तर प्रश्न एव्हढाच आहे की,
एकाच वास्तूतले लोक सातत्याने बेपत्ता होत असतील तर त्याला काय म्हणायचं ?
योगायोग तर नाहीच.. मोजून चार कुटुंबे आतापर्यंत नाहीशी झालीत. हा योगायोग कसा असेल ?
अपहरण ?? पण तो गुन्हा साधारणपणे पैसे उकळण्यासाठी होतो किंवा अगदीच टोकाचं शत्रुत्व असेल तरच ! इथे गायब झालेली लोक साधीसुधी भाडेकरू आहेत. पोस्टमनला पाहूनही घाबरणाऱ्या त्या पापभिरू लोकांचं कोणाशी शत्रुत्व असण्याची कोणतीच शक्यता नाही.
मग भुताटकी...
हे तर भारीच हास्यास्पद आहे. तुम्ही सीता भवन ही इमारत बघाल तर तुम्हालाही तशी शंका घेतल्याबद्दल नक्कीच हसू येईल.
ती इमारतच तशी आहे...
पक्के बांधकाम केलेली ती दोन मजली इमारत आहे. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी दोन खोल्यांचे तीन-तीन ब्लॉक आहेत. त्यात भाडेकरू राहतात. दुसऱ्या मजल्यावर ऐसपैस बांधकाम असून तेथे सीता भवनचे मालक असलेले क्षीरसागर कुटुंब राहते. अगदी रस्त्याला खेटून असल्याने दिवसभर या इमारतीच्या प्रत्येक खोलीत भरपूर सूर्यप्रकाश, हवा आणि धूळ असते. दिवसा व रात्री रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांचे आवाज, हॉर्नचे कर्णकर्कश आवाज, ब्रेक दाबल्यानंतर होणारा असह्य आवाज, ट्रॅफिक जाम झाल्यावर वाहनचालकांच्या त्राग्याचे, शिवीगाळीचे आवाज अशा कित्येक आवाजांमुळे सीता भवन त्रासलेले असते.
आता विचार करा...अशा गैरसोयीच्या जागी नांदायला कोणत्या भुताला आवडेल ? जुने पडके वाडे, विहिरी, पिंपळ वृक्ष, बखळी आदी सोयीस्कर व निवांत जागा सोडून सीता भवनमध्ये ती कशाला कडमडतील ?
गैरसोय असलेल्या जागी हटकून राहायला जाणे हा मानवी स्वभाव आणि त्याहून अधिक नाईलाज आहे. बाजारपेठेपासून जवळ, वर माफक घरभाडे आणि मुख्य म्हणजे भाडेकरूंच्या संसारात अजिबात लुडबुड न करणारे घरमालक असा सुखाचा त्रिवेणी संगम झाल्याने सीता भवनवर भाडेकरूंच्या उड्या पडतात.
पण मग आतापर्यंत बेपत्ता झालेल्या चार कुटुंबातल्या बारा जणांचे काय झाले असावे ?
त्यांची बेपत्ता होण्याची वेळही निश्चित नाही. कुणी रात्री, कुणी सायंकाळी, काही चक्क पहाटे तर एक कुटुंब भर दुपारी गायब झाले. अगदी नेसत्या कपड्यानिशी.....आणि घरातले सामान सोडून !
हाच प्रकार बड्या कुटुंबाच्या बाबत घडला असता तर काय काय घडले असते ? न्यूज चॅनेलचे कॅमेरे त्या इमारतीवर अक्षरशः पहारा लावून दर सेकंदाचे अपडेट्स दाखवत असते, कुठे गेले ते लोक अशा मथळ्याच्या बातम्यांनी वर्तमानपत्राची पाने रंगली असती, पोलिसांचे वाभाडे काढले असते, शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आले असते..
पण इथे तर सर्वत्र शांतता होती. जणू काही घडलेच नव्हते.
सामान्य माणसाचे अस्तित्व...असले काय नि नसले काय ! सारखेच.
त्या इमारतीतले तीन जीव मात्र तळमळत होते.
जयेश क्षीरसागर...त्या इमारतीचा मालक.
उषा क्षीरसागर...जयेशची पत्नी.
सीता तथा सीताक्का....जयेशची मावशी.
क्षीरसागर कुटुंबातले हे तीन सदस्य !
त्यात हा चौथा अशरीरी घटक समाविष्ट झाला होता.
आधी चिंता, मग भीती...भय त्या कुटुंबाला व्यापून उरले होते.
पहिली काळजी-एखादा दिवस उजाडेल आणि त्यादिवशी भाडेकरूंप्रमाणे आपलेही कुटुंब पाहता पाहता नाहीसे होईल.
दुसरी चिंता-भाडेकरू बेपत्ता, मालक मात्र शाबूत. लोकांनी भलताच संशय घेतला तर ?
तिसरी फिकीर-बेपत्ता व्हायचे नसेल तर काय करावे लागेल ?
आणि अखेरचे भय.....सीता भवनमध्ये नेमके काय शिरलेय..धडाधड माणसे गिळंकृत करणारे..आपल्या पाशवी ताकदीने होत्याचे नाहीसे करणारे..अगदी लहान लेकरांचीही दया न येण्याइतपत निष्ठुर, क्रूर...
नैवेद्यासाठी जिवंत माणसे हवी असलेले हे दैवत आहे की कोपिष्ट झालेल्या पूर्वजांचे अदृश्य समंधरूप ? की इतस्ततः भटकणाऱ्या एखाद्या अतृप्त आत्म्याला सीता भवनची वाट सापडली होती, तिथल्या रहिवाशांचा भोग त्याला रुचकर वाटला होता.
त्यातल्या त्यात सीताक्का काहीशी सुखी होती. एकतर म्हातारपण आल्याने तिच्या संवेदना काहीशा बोथट झाल्या होत्या. तरुण वयातच तिने प्रियजनांच्या मृत्यूचे इतके आघात सोसले होते की तिला मृत्यूविषयी फारशी भीती वाटत नसे. आईवडिलांवाचून पोरका झालेल्या जयेशला तिने फुलासारखा सांभाळला होता. स्वतःला अकाली वैधव्य आल्यानंतर मिळालेली सर्व संपत्ती जयेशला देऊन ती मोकळी झाली होती. माय मरो अन मावशी जगो ही म्हण तिने सार्थ करून दाखवली होती. तिच्या मायेची पुरेपूर परतफेड जयेश आणि उषा करीत होते. त्या इमारतीला सीताक्काचे नाव देऊन त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.
फारशी भीती वाटत नसली तरी तिला जयेशची चिंता भेडसावत होती. सीता भवनमधल्या त्या विचित्र प्रकाराने झोप उडालेल्या जयेशला पाहून तिची झोपही अंतर्धान पावली होती. रात्री बेरात्री जयेश-उषाच्या बेडरूममधला पेटता दिवा पाहून ती अस्वस्थ होत होती.
आताशी कुठे संसारात रुळू पाहणारी ती अजाण पाखरे...
हा काय भोग नशिबी असावा त्यांच्या ?
आपल्या मायेच्या पंखाखाली वाढवलेला जयेश ! त्याच्या संसारात मनापासून रमलेली उषा..
हे अमंगल, अभद्र सावट त्यांच्या जीवनावर एव्ह्ढ्यातच पसरायला नको होतं. कायम गजबजलेली सीता भवन इमारत, तिची ख्याती माणसं खाणारी वस्तू म्हणून पसरणे योग्य नाही.
विचार करून सीताक्काच्या वृद्ध मेंदूचा भुगा झाला. डोक्यात विचार अधिकच दाटले तशा तिच्या पापण्या आपसूक मिटल्या गेल्या. त्यांच्याआडची वेडीबिद्री स्वप्ने मात्र अजूनही तिचे काळीज कुरतडत होती.
त्याचवेळी खालच्या मजल्यावर काहीतरी घडत होतं !
(क्रमश:)