पिशाच्च पर्व
पर्व पहिले – अघोर कालींजर
भाग १ – धडा – १
३१ जुलै २००८
1271 सदाशिव पेठ, केळकरांचा वाडा, जस्ट अगदी पेरुगेट पोलीस चौकीच्या पुढेच. स्वछ पंढरी आडवी पसरलेली, पेशवेकालीन बांधकाम असलेली, दुमजली इमारत. मध्यभागी निळ्या रंगाचा, नक्षीकाम केलेला मोठा लाकडी दरवाजा. खालून दरवाज्याच लाकूड जरा झिजल होत. मुख्य दरवाजा बंद होता. छोटा दिंडी दरवाजा उघडा होता. जुलै महिन्याचे दिवस होते. पहाटेपासूनच पावसानी जोर धरला होता. सकाळचे आठ वाजले होते. पावसामुळे रस्त्याला फारशी वर्दळ नव्हती. पण एखाद दुसरी टू व्हीलर आणि सकाळच्या क्लास ला लगबगीन निघालेली काही पोर एवढ सोडलं तर रस्ता शांत होता. तेवढ्यात त्या मुसळधार पावसात टर्र्रर्र्र् आवाज करत रस्त्यातल्या वहाणार्या पाण्याची कारंजी उडवत एका मागोमाग एक आशा दोन रिक्षा वाड्यासमोर येऊन थांबल्या.
पाठोपाठ सहा व्यक्ती त्या रिक्षातून उतरल्या त्यातल्या दोघांच्या हातात बोचकी धरावी तशा पिशव्या धरलेल्या होत्या. पाच जण आत गेले राहिलेल्या एकाने पैसे दिले आणि त्यांच्या मागे वाड्यात प्रवेश केला.
वाड्यात गजबज होती…… मालू वन्स तेवढ्यात ओरडल्या ! .. माई….. आग गुरुजी आलेत मी नैवेद्याच बघायला जाते . पुष्पानी सगळी तयारी केलीय, फक्त वाती उंदरांनी कुरतडल्यायत. नव्या आणायला लागतील. पण हा डीम्ब्या कुठे तडफडलाय सकाळपासून….. सकाळच्या चहानंतर गायबच आहे कि
माईंनी ग्यास वरून गुरुजींसाठी चहा उतरवला आणि ट्रे मधे ठेवलेल्या कपात गाळला. शेजारी सुनीता कोथिंबीर निवडत होती. तेवढ्यात माई म्हणाल्या आग जरा हे पुढच्या खोलीत नेऊन देशील का आणि सतीश भाऊजीना म्हणावं कि पूजेला सुरवात करा आणि काही लागल तर बघ. मी स्वानंदला बघून येते.
वाडयाच्या एका अंगाला लाकडी जीना होता. माई वर आल्या आणि हाक मारली..... स्वानंद!! ए स्वानंद .... काय चाललाय, चल लवकर.... खाली गुरुजी येऊन थांबलेत.
आतून कसलाच आवाज नाही.
माईनी खोलीत शिरून आतल्या खोलीचा दरवाजा उघडला . बघतात तर स्वानंद कानाला हेड फोन लाऊन पी सी वर गेम खेळत बसला होता. खाली मंगू बोका शरीराचं मुटकुळ करून पडला होता.
स्वानंद !! ... माई परत ओरडल्या पण कुठलाच प्रतिसाद नाही. शेवटी मेन स्वीच बंद करण्याशिवाय पर्यायच नव्हता. माईंनी बटण बंद केलं आणि स्वानंदच्या मागे येऊन उभ्या राहिल्या.
MSEB च्या नावांनी एक शिवी हासडत स्वानंदनी कानाचा हेडफोन काढला. खाली झोपलेल्या मंग्याला पायांनीच दूर सारत “ उठ की ढेब्र्या, बघाव तेंव्हा खायचं आणि लोळायचं. असं म्हणत मान मागे वळवली.....
बघतो तर मागे माई. शीट मगाची शिवी ऐकली वाटत. माई गंभीर पणे म्हणाल्या. आण्णांचा तेरावा आहे आज. थोडं तरी वेळ काळाच भान असु दे. जा जरा वाती घेऊन ये पटकन.
माई खाली गेल्या. स्वानंद उठला शेजारच कपाट उघडलं. सगळा कपड्यांचा ढीग अंगावर पडला. त्यातल्या त्यात एक भडक लाल रंगाचा टी शर्ट अडकवून स्वानंद बाहेर पडला.
अण्णा. म्हणजे स्वानंदचे आजोबा.... डॉक्टर, विनायकराव केळकर. पुण्यातल एक नामवंत प्रस्थ. अनेक शास्त्रात पारंगत, जेवढे मंत्र शास्त्रातले पारंगत तेवढेच खगोल आणि भौतिक शास्त्रातले तद्न्य. जगातील अनेक विद्यापीठातून त्याना विविध विषयावर सेमिनार साठी आमंत्रण यायची. चार विषयात पी एच डी आणि अनेक पेटंट त्यांच्या नावावर नोंदली गेली होती. मागच्या १८ तारखेला विनायकरावांच निधन झालं. आज १३ वा होता.
दुपारी एकच्या सुमारास सगळ्यांची जेवण आटोपली. उष्टावळी, निर्माल्य, प्रसाद, नाही म्हणता म्हणता २ वाजले.
वाडयाच्या उजव्या बाजूला तीन खोल्या होत्या. एक बैठकीची खोली होती आणि शेवटी स्वयंपाकघर होत आणि मधे एक अरुंद अशी छोटी खोली होती. त्यात काही समान ठेवलं होत. बैठकीच्या खोलीत आता सगळे जमले होते. माईन्च्या चेहेर्यावर थकवा जाणवत होता. मालू ताई, आणि सतीशराव खाली जमिनीवरच बसले होते माई एका रोलिंग चेअर वर टेकल्या होत्या. स्वानंद त्या रोलिंग चेअरच्या पुढ्यात माईन्च्या दोन्ही पायात पाठ खुपसून बसला होता. माई बसल्या बसल्या स्वानंदच्या वाढलेल्या केसातून बोट फिरवत त्याला कुरवाळत होत्या. थापटत होत्या.
स्वानंदनी डोळे मिटले होते. हे क्षण कधीच संपू नयेत. माईन्च्या स्पर्शातून मायेचा पाझर ओसंडून वहात होता.
आता स्वानंदला माई सोडल्या तर सख्या नात्यातल कोणीच नव्हत. स्वानंद दीड वर्षांचा असतानाच वडलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी विनायक राव लंडन मध्ये होते. ते तातडीन पुण्याला निघून आले. स्वानंदचे वडील म्हणजे दिलीप केळकर... तेहेतिसाव्या वर्षीच देवाज्ञा झाली. आणि मग त्या नंतर विनायक राव आणि पार्वती वहिनी, सुलोचना (माई) आणि स्वानंद च्या मागे खंबीरपणे उभे राहिले.
स्वानंदला आणि माईना कधीच कशाचीच कमी नव्हती. फक्त वडिलांची माया, लाड, धाक, शिस्त, मस्ती कधीच अनुभवता आल नाही. स्वानंद चार वर्षाचा असतानाच मालतीच लग्न झालं. आता या बारा खोल्यान्च्या वाड्यात फक्त चार टाळकी रहायची. वाड्याच्या बारा खोल्यांपैकी सहा खोल्यांमध्ये माई आणि स्वानंद आणि उरलेल्या सहांमध्ये विनायकराव आणि पार्वती वाहिनी अस रहायचे. स्वानंद १० वर्षांचा होता तेंव्हा पार्वती वाहिनीच निधन झालं.
त्यावेळी आज्जी म्हणल कि पुराणातल्या गोष्टी, कीर्तन, नारद मंदिरातला दही पोह्यांचा प्रसाद, स्वानंदच आज्जीशिवाय पानही हलत नसायचं. आज्जीच्या खोलीत खुंटीला तिची पिशवी टांगलेली असायची, मग स्वानंद हळूच पलंगावर चढून आत हात घालून १०, २० पैश्यांची नाणी पळवायचा आणि मग वाड्याच्या शेजारी असलेल्या बाळूच्या दुकानातून त्याच्या २ ओरेंज च्या गोळ्या आणायचा आणि एक माईला द्यायचा, अन एक अज्जीच्ज्या उशी खाली हळूच नेऊन लपवायचा. पार्वती वाहिनिना अशा अधून मधून कधी उशाखाली किंवा कधी तुळशी वृन्दावानापाशी निरंजना जवळ किवा कधी स्वयंपाक घरात लपवलेल्या गोळ्या सापडायच्या. जिथे फक्त त्यांचाच वावर होता अशा नेमक्या ठिकाणी स्वानंद त्या गोळ्या लपवायचा. मग ती गोळी सापडली कि पार्वती वाहिनी जोरात हाक मारायच्या डीम्ब्या ए डीम्ब्या. स्वानंद ह्याच हाकेची वाट पहात बसलेला असायचा. हाक आल्या सरशी जिथे असेल तिथून तो धावत जाऊन आज्जीला जाऊन बिलगायचा आणि घट्ट मिठी मारायचा. मग आज्जी कमरेला लावलेल्या रुमालाची पुरचुंडी सोडायची आणि छोट्या स्वानंदला कडेवर घेऊन दही पोहे भरवायची.
स्वानंदचे डोळे आता पाणावले होते. नाक सुर्सुरायाला लागले होते. आजोबांची खूप आठवण येत होती. आजोबा आणि माई म्हणजे स्वानंदच विश्व होत. अस वाटत होत की अर्ध जागच संपून गेल. मिटलेल्या डोळ्यांसमोर लहानपणापासून चे अण्णांच्या सहवासातले दिवस एखाद्या चित्रपटासारखे दिसत होते. आणि अचानक स्वानंदला मागच्या महिन्यातला तो प्रसंग आठवला.
***********************************************************************
© रघुनंदन कुलकर्णी