शुक्रवार ची रात्र, नेहमीचीच सेकंड शिफ्ट, 12.25 ची लास्ट लोकल, तिच्यातला ठरलेला डबा आणि ठरलेला बाकडा
पण या सगळ्या ठरलेल्या गोष्टीत आज एक नवीन चेहरा "साहेब माझ्या मुलीला पापलेट खूप आवडतात म्हणून आज घेतलेले, पण आता तिला पापलेट द्यायला घरी पोहोचू शकेन असं वाटत नाही. तुम्ही घेऊन जाता का हे?"
वास्तविक मला पापलेट खूप आवडतात पण कशाला हे नसतं झेंगट, हा कोण मला मासे देणारा? "नको मी शाकाहारी आहे" म्हणून मी ते नाकारले.
पुन्हा पुढच्या शुक्रवार ची रात्र, नेहमीचीच सेकंड शिफ्ट, 12.25 ची लास्ट लोकल, तिच्यातला ठरलेला डबा, ठरलेला बाकडा आणि परत तोच चेहरा, तीच माशाची पिशवी आणि तीच विनंती
त्या अमनवीय शक्तीला नाही म्हणणं माझ्या जीवावर आलेलं, त्याच्या हातातून पिशवी घेताच त्याच्या चेहऱ्यावर एक खुनशी हास्य "मासे खातोस काय, आज मासे तुला खातील" आणि इतकं बोलून त्यानं मलाच खाडीत फेकून दिलं
पुन्हा पुढच्या शुक्रवार ची रात्र, 12.25 ची लास्ट लोकल, तिच्यातला ठरलेला डबा, ठरलेला बाकडा आणि
परत तीच माशाची पिशवी समोरच्याला देणारा मी.......
भूषण मुळे सातारकर