ईपरित - All new Marathi stories
पूर्ण कथादुपारचे बारा वाजत आले असतील. धुरळा उडवत पोलीस गाडी माळरानातून गावात दाखल झाली. टाळगावात अशी पोलीस गाडी येण्याची पहिलीच वेळ. त्यामुळं कुतूहलानं गावातील लहानगी पोरं गाडीमागच्या धुरळ्यातनं "पुलिस आलं ....पुलिस आलं...पुलिस आलं...." बोंबलत चौकात दाखल झाली. गाडी आता चौकात उभी होती. गावातील काही लोक आणि गावचा पोलीस पाटील तिथं पोलीस येण्याची वाटच पाहात होते. गाडी थांबल्यावर पोलीस पाटील गाडीत बसले आणि गाडी सावकाराच्या वाड्याकडे निघाली. बाकीचे लोक मागून पायी जाऊ लागले.
सावकाराच्या वाड्यासमोर बघ्यांची तोबा गर्दी जमली होती. पोलीस गाडी बघताच गर्दी थोडीशी पांगली. फौजदार काळे ती गर्दी बघताच काहीशे संतापले. अन पोलीस पाटलाला त्यानं झापलं -
"अहो पाटील, काय हि गर्दी....??? घरी पिटाळून लावा ह्या सगळ्यांना....काय तमाशा सुरु आहे काय हितं ....???"
तशे पोलिस पाटील डोळे मोट्ठे करून बाजूच्या गावकऱ्यांवर खेकसले -
"आरं निगा कि घरी....बघितलंय नव्ह ...?? का आता तपास बी तुमीच करता....?? जावा....निगा घराकडं...!!"
गर्दी अजून काहीशी पांगली पण कुणीही निघून गेलं नाही. कारणही तसंच विपरीत होतं . या जेमतेम दीडशे घरांच्या छोट्याश्या गावात एवढा निर्घृण प्रकार कधीच घडला नव्हता. लोकं उत्सुक होती......कुजबुजतं होती....अन काहीशी घाबरलीही होती. फौजदार काळेंनी हाताने इशारा करत "नेमकं कुठे..??" असं विचारलं अन पोलीस पाटलानं तोंड उगडायच्या आत गर्दीनं वाड्याच्या मागील बाजूस बोटं दाखवलं. फौजदार, दोन शिपाई अन पोलीस पाटील वाड्यामागं निघाले.....गर्दी मागं होतीच, हे सांगायला नको.
आता हि वरात वाड्यामागं पोहोचली . या मागील बाजूस सभोवती आंबा, चिकू, फणसाची झाडे होती अन त्याच्या मध्यावर जवळजवळ दोनएक गुंठे मोकळ्या जागेत तण होतं . अन त्या सुकलेल्या गवतावर तीन-चार मातीचे ढीग होते....कमरेएवढे उंच असावेत. ताजे खणलेले दोन मोट्ठे खड्डे त्यांना दिसले, हि माती त्याच खड्ड्यातली असावी. त्या मातीच्या एका ढिगाऱ्यावर साठी पार केलेल्या राघोबा सावकाराचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता. त्याच्या डोक्यावरील काही भागात केस दिसतच नव्हते, अर्धवट भागातली कवठी कातडी सोलल्याप्रमाणे उघडी पडली होती....डोळे गायब होते अन त्या रिकाम्या खोबण्यातून गालावर आलेले रक्ताचे ओघळ सुकून गेले होते....जबडा सांध्यातून निखळून कातडीच्या जोरावर तग धरून लटकत होता.....एखाद्यानं नरडीचा घोट घेतल्याप्रमाणे गळ्याला मोठ्ठ भगदाड पडलं होत....अंगावरचा सदरा चिंध्या होऊन रक्तानं न्हाऊन निघाला होता....हाता-पायावर जखमांची रांगोळी दिसत होती.....पोटातले आतडे, जठर बाहेर आले होते अन त्या रक्ताळलेल्या मांसावर माश्या घोंगावत होत्या. एकंदरीत हे दृश्य कुणालाही हेलावून टाकणारं होतं . या बघ्यांच्या गर्दीचं कारण फौजदार काळेंना कळालं . पण ते स्तब्ध होते....त्यांच्या वीस वर्षाच्या नोकरीत अनेक घृणास्पद गुन्हे त्यांनी पहिले होते......यापेक्षही बीभत्स अवस्थेत असलेले मृतदेह सुद्धा.....!!! काळे साहेब खाली बसून मृतदेह न्याहाळत असताना पोलीस पाटलांनी आवाज दिला-
"सायब, अजून संपलं न्हाय....या हिकडं ....!!"
अन अवाक होऊन फौजदार काळे पोलीस पाटलांसोबत चालू लागले. ते आता वाड्याच्या मागच्या दारातून आत गेले....काही बघे तिथेही मागून आलेच. आतल्या अंगणातील तुळशीजवळ एक मृतदेह पडला होता.....तो शांताराम होता-सावकाराचा वीस वर्षाचा तरुण पोरगा- असं पाटलानं सांगितलं......या जिवाचीही अगदी राघोबा सावकारासारखीच अवस्था....तीच अमानुषता.....हे मात्र फौजदार काळेंना काहीसं विचित्र वाटलं......दोन्ही व्यक्तींना एकसारखंच मारलं गेलं होतं .....पण एकाला मारताना दुसऱ्यानं प्रतिकार का केला नाही......विचार करत-करत फौजदार काळे पाटलांसोबत बाजूच्या खोलीत गेले अन तिथं सावकाराची बायकोही त्याच छिन्नविछिन्न अवस्थेत आढळली. उमर पन्नाशीच्या आतबाहेर असावी. फौजदार काळे आता पुरते चक्रावून गेले होते. हे सगळं फारच अमानुष....अभद्र होतं .....त्यांच्या उभ्या वीस वर्ष्याच्या नोकरीत इतका विचित्र प्रकार त्यांनी कधीही पहिला नव्हता. हे सगळं त्यांना इतकं किळसवाणं वाटू लागलं कि ते तिथून तडक बाहेर वाड्याच्या समोरील अंगणात जीपजवळ आले. पाटीलही पळतच मागून आले.
"पाटील....जरा माहिती द्या या परिवाराबद्दल."
या प्रश्नाची पोलीस पाटील जणू वाटच पाहत असावे-
"ह्य बगा सायब....तिनंच माणसांचं कुटूमं ....पोरगं तालुक्याला कालेजात आसत ....सुट्टीला आलं आसन ..... सायब, मेलेल्या माणसाबदल वाईट-वंगाळ बुलू नी .....पण खरं तर सांगायचं पायजेल का न्हाय.....??? ह्यो रागूबा सावकार तसा बेरकी माणूस...पिड्यानपिड्या गरिबांना वाटलेल्या कर्जाचा याजावर जगल्या ह्या घराण्याच्या...पण बेरकीपणा गेला न्हाय. आर्दा गाव आसन हेंच्या कर्जाच्या डोंगराखाली....!!!"
"ते ठीक आहे पाटील पण कुणाशी काही हाडवैर, मागील काही दिवसांत भांडण .....???" काळेंनी विचारलं.
"न्हाय बा .....काय वं गावकरी....तुमीबी सांगाकी ....आस काय हुतं काय...??" पाटील गर्दीकडे बघत उद्गारले. गर्दीनं नकारार्थी मान हलवली.
"हो पण सायब...एक गोस्ट इसरली.."धोंडिबा"-सावकाराचा गडी .....तेंच्या वाड्यातच ऱ्हायाचा.... त्यो कुटं दिसत न्हाय...!!!"
फौजदार काळेंनी कान टवकारले...."दिसत नाही म्हणजे...??"
"आवं सायब....हितं आजूबाजूला समदीकडं सोदलं ....तेचा कुटबी पत्त्या न्हाय." पाटील बंडीतली खैनीची चंची काढत म्हणाला.
"हे बघा, एकतर तोच हे सर्व खून करून घरातली चोरी करून पळाला असावा किंवा त्याला या प्रकाराबद्दल काहीतरी खात्रीशीर माहिती असावं." सिगारेट पेटवत काळे म्हणाले.
"न्हाय वं सायब.....धोंडिबा असं न्हाय करायचा....लय सादा आन मवाळ गडी हाय त्यो.....आव कुणाला उलट बी बोल्ला न्हाय कदी , खून काय करायचा त्यो....??" पोलीस पाटील पोटतिडकीनं बोलला . बघ्यांनीही त्याला दुजोरा दिला.
"हे बघा पाटील....त्यानं काय केलं कि नाही त्याचा तपास आम्ही लावू....तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तो धोंडिबा गावात आला किंवा कुणालाही कुठे दिसला, लगेच खबर मला मिळाली पाहिजे. आणि हो, सर्व तपास होईपर्यंत या वाड्यात अन मागील बाजूस कोणीही जाता काम नये." फौजदारांच्या बोलण्यातील जरब पाहून आपसूकच पोलीस पाटलांनी मन हलवली. एव्हाना फौजदारांनी निरोप दिलेली सरकारी इस्पितळातील रुग्णवाहिका तिथे पोहिचली. तिन्ही मृतदेह शव-विच्छेदनासाठी तालुक्याला नेण्यात आले.
****
तो नाट्यमय घडामोडींचा दिवस संपून दुसरा दिवस उजाडला. पण टाळगावातचं काय, उभ्या पंचक्रोशीत राघोबा सावकाराच्या अन कुटुंबाच्या खुनाचा विषय चर्चेत होता....अगदी न्हाव्याच्या दुकानापासून ते विहिरीवरील पाणवठ्यापर्यंत.....लोकं रंगवून तो विषय चघळत होते.... तालुक्याच्या प्रमुख मराठी दैनिकात "दैनिक लोकमंच" मधेही हि बातमी छापून आली होती..... काही लोकं तर धोंडिबालाच खुनी ठरवून मोकळी झाली होती तर काहींना मात्र धोंडिबा असं काही करणार नाही, हि खात्री होती. तर काही लोकांना हे भुताटकीचं काम असेल असंही वाटत होतं. सगळंच एक कोडं होतं, ज्याचं उत्तर मिळण्यासाठी धोंडिबा मिळणं फार गरजेचं होतं . या सगळ्या तारंबळीत धोंडिबा आहे कुठे, हे कुणालाच माहिती नव्हतं. पोलीस पाटीलही आपल्या परीने धोंडिबाला शोधण्याचा प्रयत्न करत होते. फौजदार काळे दुसऱ्या दिवशीही गावात चक्कर मारून गेले, पण धोंडिबाची काही खबर नसल्याने निराश होऊन परतले.
दुसरा दिवसही मावळला....पण राघोबा सावकाराच्या घरातील हत्याकांडाचा उलघडा कधी होणार, हा एकच प्रश्न आ वासून उभा होता.
अन तिसऱ्या दिवशी दुपारी गावाबाजूच्या बाजूच्या जंगलात गेलेला एक गुराखी बोंबलत गावात दाखल झाला. त्यानं तिथं धोंडिबाच शव पाहिलं, असं त्याच म्हणणं होतं. पोलीस पाटलांनी लगेच दोघाजणांना फौजदारांना सांगावा देण्यास धाडलं आणि सात-आठ गडी घेऊन स्वतः त्या गुराख्यासोबत जंगलात गेले. चांगलं अर्धा तास पायपीट केल्यावर त्यांना करवंदीच्या एका जाळीत, काट्याकुट्यात निपचत पडलेला धोंडिबा दिसला. पाटलांनी पुढं होऊन धोंडिबाची नाडी तपासली, छातीवर कान ठेवून हृदयाचे ठोके बघितले अन आनंदाने ओरडले-
"आरं जित्ता हाय गडी .....उचला रं पोरांनु ....चला घीऊन गावाकडं...!!"
जवळ-जवळ एक तास लागला त्यांना , धोंडिबाला गावात आणायला. तोपर्यंत फौजदार काळेही जीप घेऊन गावात दाखल झाले होते. धोंडिबाला जिवंत पाहून त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले. आता हे प्रकरण मिटणार, अशी आशा त्यांना होती.
धोंडिबाला चौकातल्या पिंपळाच्या पाराखाली एका बाजल्यावर टाकण्यात आले. बघ्यांची गर्दी जमली. कानात प्राण आणून लोकं 'धोंडिबा काय बोलणार', याची वाट पाहात होते. पण तो बेशुद्ध अवस्थेत होता. पोलीस पाटलांनी जवळच्या घरातून कांदा आणण्यास सांगितला आणि एका बुक्कीत तो फोडून धोंडिबाच्या नाकासमोर धरला....तसा धोंडिबा सावध झाला. चोहीकडे माणसांची गर्दी बघून काहीसा घाबरला. अन त्यानं हातानंच 'भूक लागलीय' असं खुणावलं. पुढच्या पाच मिनिटात कुणीतरी जर्मनच्या ताटलीतून गरम दूधभात आणला. धोंडिबानं तो अधाशासारखा फस्त केला अन तृप्त होऊन ढेकर दिला. बघ्यांनी मोजलं होतं - ताटलीभर भात धोंडिबानं तेरा घासांत संपवला होता. शरीराची गरज भागल्यावर धोंडिबाला आता आपल्या मालकाची आठवण झाली अन तो मोठ्यानं रडू लागला. पोलीस पाटलांनी त्याची समजूत काढली. अन ते म्हणाले-
"ह्य बग गड्या , तुज दुख सम्द्यास्नी ठावं हाय....पण रडून काय उपेग....?? नेमकं काय झाल्त त्या रातीला.....?? डोस्क्यावर जर जोर देवुन आटवून सांग.....अन खरं -खरं सांग, खोटं कायबी नगो ......!!"
मानेनंच हो म्हणत धोंडिबा बोलू लागला-
"मला जास्त काय म्हायती न्हाय....जिसभर मी नदीकडलं शेत नांगरत हुतो.....येकटाच असल्यानं लय झीट आली हुती कामानं ......समद आंग खांडकावाणी दुखत हुतं ......रातीला कदी एगदा निजतुया आस झाल्त...रातीचा तुकडा खाल्ल्यावर मी झोपाय गेलो .....पडल्या-पडल्या डोळा लागला.....अन राती कवातरी जाग आली.....कुणीतरी जोरात आराडलं .....त्यो मालकांचा आवाज हुता....अन पुड्ल्या चार-पाच शेकण्डात धाकल मालक अन मालकीणबाईचा आवाज आला.....समद एव्हडं लगूलग घडलं...मला वाटलं चोरच अस्त्यांन .......मी दबकत दरवाज्या उघडला....अन जे कायतरी गराजल्यावानी आवाज आला , मी धूम पळत पुढला दरवाजा उघडला.....अन थेट जंगलाकड पळालो.....त्यो आवाज लय वंगाळ हुता.....माणसाचा नसलं .....अंदारात दिसलं न्हाय काय ......पण जनावर आसल , आसबी वाटलं न्हाय.....ती नक्की भुताटकीचं आसावी ........मलाबी ती भुताटकी मारून टाकलं, या भ्यानं मी काट्याकुट्यातनं वाट मिळंल तिकडं पळालो.....इतका जोरात पळालो कि कदी त्या करवांदीच्या जाळीत जाऊन बेसुद झालो, मला कळलं न्हाय."
सगळी गर्दी कुजबुजू लागली. बऱ्याच लोकांना एका विचित्र भीतीनं जणू स्पर्श केला होता....धोंडिबा जर खरं सांगत असेल तर त्या भुताटकीचं काय करायचं, हा आता यक्षप्रश्न बनला होता. लोकं ना-ना प्रकारचे तर्क लढवत होते. अन तेवढ्यात शांत बसलेले फौजदार काळे बोलायला लागले तसे सर्वांचेच कान टवकारले.
"हे बघा पाटील आणि गावकरी, आता हा धोंडिबा सांगतोय ते खरं कि खोटं हे वेळ आल्यावर कळेलच....पण प्रथमदर्शनी पुरावा त्याच्या विरोधात आहे, तो एकटाच त्या घरातून जिवंत बाहेर पडला असल्याने आमच्यासाठी तो प्रमुख आरोपी आहे. आम्ही त्याला आता घेऊन जाऊ, सर्व चौकशी, त्याच्या हाताच्या ठश्याचे नमुने, कपड्यांचे परीक्षण या गोष्टीचा आम्ही तपास करू. अन खरंच धोंडिबाविरुद्ध काही सिद्ध झालं नाही, तर त्याला सोडून देऊ."
पोलीस पाटलांना हा पर्याय आवडला. कारण त्यांना कुठंतरी खात्री होती कि धोंडिबा निर्दोष असावा. सर्वांनी संमती दर्शवली अन फौजदार धोंडिबाला घेऊन गेले.
****
धोंडबाला पोलीस कोठडीत आता चांगले दहा दिवस होऊन गेले होते. तीन-char वेळा त्याचा जबाब घेऊनही तो आपल्या जबाबावर ठाम होता. फौजदारांनी त्याच्यवर थर्ड डिग्रीचाही प्रयॊग केला पण तो काहीही वेगळं सांगत नव्हता. अन फौजदार काळेंना त्याच्या भुताटकीच्या कहाणीवर विश्वास नव्हता. नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे, अशी त्यांची खात्री होती. पण गुरासारखं बडवूनही धोंडिबा ती एकच गोष्ट बोलत होता. शेवटी कंटाळून फौजदारानी त्याला बडवायचा नाद सोडून दिला. ते आता मृतदेहाचे शव-विच्छेदन अहवाल आणि धोंडिबाच्या हाताचे ठसे, कपड्यांचे नमुने या सगळ्या अहवालांची वाट पाहत होते. कारण त्यांना खात्री होती कि हाताचे ठसे एकतारी बॉडीवर सापडणार .....किंवा धोंडिबाच्या कपड्यांच्या नमुन्यावर तिघांपैकी एकांच्यातरी रक्ताचे डाग मिळणार......अन तेवढं पुरेसं होतं -केस संपवायला. अन पुढल्या तीन दिवसांत हे दोन्ही अहवाल आले अन फौजदारांची भलतीच निराशा झाली.
'असं कसं शक्य आहे...??' ते जणू स्वतःच विचारात होते.
शव-विच्छेदन अहवालात स्पष्ट नमूद होते कि या हत्या कोणत्याही शस्त्राने नाही तर नख्यांनी झाल्या असाव्यात, जबडे तुटण्याचे कारण ते जबडे ताकदीने फाकवले असावे, नरडीचा भाग हा चावून-चावून फोडला असावा....त्यामुळे ह्या हत्या कोणत्याही माणसानी करणे अशक्य आहे. तसेच धोंडिबाच्या कपड्यांवर इतर कुणाच्याही रक्ताचे डाग सापडले नसल्याचे दुसऱ्या अहवालात नमूद केले होते. अन रक्त अंगावर न उडता या हत्या करणं शक्य नाही, हे काळेंना चांगलंच माहित होतं . म्हणजेच धोंडिबा निर्दोष होता...??
पण मग त्यानं सांगितलेली कहाणी....??? त्यावर कसा विश्वास ठेवायचा....??? हे असं कधी असत का....??? काहीतरी चुकतंय..... हि केस तडीस लावण्याचा फौजदार काळेंनी आता जणू चंगच बांधला होता. त्यांनी धोंडिबाला जीपमध्ये टाकून ते टाळगावाकडे निघाले.
चौकात आलेली पोलीस गाडी बघून गर्दी जमा झाली. काळेंनी धोंडिबाला जीपमधून उतरवलं. पुरावा नसल्यानं त्याला सोडत आहे पण केस संपेपर्यंत त्याला गाव सोडून जाता येणार नाही, फौजदारांनी पोलीस पाटलांना बजावलं अन ते निघून गेले.
****
धोंडिबाला गावी सोडून आता आठ दिवस व्हायला आले तरीही फौजदारांना काहीही सुगावा लागत नव्हता .त्यांनी या हत्याकांडानंतर सावकाराचा वाडा दोन वेळा पिंजून काढला होता, पण पदरी निराशाच आली होती. हि केस फारच गुंतागुंतीची होती अन आता तर ती डेडएन्डवर होती. एक-एक दिवस पुढं सरकत होता पण काहीही हाती न लागल्याने फौजदार आता इरेला पेटले होते. इकडं टाळगावात भुताटकीच्या कहाणीने चांगलाच जोर धरला होता. लोकं आता अंधाराचे बाहेर पडायला धजत नव्हते.सावकाराचा छिन्नविछिन्न देह बऱ्याचजणांना स्वप्नात दिसू लागला होता. सर्व गावच एका अनामिक दहशतिने पोखरला होता.
अखेर फौजदारांनी "स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग" या पोलीस ट्रेनिंगमध्ये शिकलेल्या थेरीचा वापर करायचं ठरवलं आणि त्यांनी धोंडिबाला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं. हवालदारंनी धोंडिबाला हजर केलं. काळेंनी धोंडिबाला आधीच स्पष्ट केलं कि त्याला कुठलाही त्रास दिला जाणार नाही. अन ते विचारू लागले-
"मला सांग, तुझ्या मालकाचं मागील सहा महिन्यात कुणाशी भांडण वगैरे....???"
"न्हाय सायब...!!"
"मग घरात काही वाद-विवाद....??"
"तसबी काय न्हवत...!!"
"मग कुणी माणूस, एखादी बाई वगैरे - भिखारी , जोगत्या, साधू बनून आली होती का, हत्यांच्या आधी आठ-दहा दिवसांत.....???"
"तस सांगता याच न्हाय पर तसं काय आसत तर गावातल्या बाकिच्यांनीबी बगितलं आसत कि ....!!"
"मग घरातल्या कुणाचं काही विचित्र वागणं....काही जादू-टोणा करण्याचा प्रयत्न , कुणाला तशी या गोष्टींची आवड....???"
"तसंबी काय न्हाय.....हा पर एक गोस्ट जरा इचितर वाटलीवती मला....!!"
धोंडिबाच्या या वाक्यावर फौजदारांनी कान टवकारले....
"ह्य समद ईपरीत हुयाच्या आदल्या दिशी मी , मालकीण बाई अन धाकलं मालक घराची सापसाप्पय करत हुतो. मी दिवाणखान्यातल्या मोठाल्या फोटू शिडीवर उभा ऱ्हाऊन पुशीत हुतो अन एक फोटू पडला. मालकांच्या पंजूबांचा दांडगा उंचीचा फोटू. मी उचलायला गेलो तर मागल्या बाजून त्यो फाटला आन त्यातनं कागदाची उळकुटी भायेर आली....ती त्या फोटवात दडवून ठेवली हुती भौतेक.....मी आडाणी हाय.....मी ती कागदं मालकास्नी दिली....तेंनी ती उगडून पायली आन लय खुशीत आलं....मला काय बोल्ल्ल न्हयत पण पन्नास रुपड्यांची नोट दिली....मी लय खुश हुन पाच रुपड्यांची दारूबी पिली त्यादिशी....त्यादिशी घरातली तिनी मुंडकी रातच्याला वरच्या माडीवर बराच येळ जागत हुती....बोलत हुती.....हासत हुती....समदी लय खुशीत हुती.....दुसऱ्या दिशी मी मालकास्नी 'खुशीत हाय आज' आस इचारलं तर ते खेकसले माज्यावर.....मी नाद सोडला आन तसबी मला काय घेणंदेणं नव्हत....."
फौजदार काळेंना जो एक धागा हवा होता- सुतावरून स्वर्ग गाठण्यासाठी, तो मिळाला होता. त्यांनी धोंडिबाला घेतलं अन ते टाळगावकडे रवाना झाले.
गावात पोहोचल्यावर काळेंनी शेतात गेलेल्या पोलीस पाटलांना बोलावलं आणि दोन हवालदार, धोंडिबा, पोलीस पाटलांना घेऊन ते सावकाराच्या वाड्याकडे वळले. त्यांना काहीही करून ते कागद शोधायचे होते. या हत्याकांडाचे सारे गुपित त्या कागदांतच आहे, असे त्यांना खात्रीपूर्वक वाटत होते. फौजदारांनी तशा सूचना बाकीच्यांना केल्या, सारी माणसं पिसाटल्यासारखी ते कागद शोधू लागली. तासभर तरी झाला, वाड्यात बरीच कागदं सापडली पण जी हवी होती ती सापडत नव्हती. अन शेवटी दीडेक तासांनंतर धोंडिबालाच कुठेतरीtते कागद सापडले .काळेंनी एखाद्या गिधाडासारखे त्या कागदांवर झेपावले . ते दोन जीर्ण झालेले कागद होते....रंग तांबूस झाला होता.....त्यांवरील लिखाण हे बोरूने लिहिले असावे.....पहिल्या कागदावर कोणत्यातरी गुप्तधनाबद्दल लिहिले होते.....अक्षर पुसत असले तरी थोडा प्रयत्न केल्यास ओळखू येत होते.......एका पितळी हंड्याचा उल्लेख होता.....सोन्याच्या हंडाभर मुद्रा जमिनीत गाडून ठेवल्याची माहिती होती....खाली कसला तरी नकाशा रेखाटण्याचा प्रयत्न केला होता......तो त्या गुप्तधनाचं ठिकाण दर्शवत असावा. काळे ते कागद घेऊन तडक वाड्यामागे पळाले. काय झालाय हे समजण्यासाठी बाकीची मंडळी मागून धावली. आता फौजदार काळे त्या खड्ड्यांजवळ उभे होते....अन हातातला तो नकाशाचा कागद गोल-गोल फिरवत काहीतरी ठोकताळा बांधत होते अन अचानक त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. काळेंना न्याहाळत बाजूला उभ्या असलेल्या पोलीस पाटलांची उत्सुकता शिगेला पोहिचली होती. न राहवून त्यांनी विचारलं-
"सायब....लागला का छडा ....??? आमास्नीबी सांगाकी फोड करून....!!"
भानावर आलेले फौजदार काळे बोलू लागले-
"पाटील , हे सगळं गुंतधनाचं प्रकरण आहे.....सावकाराला या कागदामधून गुप्तधनाची अचूक जागा मिळाली अन त्यांनी ते खोदून काढलं ....पण कुणीतरी त्यांच्यावर हल्ला करून ते पळवलं .....त्यातच त्यां सर्वांची हत्या झाली असावी...!!"
"ते खरं आसन कदाचित .....पण मी म्हंतो पाच-धा शेकांडात कसं मारलं कुणी तीन माणसांना ....आवं मुडदं बगुन भ्या वाटत हुतं ......ह्य माणसाचं काम वाटत न्हाय सायब ..!!" पाटील म्हणत होते त्यात तथ्य होतं ......तिन्ही लोकांचा ओरडण्याचा आवाज हा दहा -पंधरा सेकेंडच्या आत आला होता- निदान धोंडिबाचा जबाब तरी हेच दर्शवत होता. फौजदार काळेंनाही खरंतर त्याच्या या चोरीच्या थेरीवर जास्त भरवसा नव्हता कारण शव-विच्छेदन अहवालातही 'हे' मानवी कृत्य नसल्याच नमूद केलं होत.
पण मग हत्याकांडाचं रहस्य अजूनही उलगडलं नव्हतं.....फौजदार आता काहीशे हताश झाले होते....वैतागले होते......त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा तपास इथवर आणला होता अन उलगडा होते असं वाटताच प्रकरणाला अजून एक अज्ञात कंगोरा असल्याची जाणीव त्यांना झाली.......काहीतरी सुटतं होतं ....हातातली कागद सांभाळत ते वाड्याच्या समोरील बाजूस जीपजवळ आले. काहीशे निराश होऊन ते गाडीत बसले.
दुपारचे दोन वाजत आले असतील, फौजदारांनी ते कागद पुन्हा तपासायला सुरुवात केली. गुप्तधनाची माहिती अन नकाशा पहिल्या पानावर होती.....दुसऱ्या पानावरची शाई इतकी उडाली होती कि काही कळणं अशक्य वाटत होतं .....फौजदारांनी खिशाला लावलेलं पेन काढलं अन अस्पष्ट दिसणारी अक्षरे जोडण्याचा ते प्रयत्न करू लागले.....अन एक-एक शब्ध जणू कागदावर जन्म घेऊन लागला..... फौजदार आता निराशा झटकून कामाला लागले ......एक-एक शब्द जुळत होता....त्याच अर्थपूर्ण वाक्य तयार होत होतं .....पोलीस पाटील आणि बाकीची मंडळी शेजारच्या बदामाच्या झाडाखाली सावलीला थांबली होती....एकमेकांना खैनी देत गप्पा मारत होती.....फौजदारांच्या कामात अडथळा आणून चालणार नाही, हे त्यांना माहिती होतं .....फौजदार आता पिसाटल्यासारखे हात चालवत होते.....कागद निम्म्याला वर त्यांनी संपवला ....पण एक-एक शब्द वाचताना त्यांना पूर्ण मजकूर कळाला नव्हता.....हा हा म्हणता पुढील दहा मिनिटात तो मजकूर पूर्ण झाला अन फौजदार अधाशासारखे तो वाचू लागले....अन त्यांचे डोळे विस्फारले ...दोन मिनिटात तो कागद वाचून झाला अन काळे तडक वाड्याच्या मागील दिशेने पळत सुटले.....बाकीच्यांची तारांबळ उडाली.....फौजदार थेट त्या खड्ड्यांजवळ पोहोचले ....अन टुणकन उडी मारत एका खड्ड्यात उतरले.....जमलेला सुका झाडपाला हातानं बाजूला करत वेड्यासारखं काहीतरी शोधू लागले.....पण काही मिळालं नसावं- कारण ते बाहेर येत दुसऱ्या खड्ड्यात उतरले.....पुन्हा शोधू लागले.....अन त्यांच्या हाताला काहीतरी लागलं.....त्यांनी पाचोळ्यातला तो हात वरती काढला.....हातात एक फुटलेल्या मडक्याचा तुकडा होता.....
तो पाहताच फौजदारांचा श्वास फुलला ..... कपाळावर घर्मबिंदु जमा झाले.....हृदयाची धड-धड वाढली.....त्यांची ती अस्वस्थता पाटलांनी ओळखली ....
"सायब....आदी भायेर या बगु......मंग बुलू .....सायबास्नी भायेर काडा लवकर.....!!" पाटील काहीशे खेकसले. धोंडिबा अन हवालदारांनी काळेंना बाहेर काढलं अन ते वाड्यासमोरच्या बदामाच्या झाडाकडे सावलीला जाऊन बसले. थंडगार पाण्याचा एक पूर्ण तांब्या पोटात रिचवल्यावर फौजदारांना थोडं बरं वाटलं....अन ते बोलू लागले-
"पाटील....विश्वास ठेवावा कि नाही...अजूनही समजत नाही पण हे भुताटकीचंच प्रकरण वाटतंय....!!"
हे वाक्य ऐकून सर्वांचेच डोळे विस्फारले ....काहीतरी ठोस पुरावा असल्याशिवाय फौजदार असं काही बोलणार नाहीत, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं .....अन ते आता पुढं काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.....
अन फौजदार सांगू लागले-
"अहो या दोन कागदांवरून असं कळतंय कि गुप्तधन म्हणजेच सोन्याच्या मुद्रांचा हंडा हा राघोबा सावकारांच्या पंजोबांनी वाड्यामाग त्या घड्ड्याच्या ठिकाणी पुरला होता....हे धन त्यांनी भानामती-काळा जादू करून मिळवलं असावं - कारण ते काळ जादू शिकले होते....त्या कागदात तसं नमूद आहे....तर त्यांनी हे गुप्तधन आपल्या वंशजांसाठी वाड्यामाग पुरून ठेवलं.......नकाशातली जागा तीच आहे.....पण सावकाराचा अंदाज चुकल्याने दोनदा खड्डे खणले असावे.....इतर कुणी त्या धनाचा लाभ घेऊ नये म्हणून काळ्या जादूनं एक पिशाच मडक्यात भरून, वरून लाखेचा लेप लावून ते मडकं त्या हंड्याच्या इथेच पुरलं.....ते पिशाच फारच अघोरी अन घातक आहे.....मडकं फुटून ते बाहेर आल्यास दिसणाऱ्या प्रत्येकाला ते मारून टाकेल आणि सगळं सोनं कोळसा होईल......ते माणसाचा जबडा उखडवून.....
नख्यांनी त्याचे डोळे काढून नरडीचा घोट घेतं .......पोट फाडून आतडी खातं .....असं ते रक्तपिसासू पिशाच आहे.....पण एखदा सोनं कोळसा बनल्यावर त्या पिशाचाच काम संपेल अन ते नाहीसे होईल......त्याच वर्णन आहे त्या कागदात . राघोबा सावकाराला हा कागद मिळाल्यावर तो खुश झाला पण धोंडिबाला त्याने काहीही सांगितलं नाही....घरातील तिघा जणांनी आधल्या रात्री सगळं ठरवलं आणि दुसऱ्या रात्री धोंडिबा झोपल्यावर ते वाड्यामाग खणण्याच्या उद्योगाला लागले असावे.....पण धन मिळवण्याच्या लालसेत त्यांनी हे दुसरं पान वाचण्याचा साधा प्रयत्नही केला नसल्याचं दिसतं."
हे सगळं ऐकल्यावर पोलीस पाटलांनी डोक्याला हात लावला अन बोलले-
"भलतंच ईपरीत घडलं ह्य सावकाराच्या घरासंग .....लयं वंगाळ झालं बगा ......मरताना पण लालूच सुटली न्हाय सावकाराची....!!"
पण फौजदार काळे जे काही बोलले तसच घडलं असावं का.......त्याची शहानिशा करण्यासाठी स्वतः काळे पुन्हा वाड्यामागे जाऊ लागले. बाकीचे पून्हा मागून गेले. मातीच्या ढिगाजवळ पडलेलं कुदळ घेऊन फौजदार त्या खड्ड्यात उतरले ......पाटलांनीही मागून उडी मारली....अन ते तो खड्डा आणखी खणू लागले....पाटीभर माती फावड्याने बाजूला घेत पाटलांनी कुदळीचा प्रहार केला अन ठणssणssणssणss असा आवाज झाला....फौजदार अन पाटील खाली बसले अन हातांनी माती पोखरून पहिले तर एका पितळी हंड्याच फूटभर व्यासाचं तोंड दिसू लागलं....त्याच तोंड लाखेनी लिंपल होतं .......फौजदारांनी कुदळ घालताच लाखीच्या खाडकन ठिकऱ्या पडल्या अन फौजदारांनी आत हात घालून कोळसेच असल्याची शहानिशा केली...!!
फौजदार काळेंच्या कारकिर्दीतील हि विचित्र केस आता संपली होती पण सरकारी दस्तऐवजात मात्र हे हत्याकांड अज्ञात इसमाने केल्याचं त्यांना नमूद करावं लागलं....!!
@समाप्त@
दीपक पाटील