धर्मसंकट
(पूर्ण कथा)
उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्यनारायण आपली सारी शक्ती पणाला लावून तळपत होता. उकाड्याने लोकांनाच काय, मुक्या प्राण्यांनाही जेरीस आणलं होतं. नेहमीसारखाच आजचा दिवस उगवला. भूतटाकळीतली ती सकाळही नेहमीसारखीच होती. त्यात विशेष उल्लेख करण्यासारखं काहीही नव्हतं. उन्हाचा पारा हळूहळू उंची गाठू लागला. गावात भटक्या कुत्र्याशिवाय कुणीही नजरेस पडत नव्हतं. दिवसा नजरेसही न पडणारी हि गावकरी लोकं दिवस ढळताच मात्र जत्रा भरल्यासारखी गावात वावरत. हि भूतटाकळी गावातील लोकांची खासियत होती. या गावात जणू तो एक रिवाजच झाला होता. अन अचानक भर दुपारी गावात अनोळखी शिरकाव झालानं मेलेल्या नागासारखं निपचित पडलेलं ते गाव खडबडून जागं झालं. एक इसम ताडताड पाऊले टाकत त्या जीर्ण गावात शिरला. वयस्कर वाटणाऱ्या त्या इसमाची चाल मात्र दमदार होती. गावात शिरताच लागणाऱ्या मुख्य चौकात थांबून त्यानं चोहीकडे नजर टाकली. तो कसलासा शोध घेत असावा , प्रथमदर्शी तर तसंच वाटत होतं. आळशी गावकऱ्यातील काहीजण आपल्या घराच्या खिडकीतून पाहू लागले. हा आगंतुक उगवलेला पाऊण गावकऱ्यांची उत्सुकता चाळवायला पुरेसा होता. पण जसं काही गावकऱ्यांनी त्या पाहुण्याला न्याहाळलं, तसं मात्र साऱ्या गावच्याच पोटात जणू ढवळाढवळ सुरु झाली. तो वृद्ध इसम पाहून गावातील लहान्यांची पाचावर धारण बसली....बायाबापड्या आपापल्या कार्ट्यांना दारं -खिडक्यांतून खेचून मागे घेऊ लागल्या. त्या वृद्ध पाहुण्याने लहानांनाच काय, मोठ्यांच्याही तोंडच पाणी पळवलं होतं. त्यांची ती गंभीर मुद्रा, भेदक नजर अन चाणाक्ष हालचाली गावकऱ्यांना मुळापासून भेदरून टाकण्यास पुरेश्या होत्या. गावकरी या ना त्या आडोश्याने लपून त्या वृद्धाच्या हालचाली टिपत होते, पण त्याच्या समोर जाण्याची कुणाचीच हिम्मत होत नव्हती. तो वृद्ध इसम आता हळूहळू पाऊले टाकत गावातून चालत होता, जणू तो गावाची रेकी करत असावा. चालत - चालत तो अगदी त्या टोकाशी असणाऱ्या भग्न अश्या नवलाई देवीच्या मंदिरापर्यंत गेला अन पुन्हा त्याच धीम्या गतीने परत चौकाकडे येऊ लागला. सारा गाव फिरून झाल्याची खात्री करत तो आता त्या चौकात येऊन पोहोचला. त्याने पुन्हा एकदा त्या चौकावर अन आजूबाजूच्या परिसरावर आपला भेदक कटाक्ष टाकला. त्याला चौकाच्या एका बाजूला एक विहीर दिसली. तो तिकडे निघाला. विहिरीत पाणी आहे, हे पाहून त्याची मुद्रा काहीशी प्रसन्न झाली. त्याची ती प्रसन्न मुद्रा पाहून लपून पाळत ठेवणारे गावकरी आणखीच चिंतीत झाले. आता हे "धर्मसंकट" अजून काय -काय पाहायला लावणार, लोकं विचार करत होती. अन पुन्हा चौकात येताना त्या वृद्धाने आपल्या दोन्ही हातात एक दगड उचलला. तो दगड त्याने त्या चौकाच्या मध्यभागी आणून ठेवला. गावकऱ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचू पाहत होती. गावात त्या वृद्धाने सुरु केलेला हा बदल अनपेक्षित अन तितकाच नकोसा होता. साऱ्या गावाला धडकी भरवणारा तो वृद्ध इसम पुढील तीन - चार तास अविरत मेहनत करत होता. त्या चौकात त्याने दगडांचा एक मोठ्ठा ढिगच उभा केला होता. सायंकाळची चाहूल आता लागली होती. क्षितिजावर पसरलेल्या लालसर प्रभेत घरट्याकडं निघालेली पाखरं दिसू लागली होती. घरातून बाहेर पडायला उत्सुक गावकरी त्या अभद्र पाहुण्याच्या निरोपाची वाट पाहत घरातच दबकून बसली होती. थकून काहीवेळ विश्रांती घेत असलेला तो वृद्ध अखेर उठला, तशी गावकरी मंडळी खुश झाली. हळूहळू पाऊले उचलत गावातून तो वृद्ध बाहेर पडू लागला. तो चांगलाच दूर गेल्याची खात्री होताच कोंडमारा केलेली जनावरं बाहेर पडावी, तशी गावकरी मंडळी बाहेर पडली. साऱ्यांच्या मुखात त्या अभद्र पाहुण्याचंच नाव होतं. तो कोण आहे , तो का आला असावा, तो आता काय करणार आहे.....एक ना अनेक प्रश्न.....!!! रात्रीच्या अंधारात जेव्हा भेदरलेले गावकरी पिंपळाच्या पाराखाली जमू लागले, तेव्हा तिथे चौकात घरं असलेली तिनं कुटुंब आधीच हजर होती. तो अभद्र म्हातारा चौकात प्रकटल्यापासून ती कुटुंबं इतकी घाबरली होती, कि ती लोकं आपल्या घरी जाण्यासाठीही आता तयार नव्हती. सर्वजण ना ना प्रकारचे तर्क लढवत होते. अन चौकात घरं असणाऱ्या कुटुंबातील एक बाई अचानक विव्हळू लागली-
"आता काय आपलं खरं न्हाय.....तो उलट्या काळजाचा म्हातारा आपल्याला सोडत न्हाय....माझ्या लहान्यान तेच तोंड पाह्यलं, तेव्हपासून पोरगं अगदी कोमेजलंय बघा....काहीतरी करायला पायजे त्याच.....!!"
तशी शांत असणारी गर्दी आणखी कुजबुजू लागली. गावकरी खरंच घाबरले होते. त्या वृद्ध इसमाचे नाव निघताच लहानगी पोरं तर भोकांड पसरून ओरडू लागली. गर्दीची अस्वस्थता पाहून पंच आण्णा बोलायला उभे राहिले-
"घाबरून जाऊन कसं चालेल.....??? आपण त्याला घाबरवायचं का आपणच घाबरायचं....??? हे गाव आपलं आहे.....तो परका आहे....धीर सोडू नका...उद्या तो परत आला, तर त्याला आपला हिसका दाखवू......"
तेवढ्यात एकजण बोलला-
"अहो.....बघितलंय का तुम्ही त्याला.....त्याचं हिडीस रूप अन ती घातकी नजर.....कोण जाणार त्याच्यापुढं.....??? मी तर नाही बाबा....!!!"
यावर चिडून आण्णा उद्गारले-
"कोण येणार रं माज्यासोबत उद्या.....??? बोला कि...!!"
पण गर्दी ढिम्म....कुणीही होकार देईना....!!
"मग भोगा आपलं कर्म.....मलातरी काय करायचंय....!!" म्हणत आण्णा वाऱ्याचे वेगाने तिथून गायब झाले.
*****
दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी गाव सामसूम होता. तो वृद्ध कदाचित येणार नाही, या आशेने गावकरी खुश होत होते. अन इतक्यात त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. कुर्र्रर्र्रर्रर्रर्रर्रर्र...कुईईई...कुर्रर्रर्रर्रर्र... कुईईई आवाज हळूहळू गावाच्या दिशेने सरकू लागला. गावकरी आपल्या दारं- खिडक्यांतून पाहू लागले. हातात एक पितळी बादली अन डोक्यावर कसलेसे पोते घेऊन तो वृद्ध गावाच्या दिशेने येत होता. त्याला पाहून गावकऱ्यांना पुन्हा धडकी भरली. आता हा आज आणि काय प्रताप करणार, गावकरी तर्क लढवत होते. हळूहळू चालत तो वृद्ध इसम चौकात पोहोचला. हातातली बादली अन डोक्यावरच ते जड पोतं खाली ठेवून त्याने चौकावर नजर मारली अन मोठ्याने हसला. त्याचं ते हसू पाहून गावकरी आता चांगलेच धास्तावले. क्षणाचाही विलंब न करता त्याने काल जमवलेल्या दगडांचा तो ढीग चापचायला सुरुवात केली. दगड उलटे - पालटे करून नीट तपासत त्याने ते दगड एकावर एक रचायला सुरुवात केली. आता मात्र त्याच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला होता. त्याच्या तोंडून पडणारे ते शब्द गावकऱ्यांच्या कानात विंचवाच्या डंखासारखे भासत होते. गावकऱ्यांना आता कळून चुकले, हे अभद्र मंत्र काहीतरी घातपात नक्कीच करणार. मंत्रांच्या त्या जीवघेण्या शब्दांमुळे आता गावकऱ्यांना त्या वृद्ध इसमाचा हिडीस चेहराही पाहणे अशक्य झाले. बाया आपापल्या पोरांचे कान झाकू लागल्या. तासाभरात त्या दगडांचा एक चबुतरा रचल्यावर त्या वृद्धाने ती पितळी बादली त्या विहिरीवरून भरून आणली. आता त्याने सोबत आणलेले ते जड पोते सोडले, त्यात चुना होता. त्या चुन्याचा गारा करून त्याने आपले काम पुन्हा सुरु केले. चबुतऱ्याच्या साऱ्या खाचा भरून त्याने तो चबुतरा पक्का केला अन वरचा पृष्ठभागही चुन्याच्या पातळ गिलाव्याने समतल करून घेतला. आता तो गिलावा सुकण्यासाठी त्याला काही वेळ वाट पाहावी लागणार होती. तोपर्यंत तो मांडी घालून त्या गाऱ्याशेजारी बसला अन त्याने उरलेल्या चुन्याचा एक आकार बनवायला सुरुवात केली. त्याच्या तोंडून पडणाऱ्या त्या मंत्रांचा आवाज आता चांगलाच वाढला होता. तो आकार तयार होताच चबुतऱ्याचा गिलावा सुकल्याची त्याने खात्री केली अन बनवलेला तो आकार त्याने चबुतऱ्याच्या मध्यभागी ठेवला. आता दिवस उतरणीला लागला होता. आकाशात कालचीच लाली दिसू लागली होती. त्या वृद्धाने आता आपल्या करड्या आवाजात एक वेगळाच शब्दघोष सुरु केला. त्या मंत्राने वातावरण आणखीच गंभीर बनले. गावकरी आता घायतुकीला आले होते. हा हिडीस म्हातारा आपला कर्दनकाळ ठरणार आहे, याची त्यांना जाणीव झाली असावी. अन इतक्यात साऱ्या गावावर एक वावटळ फिरू लागली. या कपटी म्हाताऱ्यानेच हे नवीन काहीतरी आणलं आहे, गावकऱ्यांना खात्री होती. ती वावटळ घोंगावत क्षणात साऱ्या गावात फिरून चौकात दाखल झाली अन अतितीव्र वेगाने चबुतऱ्यावरील त्या आकारात सामावली. आता अंधार चांगलाच दाटू पाहत होता. एक विकट हास्य करत त्या वृद्ध इसमाने ती रिकामी बादली अन पोते उचलले अन तो गावाबाहेर पडू लागला.
त्याच्या गमनाची वाट पाहत असलेले गावकरी धडधड सांभाळत बाहेर आले. अंधारात काही धाडशी लोकं त्या चबुतऱ्याजवळ पोहोचले अन समोरच दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली. चबुतऱ्यावरील तो चुन्याचा आकार किंचित चमकत होता. त्यातून निघणारी ऊर्जा संबंध गावासाठी धोक्याची घंटा आहे, काही जाणत्या व्यक्तींनी हे जाणले. रात्रीच्या अंधारात पिंपळाच्या पारावर गावकरी पुन्हा जमले. पण त्या म्हाताऱ्याने उभ्या केलेल्या या धर्मसंकटावर काहीही तोडगा निघाला नाही. आता हे गाव सोडण्याशिवाय पर्याय नाहीये, साऱ्यांचं यावर एकमत झालं.
*****
दुसरा दिवस उजाडला. भूतटाकळी गावच्या शेजारीच असणाऱ्या भिवापूर गावातले पाच -पन्नास लोक गावाबाहेर असणाऱ्या डोंगराकडे चालले होते. त्या सर्वांचे चेहरे चिंतीत होते, ते घाबरलेले दिसत होते. अखेर पायपीट संपवून ते डोंगरपायथ्याला पोहोचले. तिथे उंबराच्या झाडाखाली एक झोपडी दिसत होती. भिवापूर ग्रामस्थांपैकी एका वृद्ध इसमाने पुढे होत आवाज दिला -
"कानिफनाथ महाराजssss……!!!”
तसा झोपडीच दार उघडून एक वृद्ध इसम बाहेर आला. त्याच्या कृश देहाभोवती जणू एक वेगळीच सुष्ट ऊर्जा घोंगावत होती. त्या वृद्धांचे नाव कानिफनाथ होते. ते एक संन्याशी होते. बाहेर येताच त्यांनी हसून सर्व लोकांवर एक नजर टाकली. जमलेल्या साऱ्यांची मुद्रा आता प्रसन्न झाली, मघापासून लागून राहिलेली चिंता कुठल्या कुठे पळून गेली.
तो वृद्ध इसम बोलू लागला-
"महाराज.....अहो, सारे भिवापूरकर काल रात्री झोपलेच नाहीत.....साऱ्यांना तुमची चिंता लागून होती. काय झालं शेवटी, संपलं का ते संकट....??? निघाला का काही उपाय....???"
सारे गावकरी आता कानिफनाथ महाराज काय बोलताहेत हे ऐकू लागले.
"हे पहा.....ईश्वराच्या साहाय्याने मी त्या धर्मसंकटावर मार्ग काढण्यात सफल झालो आहे. आता कसलीही चिंता करायचं काही कारण नाहीये....!!!" महाराज प्रसन्न मुद्रेने बोलले.
त्यांची ती वाक्ये ऐकून लोकांनी महाराजांचा जयजयकार केला. त्यांना थांबण्याचा इशारा करत महाराज विचारू लागले-
"पण हे अभद्र संकट उद्भवलंच कसं....काय इतिहास आहे या भूतटाकळी गावाचा....???"
अन आता ते वृद्ध इसम बोलू लागले-
"महाराज......काय सांगावं.....अहो, सहा-सात पिढ्यामागची कहाणी आहे हि. भूतटाकळी हे त्या गावाचं नाव नव्हे- टाकळी असं नाव होतं त्याच. मराठेशाहीचा तो सुवर्णकाळ.....!!!! स्वराज्य चांगलं फोफावत चाललं होतं अन परकीय गिधाडांची नजर त्यावर पडली. मराठेशाहीचा बिमोड करण्यासाठी तीस हजारांची एक फौज दिल्लीवरून दख्खनवर चाल करून आली. इथून चार कोस दूर एका गावाजवळ तुंबळ लढाई झाली. पण दहा हजार मराठा बहाद्दरांनी तीस हजार यवनांची धूळधाण केली. ते यवन सैरावरा पळू लागले. अन त्यातली एक सात - आठशे धारकरयांची तुकडी जीव वाचवण्यासाठी टाकळीजवळच्या जंगलात येऊन लपून बसली. पण उरी अपमानाचा भडका उडाला होता त्यांच्या. मध्यरात्रीनंतर ती सैतानी टोळी निपचित झालेल्या टाकळी गावावर तुटून पडली. जेमतेम साठ - सत्तर घरांचं छोटंसं गावं ते....अन एक-एका घरात हे चार- पाच तलवारधारी शिरले. दिसेल त्याची मुंडकी छाटायला सुरुवात केली. बायाबापड्या बाटवल्या. लहान पोरांनाही सोडलं नाही. सारा गाव एका रात्रीत मारून खतम केला त्या नराधमांनी.....!! गावातलं एकमेव असं नवलाई मातेचं मंदिरही त्यांनी सुरुंग लावून पाडलं. एक - दोन गावकरी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात सफल झाले. त्यांनीच हि करून कथा आमच्या गावात येऊन सांगितली. अन तेव्हापासून हा सारा गाव ओस पडला तो गेली चारशे वर्षे ओस आहे. अन त्या दीड- दोनशे लोकांचे आत्मे आजही त्या गावात फिरताहेत....!!! त्या गावात चुकून गेलेला व्यक्ती कधीही परत आला नाही आजवर.....!!!
पण महाराज.....आपण हि किमया कशी केलीत....???"
त्यावर खळखळून हसत कानिफनाथ महाराज उद्गारले-
"किमया करणारा मी कोण....?? कर्ता - करविता तो ईश्वर.....आपण सर्वजण एक निमित्त आहोत. पण तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे का....???"
त्यावर उत्साहाने सर्वजण "हो" म्हणाले.
महाराज हसत म्हणाले -
"मी सांगण्यापेक्षा आपण सर्वजण माझ्यासोबत येऊन स्वतःच का पाहत नाही....???"
हा प्रश्न ऐकून सर्वजणच स्तब्ध झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर असणारी ती अनामिक भीती जाणून कानिफनाथ महाराज पुन्हा हसले अन म्हणाले-
"घाबरू नका.....मी आहे तुमच्यासोबत...चला माझ्यामागे....!!!"
अन ते ताडताड करत पुढे चालू लागले. गर्दी त्यांच्या मागे जाऊ लागली. ते सर्वजण आता भूतटाकळीच्या दिशेने जात होते.
*****
भूतटाकळी गावाच्या चौकात येताच साऱ्यांच्या नजरा त्या चबुतऱ्यावर खिळल्या. उन्हाच्या तिरिपीत चुन्याचं ते शिवलिंग विलक्षण चमकत होतं.....!!!
ते पाहून नकळत साऱ्यांचे हात जोडले गेले. अन ते वृद्ध गृहस्थ विचारू लागले-
"महाराज......पण ह्या शिवलिंग स्थापनाने हे संकट टळलं....??? कसं काय....???"
कानिफनाथ महाराज आता बोलू लागले-
"पहिल्या दिवशी मी गावात जेव्हा पाऊल ठेवलं, इथली प्रचंड नकारात्मक ऊर्जा मला जाणवली. या गावात असंख्य अतृप्त आत्मे घोंगावत आहेत, हेही मला कळालं. गावाची रेकी करताना मी नवलाई मातेचं ते भग्न मंदिर पाहिलं. गावातला एकमेव ऊर्जाश्रोतच संपला म्हटल्यावर, गावात नकारात्मकता स्तोम माजवणार, हे निश्चित होतं. या गावातला ऊर्जेचा समतोल बिघडला होता. शिवलिंगाच्या स्थापनेने तो पूर्ववत झाला. शिवलिंग स्थापनेवेळी मी त्या अतृप्त आत्म्यांच्या शांतीसाठीही करुणराज शिवाकडे प्रार्थना केली. आता हा परिसर पूर्णतः सुरक्षित आहे....!!"
सर्वांनीच हात जोडून कानिफनाथ महाराजांचे आभार मानले.
(समाप्त)
- दीपक पाटील