असणारी बिहारी 2 कुटुंब एकाच घरात राहतात.
शॉवर वगैरे चालू केला तर बाथरूमच्या खिडकीतून वरून कुजबुज आवाज आला. कुजबुज कारण शॉवरच्या पाण्याचा आवाज! सर्वांच्या बाथरूम खिडक्या इमारतीच्या मधल्या पोकळीत उघडतात. त्यामुळे आवाज घुमतोही.
मी वैतागून मनात म्हटलं साले हे बिहारी रात्री पण कटकट करतात. मला टॉयलेट बाथरूममध्ये असा डिस्टरबन्स आवडत नाही. दुसऱ्या मजल्यावरची कुजबुज पहिल्या मजल्यावरच्या खिडकीबाहेरून आल्याचे जाणवले. आवाजाची बदलली दिशा मला जाणवली.. म्हणून लांबलचक बाथरूममध्ये मी सेफ साईड नजर टाकली. (म्हटलं च्यायला नागव्याने मरायला नको) ऑल ओके होते. आणि भास असेल असे समजून मी नळाखाली चुळ भरण्यासाठी ओंजळ धरून वाकलो. तर माझ्या कानामागून 'श्रीनिवास' असा प्रेमळ आवाज आला.( बहुतेक स्त्रीचा) मला वाटलं बायकोने हाक मारली असेल, म्हणून मी ही तिला प्रश्नार्थक हाक दिली. तर काहीच रिप्लाय नाही. मग मी आधी टॉवेल गुंडाळून मला काही शंका आलीच नाही असे भासवून विजेच्या वेगाने थेट माझ्या बेडरूममध्ये घुसलो. ना मागे वळून पाहिले, ना बाथरूमचा लाईट बंद केला. अजूनही मी मला काही भास झालाच नाही असेच भासवत सुम बायकोच्या बाजूला बेडवर एका अंगावर पडुन मोबाईल सुरू केला. आता हा भास कसा? झोप अनावर झालेली तर तसेही नाही. ना कुठला भुताचा विचार मनात होता... तरी हा भास मानून तो विसरायला फेसबुकवर कमेंट वगैरेत मन रमवलं. जरा धीर आलेला. बायकोकडे पाठ होती. तिने झोपेतच बहुदा प्रेमाने खांद्यापासून कमरेपर्यंत सलग हात फिरवला. मला पण जरा धीर वाटला म्हणून मी लगेच कुस बदलली तर तीही माझ्याकडे पाठ करून गाढ झोपलेली. आणि असे ३६ आकड्यात झोपून हात असा फिरुच शकत नाही. फुल्ल हवा टाइट. पण पुन्हा मी तसे भासवले नाही म्हणजे भुताला कळलं नाही पाहिजे की आपल्याला कळलंय ते की तो असल्याचे कळलंय
सकाळी हे 'प्रेमळ भूत' कोण असा प्रश्न डोक्यात होताच. फेसबुकवर ब्लॉक केलेली एक्स बैंमाणसं शोधली. सर्व जीवन्तच होत्या. नंतरचा महिनाभर तरी सामान्य माणसासारखा वेळेवर झोपलो.