समय-ती एक अनाहूत वेळ..!(भाग २)
आता ती जरा बुचकळ्यात पडली होती..तेवढ्यात डब्यातले लाईट गेले आणि ट्रेन थांबण्याचा आवाज आला..ती बॅग मधे मोबाईल शोधू लागली. तेवढ्यात पाठून अंधुक प्रकाश चमकला आणि आवाज आला,"अहो ताई,चला उतरा शेवटचं स्टेशन आलं.." ती जरा चरकलीच..अरे आपण कोणती ट्रेन पकडली नेमकी आणि नेमकं कुठं पोहचलोय..तिला काही उमजेना. तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं..पण आता तिथे कोणीच नव्हतं.कदाचित तो टिसी होता आणि उतरून गेला असावा.असा विचार करत ती उतरली..स्टेशनवर पण कोणी दिसत नव्हत..तिने स्टेशन मास्तरचं ऑफिसमध्ये पाहिलं.ते ही खाली होतं..ती स्टेशन मधुन बाहेर पडली. तिथे ठळक अक्षरं चमकत होती "रायगाव".."गाव??"पाटी पाहुन ती जरा चरकलीच आणि हा विचार करतच ती वाट मिळेल तिथे चालत होती.तिची नजर चहूबाजूंनी फिरली पण तिथं चिटपाखरू सुध्दा नव्हतं.तिच्या पुढे हा यक्ष प्रश्न होता आता ती जाणार तरी कुठे अन् वाट विचारणार तरी कुणाला..?? ह्याच विचारात ती वीस पंचवीस मिनिट चालत होती..ती चालत होती तो रस्ता नसून खडकाळ पायवाट होती..आजूबाजूला गर्द हिरवी झाडी...रातकिड्यांची भुणभुण सुरूच होती..मध्येच एखादा काजवा चमकून जायचा..कुठून तरी एखाद जंगली जनावर ओरडण्याचा आवाज यायचा.त्यात विजांचा कडकडाट सुरूच होता आणि पाऊसही जोरदार होता..ती बॅग आणि छत्री सांभाळत कोणी तरी भेटेल या आशेने पुढे पुढे सरकत होती..
तेवढ्यात तिला काही पावलावर उजेड दिसला.इथूनच होणार होती सुरवात 'समय च्या अनाहूत वेळेची..' तिने त्या उजेडाच्या दिशेने पावले उचलली.ती त्या उजेडा जवळ पोहोचली.तो एक भला थोरला वाडा होता.पावसाने धुवून निघालेला तो वाडा विजेच्या प्रकाशात चमकत होता.तिने उडण्यासाठी दाराला हात लावला तोच ते दार कर्रर्र असा आवाज करत उघडलं गेलं.आणि क्षितीचं पहिलं पाऊल पडलं अनाहूत अशा कालचक्रात..ती आत शिरताच ते दार जसं होत तस बंद झालं..ती दचकलीच..वाड्यात अंधुकसा प्रकाश पसरला होता म्हणजे पायाखालचं स्पष्ट दिसेल एवढा.तिने पुढे येत विचारलं,"कोणी आहे का? " सबंध वाड्यात तिचा आवाज घुमला पण प्रतिसाद काही आला नाही...ती आत गेली..वाडा अगदी भक्कमपणे उभा होता सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या...खोल्या सुध्दा अगणित होत्या हे बघताच तिच्या लक्षात आलं होतं..एवढं सारं नीटनेटकं असूनही तिला माणसाची चाहूल काही लागली नव्हती..ती जिना चढून वर गेली तिथे एका खोलीच्या वर एक फलक दिसला "श्रृंगार कक्ष" त्या खोलीच्या दाराला असंख्य हळदीकुंकू लावलेले दोरे गुंडाळले होते..ती त्या दाराला स्पर्श करणार एवढ्यात तिला एक किंकाळी ऐकू आली....."आई गं....कारभारी वाचवा ओ मला..सोडवा ह्या नराधमाच्या हातनं..ए पुढे येऊ नगसं..म्या पवित्र हाय..तुझ्यासारख्या रानटी पुरूसाला मी माजं पावित्र्य भंग करू द्यायची न्हाय.म्या परत येणार हाय म्या तुझ्यावर सूड उगवल्या बिगर स्वस्त बसणार न्हाय ..म्या परत येईन..." असे काहीसे उद्गार होते ते...त्या नंतर कोणी तरी पाण्यात पडल्याचा आवाज आला आणि सारं पुन्हा शांत झालं. क्षिती दोन अडीच तासानंतर माणसाचा आवाज ऐकत होती..तोही हा असा..त्या दरवाज्या मागे काय आहे हे पाहाण्यासाठी तिने तो उघडण्याचा प्रयत्न केला.त्याला स्पर्श करताच तिला चटका बसला...............
क्षितीचे डोळे उघडले ते मुळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने..ती एका झोपडीत खाटेवर झोपली होती...अंगात तिचे कपडे नसून परकर पोलका होता आणि उबदार गोधडी तिने पांघरली होती..रात्री शांत झोप झाल्यामुळे प्रसन्न वाटत होतं.तर रात्री अंधारात न कळलेल्या किरकोळ जखमा अन् थोडासा मुका मार आता चांगलाच जाणवत होता..बाहेर झुंजूमुंजू उजाडलयं हे दारातून येणाऱ्या प्रकाशामुळे कळत होतं..ती तशीच उठून लंगडत बाहेर आली तिथे बाहेर ओसरीवर एक आजीबाई दळण दळीत ओव्या गात होत्या.नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा आणि ताजेतवानेपणा होता...
तिला बघताच त्या आजीबाई म्हणाल्या, "उठलीस व्हय पोरी..त्या तितं आत मोरीमधी त्वांड धुवून घे जा.. तुज्यासाठी चा आणते." क्षितीने तोंड धुवून घेतलं आणि आजीबाईंसोबत चहा घेत बसली..."आजी पण मी इथे कशी आले मला काही आठवत नाहीये.." आजी म्हणाल्या,"काल रातच्याला माजा ल्योक माशे पकडून परतत होता तवा त्येला पावसामुळं थोडा उशीर झाला...पायवाटेनं येताना तु तिथं त्येला बेसुध गावली त्यानं आजुबाजुला पायलं तर तिथं कुणी बी न्हवतं म्हनुन त्यानं सरळ उचलून हितं आणली..आनी व्हय तुजं ते बोचक आनं कापडं पार चिखलात भिजली व्हती म्हनुन मी माज्या नातीचा परकर पोलका तुला घातला आणि तुला न्हिजवली..आनं तुजी कापड धुवाया टाकली..म्हनलं सकाळच्याला तुला सूध आली की बगू काय ते..आताच माजा ल्योक विचारत व्हता पावनी सुधींवर आली का म्हुन..मी म्हनलं नाई आजून तसा गेला शेतावर..आनं माजी नात गेलीया नदीवर पानी आणायला.." "मी पायवाटेवर..??मी तर त्या वाड्यात होते मग बाहेर कधी आले कोणी बाहेर काढलं तिथून..??" क्षिती बोलून गेली...आता आजींच्या चेहर्यावर आश्चर्याचे भाव होते..."पोरी काय म्हनली तु वाडा...??कोनचा वाडा..सगळं सांग बगू सविस्तर.." क्षितीने ट्रेन पासून ते काल रात्रीपर्यंतचा सारा प्रकार आजीबाईंना सांगितला..
आजींनी क्षणभर क्षितीला न्याहाळलं..आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या,"पोरी तिनं वाचवलं बग तुला..ती परत आलीया तिचा सूड पुरा कराया आलीया..त्याचसाठी तु हितंवर आलीस बग..तुजा वाटा असणार हाय बग तिच्या कामात.. आता संपतराव संपणार..पोरीबाळी सुरक्षित हुन्हार हायती..." क्षिती ओशाळली होती..आजी उठून गेल्या..
तेवढ्यात बाहेरून हे सारं ऐकणारी आजींची नात गंगा आत आली..तिने डोक्यावरचा आणि कमरेवरचा पाण्याचा हंडा चुलीजवळ ठेवला..आणि क्षिती जवळ येऊन बसली..."म्या गंगा...ताई तुम्हास्नी खूप प्रश्न पडलेत न्हवं म्या देते त्यांची उत्तरं.." असं म्हणत तिने उसासा टाकला...
आणि ती सांगु लागली 'गोष्ट रमा ची' "ही गोस्ट हाय सवतंत्र्याच्या येळची..तवा आमचं थोरलं सावकार रंगराव पाटील नुकतचं निवर्तले व्हते..देश सवतंत्र झाला व्हता. पन आमचं गाव परतंत्र्याच्या वेदना सहन करत व्हतं.थोरल्या सावकरांच्या नंतर त्यांचे थोरले चिरंजीव संपतरावाच्या हातात सावकारी आली अन् गाव कोलमडून गेलं.थोरलं सावकार गावात गरीब धाकल्या च्या अडीनडीला धावणारं व्हते पन त्येच्या आक्शी ईरूद धाकले सावकार त्येनी गावाचा निसता छळवाद मांडला..तवा ते इंग्रज लोक हितं शिकारीच्या नादानं मुक्कामी असतं..त्यास्नी ह्यो नराधम गावच्या तरण्याबांड पोरी पुरवायचा...आदी सवता वापरायचा आन मंग त्यास्नी द्यायाचा.गावच्या जमिनीची कागदपत्र त्येच्या ताब्यात व्हते त्यामुळं त्या पोरींचं बा गप असायचं आनी त्यांच्या आया घरात बसून आसवं गाळायच्या त्यो पोरी वापरून सोडून द्यायचा अन् गाव त्या पोरीस्नी वाळीत टाकून मोकळं व्हायचं.अन् ह्या पोरी एखाद्यी व्हिर नदी नाय तर ओढा जवळ करायच्या अन् त्यांची फुगून वर आलेली प्रेत त्यांच्या घरचे रातच्याला गावाच्या ऐशीबाहेर गाडून यायचे अशा तर्हेनं त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्या बापड्या पोरीस्नी मिळायची बगा..." तिचं बोलणं मध्येच तोडत क्षिती म्हणाली,"मग रमा कोण होती?? ती ही ह्या मुलींपैकी होती का...??"
"न्हाई जी..रमा शेजारच्या शिवापुरातून लग्न करून आणलेली नवी नवरी व्हती..ती दिसायला चार चौगीत उठून दिसणारी व्हती आनं त्यात कामाला बी वाघीन व्हती..सार्या गावात कोणाच्या ही अडीनडीला धावून जायची..अगदी धीट होती..कधीही कशाला नि कुणाला ही घाबरायची न्हाई..ती आन तिचा दादला रघु संपतरावाच्या शेतावर कामाला व्हती.एक दिस संपतराव शेतावर फेरफटका माराया गेला व्हता तवा ती त्येच्या नजरेत भरली.आन त्या दीसानंतर चार दिसांनी रघुला वाड्यावर बोलावन आलं..संपतराव त्येला बोलला,"रघ्या सांच्याला तुज्या कारभारणीला पाठव वाड्यावर..." रघु दबकत बोलला,"का जी काई काम होत का..तिला कशापायी म्या करतो जी काय असलं ते...मालक ती पोटूशी हाय जी.." संपत रागाने गरजला, "तुला एकदा सांगितलेलं कळत न्हाय का..सांच्याला तिला संगत घेऊन ये.." "येतो जी" म्हणत रघु आल्या पावली परतला..
घरला परतल्यावर त्यो अस्वस्थ होता..दुपारच्याला जेवताना सुदिक त्येच लक्ष्य लागत न्हवतं..त्येच्या मनात शंकेची पाल चुकचुकत व्हती..त्यानं सारं रमेला सांगितलं.तिच्या काळजाचा ठोका चुकला..तिला तिच्या जिवाची पर्वा कधीच न्हवती पन तिचा जीव तुटत व्हता तिच्या लेकरासाठी..यात त्याची तर काय चुक न्हवती न्हवं..पन रमाई याला सुदिक धिटाईनं सामोरी जानार व्हती..सांच्याला ती धन्यासंगत वाड्यावर गेली...पोटात पाच म्हन्याचा गोळा वाढत व्हता..आनं ज्याची भिती व्हती तेच जालं..रमेला त्या खोलीत न्हेलं..तिला सजवली..व्हयं सजवली..त्या वाड्यात जानार्या प्रतयेक मुलीला असचं सजवलं जायाचं.काळी साडी नेसवून दागिने घालून केस सोडून डोसक्यावर पदुर देऊन तिला त्या नरकात ढकलायचं जिथून बाहेर पडल्यावर तिचं आयुश्य सपून जायचं...रमाई सजली..तिला त्या खोलीत घेऊन जाताना रघु बगत व्हता.संपतनं मुद्दाम त्याला रातभर त्या खोलीबाहेर बसून ठेवला..त्येच्या डोळ्यातली आसवं थांबत न्हवती..पन त्यो काई बी करू शकत न्हवता..रमा आत व्हती..नरक यातना सहन करत व्हरडत व्हती, "आई गं....कारभारी वाचवा ओ मला..सोडवा ह्या नराधमाच्या हातनं..ए पुढे येऊ नगसं..म्या पवित्र हाय..तुझ्यासारख्या रानटी पुरूसाला मी माजं पावित्र्य भंग करू द्यायची न्हाय..तु माज्या लेकराला मारलंस..म्या परत येणार हाय म्या तुझ्यावर सूड उगवल्या बिगर स्वस्त बसणार न्हाय ..म्या परत येईन..." असं ती बोलत व्हती आनी मग रघुला वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हिरीच्या पान्यात काईतरी पडल्याचा आवाज आला..त्या बरोबर संपतराव चवताळून बाहेर आला.रघूच्या कंबरेत लाथ मारून त्याला हाकलून लावला..रघुला उमगलं त्येची रमाई त्याला कदीच सोडून गेली व्हती...ह्या धक्क्यातनं त्यो कदी सावरला न्हाई बगा.रघु येडा जालता..आनं त्यातच त्यो गेला .." "हो हेच ते शब्द जे मी काल ऐकले होते आणि संपतराव त्याचं पुढं काय झालं??" क्षिती पुन्हा बोलली..
"त्यो लांडगा त्याचा त्या दिसापासनं इदवास वाढला हाय.बायकू घाबरून पोराला घेऊन पळून गेलीया..धाकला भाव दुसर्या गावातल्या शेतात संसार मांडून हाय..आणि ह्यो आजून बी पोरींवर अत्याचार करतो तरी बी आजवर गावाला वाचा फुटली न्हाय..पन तुमी त्या वाड्यातून सुकरूप परत आलाती..तिनं वाचवलं बगा तुम्हास्नी..रमाई येनार..पोरीबाळी सुरक्षित हुन्हार हायती..."
"पण या साऱ्यचा माझ्याशी काय संबंध..मी इथे का आले.???" क्षिती बैचैन होत बोलली "कळल येत्या अमूशेला तुमच्या साऱ्या प्रस्नांची उत्तर तुम्हास्नी मिळतील बगा..तवर तुमी आराम करा जी.."असं म्हणून गंगा आपल्या कामाला निघून गेली.. आणि बाहेर रिपरिप पडणाऱ्या पावसाकडे बघत क्षिती बसून राहिली..
अमावस्या चार दिवसावर आली होती...क्षितीने गंगा बरोबर बराच वठार फिरून काढला आणि डायरीत काही महत्त्वाच्या नोंदी करून घेतल्या..एवढ्यात तिच्या कडे बरीच माहिती गोळा झाली होती..याच माहिती द्वारे एक छोटीशी शाॅट फिल्म बनवून "सिटी लाईव्ह" वर प्रसिद्ध करायची अशी कल्पना तिच्या डोक्यात घोळत होती...पण तिच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या अनाहूत चित्रपटाची तिला साधी चाहूल सुध्दा लागली नव्हती..
अशीच एका संध्याकाळी क्षिती गंगे सोबत नदीवर गेली होती..ती अंगावरच्या कपड्यानिशी इथे येऊन पोहचली होती त्यामुळे गंगेचे परकर नि पोलके वापरत होती.आता ही तिने गडद हिरव्या रंगाचा परकर पोलका घातला होता..त्याला सुबक अशी किनार होती..हात लहानसे फुगरे होते पोलक्याचे अन् पाठी दोरी बांधली होती...तिच्या गोर्या अंगावर रंग अगदी खुलून दिसत होता..त्यात आखीव रेखीव बांधा..सुंदर बोलके डोळे अन् सहज एक्सपेरिमेंट म्हणून तिने तिच्या लांब सडक केसांच्या वेण्या पाठीवर सोडल्या होत्या..हे गावरान सौंदर्य तिला बरंच खूलून दिसत होतं.दोघीही खडकावर बसून नदीच्या पात्रात पाय सोडून गप्पा मारत बसल्या होत्या.
"ताई आक्शी गौराई वानी दिसाया लागलासा..कुणाची नजर नगं लागाया.." असं म्हणत गंगेनं क्षितीच्या कानशीलाला बोट लावून आपल्या कानापाशी आणून कडकड मोडली.तेवढ्यात अचानक आभाळ भरून आलं विजांचा कडकडाट सुरू झाला."चल गंगे पाऊस येणार आहे असं वाटतंय धडक येण्याआधी घर गाठायला हवं.." असं म्हणत क्षिती उठली..दोघी खडकावरून खाली उतरल्या..आणि घराकडे जायला वळणावर तोच समोर संपतराव आला..गंगेला म्हणाला, "तु सखारामची पोर हायस न्हवं का..??" "व्हय जी" गंगा बोलली.."ही कोन हाय संगत..नवी वाटत्ये याआधी कदी पायल नाय गावात.." संपत.."मावशीची पोर हाय शेजारच्या गावची...कमळा..चार दिस राह्या आलीया." "आनीक किती दिस राह्यनार हाय..??" " अमुशे पतुर हाय...अमुशा सरली कि जायल ती.." गंगा म्हणाली तेवढ्यात पाऊस सुरू झाला..तिघेही चिंब भिजले..."बरं तुज्या बापाला सांच्याला वाड्यावर बोलावलं हाय म्हुन सांग.." क्षितीच्या ओल्या चिंब कपडे चिकटलेल्या शरीराकडे हावरट नजरेनं पाहत संपतराव उद्गारला...आणि तिघे ही आपापल्या मार्गाला लागले..
घरी आल्यावर दोघींनी कपडे बदलले तेवढ्यात गंगेचा बाप आला...त्याला पाणी देत गंगा म्हणाली," बा सावकारांनी सांच्याला तुम्हास्नी वाड्यावर याया सांगितलं हाय.." "काय तुला कोन बोलल..??" सखारामनं विचारलं.आणि गंगेनं घडला प्रकार सांगितला..
संध्याकाळी सखाराम वाड्यावर जाऊन आला...तो आल्यापासून कोपर्यात बसून होता.."काय झाल तिथं.मघापासून गप बसला हायस काई सांगनार हायस की न्हाई.." आजी विचारत होत्या. जरा वेळ सखाराम पुन्हा गप्प झाला आणि बोलता झाला,"आये,सावकारांनी ताईस्नी वाड्यावर घेऊन याया सांगितलं हाय.." "काय त्या लांडग्याची नजर ह्या पोरी वर कदी पडली.." शेवंता आजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या."मघाशी नदीवर गेलतो तवा आला व्हता कुत्रा आडवा.." गंगा तिडकिने बोलली."कदी बोलीवलं हाय..??" एवढूस तोंड करत आजींनी विचारलं.."परवा दिशी अमूशेला.." सखाराम म्हणाला..या चर्चेनंतर सगळे दोन दोन घास खाऊन झोपले.
रात्री उशिरा आभाळात विजेचा तांडव सुरू झाला.मागोमाग पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या आणि शेवंता आजींना जाग आली..मंद प्रकाश झोपडीत पसरू लागला.आणि बघता बघता तिथे एका बाईची आकृती तयार झाला.ती मधाळ आवाजात बोलू लागली,"शेवंताक्का घाबरू नगसं पोरीला पाठव बिनघोर.पोर सुखरूप परत येईल बग.आता शेवट होनार हाय सगळ्याचा.आनी त्यो हीच पोर करनार हाय.भरोवसा ठेव बग त्येच्यावर त्यो हाय आपल्या संग.." एवढं बोलून ती लोप पावली..आजींनी त्या दिशेने हात जोडले आणि पडून राहिल्या.आता आकाशात कडकडणार्या विजा शांत झाल्या होत्या आणि पाऊसही कमी झाला होता.
सकाळी उठल्यावर शेवंता आजींनी क्षितीला वाड्यावर पाठवायचा निर्णय सांगितला..गंगा आणि सखाराम अवाक् झाले पण आजींनी त्यांची समजूत काढली होते तर क्षिती ह्या आव्हानाकडे पत्रकाराच्या दृष्टीने पाहात होती.तिच्याकडे काहीतरी वेगळं करून दाखवायची संधी आली होती..या गावात होणाऱ्या अन्यायाला ती जगासमोर आणणार होती.ती लगेच आपल्या बॅगकडे वळली..त्यात तिने चोरकप्यात ठेवलेला मिनी कॅमेरा काढला..सुदैवाने त्याला काही झालं नव्हतं..तिने नीट चेक केलं..आता तिच्या आयुष्यभराचं पत्रकारितेचं कसब पणाला लागणार होतं..
आणि अमावस्येचा तो दिवस उजाडला..दिवसभर वातावरण ढगाळ होतं.पक्ष्यांचा चिवचिवाट शांत झाला होता..हे संकेत होते काहीतरी घडणार याचे..संध्याकाळी आभाळ भरून आलं विजांचा कडकडाट सुरू झाला सखाराम क्षितीला वाड्यावर सोडून परत आला..आता वाड्यात फक्त संपतराव,क्षिती आणि एक बाई होती..तिनं क्षितीला सजवलं..काळी साडी नेसवली..केस मोकळे सोडले..पदर डोक्यावर घेऊन क्षितीने दुसर्या खोलीत प्रवेश केला जिथे संपतराव पलंगावर उघडा पहुडला होता.त्याने तिचा पदर दुर सारला आणि त्याचा चेहरा भितीने पांढरा पडू लागला कारण त्याला क्षितीच्या ठिकाणी रमा दिसत होती...तो जवळपास उडालाच...तिच्या समोर उभा राहून थरथरत म्हणाला, " तू..........तू तर मेली व्हतीस न्हवं..."क्षिती मध्ये असलेली रमा चवताळून बोलली,"व्हय मेले व्हते पन माज्या आत्म्याला आजून मुक्ती न्हाय मिळाली..तुजा हिसाब चुकता करायचा व्हता मी बोल्ले व्हते म्या येनार...तू मला नि बाकीच्या पोरीस्नी खूप छळलसं आज म्या सार्याचा सूड घेनार हाय..."
असं म्हणत ती चपळाईने दरवाजा जवळ सरकली आणि तिने तिथला दंडुका उचलला आणि संपतच्या डोक्यात प्रहार केला बेसावध संपतराव खाली कोसळला.तिने त्याला भोकसायला सुरवात केली..तो केविलवाणा होऊन तिची माफी मागत होता..,"बये माफ कर मला.म्या चूक केली..परत कोनत्या बाईकडं नजर सुदिक उचकतनार न्हाई..एक वेळ माफी दे..." "चूक....तू गुन्हा केला हायस...किती कळ्या खूडल्यास किती आयुश्य उद्वस्त केलीस..तुज्या सार्या गुन्ह्यांची कबूली म्या घेनार हाय..नराधमा याची शिक्षा तुला मिळनार हाय आन ती म्या देनार हाय." "नगं आसं करूस तू सांगशील ते म्या करीन व्हय म्या कबूल करतो म्या जमिनीच्या कागुद पतरांची भ्याव दावून पोरीस्नी भोगलं..त्यांची आयुश्य माज्यामूळं बरबाद जाली...तू बी माज्या मुळं मेली तुजं प्वार बी माज्या मुळं दगावलं म्या एकवार परत माफी मागतो पन मला मारू नगसं.." संपत दयेची भीक मागत होता...पण रमा त्याचं ऐकून घ्यायला तयार नव्हती...तिने काठीने बडवून बडवून त्याला अर्धमेला केलं होतं..."म्या सांगीन ते करशील व्हयं...आरं हडं ती येळ तर कदीच निघून गेली हाय..कबूल तर तू दिली हायस...आता तुला तडपून तडपून मारल्या बिगर शांत नाय व्हायची म्या...आता तुला शिक्षा मिळनार हाय..म्या देनार तुला 'मृत्यूदंड' "आता ती पून्हा दाराजवळ गेली आणि तिथे कोपर्यात जळत असलेल्या मशालीवर तिने तो दंडुका धरला आणि चांगलाच निखार्याच्या धगी एवढा भाजला...आणि त्याचे चटके ती संपतला देत होती...बाहेर धोधो पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरूच होता..तरी ही गावात सर्वाना संपतच्या ओरडण्याचा आवाज येत होता...
संपतराव गुरासारखा ओरडत होता..त्या सरशी रमाला जोर येत होता..."व्हरड आणखीन व्हरड त्या दिशी म्या बी अशीच व्हरडत व्हते...भीक मागत व्हते पन तुज्या दगडाच्या काळजाला पाझर न्हाय फुटला..काय चुक व्हती माज्या निस्पाप लेकराची ज्याचं आयुश्य तू जनमन्या अगूदर सपून टाकलस...माज्या पोटचा धड आकार नसलेला गोळा रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेला म्या सवताच्या डोळ्यानं पायलं...काय नरक यातना जाल्या असतील रं माज्या आईच्या काळजाला ईचार केलास काय कदी..." असं बोलत असताना तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या तिच्यातली आई टाहो फोडत होती..शेवटी तिने दुसर्या कोपर्यात असलेली पारई ( जमिनीत खोल खड्डा खणण्यासाठी शेतकऱ्या करवी वापरलं जाणारं लांब काठीच्या आकाराचं जड लोखंडी हत्यार ) उचलली आणि थेट संपतरावाच्या 'गुप्तांगावर ' शेवटचा वार केला.आणि संपतरावची शेवटची किंकाळी सबंध आसमंतात घुमली आणि संपतराव कायमचा संपला...मरताना त्याच्या डोळ्यात भिती आणि वेदना असे समित्रित भाव होते.
पारई बाजूला फेकून क्षिती तिथंच कोसळली.त्या बरोबर बाहेरचं वादळ अचानक थांबलं आणि आभाळ निरभ्र झालं होतं...वाड्याची दार खिडक्या धाड धाड उघडली सगळे गावकरी वाड्याजवळ जमले..."त्या पोरीला कोनीतरी बाहेर आना रं.." शेवंता आजी ओरडल्या..सखाराम आणि दोन दणकट पुरूष आत गेले..त्या खोलीत क्षिती आणि संपतराव दोन वेगळ्या दिशेला पडले होते.क्षितीला उचलताना तिने पलंगाच्या दिशेने हात दाखवला व बोलली," काका, कॅमेरा घ्या "आणि ती पून्हा बेशुद्ध झाला सखरामला पलंगावर लावलेला कॅमेरा दिसला त्याने तो काढून घेतला आणि तिला घेऊन सारे बाहेर आले..ते बाहेर येताच पुन्हा दार खिडक्या बंद झाल्या...वाड्यावर पांढरा शुभ्र प्रकाश पडला आणि तिथे अडकून पडलेल्या सार्या मुलींचे आणि रमाई चे आत्मे त्या प्रकारातून वर जाताना दिसले..त्याना मुक्ती मिळाली होती. गावकर्यानी त्यांना हात जोडले..थोड्या वेळाने प्रकाश लोप पावला..आणि वाड्यावर वीज कोसळून वाडा भस्मसात झाला...
हे सगळं झाल्यानंतर क्षिती दोन दिवसांनी डोंबिवलीला परतली.तिला त्या कॅमेराची आठवण झाली तिने फुटेज चेक केलं..सारं व्यवस्थित रिकॉर्ड झालं होत फक्त तिचा चेहर्यावर पदर होता त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता..तिला आठवलं की तिचा पदर संपतरावने दुर सारला होता मग इथे...?? मग तिला तिच्या आजीची आठवण झाली ती म्हणायची आत्म्याचा चेहरा कधीही आरश्यात आणि कॅमेर्यात दिसत नाही..मग ती ते फुटेज घेऊन ऑफिसला आली व्यवस्थित एॅडीट करून हे सगळं सत्य जगासमोर आणण्यात क्षिती यशस्वी झाली...'सिटी लाईव्ह' ची टीआरपी ही प्रचंड वाढली..आणि रायगावला सरकार दरबारी मान्यता मिळाली सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे सावकारी कायमची संपुष्टात आली...
या साऱ्याला दोन वर्षे सुमार काळ लोटला होता...बाहेरचं वातावरण वादळी होतं..मुसळधार पाऊस धोधो कोसळत होता.. तिनं शेवटचं पान वाचून संपवलं आणि पुस्तक टेबलवर ठेवून बेड लॅम्प मालवून झोपली...खोलीत पसरलेल्या अंधूक प्रकाशात ते पुस्तक चमकत होतं...त्याचं नाव होतं...'समय -एक अनाहूत वेळ' खाली लिहिलं होतं.लेखिका 'क्षिती शरद साठे'.....
वाचकहो, हा कथेचा दुसरा नि शेवटचा भाग..पहिल्या भागाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार..हा भाग कसा वाटला नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया मधून.. धन्यवाद...
अनु