स्वप्न
(लघुकथा)
लेखन :- शशांक सुर्वे
सायकलवरून 30 km चा उनाड प्रवास सुरु होता....वाट फुटेल तिकडे आपली mtb सायकल चालवायची आजूबाजूचा निसर्ग बघायचा आणि ठराविक काळानंतर मागे फिरायचं....निलेशचा प्रत्येक रविवारचा हा ठरलेला कार्यक्रम असायचा....शहरापासून काही अंतरावर दुतर्फाची झाडे....आल्हाददायक हवा....शहरी गोंगाटापासून कितीतरी विरुद्ध अशी जागा होती....डांबरी रस्ता आणि एखाद दुसरं त्या रस्त्यावरून धावणारे वाहन सोडले तर माणसाचा हस्तक्षेप कमीच....अश्या ह्या रस्त्यावरून सकाळी बाहेर पडलेल्या निलेशची सायकल धावत होती.....डोक्यात असंख्य विचारचक्र सुरू होते....तो एका बँकेत जॉब साठी होता..नवीनच रुजू झाला होता...काहीसा गोंधळ होत होता..काल म्हणजे शनिवारी त्याने साहेबांची बोलणी खाल्ली होती....त्याचा राग सायकलच्या पॅडल वर निघत होता परिणामी सायकल वेगात धावत होती.....एकटाच बाहेर पडलेला निलेश तसा स्वमग्न होता....लोकांत मिसळणे गप्पा गोष्टी करणे त्याला जराही आवडत नसे.....त्याला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या.....निलेशचे वडील बँकेत जॉब करत होते....भाऊ रोहित अजून शिक्षण घेत होता....निलेशला लेखक व्हायचं होतं....तश्या त्याच्या डोक्यात अमाप कल्पना होत्या....कॉलेज संपल्यावर त्याने लिहायला सुरुवात देखील केली होती.....पण वडिलांचा हट्ट.....अखेर त्याने आपल्या आतील लेखक मारून टाकलं आणि बँकेत भरती साठी शिक्षण बळजबरीने सुरू केले.....पण दर रविवारी सायकल चालवत असताना त्यांच्या आतील तो लेखक परत त्याच्या अंगात संचारायचा आणि तो वेगवेगळ्या कल्पना रंगवत सायकल चालवत दूर दूर निघून यायचा....आपल्या स्वप्नाळू कल्पना विश्वात....आजही आपल्या कल्पनेत त्याने एका सुंदर मुलीला गुंडाच्या तावडीतून वाचवलं होत आणि निलेशचं प्रेमप्रकरण देखील चालू झालं होतं.....स्वतःसाठी आपल्या कल्पनाविश्वात एका सुंदर मुलीची त्याने निवड केली होती.....आपला बँकेतला जॉब....आपलं क्षेत्र नाकारणारे आईवडील त्याच्या ह्या काल्पनिक जगात कुठेच नव्हते....त्याची सायकल आणि डोक्यातील विचारचक्र सुरू होते...त्या मुलींना गुंडाच्या तावडीतून वाचवल्याचे स्मितहास्य त्याच्या चेहऱ्यावर होते..अचानक एक तीव्र कळ त्याच्या डोक्यात शिरली....निलेश जमिनीवर कोसळला....पायात अचानक एक तीव्र कळ आणि.....सायकल बाजूला पडली....तो आपला पाय पकडून जोरात हलवू लागला....पेटकं आल्याने मांडीत घट्ट झालेलं रक्त दोन्ही हातांनी हलवून विरघळवु लागला....कळ शांत होत होती....त्याचं लक्ष समोर गेलं....कपाळावर आठ्या उमटल्या.....त्या तळ्याच्या कडेला एक सुंदर जुन्या बांधणीचा बंगला दिसू लागला....निलेश काही क्षण थबकला....कारण ह्या तळ्याजवळून तो कितीतरी वेळा गेला होता पण हे जुन्या बांधणीचे घर त्याने कधीच बघितले नव्हते....आणि अचानक एवढं मोठं आणि जुन्या बांधणीचे घर बांधून पूर्ण करणे शक्य नव्हते कारण मागल्या आठवड्यात एका सुपरहिरोची कल्पना करत कथा रंगवत तो इथून गेला होता तेव्हा ते घर तिथे नव्हतं.....घराला गेट नव्हतं....शंकेचे आणि कुतूहलाचे संमिश्र भाव निलेशच्या चेहऱ्यावर उमटत होते....हे घर कुठेतरी बघितलं आहे....कुठे??? कुठे???कुठे????
"हा आठवलं....मागच्या महिन्यात मी ह्या कथेची कल्पना केली होती....एक जुनाट घर त्यात दडलेल्या सोन्याचा पुरातन खजिना.....हिरोचं नाव काय होत....काय होत??....हा जितेंद्र....बरोबर.....तो ह्या घरातील मायावी राक्षसीं शक्तीला हरवतो आणि इथली सोन्याने भरलेली पेटी घेऊन आरामात जीवन जगू लागतो....पण माझ्या कल्पनेतलं घर अगदी सेम टू सेम इथं कसं काय??"
उत्तर तर आत गेल्यावरच मिळणार होतं.....दबक्या पावलांनी निलेश आत जाऊ लागला....दार उघडं होतं.....घर जरा परिचित वाटतं होतं कारण ते त्याच्या कल्पनेतलं घर होतं.....दबक्या पावलांनी तो आत जात होता.....एक अनामिक भीती त्याच्या मनात दाटली होती....ज्या अर्थाने मी कल्पना केलेले घर प्रत्यक्षात उतरले तर ह्या घराची मालकीण ती सुंदर चेटकीण ह्या घरात राहत असेल....ती माणसाला वश करते.....आणि हळूहळू क्षीण बनवते....आणि नंतर....नंतर....ती समोरच्याला ह्या घरात बंधीस्त करून टाकते.....त्याचं अस्तित्वच नष्ट करून टाकते....."
निलेश मागे कधी रंगवलेली कथा परत उजळणी करू लागला सावध पाऊले टाकू लागला....पण समोर कुणीच नव्हतं.....लांबून काहीतरी अस्पष्ट दिसत होतं....मंद सुगंध पसरला होता....तो हळूहळू चालत होता....समोरच दृश्य बघून त्याचे डोळे अजून विस्फारले....कारण सकाळ पासून तो ज्या मुलीला आपल्या कल्पनाविश्वात गुंडाच्या पासून वाचवत होता तीच मुलगी.....तिचं सुंदर पेंटिंग समोर दिसत होतं.....भलंमोठं पेंटिंग अगदीच जिवंत वाटत होतं.....निलेश चालत चालत त्या पेंटिंग समोर आला.....गोल चेहरा...गालावर खळी....लांबसडक केस.....तीच होती ती.....निलेश अक्षरशः बधिर झाला.....आपण स्वप्न तर बघत नाही आहोत ना??....असा विचार करत असतानाच त्या पेंटिंग मधील मुलीने एक सुंदर स्मितहास्य केलं.....त्याच बरोबर निलेश चपापला आणि मागे सरकू लागला.....मागे काहीतरी पायात अडकल्यामुळे तो खाली पडला..…..त्याने वर बघितले.....समोर काहीच नव्हते....ना ते जुनाट घर....ना त्या सुंदर मुलीची पेंटिंग.....तो जिथे mtb वरून पडला होता तो तिथेच होता....त्याचं डोकं जड झालं होतं.....त्याने आपलं डोकं धरलं
"बेशुद्ध पडलो होतो की काय....शीट....2 वाजत आले...म्हणजे दीड तास इथेच बेशुद्ध होतो मी???"
निलेशने आपली सायकल उचलली आणि परतीच्या प्रवासाला निघाला.....7 वाजता घरी आला तेव्हा त्याचे वडील रागात होते.....घरात पाय ठेवताच
"निलेश....बँकेतून कृष्णप्रकाश साहेबांचा फोन आलेला....तुझं लक्ष नसत म्हणे आजकल कामात...धुंदीत असतोस म्हणे...नाक कापशील अश्याने माझं....ह्यासाठी तुला इतकं शिकवलं का??......"
वडिलांचं हे बोलणं निलेशला नवीन नव्हतं.....सायकल वरून पडल्यामुळे त्याच्या गुडघ्याला लागलं होतं....रक्त वाहत होतं पण त्याची विचारपूस न करता वडिलांनी आपल्यालाच सुनावलं ह्याचं दुःख निलेशच्या मनात होतं....त्याची आई देखील आपलं सगळं प्रेम त्याच्या लहान भावाला देत होती.......घरात आधीच वातावरण गरम होतं काहीही न बोलता तो जेवून सरळ झोपी गेला.....थकव्यामुळे काही क्षणात डोळे मिटले गेले
काही वेळ झाल्यावर एक नाजूकसा स्पर्श त्याच्या पायावरून फिरत असल्याचं त्याला जाणवलं....तो खडबडून जागा झाला....समोर तीच मुलगी....दुपारी कल्पनेत रंगवलेली...निलेशने समोर नजर फिरवली.....तो त्याच दगडी जुनाट घरात होता.....
"खूप लागलं का हो??"
प्रेमळ स्वर ऐकून निलेश थोडा ओशाळला.....
"न...न....नाही....जास्त नाही लागलं"
"मी मलम लावून देते"
तिच्या ह्या प्रेमळ आग्रहाला निलेशकडून विरोध झाला नाही
"तुम्ही कोण आहात आणि मी इथे कसा??"
मलम लावणारे नाजूक हात अचानक थांबले
"अहो....अस काय करताय मी तीच आहे तुमच्याच विश्वातला एक छोटासा भाग.....प्राची हे नाव तुम्हीच ठेवलं नाही का??"
निलेशला बोलायला शब्द नव्हते.....एक एवढी सुंदर मुलगी पहिल्यांदाच त्याच्या इतक्या जवळ होती...त्यामुळे शब्द गळ्यातच गोठले होते
"तुम्ही आराम करा हं.....मी परत येईन"
अस बोलून ती एक स्मितहास्य करून निघून गेली....त्यारात्री निलेशला अगदी शांत झोप लागली....सकाळी मोबाईलच्या गजरने त्याला जाग आली....त्याने डोळे उघडले तो आपल्या खोलीत होता....आजूबाजूला बघितलं तेच परिचित कोपरे,भिंती.....ती कुठेच नव्हती
"ज्यायला स्वप्न होत वाटतं"
.....अस बोलून त्याने चादर बाजूला केली....गुडघ्याच्या वेदना कमी झाल्या होत्या....त्या जखमेवर काहीतरी चिकट पसरलं गेलं होतं....अगदी मलमा सारखं.....निलेशला काही सुचत नव्हते.....घड्याळाच्या काट्याबरोबर त्याचे हातही हलत होते आपली दैनंदिन कामं तो उरकून घेत होता....बँकेत गेल्यावर परत तिचाच विचार.....तिचे ते प्रेमळ दोन शब्द....कल्पनाविश्व कामावर रंगत होतं....परत कामात चूक झाली......काम आटोपून निलेश घरी पोहोचला आणि जेवून पटकन झोपी गेला.....अंगात कंटाळा होता....पटकन झोप देखील लागली.....परत एक थंडगार स्पर्श त्याच्या हातावर तो खडबडून जागा झाला....डोळे उघडताच समोर चांदण पसरावं तसा प्रकाश पसरला होता पाण्यावर सूर्यकिरण परावर्तित होऊन तळ्याकाठी बसलेल्या निलेशच्या डोळ्यावर पडत होते.....हा प्रकाश सहन न झाल्याने त्याने मान फिरवली....उजव्या बाजूला तीच बसली होती....कालच्या स्वप्नातली प्राची.....आता मात्र निलेश दचकला नाही त्यानेही स्मितहास्य केलं आणि दोघांच्या गप्पा रंगल्या.....कित्येक तास तो आपलं सगळं जीवन तिला उलगडून सांगत होता.....तीही स्मितहास्य करत ऐकून घेत होती.....वेळ आणि वरचा गुलाबी सूर्य वेगाने धावत होता.....परत मोबाईलचा गजर....परत जाग......दुसऱ्यांदा तिचं ते गोड स्वप्न तिचे ते सुरेल शब्द निलेशने साठवून ठेवले होते....तो परत कामावर पोहोचला.....तेव्हा मात्र सगळा ऑफिसचा स्टाफ त्याच्याकडे बघत होता....त्याला बघून शिपाई मॅनेजरच्या केबिन मध्ये धावत गेला.....मॅनेजरने निलेशला ऑफिस मध्ये बोलावून घेतलं
"मिस्टर निलेश....काल तुम्ही परत चूक केली....लक्ष कुठे असत तुमचं....अरुण माझा मित्र....त्याचा मुलगा तू...म्हणून गप्प बसलो पण कालचा प्रकार खूप झालं हे.....2 लाख दुसऱ्या खात्यावर पाठवले तुम्ही....ते काही नाही सक्तीची रजा घ्या महिनाभर.....मग बोलू आपण"
निलेश प्रचंड घाबरला.....परिणाम त्याला माहित होते....मॅनेजरचा बाबांना फोन जाणार आणि ते निलेशला सूनवणार.....एक विचित्र भीती....लहानपणापासून घरच्यांच्या नाराजीच्या भीतीत वाढलेला निलेश बँकेतून बाहेर पडला.....आणि एका नदीकिनारी जाऊन बसला.....ह्या सगळ्याला ते रात्रीचे स्वप्न आणि ती मुलगी कारणीभूत होती....तिचे ते मधाळ स्वर दिवसभर त्याच्या कानात घुमत असत....पण आता घरच्यांची नाराजी.....ज्या साठी त्याने आयुष्यभर मेहनत घेतली होती तो जॉब धोक्यात आला होता.....घरच्या लोकांना तोंड द्यायला त्याला भीती वाटत होती.....संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तो तिथेच बसून होता शेवटी काहीसं ठरवून तो जड पावलांनी घरी जायला निघाला....घरात जाताच निलेशची आई त्याचे वडील भाऊ जागेवर थबकले....त्याचे बाबा अरुणराव त्याच्या जवळ आले आणि सनकन कानाखाली लगावली.....निलेशच्या आयुष्यातले पहिले थप्पड.....त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले
"रांxxx.....तुझा बाप आयुष्यभर बँकेत खपला पण पाच पैशाचा घोळ झाला नाही....आणि तू???......जन्माला तरी कश्याला आलास??.....माझं नाक कापायला??"
निलेश हुंदके देत रडत होता
"मला नव्हता करायचा तो जॉब.....माझं एक दुसरं स्वप्न होतं"
निलेशचे वडील प्रचंड संतापले
"काय घंटा स्वप्न तुझं....भीक मागायची लक्षण तुझी....आधी माहीत असत तर शिकवलाच नसता तुला....लावला असता दगड फोडायला....."
काही न बोलता निलेश डोळे पुसत आपल्या खोलीत आला....9 वाजत होते.....बाहेर घरच्यांचे कडवट आणि भाल्यासारखे टोकदार शब्द त्याच्या कानातून काळजात उतरत होते.....सतत मनात एकच प्रश्न....काय चूक आहे माझी???......डोळे पाण्याने डबडबले होते....डोकं थकलं होत......डोळे जड होऊन बंद झाले.....गाढ झोप
डोळे उघडताच तो डिनर टेबलावर होता....सकाळपासून उपाशी असलेला जीव समोर चमचमीत पदार्थ बघून अगदीच कावराबावरा झाला....मंद कँडलचा उजेड आणि समोर तीच सुंदर प्राची.....काही बोलायच्या आत तिने आपल्या ओठावर बोट ठेवलं आणि म्हणाली
"शुssssssss.......काहीच बोलू नको.....मला माहित आहे सगळं.....तुझ्या जगात तुझी कुणाला पर्वा नसली तरी मला इथे आहे...ह्या जगाचा आणि माझा निर्माता आहेस तू.....सो एन्जॉय"
निलेश देखील बोलण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता....त्याने समोरच्या जेवणावर ताव मारायला सुरू केली.....तिकडे निलेशचा भाऊ रोहितला त्याची चिंता वाटू लागली....जेवला नव्हता तो....रोहितने निलेशच्या दरवाज्यावर नॉक केलं....दरवाजा उघडाच....रोहित दबक्या पावलांनी खोलीत शिरला.....निलेश पाठमोरा झोपला होता आणि त्याच्या डोक्याची एका विशिष्ट पद्धतीत हालचाल होत होती...काहीतरी चावल्याचा चपचप आवाज येत होता.....रोहित दबक्या पावलांनी निलेशच्या समोर गेला....समोरचं दृश्य बघून तो थबकला.....निलेशचे तोंड हालत होते....जणू तो काही खात आहे....मधेच काहीतरी उचलून पीत आहे अश्या पद्धतीत तो हाताच्या आणि तोंडाच्या हालचाली करत होता....पाणी गळ्याखाली उतरावं तसा त्याचा गळा वरखाली होत होता.....काय प्रकार आहे??....रोहित निलेशला जागं करण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला जाग येत नव्हती....अजूनही तो आपल्या तोंडाची हालचाल करत होता.....आईवडील त्याच्यावर चिडून होते त्यामुळे त्यांना सांगणे अवघड.....रोहित एकटक त्याच्याकडे बघत होता...."स्वप्नात असेल कदाचित" असा विचार करून रोहित तिथून बाहेर आला
खरोखर स्वप्नातच होता तो.....पण हे स्वप्न वेगळं होतं.... त्याने कल्पनेत रचलेलं जग होत हे....आणि त्यात तो तीन चार दिवस रमला होता.....तो सुंदर दगडी वाडा..तिथे असलेली सोन्याची सजावट..आजूबाजूचा सुंदर परिसर आणि तिथे असलेली ती....कधी एकदा रात्र होते आणि स्वप्नात जातो अस त्याला होई.....सकाळी डोळे उघडले आणि ह्या खऱ्या आयुष्यात आला की त्याला नकोसं आणि जडजड वाटे.....घरच्यांचा तोच अबोला.....महिन्याभराची सुट्टी होती....वडील तर निलेशच्या तोंडाकडे बघत नव्हते....कारण त्यांचे नाक कापले होते ना त्याने.....आई देखील मोजकं पण खोचक बोलायची.....नाही म्हणायला त्याचा भाऊ रोहित मात्र निलेशला खोदून खोदून विचारत होता
"दादा काही टेन्शन आहे का रे??"
"नाही रे कसलं टेन्शन नाही...."
"तस नाही एकटा एकटा खोलीत बंद असतोस....कुणाशी बोलत नाहीस.....म्हणून विचारलं बाकी काही नाही"
निलेशच्या रात्रीच्या वेळच्या हालचाली संशयास्पद होत्या.....रोहितला त्याची चिंता वाटत होती....प्रत्येक रात्री तो झोपेत काहीतरी विचित्र बडबडत असायचा त्याच्या ओठांची आणि कंबरेची विशिष्ट हालचाल त्याचं वारंवार चेहऱ्यावर फुलणारं स्मितहास्य काहीतरी विचित्र घडत होतं.....रोहित हे कुणाला सांगू शकत नव्हता.....निलेशला ह्याबद्दल विचारलं असता तो प्रचंड चिडायचा.....कदाचित जॉबचे आणि घरचे एकत्रित टेन्शन ह्यामुळे तो कसल्यातरी मानसिक आजारात गेला असेल ह्याची दाट शंका रोहितला वाटत होती....त्याचा एक मित्र होता त्याचे वडील मनोविकार तज्ञ होते......डॉक्टर पाटील ह्यांना रोहितने निलेशचा आजकलच्या विशेष करून रात्रीच्या हालचाली बद्दल बोलून दाखवलं.....डॉ पाटील ह्यांनी त्याला घेऊन यायला सांगितलं.....
पण निलेश येईल???.....त्याला इथे आणणे भाग होते कारण त्याच्या वागण्या बरोबर त्याच्या शरीरातही बदल होत होते.....त्याचे गाल बसले होते वजन झपाट्याने कमी होत होतं.....रोहितला चिंता होती......रोहित त्याच्यावर लक्ष ठेवून होता....विस्कटलेले केस...डोळ्याभोवती काळी वर्तुळे ....मळकट टीशर्ट...आणि चेहऱ्यावर सतत स्मितहास्य....काहीतरी आठवून सतत ते हसणं.....जस जसे दिवस जातील तसतसा हा प्रकार भयंकर होत गेला....आई वडिलांच्या समोर तो थोडं नॉर्मल वागायचा पण एकांतात असताना त्याचे चाळे सुरू होत असत.....एक दिवस रोहित काहीतरी कारण सांगून निलेशला डॉक्टर पाटलांच्या जवळ घेऊन आला.....पाटलांना तो एकदम नॉर्मल वाटत होता....त्यांनी त्याची टेस्ट केली....एकदम नॉर्मल वाटत होता.....रोहितने त्यांना सगळी हकीकत सांगितली....हे ऐकून डॉक्टर पाटलांना थोडं नवल वाटलं कारण मनोरुग्ण शुद्धीत असताना आपल्या विकृती करत असतो पण झोपेत अस काही करणं त्यांनी पहिल्यांदा ऐकलं..त्यांना ह्या गोष्टीचा पुरावा हवा होता..तेव्हा त्यांनी रोहितला निलेशचा खोलीत रात्रीचे शुटींग करायला लावलं....तेव्हा रोहित ने त्याच्या बेड समोर एक छुपा कॅमेरा लावला....पूर्ण एका रात्रीचे शूटिंग झालं....ती शूटिंग बघून डॉक्टर पाटील अवाक झाले.....विचित हालचाली होत्या त्या जणू झोपलेला निलेश कुणासोबत बोलत आहे....तिच्या सोबत चालत आहे....एकूण रात्री तो एका स्वप्नवत जगात जगत होता.....रात्री सोपेत बडबडने वैगेरे गोष्टी एक ठराविक काळासाठी असायच्या पण निलेश पूर्ण रात्र त्या धुंदीत असायचा एकाच बेडवर तो पूर्ण एक काळ आपल्या हालचालींनी जगत होता. हातापायांच्या त्या हालचालीवरून अस वाटत होतं की तो रात्रीच दुसरं आयुष्य जगत आहे.....डॉक्टर पाटील ह्यांनी निलेशला दुसऱ्या दिवशी बोलावले आणि बोलता बोलता हिप्नॉटिझ केले....त्याच्या मनात काय चालू आहे हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं होतं.....
"निलेश.....मी तुला आता काही प्रश्न विचारीन त्यांची तू उत्तरं दे.....तू रात्री कुठे असतोस ???आणि काय करत असतोस??"
निलेशच्या चेहर्यावर एक स्मितहास्य
"मी रात्री प्राची बरोबर असतो तिच्या त्या श्रीमंत बंगल्यात....."
"ही प्राची कोण....सगळं सविस्तर सांग... काही लपवू नको"
"प्राची हे माझ्या कथेतील पात्र आहे...मी ना तिला वाईट समजत होतो....चेटकीण....लोकांना भुलवून ती त्या घरात खजाण्याच्या आमिषाने बोलावून घेते आणि तिथे त्यांना मारून टाकते....पण मी चूक होतो....ती खूप चांगली आहे.....खूप चांगली वागते माझ्याशी"
डॉक्टर पाटील थक्क झाले
"ओके ओके....रोहितने सांगितलं मला की तुला लेखक व्हायचं होत पण वडिलांच्या हट्टाने तू बँकेत जॉब करू लागलास.....तू कुणाशी जास्त संपर्क ठेवत नाहीस...आपल्याच दुनियेत असतोस.....आणि ही प्राची तुझ्या कथेतील एक पात्र....सॉरी चेटकीण आहे"
निलेशच्या चेहऱ्यावर गंभीर भाव
"नाही.....ती चेटकीण नाही....ती खूप चांगली मुलगी आहे....किती प्रेमाने बोलते माझ्याशी.....एवढं प्रेमाने माझ्याशी कुणीही बोललं नव्हतं"
डॉक्टर पाटील आपल्याशीच काहीतरी बोलत मान हलवत बाहेर आले.....त्यांनी निलेशला त्या संमोहनातुन बाहेर आणून बाहेर बसायला लावलं आणि रोहित ला केबिन मध्ये बोलावलं....काहीतरी उलगडा लागल्याचे सकारात्मक भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते
"हे बघ रोहित....तू जे सांगितलं आणि निलेश कडून मला जे कळलं त्यावरून हे सिद्ध होते की.....त्याला लेखक व्हायचं होतं....पण तुझ्या वडिलांच्या जबरदस्तीने तो बँकेत जॉबला लागला जे काम त्याला मान्य नव्हतं.....पण त्याच्या आतील तो लेखक अजूनही जिवंत होता.....हे लेखक लोक भलते कमाल असतात.....त्यांचं जग वेगळं असतं....काहीसे मनाने हळवे....कमकुवत....त्रागा करून घेणारे.....नेमकं हेच झालं आहे.....तुझ्या भावाचा स्वभाव स्वमग्न आहे....तुझे वडील त्याचा अपमान करतात.....किंवा इतर कुणी काही बोलत असेल.....त्यात त्याच्या जॉब वर काही प्रॉब्लेम्स सुरू आहेत.....तर हे सगळे मानसिक हल्ले त्याच्या मनावर एकदम सुरू आहेत......त्याला मानसिक आधारची गरज आहे.....पण तुझ्या शांत अबोल भावाला हे कुणाला सांगता येत नाही त्यामुळे त्याने आपल्या काल्पनिक जगात प्राची हे पात्र तयार केलं आहे.....त्याला तिचं स्वप्न पडू लागलं आहे....आणि तो स्वप्नात सगळं तिच्याशी शेअर करतो....हा एक मानसिक आजार आहे"
डॉक्टरांना थांबवत रोहित मधेच बोलला
"पण डॉक्टर....त्याचं वजन कमी होत आहे...रात्री तो विचित्र हालचाली करतो....मानसिक आजार असा अचानक कसा हावी होऊ शकतो.... .बघा तो किती अशक्त झाला आहे.....काहीतरी इलाज असेलच की"
"अरे रोहित....रिलॅक्स......होत असे कधी कधी.....मानसिक आजाराचा शरीरावर देखील परिणाम होतो.....मी काही गोळ्या लिहून देतो त्याचा कोर्स सुरू कर....ज्यामुळे निलेशला शांत झोप लागेल...डोन्ट वरी बरा होईल तो"
रोहितने ती औषधे घेतली.....त्या रात्री निलेश गोंधळल्यासारखा वागत होता.....जेवतानाही त्याचा घास हातातच काहीवेळ थांबत होता.....त्याचा हा अवतार बघून त्याच्या वडिलांना अक्षरशः किळस वाटत होता.....एक जोरदार शिवी बसताच निलेश चपापला आणि जेवू लागला....तिकडून आईचे टोमणे सुरूच होते....रोहित दोघांना गप्प करत होता....जेवण झाल्यानंतर रोहित निलेशला आपल्या खोलीत घेऊन गेला त्याने डॉक्टरांनी दिलेली औषध निलेशला दिली......काही वेळातच निलेश गाढ झोपी गेला....रोहित त्याच्या जवळच काही वेळ बसला....निलेशकडून कोणतीही हालचाल होत नव्हती....तब्बल दीड तास रोहित निलेशच्या बेड शेजारी बसला होता.....पण निलेश अगदी शांत झोपी गेला होता.....काही दिवसांपासून होणारी त्याची तगमग शांत झाली होती....हे बघून रोहितने एक निश्वास सोडला आणि आपल्या खोलीत निघून आला.....
सकाळ झाली.....सगळ्यांची आवराआवर सुरू होती.....8 वाजत आले होते.....निलेश अजून झोपला होता.....आईचा खालून ओरडा चालू होता पण रोहितने तिला समजावलं....त्याला गोळ्या दिल्या होत्या रात्री त्यामुळे झोपला असेल......वडील पेपर वाचता वाचता निलेशचा विषय निघताच नकारात्मक मान डोलवत होते....8 चे 9 झाले शेवटी रोहित निलेशच्या खोलीकडे निघाला.....दरवाजा उघडाच होता....समोरचं दृश्य बघून तो जोरात दरवाज्याला आपटला......निलेशच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं होतं....सगळा बेड रक्ताने माखला होता....हाडाच्या सांगड्याला मास चिटकून जो कृश देह दिसावा तसा निलेश दिसत होता....समोरचं दृश्य एकदम भयानक होतं.....काहीसा आवाज झाल्याने निलेशने आपले पांढरेफेक डोळे रोहितच्या दिशेने फिरवले ते भयानक डोळे बघून रोहित ओरडू लागला....."बाबाsssssss......बाबाsssssss"
तसे अरुणराव वरती आले.....निलेशची ती हालत बघून ते प्रचंड बैचेन झाले.....निलेश हलु शकत नव्हता पण त्याचे ते डोळे त्यातली बुबुळे गोल गोल फिरून मदतीचे आवाहन करीत होती.....दोघांनी मिळून निलेशला उचललं....एखादा निर्जीव देह....अगदी ताठ झाला होता......चेहऱ्याची अवस्था बघून निलेशची आई बेशुद्धच झाली....दातखिळी बसलेली....फक्त हलती बुबुळे जिवंत असल्याची साक्ष देत होती.....रोहितने अगदी लहान मुलाला उचलावं तस त्याला उचलून दवाखान्यात नेलं....त्याची ती अवस्था बघून डॉक्टर आवक झाले.....त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या पण निदान लागत नव्हते.....चांगला ठणठणीत देह आज अचानक हाडाचा सापळा बनला होता अगदी ओळखूही येत नव्हता.....त्याला ecg वैगेरे जोडली होती.....ह्रदयाची स्पंदने खाली वर होत होती......डॉक्टरांना देखील रोहितच्या बोलण्यावर विश्वास नव्हता की एका रात्रीत एक ठणठणीत मुलाची ही अवस्था झाली पण हा विचार करायला वेळ नव्हता....निलेशची प्रकृती खालावत होती....डॉक्टर प्रयत्न करत होते......रोहित आणि त्याचे वडील हवालदिल होऊन बाहेर बसले होते....अचानक आतून त्यांना डॉक्टरांचं बोलावन आलं तसे अरुणराव ताडकन निलेश जवळ पोहोचले.....अरुणराव आणि रोहित त्याच्या बेड जवळ पोहोचले.......निलेशच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता पण चेहऱ्यावर एक स्मितहास्य कायम होते.....ecg मशीनची टिक टिक टिक सुरू होती ती रेषा वर खाली होऊन निलेशच्या जिवंतपणाची साक्ष देत होती.....नेहमी पाण्यात बघणारे त्याचे वडील पहिल्यांदा त्याच्याकडे काळजीने पाहू लागले.....रोहितच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू होते कारण त्याचा भाऊ नॉर्मल वाटत होता....निलेशने थरथरत्या हातांनी त्याच्या वडिलांचा हात पकडला
"बाबा....जे सांगतो ते नीट ऐका.....माझ्याकडे वेळ कमी आहे"
अरुणरावांना हे ऐकून धक्काच बसला
"वेळ कमी आहे म्हणजे??....निलेश तुला काही होणार नाही"
निलेशने आपली मान फिरवली तो रोहितकडे बघू लागला
"जे व्हायचं ते झालंय......तुम्हाला आठवतंय बाबा....मला लेखक व्हायचं होतं....पण ते शक्य झालं नाही....तुमच्या हट्टाने मी जॉब करू लागलो पण माझ्या कल्पना माझी साथ कधीच सोडत नव्हत्या....माझ्या कल्पनेतलं विश्व वेगळं आहे....पण ते काल्पनिक विश्व माझ्या खऱ्या आयुष्यावर हवी होईल असं वाटत नव्हतं"
निलेश काय बोलतोय हे दोघांनाही कळत नव्हतं....ते सगळं शांतपणे ऐकत होते....
"तिला मी घडवलं....माझ्या काल्पनिक जगातली सगळ्यात ताकतवाण अशी चेटकीण होती ती....मी जर लेखक बनलो असतो तर मी तिला माझ्या कल्पनेत हरवलं असतं....तिच्यावर एखादी मोठी कादंबरी लिहून त्यातच तिला मारून टाकलं असतं...पण ते शक्य झालं नाही.....मी जॉब करू लागलो आणि तिला हरवू शकलो नाही....एका क्षणी वाटलं ती माझ्यावर हावी झालीय.....म्हणून तर माझ्याकडून कामात चुका होऊ लागल्या आणि तुमची बोलणी खावी लागली....हे दुःख मी कुणाला सांगू शकत नव्हतो....मनातल्या मनात रडत होतो....तेव्हा ती परत आली....जी माझ्या कल्पनेच्या जगात खलनायिका होती तिलाच मी माझे दुःख सांगू लागलो.....ती माणसाला भ्रमित करते आणि ओढून घेते हे माहीत असूनही मी माझ्या काल्पनिक जगात तिच्यासोबत रमू लागलो....पण मला हे कळलं नाही की ती मला ओढून घेत आहे तिच्या फायद्यासाठी.....मी माझ्या कल्पनेने तिला घडवलं...आता मी तिची वेगळी दुनिया घडवावी असा ती मला आग्रह करत आहे....ज्यात ती ताकतवान असेल त्यामुळे ती आता मला सोडणार नाही.....तिला माझी सोबत आणि मला तिची सोबत आवडू लागली आहे.....ती मला आपल्या जगात घेऊन जाईल....जिथे आम्ही दोघेच असू.....हे शेवटचं सांगण्यासाठी तिने मला इथं पाठवलं आहे"
रोहित आणि वडिलांना काहीच समजत नव्हते
"आणि हो रोहित.....माझ्या बेडखाली एक पेटी आहे.....त्यात खजाना आहे.....प्राची प्रत्येक भेटीनंतर मला नजराणा देत होती त्यात तो आहे....तो तुम्ही वापरा.....बाबा मला माफ करा.....मी तिला हरवू शकत नाही....तिने मला काबीज केलं आहे.....माझी वेळ झाली.....बघा ती बोलवत आहे बघा....बघा"
निलेश अगदी घाईगडबडीत सगळं बोलून अचानक शांत झाला...ecg मशीन वरची ती हलणारी रेष आता समांतर झाली.....निलेशचे डोळे वर काहीतरी बघत स्मितहास्य करत होते....ते स्मितहास्य करतच त्याने प्राण सोडला....हाताच्या मुठी सैल झाल्या खन खन करत एक सोन्याचं नाणं त्याच्या हातातून जमिनीवर पडलं....ते नाणं रोहितने उचललं.....डॉक्टरांनी निलेशला मृत घोषित केलं......त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ कुणालाच लागला नाही.....पण तो जिथे पोहोचायचा होता तिथे पोहोचला
निलेशचे तेरावे पार पडले.....सगळं प्रकार अगदी कल्पनेच्या पलीकडचा होता.....रोहितला सगळ्यात जास्त दुःख झाले होते....आपल्या भावाचा स्वभाव तो ओळखून होता....असाच विचार करता करता त्याला त्या दवाखान्यातील नाण्याची आठवण झाली....त्याने कपाट उघडलं त्यात ते सोन्याचं नाणं होतं....ते नाणं रोहितने हातात घेतलं त्यावर कसल्यातरी विचित्र भाषेत काहीतरी लिहलं होतं.....रोहितला काहीतरी आठवलं तो निलेशच्या खोलीत गेला त्याने बेड खाली बघितलं एक लाकडी पेटी दिसत होती....ती लाकडी पेटी त्याने बाहेर ओढली.....ती पेटी रोहितने उघडली....त्यात असंख्य अशी सोन्याची नाणी होती.....त्या नाण्यावर खोलीतला सूर्यप्रकाश पडून ती सोन्याची नाणी चमकत होती.........(समाप्त)
लेखन :- शशांक सुर्वे
(कथा कशी वाटली??? कमेंट बॉक्स मध्ये आपला अभिप्राय जरूर नोंदवा......धन्यवाद )