मार्गशीर्ष संपत पौष लागत असतांना थंडीनं चांगलंच बाळसं धरलं होतं. आजुबाजुच्या शेतात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेतांनी गव्हाची धानी शाल पांघरली होती जणू.कापसाची पक्व बोंडे थंडीतही तडकत पांढरं सोनं बाहेर ओतीत होती. बाकी सारी जिकडे तिकडे आडदांड वाढलेली श्रीमंती केळीच केळी . तापीचं भुमीगत पाणी पिऊन काळी माय थंडीतही बहराचं दान भरभरून देत असल्याची जाणीव कल्याण व दिनास जाणवत होती.
चरणमाळ घाटातलं आपलं गाव सोडत दोन दिवसांपासून त्यांनी शहादा, शिंदखेडा,शिरपूर तालुक्यातील सारा तापीकाठ चेंधूनही अचूक गावाचा त्यांचा शोध संपला नव्हता. आज दुपारपासून त्यांनी अनेर नदी ओलांडून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करत गावं धुंडाळण्यास सुरवात केली होती. दिनाचा अहवा डांग कडच्या आदिवासी पट्ट्यात मस्त जम बसला होता. त्यापेक्षा एका वर्षानं ज्युनिअर कल्याणला दवाखाना टाकण्यासाठी तापीकाठावरील एखादं मनाजोगते गाव त्यांना मिळत नव्हते. बऱ्याच गावांना आधीच एकेक -दोन दोन डाॅक्टर प्रॅक्टीस करत होते.अशा ठिकाणी अनुभव नसलेल्या कल्याणला सुरूवातीसच स्पर्धा करणं जमलं नाही तर उगाच त्याचा आत्मविश्वास जायला नको म्हणून दिना भटकंती करत होता. चारच्या सुमारास ते तापी व अनेरच्या दुआबात(घोशात) आले.सात आठ किमी अंतर झालं तरी गाव लागेना.रस्ता तर खराब खराब होत चाललेला. जिकडे तिकडे केळी व गव्हाचीच शेती.रस्ता नाल्या काठाकाठानं पळत शेतात हरवत घुटमळत होता. नाल्याच्या दोन्ही बाजूला बोरींची झाडेच झाडे दिसू लागली. रस्त्याच्या कळेलाच विहीर व माणसं दिसताच कल्याणनं दिनास गाडी उभी करायला लावली. विहीरीवर केळ्याचा पाडा पाडणारी माणसं बागेतून घड आणत कमरेच्या उंचीचे घड ट्रकवर चढवत होती. साठी ओलांडलेला बहुतेक मळ्याचा मालक असावा लोखंडी पट्ट्याच्या पलंगावर बसून लक्ष देत होता. विहीरीच्या बाजुला मागच्या वर्षाच्या कापसाच्या काड्यांचा मोठा ढिग पडला होता. त्यावर भोपळ्याच्या व वालांच्या वेलांनी आपलं साम्राज्य पसरवलं होतं. पट्ट्या-पट्ट्याचे काबरे चितरे भोपळेच भोपळे ढिगावर लटकत होते.हरण्या वालही वालाच्या शेंगांनी बहरलेला होता. रस्त्यापलीकडील बोरीच्या झाडावरील बोरांचा घमघमाट सुटत होता.दिना व कल्याणनं हात पाय तोंंड धुतले.
" बाबा, पुढं कोणतं गाव लागणार?" कल्याण विचारता झाला.
" बसा! कुठून आलात?कुठं जायचं?"
" आम्ही चरणमाळ परिसरातले.
दवाखाना टाकण्यासाठी चांगलं गाव शोधतोय!"
" असं का! मग आमचं गाव चांगलंच आहे! पुढे हा नाला उतरलं की खड्ड्यात आमचं 'बोरवण' गाव आहे.पुढे अनेर व तापी.बाकी गावं नदीपल्याड आहेत."
" गावात कुणी डाॅक्टर आधीचे?"
" डाॅक्टर! या आडवळणी गावात कोण येतं बाबा! नऊ दहा किमी अंतर जाऊन व नदी ओलांडल्यावर मोठं गाव तिथंच जावं लागतं आजारी पडल्यावर!"
माणसाच्या या बोलण्यानं कल्याण व दिनाच्या आशा पल्लवीत झाल्या.
"बरं बाबा जातो आम्ही मग गाव पाहतो!"
" थांबा पोरांनो! मी पण येतो सोबत गाव दाखवायला! फक्त हा ट्रक भरला गेला की निघू, थोडं थांबा! तो पावेतो समोरच्या झाडाची बोरं खा! आमच्या बोरवणची बोरं दूर दूर प्रसिद्ध आहेत.लांब लांबून लोक येतात बोर घ्ययला!"
दिना व कल्याण बाबानं दाखवलेल्या नाल्याकाठावरील बोराकडं जाऊ लागले.
" उमेश, कल्याणी! या पाहुण्यांना बोर द्या रे!" बाबांनी विहीरीवरून हाकारा भरला.
रस्ता ओलांडताच नाल्याच्या काठानं बोरीच बोरी होत्या. हंगाम असल्यानं लाल, पिवळी,हिरवी, बोरं पाहून डोळे व चित्त पालवी सुखावत होत्या. वासानं तर धुंदीच चढत होती. काही मजुर बोर पाडत, हलवत, वेचत होती.पथाराच पथारा. एका झाडाखाली गोण्या भरल्या जात होत्या तिथंच कल्याणच्या वयाचाच मुलगा उभा होता. त्यानं त्यांच्या हातात बोरं ठेवली. व पुढच्या झाडाकडं इशारा करत ती बोरं पण चाखायला लावली. बोरांची चव खरच वेगळीच होती. ताजी चविष्ठ बोरं तृप्ती देत होती. कल्याण पुढं निघाला. झोपाळ्या बोरी टाकत तो पुढे जाणार तोच त्याचं लक्ष झाडाआड गेलं. बोरी आड हातातल्या काठीनं अलवारपणे फांदीला टिचकी मारत त्याच्याच वयाची पोर! छे बाईच! बोरं झटकत होती. तिचं लक्ष कल्याणकडं जाताच ती सावध झाली. कल्याण बोरीचा बहर विसरला ,बोर खाणं विसरला व पोरीकडंच पाहू लागला. क्षणभर.त्यास जाणीव होताच तो खाली पडलेली बोरं वेचू लागला. तोच
" ती नका खाऊ! या इकडच्या झाडाची खा!" वाऱ्याच्या मंद झुळकीनं बोरं टपटप गळावीत तसे बोरीच्या बनात बोल घुमले.
" कल्याण! बोर मस्त लगडली रे!"
मागून येत दिना पोरीकडं पाहत म्हणाला.
कल्याणनं त्याच्याकडं रागानं पाहत
" होय! पण सांभाळ बोरीला काटेपण आहेत.ओरखडे उठतील,चल!" सांगत बोरे उचलत माघारी फिरला.
विहीरीवर केळीचा ट्रक भरला गेला.
बाबानं " कल्याणी चल !" म्हणून आरोळी ठोकली व मघाची ती मुलगी आली. तिच्या अॅक्टिवावर बाबा बसले व त्या मागोमाग कल्याण व दिनाची गाडी निघाली. वळसा घालणारा नाला उतरून लाल भुरसट मातीचं टेकाड उतरताच गाव दिसू लागलं. नदी घोशात एकांतात वसलेलं गाव आपली जुनी संस्कृतीच्या खुणा जपून पहुडल्यागत दिसत होतं.गावाच्या सुरुवातीलाच भलीमोठी पायविहीर लागली.तिच्याजवळ जुनाट पिंपरणीचं झाड. पुढे गल्लीतून जाताच एक मोठा चौक लागला.चौकातच बसकी वाटणारी पाण्याची टाकी. अॅक्टिव्हा चौकात दुमजली रंगीत मोठ्या माडीजवळ उभी राहिली.तसे सारे थांबले. कल्याणची नजर अनपेक्षित पणे पोरीवर गेलीच.
" कल्याणी, म्हशीची धार काढली गेली असेल तर दुधच आण मस्त!" बाबानं त्या पोरीला फर्मावलं.
बाबापाठोपाठ कल्याण दिना माडीच्या कमानीतून मधला चौक पार करत देवळीतून मध्ये आले. 'सजन भिकाजी चौधरी,सरपंच' नावाची पाटी वाचताच बाबा सरपंच असल्याचं दोघांनी ओळखलं.
" पोरांनो सातशे उंबऱ्यांचं तीन हजार डोईचं आमचं बोरवण गाव. आडवळणाचं असलं तरी केळी बोरी, कापसानं समृद्ध आहे. तालुक्यापासून पस्तीस किमी अंतरावर. हाताला गुण असेल तर तुमचा दवाखाना नक्कीच चालेल. चार पाच किमी अंतरावर तापी काठावर व बाजुला अनेर काठानं ही छोटी गावं आहेत. तिथं ही डाॅक्टर नाहीच ." बाबा सारं बयाजवार सांगू लागले.
तोच दूधाचे ग्लास घेऊन मुलगी आली.
" ही आमची कल्याणी! अनेर नदी पलीकडे धुळे झेड. पी.त शिक्षीका.आज रविवार म्हणून घरी!" बाबानं परिचय करून देताच मुलीनं ग्लास देत महा मुश्कीलीनं हसत नमस्कार केला.
" मी डाॅ.दिनेश व हा कल्याण!" दिनानं पोरीकडं पाहत परिचय देण्याचा प्रयत्न केला पण तिकडे दुर्लक्ष करत मुलगी घरात निघून गेली.
दुध घेताच बाबानं त्यांना घेत गावात फेरफटका मारला. दोन तीन लोक जवळ येताच
" हे डाॅक्टर आहेत,आपल्या गावात दवाखाना टाकताहेत!" सांगितलं.
" बापू मग तर साऱ्या गावाची सोय होईल, टाका टाका!" जमलेले दुजोरा भरू लागले. बाबा गावाचे सरपंच असल्यानं गावात चांगलाच मान व वजन दिसत होतं. त्यांनी दवाखान्यासाठी त्यांचंच जुनं घर दाखवलं व या ठिकाणी तुम्हास काहीच हरकत नसल्याचा विश्वास दिला. सहा वाजताच दिना व कल्याण 'दोन तीन दिवसात सामान आणतो', सांगत रजा घेतली.
बाबा तर रात्रभर मुक्काम करायला लावत होते पण शिरपूरला सोय असल्याचं सांगत ते परतले. परततांना गावात येणारी गुरे, मजुर लाल फफुट्याचा धुरळा उठवतांना त्यांना भेटले. पण कल्याणनं मनाजोगतं गाव मिळाल्याच्या खुशीत व अंधार लवकरच पडणार म्हणून गाडी जोरात दामटवली.
बी.ए.एम.एस मुंबई ला करून कल्याणनं एक वर्ष शहा डाॅक्टरांकडं मुंबईलाच प्रॅक्टीस करत अनुभव घेतला होता. म्हणून त्यास इतर टेंशन नव्हतं फक्त गाव चांगलं मिळावं हीच इच्छा होती.ती ही आज पूर्ण झाली.
तीन दिवसांनी माई, दिना,दिनाचे आई वडील व मोजकं सामान , मोटार सायकल घेत ते बोरवणला आले. माई ,काका, काकूंना गाव परिसर आवडला. सरपंच सजन बापुच्या जुन्या घरात मोजका सामान लावत टेबल खुर्ची बाकडा ठेवत पडद्यानं पार्टिशन घालत कल्याणचा दवाखाना आकाराला आला. दुसऱ्या दिवशी सत्य नारायणाची छोटी पुजा ठेवत लोकांना प्रसाद व अल्पोपहार देत दवाखान्याचं उद्घाटन केलं. त्याच दिवशी दुपारुन माई काका काकी व दिना गाडीनं परतले. परततांना माईला कल्याणला आपण उचलून आणलं तो दिवस आठवला व डोळे पाणावले.
" माई चार पाच वर्ष फक्त.मग निवृत्त झाली की तुला पण इथंच आणीन!" कल्याण येणारी आसवं आवरत म्हणताच माईनं माघारी वळत त्यास जवळ घेतलं.
" माई, आता तो छोटा कल्याण नाही,डाॅक्टर कल्याण झाला ! लोक पाहत आहेत!" दिना बोलला नी माई आसवंं पुसत हसू लागल्या.
आठ दिवसातच कल्याणचं
' माई क्लिनीक' मस्त चालू लागलं. बाईक वर बॅग घेत तो गावात फिरू लागला. सजन बापूनं सोबत येत बाजुच्या दोन्ही गावात संरपंचाशी भेट घालून देत ओळख करून दिली. आता शेजारच्या गावाहूनही त्यास फोन येऊ लागले. तो आता दुपारपर्यंत बोरवणात फिरे. व दुपारनंतर बाजुच्या खेड्यात जाई. रात्री उशीरा बोरवणात परते.पुन्हा गावातले कुणीना ना कुणी क्लिनीकवर येऊन बसलेलं असे. मग पुन्हा त्यांना उपचार किंवा गावात घरी जाई. मग स्वयंपाक करून जेवण करी. एका महिन्यात त्याच्या हाताला गुण असल्याचं तिन्ही गावात बोललं जाऊ लागलं. शेजारच्या गावात अनेर पलिकडच्या मोठ्या गावातून डाॅक्टर येई त्याचं येणंच कल्याणमुळं थांबलं. आता कल्याणला पूर्ण आत्मविश्वास आला.डाॅ.शहाकडं प्रॅक्टीस करतांना त्याला काही झालंच तर शहा सर आहेत ही बॅकींग होती. पण इथं जे काही निदान ,उपचार करायचे हे आपल्याच जबाबदारीनं . म्हणून सुरूवातीस तो घाबरून निर्णय घेई .पण जेव्हा त्याचं निदान चपखल ठरत पेशंट बरे होऊ लागले तसशी त्याची हिम्मत वाढत आत्मविश्वास दुणावला. पैशाच्या फि बाबत सुरवातीस त्यानं नमतं धोरण घेत लोकांचा विश्वास संपादन केला. पण ही सारी कुतर ओढ करतांना क्लिनीकची झाडलोट, कपडे धुणं, स्वयंपाक करणं यात दमछाक होऊ लागली. बऱ्याचदा लोकच आग्रह करत त्यास रात्री जेवणास थांबवू लागले. मग तो ही आढे वेढे न घेता रात्री जेवण करू लागला. पण हे बेभरवशी असायचं. रात्री दहा अकराला परत आल्यावर स्वयंपाक करायचं त्याच्या जिवावर येई.
गावात बी.एस.एन.एल. लाच थोडी फार रेंज मिळे.ते ही ठराविक ठिकाणी च. म्हणून त्यानं बापूच्या ओळखीनं क्लिनीकमध्ये लॅण्डलाईन बसवला. आता रात्री अपरात्री केव्हा ही फोन आला की तो उठत बॅग घेऊन निघे.
रविवारी आठ वाजताच सजन बापूचा माणूस येत दुपारी माडीवर जेवण असल्याचं सांगून गेला. दुपार पर्यंत पेशंटची रीघ काढल्यावर माणूस बोलवायला आला व सोबत बॅग ही घ्यायला लावली.
माडीवर येताच बापूनं प्रेमानं विचारपूस करत गप्पागोष्टी करत कल्याणीस बरं नसल्याचं सांगत तपासण्यास सांगीतलं.
मधल्या हाॅलमध्ये काॅटवर कल्याणी झोपलेली. राधाताईनं जवळ येत स्टुल दिला. त्यावर बॅग ठेवत कल्याणनं बॅग उघडत स्टेथॅस्कोप लावत तपासू लागला व नंतर नाडी पाहण्यासाठी तो हात हातात घेऊ लागताच त्याच्याच छातीत धडधड होऊ लागली. त्यानं कसोशीनं स्पर्श टाळत रक्तदाब मोजला.
"इंजेक्शन घेणार का? " धडधड आवरत तो विचारू लागला.
" त्यात काय विचारणं डाॅक्टर साहेब!" राधाताईच मध्ये बोलल्या.
" जड असल्यानं कंबरेवर घेतलं तर बरं!" इंजेक्शन भरत तो सांगू लागला
" तोच कल्याणी पलंगावर उठून बसली व हातावरच घ्यायची तयारी करू लागली.
" अगं कल्याणी बेटा ! नंतर हात दुखेल! कमरेवर घे ना!" राधाताई विनवू लागली पण कल्याणीनं आईवरच डोळे वटारत चूप बसायला लावलं.
कल्याणनं दंडावर कापसाचा बोळा अलगद फिरवला तोच राधाबाई ला रांधणीतून हाक आल्यानं त्या मध्ये गेल्या.
कल्याणनं थरथरत हात पकडणार तोच कल्याणीनं झटका देत दंड सोडवत दुमटला व इंजेक्शन द्यायला खुणावलं. कल्याणला भिती हात हलला तर उगाच..म्हणुन त्यानं जबरीनं दंड धरत इंजेक्शन दिलं.नी तो दुसऱ्या हातानं दंड चोळणार तोच कल्याणीनं उभी राहत त्याच्या पायावर जोरानं पाय आपटत रागानं पाहत स्वत:च दंड चोळू लागली.कल्याणच्या पायावर जोरानं पाय आदळल्यानं तो तिरमिरला व पाय झटकू लागला. तोच राधाबाई आल्या.
कल्याणीनं तिरमिरणाऱ्या कल्याणकडं पाहत ' कशी झिरवली' या तोऱ्यानं खुनशी पाहत गालात हसू लागली.
कल्याणच्या मनात काही नसतांना तो त्याच्या व्यवसायाचा भाग. पेशंट म्हणजे देवाचंच रूप या भावनेनं तो इंजेक्शन ची जागा सुजू नये म्हणून तो दंड चोळत होता. पण कल्याणीला हात पकडत इंजेक्शन दिलं तर दिलं वरुन दंड पकडतो हा राग. म्हणून स्पर्शच नको यासाठी पायावर जोरात लाथ आपटली. कल्याणला चूक नसताना प्रसाद मिळाला. त्यानं औषधं देत कशी घ्यावीत हे राधाताईस समजावलं व तो बाहेर अप्पाकडं येऊ लागला. कल्याणी अजुनही मारक्या गाईगत त्याच्याकडं पाहत होती. तिला मनात पहिल्या भेटीच्या वेळी दिनानं
'बहरलेली बोर' बोलल्याचं खटकत होतं.
जेवण करतांना कल्याणला समोर काॅटवर झोपलेली कल्याणी दिसत असतांना ही तिच्याकडं पाहण्याची त्याची हिंमत झालीच नाही.
" बापूसाहेब ,आता जेवणासाठी गावात कुणी डबा करून देत असेल तर बरं होईल.फिरण्यातच जास्त वेळ जातो!"
" डाॅक्टर साहेब बाहेर कशाला.आपल्याकडेच जेवा दररोज!"
" बापूसाहेब आपलं घर हक्काचं आहे. पण दररोज मला योग्य नाही वाटत!"
बापूनं ओळखलं .डाॅक्टर ऐकणार नाही म्हणून त्यांनी' करतो काही तरी सोय ' म्हणत कल्याणला आश्वस्त केलं.
उन्हाळ्यात कल्याणनं तिन्ही गावं आपल्या कब्जात घेत तो सेवा देऊ लागला. गरीब असला व पैसे नसले तरी उपचार करत प्रसंगी सॅम्पलची औषधं तर कधी स्वत: ही औषधं देऊ लागला. पेशंट, लोकांशी आस्थेवाईकपणे वागू लागला. म्हणून तो साऱ्यांनाच आवडू लागला.
सजन चौधरी व किसन चौधरी दोन भावांचा परिवार. सजन बापूस कल्याणी ही एकटी मुलगी तर किसन अप्पास रमेश व उमेश ही दोन मुलं. एकत्र परिवार. सारा कारभार सजन बापूच पाहत. केळ, बोरं, कापूस याचं मस्त उत्पादन काढत. किसन अप्पा ,उमेश,रमेश सारा राबता सांभाळत. सजन बापू सरपंच म्हणून गावाचा कारभार ही पाहत. पण विरोधी पार्टीतल्या दौलत राव व त्यांची मुलं अर्जुन, गोकुळ यांना गावातील सजन बापूचं वर्चस्व सहन होईना. त्यातच अनेर पलिकडून कंजार गावातून येणारे जाधव डाॅक्टर त्यांचेच नातेवाईक होते. सजन बापूनं कल्याण डाॅक्टराला सहकार्य करत ,घर देत दवाखाना उघडला ही बाब दौलतराव व मुलांना खटकली व ते सजन चौधरीचा माणूस म्हणून कल्याण डाॅक्टराला देणं घेणं नसतांना पाण्यात पाहू लागले. त्यातच कल्याणच्या हाताला गुण असल्यानं व वागणुकीनं लोक जाधव डाॅक्टराला बोलवणं विसरलेच. म्हणून अर्जुन व गोकुळ कल्याण डाॅक्टर केव्हा कचाट्यात सापडतो याची वाट पाहू लागले.
पावसाळा लागला. सातपुड्यात मान्सुन बरसला .सातपुडा पाझरू लागला व अनेर तापी दुधडी भरभरुन वाहू लागल्या. पावसात निसरड्या रस्त्यावरून गाडी चालवतांना कल्याणला सावधानता घ्यावी लागू लागली.व झडी लागताच साथीच्या आजारांनी पेशंट ही वाढू लागले. म्हणून शेजारच्या गावातून परतायला त्याला उशीर होऊ लागला.
घरी येताच त्यानं कपडे बदलवत खिचडी शिजवली व जेवायची तयारी करू लागला. बाहेर सर्वत्र अंधार व मरणाचा पाऊस. अकरा होत आलेले. लोकं पावसानं लवकर झोपलेले. त्यानं दरवाजा बंद करत जेवण आटोपलं. तोच ओट्यावर त्याला काही तरी खुडबुड जाणवली. त्यानं दरवाजा न उघडता खिडकीतूनच " कोण?" विचारलं.
पण उत्तर येईना. अंधारात काही दिसे ही ना.
त्यानं खिडकीतून टाॅर्च चमकवला.
" डाॅक्टरसाहेब, काही नाही.मी आहे झब्बू!"
" कोण झब्बू!" कल्याणनं आतूनच घाबरत विचारलं.
" मी झब्बू झिप्पर....रघा शिरसाठाचा भाऊ!"
टाॅर्चच्या उजेडात कल्याणला चेहरा गावात अलिकडेच पाहिलेला वाटला.
" काय काम होतं! "
" काही नाही, झडीची घरात झोपायला जागा नाही म्हणून ओट्यावर झोपायला आलो."
" मग घरात ये! "
" नाही नाही डाॅक्टर साहेब मला ओट्यावरच झॅक झोप येईल.घरात नको."
" ठिक आहे!" म्हणत कल्याणनं खिडकी बंद केली. त्याला ही कुणी तरी सोबत आहे हे चांगलंच होतं. थोड्या वेळानं घरात डास भुणभुण करायला लागले.मग कल्याणनंच बाहेर ओट्यावर पलंग टाकला.
झब्बू झोपला नव्हताच.
" काय करतो रे तू! गावात दिसत नाही सहसा!" कल्याणला झोप येत नव्हती म्हणून सहज विचारलं.
" कसा दिसणार गावात, पाच महिने महुवा फॅक्टरीत ऊस तोडायला जातो. या वर्षी पट्टा पडला नी धुळ्यालाच थांबलो. चार पाच दिवसापूर्वीच आलो गावात. एरवी कुणाचेही काही काम असो ते करतो."
कल्याण झोपला. सकाळी उठला तर झब्बूनं ओटा न विचारता स्वच्छ केला. नी मग विचारून मधलं घर दवाखाना ही झाडून स्वच्छ केला. कल्याणनं त्याला तोंड धुवायला लावत ठेवलेला चहा दिला. नंतर मग झब्बूचं कल्याणकडंचं थांबणं वाढलंच.
झब्बूबाबत कल्याणला नंतर गावातून सारी हकीगत कळली.
चार भावाच्या पाठीवर हा झालेला. वडिलांना याच्या जन्माच्या वेळी मुलगी हवी होती. याची आई दुर्गी बाळंत झाली. जुळी जन्माला आली एक मुलगी व मुलगा.पण मुलगी जन्मतः च वारली व हा जगला. वडिलास मुलगी हवी होती तर चारात याची भर पडली.नियतीनं जणू त्यांच्या बाजुत जणू झब्बूच दिला म्हणून याचं नाव झगाचं झब्बू पडलं. गावातील इतरांनी भर घालत यथावकाश झब्बू पुढं झिप्पर लावलं.
आई वडील चार मुलाच्या लग्नानंतर दगावली. भाऊ आपापल्या संसारात मग्न झाली व हा कुवाराच राहिला.दिसण्यात गबाडा असला तरी कामास पक्का. मिळेल ते काम तो करू लागला. फक्त चहा व जेवणाच्या बदल्यात. सकाळी उठताच कुणाचाही गोठा झाडी नी पातेली भर कोरा चहा घेई. मग दुसऱ्याकडंनं दुपारचं जेवण. नी मग गावात निर्हेतूक फिरणं. दिवाळीनंतर टोळीबरोबर महुवा फॅक्टरीत जाई. तिथं कुणाची मुलं सांभाळ, कुणाची बांडी विक, कुणास ऊस भरायला मदत कर अशी कामं करी व पोट भरी. मुकादम व लोक ही यास वापरून घेत पण अंगात ताकद असुनही कुणीच अर्धा कोयता म्हणून त्यास लावत नसत. गावात कधी कधी गवंडीसोबत ही कामास जाई. भाऊ भावजया कधीच जेवणाला विचारत नसत. उलट चार दोन पैसे जास्तीचे मिळाले की हा भावाच्या मुलांना खर्च करी. या वर्षी हा ऊस तोडणीला गेला नी भावानं मधली भिंत पाडत याच्या हिश्श्याचं चार खण घरही बळकावलं. म्हणून तो आज झडीचं डाॅक्टराच्या ओट्यावर झोपायला आला असावा.
कल्याणशी संपर्कात आल्यावर तो घर दवाखाना झाडलोट करू लागला तर कधी बॅग धरत फिरू लागला.
कल्याणनं प्रथम त्याच्या सवयी बदलायला सुरुवात केली. त्याला अंघोळीला साबण, टाॅवेल दिला, तेल, कंगवा, नेलकटर दिलं. अंगात बंडी व सैन कापडाची पट्ट्या पट्ट्याची ढगाळ पॅन्ट होती.त्याजागी कंजारला घेऊन जात मापाचे मस्त दोन ड्रेस घेऊन दिले. कपडे घेतल्यावर रस्त्यानं येतांना त्यांनं डाॅक्टराला अविश्वासानं विचारलं.
" डाॅक्टरसाहेब, खरच ड्रेस माझ्यासाठी आहेत का?"
" कल्याणनं होकार भरताच तो रडू लागला.
" का रे झब्बू काय झालं रडायला?" कल्याणनं विचारलं.
" डाॅक्टरसाहेब मला आठवत नाही तेव्हा पासून लोकांचे उतारलेले कपडे घालतोय! ते ही अंगतोड राबवून घेतल्यावर देतात.नी तुम्ही नविन कपडे घेऊन दिले म्हणून विश्वास नाही बसत!"
" घाबरू नको.तुझ्यासाठीच घेतलेत मी!"
नवे कपडे घातले नी तो साऱ्या गावात फिरत दाखवत सांगू लागला.
" मी कल्याण डाॅक्टरांचा कंम्पाऊंडर झालो!"
कल्याणला हसू आलं व डोळ्यात आसवं ही तरळली. कुणी परकं जेव्हा माणसास आपलं म्हणून स्विकारतं तेव्हा जिवास कोण आनंद होतो.हा आनंद घेत घेत तर तो मोठा झाला होता.
झब्बू आता स्वच्छ अंघोळ करत टापटीप राहू लागला. कल्याण डाॅक्टरांची सर्व कामे करू लागला. कल्याण मागं बॅग धरत फिरू लागला. गावात डब्याची सोय होत नव्हती म्हणून कल्याणनं त्यालाच स्वयंपाक शिकवला. झब्बू मुळात गबाळ्या नव्हताच .परिस्थीतीनं त्यास तसं बनवलं होतं. हे कल्याणला त्याच्या हुशारीवरून लगेच अनुभवास आलं. एका महिन्यात त्याची राहणी बदलली व कोणत्या पेशंटला डाॅक्टर कोणत्या गोळ्या देणार हे त्याला कळू लागलं. इंजेक्शन देतांनाच कल्याण नावं सांगे व तो गोळ्या काढून पुड्या बांधी.
आषाढ लागला. अनेर तट्ट फुगून वाहत होती. सकाळीच सजन बापू उमेश, रमेश ला घेत जळगावला खत, औषधी व इतर वर्षभराचा किराणा घेण्यासाठी निघून गेले.
किसन अप्पालाही चोपड्याला काम असल्यानं त्यांनी सोबतच नेलं. कल्याणीनं नऊ वाजताच शाळेची तयारी केली. पावसाळ्यात नदीला पाणी असलं की हाकेच्या अंतरावर नदीपल्याड गावास तिला पंधरा वीस किमीच्या फेऱ्यानं अॅक्टीव्हानं कंजार मार्गेच जावं लागे. कंजार ते कनोली दरम्यान फरशी असल्यानं नदी सहज पार करता येई. कधी कधी फरशी वरही पाणी असे. ती शाळेत गेली.
कल्याण ला आज औषधी आणावयाच्या होत्या व शिरपूरच्या दिनाच्या मित्रास ही भेटायचं होतं म्हणून दुपारी जेवण करून तो कंजारवरून शिरपूरला गेला. औषधी घेत मित्राजवळ थांबत परतायला त्याला बराच उशीर झाला.
कल्याणीच्या शाळेत दुसऱ्या दिवशी संमेलन असल्यानं त्याची तयारी करण्यात, मुलांचं स्वागत गीत, ईश स्तवन व नृत्य बसवण्यात साडे सहा सात केव्हा वाजले समजलेच नाही. वर्ग बंद करत एकेक निघाले. ती गाडीजवळ आली तर गाडी नेमकी पंक्चर. गाडी तेथेच पडू देत ती सोबतच्या बाईच्या गाडीवर कंजारला आली.तेथून शिरपूर कडून कोणीतरी येईल किंवा उमेश परतला असेल तर फोन करून बोलवता येईल असा विचार करत ती कंजारला आली. सोबतची बाई निघाली. तशी ती पण थांबत वाहनाची वाट पाहू लागली.पण वाहन मिळेना. तिनं उमेशला फोन लावला तर ते अजून धरणगावच्या ही मागं. मग ती नदीकाठावर येत फरशीवरनं कनोलीकडं येऊ लागली. येणाऱ्या वाहनास हात देऊ असा विचार करत ती साडे सातच्या आस पास निघाली. कमरे इतक्या पाण्यातून ती नदी क्राॅस करत कनोली काठावर चढणार तोच मागाहून चर्र चर चर्र पाणी चिरत कल्याणची गाडी फरशी क्राॅस करू लागली.
त्यानं समोर पाहिलं. ओल्या साडीतल्या कल्याणीला पाहताच त्याची धडधड थडथड वाढली. नदीचा काठ चढत त्यानं गाडी थांबवली. कल्याणी जवळ येताच
" बसा मॅडम!" जेमतेम शब्द फुटले.
" नाही, उमेश येतोय, या तुम्ही.येतो आम्ही मागावून." कल्याणी कपाळाला आठ्या घालत म्हणाली व चालू लागली.
कल्याणनं उमेश येतोय म्हटल्यावर पावसाच्या झगारीत गाडी कनोलीत घातली. पण तोच त्याला आठवलं.आज तर सारेच जळगावला गेलेत. व त्यांना परतायला उशीर होणार असं सकाळीच बापू सांगत असल्याचं त्याला आठवलं.त्यानं आडोशाला गाडी उभी करत उमेशला फोन लावला.
" उमेश कुठ आहे तू?"
" डाॅक्टर, धरणगाव टाकलं आता.का काय झालं? तुम्ही कुठं?"
" काही नाही शिरपूर हून परततोय कनोलीत आहे.कल्याणी मॅडमांना घ्यायला कोण येतंय?"
" बरं झालं, ताईचा फोन होताच.सोबत घेऊन या तुम्हीच!"
कल्याण तिथंच थाबला. तोच बाजुच्या गल्लीतून जाधव डाॅक्टर, दौलतराव चौधरी चा गोकुळ येतांना दिसले. पावसाचा जोर वाढू लागला.कल्याणी येताच कल्याणनं गाडी काढली.
" बसा मॅडम! उमेश व बापू हे आता धरणगावला पोहोचले.उशीर होईल त्यांना! "
गोकुळ कपाळावर आठ्या आणत पाहू लागला.
कल्याणीनं गोकुळला पाहून व उमेश येतोय ही आपली बतावणी कल्याणला कळाली म्हणून ती कल्याणच्या गाडीवर बसली. तिला नवख्या डाॅक्टराच्या गाडीवर असल्या अवेळी व पावसात बसतांना पाहताच गोकुळ जाधव डाॅक्टरांना खोचकपणे कल्याणीला ऐकू जाईल अशा आवाजात बोलला.
" जाधव डाॅक्टर अशी सेवा करावी डाॅक्टरांनी तरच पेशंटचा विश्वास बसतो!"
कल्याणीनं ऐकलं व ती मुद्दाम कल्याणच्या खांद्यावर हात टाकून बसली. ते पाहून गोकुळच्या अंगाची पावसातही आग आग झाली.
" जाधव डाॅक्टर यांचा बंदोबस्त करावाच लागेल !" तो दातात आपलाच ओठ येतोय समजून जोरात चावू लागला.
कनोली टाकताच कल्याणी मागं सरकत बसली. कल्याणला कल्याणीनं हात टाकला काय नी काढला काय काहीच फरक नव्हता. त्याला फक्त भर पावसात बापुच्या मुलीला एकटं टाकून जाणं योग्य वाटेना म्हणून आटापिटा. खड्ड्यात गाडीनं दचका खाल्ला की तो गाडीच्या टाकीवर सरके तर कल्याणी मागं.हा सरकासरकीचा खेळ बोरवण येई पर्यंत सुरूच होता. पाऊस ही बहरात येत बरसतच होता. आठ दहा किमी अंतर दोन्ही एक शब्द ही बोलले नाहीत.
गाव विहीर येताच कल्याणीनं गाडी थांबविण्यास लावली.
" घरी सोडतो मॅडम!"
" नको झाले एवढे उपकार पुरे!" कल्याणी रागात बोलली तशी कल्याणनं गाडी थांबवली.कल्याणी भर पावसात गाडीपुढं डोक्यावर पदर घेत निघाली नी कल्याणची धडधड पुन्हा वाढली. त्यानं काॅलेजला व शहा डाॅ. कडं असतांना किती तरी मुलींना गाडीवर बसवत सोडलं, फिरवलं होतं.पण अशी धडधड त्यानं कधीच अनुभवली नव्हती.त्याला कळेना कल्याणी मॅडम समोर आपली धडधड, थडथड का वाढते?
कल्याणीनं घरी येताच शाॅवर खाली भर पावसात ओली होऊन आली असतांनाही थंड पाण्यानं अंघोळ केली.
तिला आज प्रथमतः कळत होतं की गारव्यात ही आग असावी. म्हणून तर कल्याण डाॅक्टरासोबत गाडीवर येतांना एवढे पाऊस पडून जमिन तृप्त होऊन ही धरणीचा मृदगंध सुटावा असा दरवळ का आपणास भासत होता.
.
.
क्रमश:

✒ वा...पा...
नंदुरबार.
नंदुरबार.