ब्रिटिशांनी गाडीरस्ते बांधण्यापूर्वी स्थानिक वहिवाट वेगळीच होती. खांबवडीतून विंझरला येण्यासाठी डोंगरातून रस्ता होता. हा रस्ता खांबवडी, भुरुकवाडी, वस्तीतून विंझरगावात पानदीतून पुढे येई व विंझरच्या ओढ्यावरील उतार ओलांडून मालवलीला जात असे. मालाच्या बैलगाड्या, गावकी चे घोडे, गाढवं, गुरं, वऱ्हाडी, सैन्य सर्व याच वाटेने जात. औंध संस्थानचे पंत प्रतिनिधी पण याच वाटेने वेल्ह्याला भोर संस्थानच्या राजवाड्यात गेले होते असे ऐकले आहे.
लग्नाला सर्व गोतावळा मार्गासनीत जमला. दिवसभर पंगती उठत होत्या. गोरज मुहूर्तावर लग्न लागलं. टुया, तेलाच्या दिव्यात घरची मंडळी जेवायला बसली. नवरा नवरी सजवून तयार केली. इकडे बाकी मंडळींनी वरातीची तयारी केली. घोडे सजवले. बैलांना झूल घातली घंटा बांधल्या. महादू व त्याच्या नवरीला बैलगाडीत बसवले. गाडीसमोर एक कोंबडं दिलं आणि तुतारी होऊन वाजत गाजत वरात निघाली. कंदील, टेंभे, काठ्या घेऊन काही लोक पुढे चालले होते. काही नाचत होते. 3-4 धारकरी पण सोबत होते. 2 ठासणीच्या बंदुका पण भरून घेतल्या होत्या. वाजंत्री, हलगी चालू होती. काही हौशी मंडळींनी मोहाची दारू प्यायली होती. सगळे अंधारात धुंद होते.
वरात खांबवडी ओलांडून डोंगरात आली तशी खिंडीपलीकडून येऊन वटवाघळांचा एक मोठा थवा फडफडत डोक्यावरून मागे निघून गेला. आयाबायांनी कानावर बोटे मोडली.... जळ्ळी मेली वाघळं.....आत्ताच अपशकुन करायचा होता....
तेवढ्यात पुढे चालणाऱ्या मशालजींना पलीकडून हलगी चा आवाज आला तसं त्यांनी इशारा केला. धारकरी व बंदुका पुढे बोलावल्या. बाकी तरण्यांनी लाठ्या सावरून कडे केले. वाजंत्री बंद झाली. हलगी थांबवली. सगळे जागीच स्तब्ध झाले. वातावरणात एक तणाव आला. दबकत दबकत दोघे खिंडीत गेले व वाकून पुढे पाहू लागले. तेवढ्यात एक कावळा चिरका आवाज करत डोक्यावरून गेला. अचानक झालेल्या आवाजाने तोल जाऊन पायाखालचा दगड सरकला व पुढे उडाला. तसा पलीकडून आवाज आला "आरं कोण दगडी मारतंय ?"
पलीकडच्या झाडीतून एक मशाल दिसू लागली पाठोपाठ एक लाल पागोटं अन घोंगडं घेतलेला भालदार दिसू लागला. तसं हे आणखी सावरून तलवारीला हात घालून थांबले. पागोटेवाल्याच्या पाठोपाठ आणखी 30 - 40 सजलेली हत्यारी माणसे पुढे आली.
महादूच्या वरातीतील पुढचा मशालजींनी हात करून सगळं काही ठीक असल्याची खूण केली. पण त्यांना कळेना पंचक्रोशीतील अजुन कुणाच्याच लग्नाची काही खबरबात नव्हती मग ही दुसरी वरात आली कुठून ? अन ते पण याच वाटेला ?
अचानक समोर आलेल्या हत्यारी वऱ्हाडामुळे सगळेच गोंधळून गेले होते. सगळे हुशार व हत्यारे परजून उभे होते. मशाली विझवण्यात आल्या. सगळे काळ्या सावल्या बनले. समोरून काही हालचाल होत नाही तोपर्यंत कुणी काही करायचे नाही अशा खुणा झाल्या.
तेवढ्यात बाजूच्या झाडीतून खसखस ऐकू आली बंदूकबाजाने घाबरून पटकन त्या दिशेने एक बार काढला. बार डोंगरात मोठ्यांदा घुमला. पाठोपाठ एका पुरुषाची किंकाळी ऐकू आली.
आणि........ एकच हलकल्लोळ माजला........
हाणा .....मारा.....आई गं....... तुझ्या..... मेलो.......तुझ्या...... तलवारींचा खणखणाट..... स्त्रियांच्या किंकाळ्या...... सोडा.... आsss......
झाडांवरील पक्षी फडफडाट करून उडाले....लांब कुठेतरी कोल्हेकुई चालू झाली..... रातकिडे किरकिरू लागले.....
पळण्याचे ठेचकळल्याचे ......काठ्यांच्या आपटल्याचे आवाज आले
त्या संमिश्र आवाजांनी जंगल भरून गेले........ गाडीचे बैल उधळून पळाले. घोडी निसटली.
भुरुकवाडीत व खांबवडीत एकदम हलगी बंद होऊन बंदुकीचा बार झाल्याचे पारावर झोपलेल्या बाप्यांनी ऐकले. खाली दोन्ही गावात चुळबूळ झाली. काही धाडसी लोकांनी वर खिंडीत जाऊन बघायचे ठरवले. काही वेळात दोन छोटी टोळकी मशाली व काठ्या घेऊन वर पोचली. समोरून खांबवडीतली पण माणसे आली. नजरा नजर झाल्यावर सगळ्यांचे चेहरे प्रश्नार्थक बनले ....
खिंडीत सगळीकडे लहानमोठे गोल गोटे पसरले होते.....दोन मोठे.... काही लहान...... सर्वांना शेंदूर फासला होता.... काहींच्या गोट्यांच्या खाली ओले झाले होते..... एकाने पुढे जाऊन मोठया गोट्याला हात लावून बघितला.... आणि तो एकदम किंचाळत मागे आला.... रक्त... थंडगार रक्त.... रक्ताचा चिखल...
कुणी म्हणतं वरातीवर दरोडा पडला. कुणी म्हणतं कल्याण भागातून आलेल्या लोकांनी जुनं वैर काढलं. कुणी म्हणतं भुताटकी झाली. नक्की काय झालं ते कुणालाच कधी कळलं नाही.
पण रात्रीतून आख्खं वऱ्हाड सामानासकट गायब झालं. मुडदे दिसले नाही नाहीत की मुंडकी.... दिसले फक्त शेंदरी गोटे....
आजही विंझर व खांबवडी मध्ये नवरा-नवरी च्या डोंगरावर जुन्या खिंडीत शेंदरी गोटे पडलेत.... ती वाट आता कुणीच वापरत नाही....काय माहित त्यांचेही शेंदरी गोटे होतील ?
(भाग 4)
वैद्य चिन्मय फडके