#सूडकथा #गूढकथा
#प्रतिशोध
"नाही. .तु online येण्याची वाट बघत होते."
"सो क्युट. .लव यु babe"
पुढचा अर्धा तास दोघं व्हाट्सअप वर चॅटिंग करण्यात बुडून गेले.
स्पृहा आणि आतिश दोघंही कॉलेजमध्ये बीबीएच्या तिसऱ्या वर्षाला, एकाच वर्गात. तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये, त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपसोबत असतानाही जगाचे भान विसरून त्यांच्या गुजगोष्टी चालत. यावरून त्यांच्या ग्रुपमधले मित्रमैत्रिणी त्यांची कायम थट्टा करत.
दोघं कॉलेजच्या बाहेरही भेटत. एकत्र नसले की दोघांचा बराच वेळ व्हाट्सअप, फेसबुकवर एकमेकांशी चॅटिंग करण्यात किंवा मोबाइलवर बोलण्यात जाई.
आतिश शहरातील एका मोठ्या नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा एकुलता मुलगा तर स्पृहाचे आई वडील दोघेही सनदी अधिकारी. स्पृहाची लहान बहीण स्पंदन त्याच कॉलेजला कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला होती. स्पृहापेक्षा स्पंदन खूपच वेगळी. कायम अभ्यासात बुडालेली. वयाच्या मानाने ती खूपच परिपक्व होती. लहान असून स्पृहाला ती नेहमी आतिशचा नाद सोडून अभ्यासात लक्ष घालण्याचा सल्ला देई. तिच्या मते आतिश सारखी मुलं मुलींकडे फक्त टाइमपास म्हणून बघतात.
नात्यातील लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आतिशचे आईवडील काही दिवसांसाठी बाहेरगांवी गेले. एकांतात भेटण्याची दोघांना अनायासे संधी मिळाली. आतिशने स्पृहाला घरी बोलावले. आतिशचा आलिशान बंगला पाहून स्पृहा अचंबित झाली. हॉलच्या भिंतीवर लावलेलं सुंदर पेंटिंग भान हरपून पहात असताना आतिशने तिला मागून येउन मिठीत घेतलं आणि तिच्या मानेवर ओठ टेकले. स्पृहा त्याच्या मिठीत विरघळली. दोघंही जगाचं भान हरपून एकरुप झाली.
स्पृहा भानावर आली तेव्हा बाहेर अंधारून आलं होतं. पटकन कपडे सावरून ती उठली. "मला निघायला हवं. उशिर झाला." असे म्हणून आतिशचा निरोप घेऊन ती निघाली.
त्यानंतर दोन तीन वेळेस आतिशने स्पृहाला त्याच्याबरोबर एकांतात येण्यासाठी गळ घातली. पण स्पृहाचे संस्कारी मन पुन्हा त्या गोष्टीसाठी तयार होत नव्हते. एकदा झाली ती चूक पुन्हा होता कामा नये असे ती वारंवार स्वतःला बजावत होती.
सेमिस्टर एक्झाम जवळ आल्याने सगळे जण अभ्यासाला लागले. स्पृहाचे मात्र अभ्यासातून लक्ष उडाले होते. काही दिवसांपासून आतिशचे वागणे बदलले होते. हल्ली तो क्वचितच कॉलेजला यायचा. त्यांच्या ग्रुपमधील काही जणांनी त्याला एका मॉडेल सारख्या दिसणाऱ्या मुलीसोबत पब, सिनेमा हॉल अशा बर्याच ठिकाणी पाहिले होते. स्पृहाच्या मेसेजेसना तो रीप्लाय करेनासा झाला. तिने त्याला मोबाइलवर खूपदा कॉल केले. एकतर तो रिसीव करायचा नाही. किंवा 'मी बिझी आहे नंतर कॉलबॅक करतो' असे सांगून फोन कट करायचा. त्याच्या अशा वागण्याने स्पृहा निराश झाली. तासंतास पुस्तक डोळ्यासमोर घेऊन ती हरवलेल्या नजरेने कुठेतरी पहात बसे. मोबाइल फोनची रिंग वाजताच अधीरपणे आतिशचा फोन असेल या आशेने फोन घ्यायची. आतिश आपल्याला टाळतो आहे, हे तिच्या लक्षात आले आणि ती अधिकच निराशेच्या गर्तेत बुडाली. स्पंदन तिला खूप समजवायची. पण वस्तुस्थितीचा स्वीकार करणं तिला खूप कठीण जात होतं. आता तर स्पृहाचे कॉलेजला जाणे सुद्धा बंद झाले. तासंतास शून्यात नजर लावून ती बसून राही. अंघोळ, जेवण या सारख्या रोजच्या गोष्टी करण्याचेही तिला भान राहत नसे. तिची अशी अवस्था तिच्या आई बाबांना आणि स्पंदन ला पाहवत नसे. त्यांचा जीव तिच्यासाठी तुटत होता. सायकॅट्रिस्ट च्या ट्रीटमेंटचा सुद्धा तिच्यावर काही फरक पडत नव्हता. डिप्रेशनवरच्या औषधांमुळे खूप वेळ ती झोपून राही. उठल्यावर काही न करता शून्यात नजर लावून बसे. बाह्य जगाशी तिचा संपर्क पूर्णपणे तुटला. घरच्यांसोबत ही ती काही बोलत नसे. एके सकाळी सहाच्या सुमारास बिल्डिंगच्या खालून गलका ऐकू आल्याने स्पंदन ला जाग आली. बाजूच्या पलंगावर स्पृहा तिला दिसली नाही. तिने उठून गॅलरीत जाऊन खाली पाहिले आणि तिला भोवळ आली. कसेतरी तिने स्वतः सावरले. स्पृहा रक्ताच्या थारोळ्यात पालथी पडली होती. नैराश्याच्या भरांत रात्री केव्हातरी तिने गॅलरीतून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली होती. स्पृहाच्या जाण्याने आई बाबा आणि स्पंदन प्रचंड दुःखात बुडाले. पंधरा दिवसांनंतर स्पंदनने कॉलेजला आणि आई बाबांनी ऑफिसला जायला सुरुवात केली. तोच त्यांच्या दुःखावरचा इलाज होता.
*****
नोटिफिकेशन साउंड ऐकून आतिशने मोबाइल उचलला. "कसा आहेस? मजेत असशील ना?" स्पृहाचा व्हाट्सअप मेसेज पाहून तो उडालाच. स्वतःला सावरून त्याने विचार केला की स्पृहाचा नंबर वापरून कोणीतरी आपली गंमत करत असणार. त्याने त्या नंबरवर फोन केला. "हैलो! मी स्पृहा!! इतक्या सहज मी तुला सोडणार नाही..." पलीकडून स्पृहाचा आवाज आणि पाठोपाठ तिचे चिरपरिचित खळखळून हसणं.
आता मात्र त्याला दरदरून घाम फुटला. स्पृहाच्या विचाराने त्याची झोपच उडाली. त्यानंतर अधून मधून स्पृहा त्याला फेसबुक मेसेंजर, व्हाट्सअप, ईमेलवर पिंग करू लागली. कधी तिच्या मोबाइलवरुन त्याला फोन येई, तेव्हा घाबरून तो कधीच फोन उचलत नसे. एकदा त्याला स्पृहाच्या ई मेल आयडीवरून एक मेल आले. त्यात तो तिच्या भावनांची कसा खेळला. पुष्कळदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्याने तिला कसे टाळले. त्यामुळे ती कशी डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी तिने स्वतःला कसे संपवले. याबद्दलची इत्थंभूत हकिकत होती. त्या दिवसापासून स्पृहा बद्दलची अपराधी भावना त्याच्या मनात घर करू लागली. त्या भावनेने त्याचे सुख चैन हिरावून घेतले. तो रात्री धडपणे झोपू शकत नव्हता. थोडी झोप लागताच वेड्या वाकड्या, भयानक स्वप्नांनी त्याला घाबरून जाग येेई. कधीतरी अचानक स्पृहा त्याच्या जवळ उभी आहे असे आतिशला वाटे आणि भीतीने तो अर्धमेला होई. हळूहळू तो आतून पोखरला जाऊ लागला. त्याचे मित्र, पब, पार्ट्या, मौजमजा, फिरणं सगळं काही बंद झालं. आता तो फक्त तासंतास शून्यात नजर लावून कोणाशीही न बोलता एकटा बसला राही. आंघोळ, जेवण कशाचीही त्याला शुद्ध नसे. त्याला या अवस्थेत पाहून त्याचे आईवडील खूप दुःखी होत. शहरातील नामांकित मानसोपचार तज्ञ त्याच्यावर उपचार करत होते. पण त्याच्या मनातील भीती कशानेही कमी होत नव्हती.
अशातच एकदा स्पंदन आतिशला भेटायला म्हणून त्याच्या घरी आली. त्याच्या घराची बेल दाबतांना तिच्या मनात भीती, दुःख अशा संमिश्र भावना होत्या. आतिशच्या आईने दार उघडले. त्या खूप खंगलेल्या दिसत होत्या. त्यांनी स्पंदन ला आतिशच्या खोलीत नेले. आतिश शून्यात नजर लावून एकटक पाहत होता. तिला पाहताच तो जोरजोरात रडू लागला आणि तिच्या समोर हात जोडू लागला. त्याचे हे वागणे त्याच्या आईला अनपेक्षित होते. त्या त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागल्या. स्पंदन डोळे पुसत तिथून बाहेर पडली.
*****
टॅक्सीतून उतरून, लिफ्टने सातव्या मजल्यावर येऊन तिच्या जवळील चावीने स्पंदनने दार उघडले आणि तिच्या खोलीत जावून पर्समधील स्पृहाचा मोबाइल, पिन नंबर देऊन उघडला. त्यातील व्हाट्सअप, फेसबुक अकाऊंट डिलीट केले. मोबाइल पूर्णपणे इरेज करून फॅक्टरी रिसेट केला आणि त्यातील सिमकार्ड टॉयलेटमध्ये नेऊन फ्लश करून टाकले. तिच्या लाडक्या बहिणीला, स्पृहाला आयुष्यातून उठवणारा आतिश स्वतःच आयुष्यातून उठला होता. तिचा सूड पूर्ण झाला होता.
कोणालाही माहित नसलेली स्पंदनची एक विशेषता होती... ती कोणाचीही हुबेहुब नक्कल करू शकत असे.
आता एका वेगळ्याच समाधानाने तिने अभ्यासाचे पुस्तक उघडले.
******
©कविता दातार