Urban Horror Legends -Bhutkatha.Horror |
मुंबईचा दक्षिण पूर्व किनारा हा दक्षिण मुंबईत मोडत नाही, इतका तो वेगळा भासतो. थोडा बकाल, थोडा सुंदर पण साकल्याने गूढ असा हा भाग. मुळात मुंबई हीच सात बेटांना जोडून बनवलेली नगरी त्यामुळे प्रत्येक भूभाग थोडा वेगळाच. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परेल, वरळी, आणि माहीम ही ती सात बेटं. मुंबईच्या बेटांना जोडून जो पूर्व किनारा तयार झाला त्यातलं मुकेश मिल्स आपण मागे बघितलं. तिथून थोडं वर सरकल की लागतं माझगाव. माझगाव ही मुंबईची प्रसिद्ध गोदी. डॉक म्हणजे माझगाव असं एकरूप झालेला हा एरिया. याच्या आधी भारतीय नौदलाचा तळ आहे. यलो गेट, लायन्स गेट असे प्रभाग आहेत. माझगावची गोदी आणि आसपासच्या गोद्या या प्रामुख्याने बॉम्बे (आता मुंबई पोर्ट ट्रस्ट) या सरकारी स्वायत्त संस्थेकडून सांभाळल्या जातात. भायखळ्याच्या पलीकडे वसलेला माझगाव हा तसा शांत विभाग. इथ एक छोटी चिनी वसाहत ही आहे म्हणे. अत्यंत देखणी. इथून पुढे रे रोड, वाडी बंदर, वडाळा अशी ही मुंबईची सु किंवा कु प्रसिद्ध हार्बर (बंदर) लाईन. अरबी समुद्र या चिंचोळ्या जागेत खाडी रूपानं घुसल्याने च मुंबई एक नैसर्गिक बंदर म्हणून घडत गेलं.
Urban Horror Legends -Bhutkatha.Horror |
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी या भागात वसाहती आहेत. आणि वर्षानुवर्षे या वसाहती किंवा आसपासच्या लोकांकडे दडलेले आहेत अनेक अंगावर काटा आणणारे अनुभव, अनेक दंतकथा. मुळात इतर मुंबई पेक्षा हार्बर मुंबई ही गुणात्मक, भौगोलिक दृष्ट्या वेगळीच आहे. इथला किनारा हा सुंदर असला तरी मालवाहू जहाज, ट्रक्स यांची ये जा आणि खलाशी, मजूर अशा जनतेमुळे थोडा राकट आहे. या भागातून पोर्ट ट्रस्टच्या मालकीचा एक खाजगी रस्ता जातो. फ्रीवे होण्याआधी, भायखळा, परेलची गर्दी टाळायची असेल तर हा रस्ता उत्तम पर्याय समजला जायचा. पण.... थोडक्या बहाद्दर वाहन चालकांसाठी. कारण हा रस्ता इतक्या निर्मनुष्य आणि धडकी भरणाऱ्या काळोख्या प्रदेशातून जातो. त्यात दूरवर दिसणारी गोदाम, निश्चल उभी मालवाहू इंजिन, अंधारातून निघणारे अंधारातच गडप होणारे रेल्वेचे रूळ, आजूबाजूला क्वचित दिसणारं एखादं वाहन.........आणि जर नशीब वाईट असेल तर...... मध्येच उभी असलेली श्वेत वस्त्रा पिशाचीणी......केस मोकळे सोडलेली. अशी भयावह स्त्री इथ मध्यरात्री सर्रास दिसते आणि वाहन थांबलं नाही तरी ती वाहनाला समांतर पळत राहते म्हणे. अर्थात असे अनुभव इतर हमरस्त्यावर ही सर्रास येतात हे सर्वश्रुत आहे. पण पोर्ट ट्रस्टच्या या जुन्या रस्त्यावर अजून ही अनेक प्रकारच्या भुताटक्या अनुभवायला येतात. कधी लहान मूल हातात घेऊन उभी असलेली स्त्री, तर कधी किंचाळत धावणारी तरुणी... त्यामुळेच रात्री सात आठ नंतर हा रस्ता घेणारे वाहन चालक खूपच कमी. फ्रीवे झाल्यानंतर जणू ही पिशाच्च बेघर झाली असावीत. न जाणो कुठं भटकत असतील.
बाकी मुंबईचा दक्षिण पूर्व किनारा हा माल वाहतूक आणि त्या अनुषंगाने होणारी लूट मार, गुन्हेगारी या मुळे ही कुख्यात आहेच म्हणा. पण या सर्व किनाऱ्यावर एका अतिशय दुर्दैवी, हृदय विदारक घटनेची अशुभ सावली पडली आहे हे आज खूप कमी लोक जाणतात.
साल १९४४. भारत स्वतंत्र व्हायला अजून काही वर्ष बाकी होती. दुसरं महायुद्ध सुरू होतं. एप्रिल १४ चा तो दुष्ट दिवस SS Stikine नावाचं मालवाहू जहाज, मुंबई गोदीत लागलं होतं. जहाजात सोनं, कापसाचे तागे असा माल होता. दुपारी २ च्या सुमारास जहाजात आग लागल्याचं निदर्शनास आलं. ताबडतोब धावपळ सुरू झाली कारण इतर मालाबरोबरच जहाजात होता.... प्रचंड दारूगोळा. युद्धासाठी रसद. पण नियतीच्या मनात क्रूर खेळ रचायचाच होता. जहाजात आग कुठ लागलीय ते धुरामुळे कळत नव्हत आणि आग थंड करायला टाकलेलं पाणी मात्र उकळू लागलं होतं. शेवटी दुपारी ४ च्या आसपास जहाज रिकाम करण्याची ऑर्डर आली आणि पुढच्या पंधरा मिनिटात कानठळ्या बसवणारा स्फोट होत जहाजाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर पुढच्या काही मिनिटात दुसरा महाप्रचंड स्फोट झाला. हे इतके शक्तिशाली विस्फोट होते की १७०० की.मी. दूर शिमला इथ हादरे बसले. विचार करा मुंबईत काय घडल असेल. जहाजात असलेले कापसाचे तागे, गोणी एखाद्या तोफगोळा सारख्या दूरवर उडून पडल्या. दोन किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला आणि दक्षिण पूर्व किनारा वाताहत झाला. इमारती, झोपडपट्ट्या काही ही उरलं नाही. लोक सैरावैरा पळत सुटले. ब्रिटिश सरकार तर हादरून गेलं पण महायुद्धाच्या धबडग्यात ही बातमी दाबली गेली. असं म्हणतात जवळपास १५०० लोक मारले गेले. ६६ अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आग विझवण्याचा प्रयत्न करत होते ते दुसऱ्या स्फोटात जागीच खाक झाले. बंदरातील आजूबाजूची ११ जहाजे त्या उत्पातामध्ये बुडली. अर्धी मुंबई नष्ट झाली.... पण शेवटी मुंबईच ती ..जिद्दीनं परत उठली. इतकी की आता या दुर्घटने बद्दल कुणी बोलत नाही, कुणाला आठवण ही नाही.
मात्र, त्या दक्षिण पूर्व किनाऱ्याला, त्या ओसाड गोदिंना, त्या भयाण, बकाल अंधाराला सर्व सर्व आठवत असावं. कारण तो कालातीत आहे. हवं तर बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या, अणुशक्ती नगरच्या, माजगावच्या रहिवाशांना विचारा. त्यांच्याकडे असे अर्बन हॉरर लेजेंडस भरपूर असतील.