शेकोटी (लघुकथा) -लेखन :- शशांक सुर्वे
थंडी सुरूच झाली होती.....गावाबाहेर एक नवीन पॉश हॉटेल सुरू झालं होतं...एकदम निसर्गरम्य ठिकाणी..डोंगरात....हौशी मातब्बर लोकांना आपले मोठे मोठे शौक पूर्ण करता यावेत म्हणून शहरापासून दूर 20 किलोमीटर लांब हे रिसॉर्ट बनवलं होत.....कुख्यात गुंडाने स्थानिक नेत्यांचा काळा पैसा सत्कारणी लावत हे पांढरं फेक पॉश रिसॉर्ट बांधले होते.... नुकतंच ते हॉटेल सुरू केलं होतं....कालच सुरुवात झाली होती....इंस्पेक्टर अभिजित यांना देखील बोलावणं आलं होतं पण काही कारणास्तव त्यांना जाता आलं नाही....पण दुसऱ्या दिवशी हक्काने ते त्या गावापासून दूर अश्या हॉटेलमध्ये गेले होते.....सिक्रेट खोल्या....खास माणसांच्यासाठी केलेल्या खास व्यवस्था.....अंधुक लाल प्रकाश आजूबाजूला लावणीच्या नावाखाली अंग उघडं ठेवून अश्लील हातवारे करून प्रसंगी आजूबाजूला घोळका करून दारूच्या नशेत झिंगत असलेल्या श्रीमंतांच्या अंगावर पडून उधलेला पैसा गोळ्या करणाऱ्या तरुणी....बाजूलाच धुरात लटकवलेल्या लाल भडक काळसर भाजलेल्या कोंबड्या..त्या तंदुरीचा करपलेला मसाल्यांचा वास...दारूच्या बाटल्या.....एकूणच सगळं दिलखूष वातावरण होतं.....इंस्पेक्टर अभिजित बरोबर राजेश देखील झिंगला होता....नवीन आणलेला iphone त्याने त्या हॉटेलमध्येच इंस्पेक्टर अभिजित यांना गिफ्ट केला होता....दोघेही पार्टीचा आनंद घेत होते....तोंडावर नाटकी हसरा प्रतिसाद असलेल्या तरुणींना जवळ ओढून त्यांच्यावर नोटांची बारीश करत होते.....राजेश जाम खुश होता....नुकताच निर्दोष सुटून बाहेर आला होता....दारूच्या नशेत
"साहेब तुमच्यामूळ बाहेर आलो बघा....तुमच्यामुळं...."
अस सारख बोलून बोलून नाचणाऱ्या एखाद्या पोरीला ओढून इंस्पेक्टर अभिजितच्या अंगावर ढकलत होता....त्यांना खुश करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होता.....
"राजेशराव आव बास ओ....किती उपकाराची भाषा ती....आव माझी नोकरी तुमच्या वडिलांच्यामुळं हाय....आणि मी काय केलं??....जरा पुराव्यात फेरफार केली....त्या पोरीच्या वडिलांना धमकावलं....तिच्या मैत्रिणींना धमकी दिली....बाकी वरल्या साहेबांना पैसाआडका वैगेरे तुमच्या पप्पांनीच दिला की....मी फक्त जरा किरकोळ फेरफार केली....तुम्हाला अलगद बाजूला काढून घेतलं....तवा ही उपकाराची भाषा बंद...."
दारूचा घोट मारत राजेश तरर डोळ्यांनी अभिजितकडे बघत म्हणाला
"आवं साहेब.....मला वाटत नव्हतं मी जेल मधून बाहिर येईल....ती सोशल वर्कर मेघना श्रीवास्तव लई लढत होती....आणि लोकांनी पण किती बोंबाबोंब केलेली....जरा हे प्रकरण मिटु दे मग एका एकाला बघून घेतो......"
"आव राजेशराव मेघना श्रीवास्तववर 15 लाखाच वजन हुतं"
सिगारेट बाजूला करत राजेश बोलला .... "म्हणजे??"
"म्हणजे तुमच्या पप्पांनी 15 लाख देऊन गप्प केलंय तिला.....समजलं काय"
हात टेबलावर आपटत राजेश बोलला
"आस हाय व्हय??....म्हणजे पैशाला सगळं विकत मिळतंय म्हणा की"
डावीकडून येणाऱ्या नाचणाऱ्या एका मुली कडून ग्लास स्वीकारत इंस्पेक्टर अभिजित बोलला
"बरोबर हाय राजेश राव....पैशाला सगळं मिळतंय....असल्या आणि ह्यापेक्षा भारी भारी पोरी पण मिळत्यात पण तुम्ही मोठा घाणा करून ठेवला....आव साहेब...तुमचं पप्पा किती टेन्शन मध्ये हुतं माहीत आहे काय??"
राजेशने सिगारेट विझवली
"काय सांगू सायेबा....पोरगी कडक होती रे....एकदा फक्त मज्जा घ्यायची होती....पण लई नखरे करत होती....रडत आरडत होती....जेव्हा तिनं कानाखाली लावली तवा आपलं टाळकं फिरलं आणि दाबला गळा....."
त्याला मधेच थांबवत अभिजित बोलला
"ते सगळं ठीक हाय पण....गावाबाहेर आणून जाळायची काय गरज व्हती तिला??....आम्हाला फोन केला असता तर निस्तरलं असत सगळं प्रकरण"
"बरोबर हाय सायेबा तुझं....पण घाबरलो होतो...आणि राग असा व्हता डोक्यात की.....जाळून खाक करायची व्हती तिला......म्हणून..."
"बर...बर....ते सोडा राजेशराव....झालं तर ते झालं....परत असा घोळ घातला की आम्हाला सांगत चला.....बाकी मज्जा घेतली की नाही"
"कुठली मज्जा घेतोय??....पोरगी लई लढून राहिली....चिवट व्हती.....म्हणून टाळकं फिरलं आणि खेळ खल्लास केला बघा....."
राजेशच्या हातात हात देत अभिजित म्हणाला
"बर सोडा आता विषय....निर्दोष सुटला नव्ह??....मग आता चला घरी जाऊया आता"
एक स्मितहास्य करत राजेश बोलला
"जातोय कुठला....आज रातीचा मुक्काम हितच....काय नवीन पाखरू आणलंय म्हण आपल्या परश्यानं"
"है तिच्या मारी......करा करा मज्जा करा....पण जरा सांभाळून बरं का...."
अभिजितच्या शेवटच्या वाक्याकडे दुर्लक्ष करत राजेश धडपडत आतल्या खोलीत जाऊ लागला....अभिजित पण मालकाशी चर्चा करत करत तिथून आपल्या गाडीने निघाला....रात्रीचे साडेबारा वाजत आले होते.....त्या रिसॉर्ट मधल्या एका नाचणारीने आपला घाम पुसलेला रुमाल काढून अभिजितच्या दिशेने फेकला होता... तो रुमाल गळ्यात बांधून त्याचा वास घेत त्या गावाबाहेरच्या निर्मनुष्य जागेवरून तो आपली गाडी चालवत होता..त्याचं पोस्टिंग माधवनगर पोलीसस्टेशनमध्ये होते.....नाईट ड्युटीवर जायचे होते....गाडीत आत जोराने म्युझिक सुरू होते....दारूच्या हलक्या झिंगेत तो गाडी चालवत होता.....20 किलोमीटर रस्ता पार करून जाण्याचा त्याला जाम कंटाळा आला होता....कार मध्ये तो एकटाच होता त्यामुळेच त्याला वाट वसरत नव्हती.....आपण चालतच जात आहोत असं त्याला वाटत होतं.....आजूबाजूला झाडी होती....अगदी दुतर्फा पसरलेली झाडे....कारच्या हेडलाइटने फक्त मर्यादित अंतर उजळून निघत होतं....बाकी तिन्ही बाजूला काळाकुट्ट अंधार.....वातावरण थोडं भीतीदायक बनले होते म्हणून तर कारच्या म्युझिकचा आवाज वाढला होता.....समोर पसरलेली मोठी झाडे त्यावर लाईट पडताच भयानक वाटत होती.....न जाणो आज अभिजितला जडजड वाटत होतं....डोक्यात भीती तिन्ही बाजूच्या अंधाराप्रमाणे दाटली होती.....थोडे अंतर आरामात पार झाले.....अचानक कारमधील धडाडणार्या बास म्युझिक मध्ये खरखर जाणवू लागली....एखाद्या रेडिओ प्रमाणे ती खरखर होती....खर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज डोकं बधिर करणारा होता....पेनड्राइव्ह मधून लावलेल्या गाण्यामध्ये अशी खरखर??....ते पण आजच??....हा एकच विचार अभिजितच्या मनात आला आणि त्या गाण्याची खरखर कर्रर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्रर्रर्र सुईईईईई....खट खट....असा मेंदू बधिर करणारा आवाज डोकं बधिर करणारा होता....शेवटी अभिजितने गाणं बंद केलं.....गाणं बंद केल्यानंतर मात्र बाहेरची भयाण शांतता अभिजितवर हावी होऊ लागली.....समोरची हेडलाइट थोडी अंधुक होऊ लागली...तो कमी जास्त होणारा प्रकाश वातावरण अजून गंभीर भीतीदायक बनवत होता..काहीतरी वेगळं घडत होतं....आसपास जे काही घडत होतं त्याचा तर्क लावणे अवघड जात होते......हेडलाइट अंधुक होऊ लागले.....सोबत गाडीचा स्पीड मीटर एकाच जागी गोठल्यासारखा 30 आकड्यावर स्तब्ध झाला.....अचानक रस्त्यावर समोर एक मंद अंधुक धुके जमा झाले....त्या धुक्याची एका ठराविक उंचीवर ठराविक पद्धतीने हालचाल होत होती....अभिजित प्रचंड घाबरला....त्याने कुणालातरी फोन लावण्यासाठी फोन बाहेर काढला तेव्हा मोबाईलची बॅटरी अचानकच लो झाली आणि अभिजितचा मोबाईल स्विच ऑफ झाला.....मनावर प्रचंड भीती त्यातच अचानक थंडीची लाट यावी तशी थंडी वाजू लागली....काचेवर दव जमू लागले....त्यात त्याने चालू केलेल्या वायपरचा खर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्र आवाज.....अभिजित इकडे तिकडे बघत होता...आजूबाजूला झाडांची सळसळ वाढली होती त्या काळ्या जंगलातून कुणीतरी आपला पाठलाग करत आहे कधी ह्या बाजूने कधी त्या बाजूने....समोरच्या धुक्यातून एक पांढरी आकृती वेगाने ह्या कडेने त्या कडेला गेली तेव्हा मात्र अभिजित जाम घाबरला....डाव्या उजव्या बाजूच्या अंधारातून त्या झाडीतून कुणीतरी मंद चमकदार डोळे त्याला रोखून बघत होते....किंचितश्या प्रकाशात एक मानवी आकार दिसत होता....मानवी आकार की झाडांच्या फांद्या?? काहीच कल्पना नाही.....पण ह्या आडवळणी रस्त्यावर कुणीतरी होतं....ते कधी डाव्या उजव्या बाजूने जात होतं कधी गाडीच्या मागे कधी वर कधी समोरच्या धुक्यात....दिसत तर काहीच नव्हतं पण अभिजितला न राहून त्या अमानवी शक्तीचं अस्तित्व स्पष्ट जाणवत होतं.....त्याची नशा कधीच उतरली होती.....त्या गारठ्यात देखील त्याला दरदरून घाम फुटला होता.....कारच्या पत्र्यावर कुणीतरी होतं हे मात्र नक्की.... आपल्या हातांच्या नखांची कारच्या पत्र्यावर लयबद्ध हालचाल करून आपलं अस्तित्व दाखवत होतं....कुणी प्राणी?? शक्य नाही.....कारण एखाद्या बासरीवर बोट जसे लयबद्ध फिरते तशी ती बोटे कारच्या पत्र्यावर फिरत होती.....बोटे की अजून काही?? आवाज स्पष्ट होता...एखादी कडक जाड बोटे पत्र्यावर फिरली असावीत....बोटे की हाडे??.....विचार करायला वेळ नव्हता कारण थंडी प्रचंड वाढली होती.....अभिजितचे अंग गारठले होते....गाडी सुद्धा गारठून बंद पडली होती.....अभिजितचे दातावर दात आपटत होते.....त्याने आपले हात अंगाभोवती गुंडाळले होते बाहेर येण्यावाचून पर्याय नव्हता कारण थोड्याच अंतरावर आग दिसत होती....कदाचित कुणीतरी "शेकोटी" पेटवली असावी..ती शेकोटीच अभिजितला ह्या थंडीपासून वाचवणार होती..अभिजित काकडत गाडीबाहेर आला....त्याने गाडीकडे बघितले....गाडीवर बर्फाचा हलकासा थर साचला होता....एवढी थंडी??....कसं शक्य आहे??
हात पाय जाम झाले होते....तो तसाच कापर्या पायांनी त्या आगीजवळ जाण्यासाठी निघाला.....एवढ्या निर्मनुष्य ठिकाणी ही आग कोण पेटवली?....विचार करायला वेळ नव्हता....डोकं सुन्न झालं होतं....शरीराप्रमाणे विचारचक्र ही गोठत चाललं होतं....थंडीने पाय सुन्न केले होते....पायात जीव नसल्यासारखे वाटत होते...अभिजित जणू पाय खेचत होता....अखेर तो त्या आगीजवळ आला....आग मोठी पेटली होती...जणू कुणी कॅन भरून पेट्रोल ओतून आग लावल्यासारखी आग पेटली होती.....मोठ्या ज्वाळा परिसर उजळून टाकत होत्या....अभिजितचे खिशात घातलेले हात बाहेर आले...ते त्याने आगीसमोर धरले....आता त्याला हायसे वाटत होतं....थंडी गायब झाली होती....आग एका लयीत पेटत होती..वेगवेगळे आकार दाखवत होती...अभिजित गरम झाला होता....खिशातून मोबाईलला काय झाले हे बघण्यासाठी तो खिशात हात घालू लागला....अचानक कसला तरी सडका,जळका वास त्याला येऊ लागला....पोलीस असल्यामुळे तो वास अभिजितला परिचित होता...मांस जळल्याचा वास....मानवी अंग जळल्यानंतर जो वास येतो तसा वास.....अभिजितने आश्चर्याने आगीकडे बघितले तो जळका वास त्या आगीतून येत होता....आगीत हालचाल होत होती.....अभिजितचे डोळे विस्फारले....त्याने आजूबाजूला बघितले...ही तीच जागा होती जिथे राजेशने अंजलीला पेटवले होते.....अभिजित इथे आला होता....त्यानेच पंचनामा केला होता थोडीफार पुराव्यात फेरफार केली होती.....विचार मनात घोळत असतानाच त्या आगीत एक काळी कवटी दिसू लागली....अभिजित घाबरला.....त्या कवटीने आपला जबडा उघडला....एक कानठळ्या उठवणारी किंचाळी त्या शांत वातावरणात घुमली.....ही किंचाळी आर्त होती.....अभिजितने आपले कान धरले आली तिथून पळून जाण्यासाठी पाय उचलला....खालून एका हाडाच्या सांगाड्याने आपल्या कडक हाताने त्याचा पाय धरला होता....ती पकड खूप मजबूत होती.....इतकी की तिथून सूटता सुटता अभिजित खाली कोसळला.....तो मानवी सांगाडा त्या आगीतून लालसर होऊन बाहेर पडत होता.....तो सांगाडा हळूहळू वितळून त्याचा रस अभिजितच्या शरीरात जात होता....त्या हाडाच्या पंज्याची पकड मजबूत होती....बाकीचा सांगाडा वितळत होता गायब होत होता....अभिजित किंचाळत होता.....तळमळत ओरडत होता.....ऐकणारं कोणीच नव्हतं.....ती आर्त किंचाळी अचानक बंद झाली....अभिजितचे डोळे सताड उघडे राहिले....तो त्या आगीकडे एकटक बघू लागला..पापणी जराही मिटत नव्हती..पापणी मिटने वैगेरे मानवी प्रकार असतात....त्याने आपल्या खिश्यातून मोबाईल काढला.....फोन ऑन झाला होता...त्याने राजेशला कॉल केला....तिकडून जोरात DJ वाजत होता.....
"हॅलो राजेश....आहेस तसा माधवनगरला ये....तिथे तुझ्या जीवाला धोका आहे"
एवढंच बोलून अभिजितने कॉल कट केला....त्याची नजर अजूनही त्या पेटलेल्या आगीवर होती....तो अगदी यांत्रिक पद्धतीने चालत चालत जाऊन त्या पेटलेल्या आगीत शिरू लागला.....आग त्याच्या कपड्याला लागत होती....कपडे त्याची त्वचा जाळत होती....तरीही तो स्मितहास्य करत त्या आगीत उभा होता.....एखाद्या लाकडाप्रमाणे त्याचा देह जळत होता..जळणाऱ्या चेहऱ्यावर स्मितहास्य असे की कुठलंतरी मोठं समाधान मिळालं आहे ..काही मिनिटातच त्या पेटत्या आगीत आता अभिजितच्या हाडांचा सांगाडा शिल्लत होता....अखेर तो ही त्या आगीत कोसळला
राजेशला काही समजत नव्हतं....आता तरी भेटून गेलेला अभिजित आपल्याला धोक्याची चेतावणी का देत असेल??.....अभिजितचे ऐकणं देखील भाग होत...कारण एका मोठया प्रकरणातून त्याने राजेशला बाहेर काढलं होतं.....फोनवरचा तो दोन ओळीचा संवाद देखील त्याला खटकत होता.....अभिजित राजेशला "राजेशराव" बोलत असे पण आता फक्त "राजेश"??.....आणि त्याच्या बोलण्यातील खेळीमिळी गायब होती...खेडवळ भाषेतला रांगडेपणा गायब होता....ते बोलणं शुद्ध वाटत होतं...अनपेक्षित होतं..कुठला तरी यांत्रिकपणा त्या दोन शब्दात होता.....आणि माधवनगरला का बोलावत आहे??.....मधून अप्पाचा माळ लागतो....अगदी ओसाड....निर्मनुष्य.....इथेच त्याने अंजलीला पेटवले होते.....कित्येक दिवस तो ह्या रस्त्यावर आला नव्हता....पण अभिजितच्या सांगण्यावरून तो ह्या निर्मनुष्य रस्त्यावर परत आला होता.....त्याचं विचारचक्र गोठलं होतं....आता त्याला स्वतःची फिकीर होती कारण त्या रस्त्यावर आता हाडं गोठवणारी थंडी वाजत होती.....गाडी बंद पडली होती....तो रागाने आपले हात स्टेरिंग वर आपटत होता....अचानक त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले....थरथरत्या कापऱ्या ओठांनी सुस्कारा सोडला कारण त्याला जवळच एक शेकोटी जळताना दिसत होती....आता ही पेटती "शेकोटी" त्याला ह्या थंडी पासून वाचवणार होती.......................(समाप्त)
लेखन :- शशांक सुर्वे
(कथा कशी वाटली??....ह्याबाबत आपला बहुमूल्य अभिप्राय कमेंटमध्ये जरूर नोंदवा.....धन्यवाद )
No comments:
Post a Comment