(भयकथा)
प्लॅटफॉर्म नं 7
"पंधरा वर्ष !...बघायला गेलं तर जास्त नाहीत पण त्या काळात तिच्यात झालेला 'तो' बदल हा अविश्वसनीय होता...त्या रात्री पहिल्या क्षणी मी तर त्या अंधारात तीला ओळखले देखील नव्हते ,कडेवर ते काही महिन्यांचे मूल आणि तीचे अस्तव्यस्त मळकट कपडे आणि तो निस्तेज चेहरा.पहायला जवळ जाईपर्यंत ती त्या अंधारात कुठे दिशेनाशी झाली हे समजले नाही पण.......
'ती....' ती नक्की जुईच होती हे अजुन ही माझ्या मनाला पटत नव्हते...मी जवळ जवळ पंधरा वर्ष नोकरी निमित्त बाहेर राहिलो....आणि आज ज्या शहरात शिकलो तिथेच बदली झाली होती... तिथल्या रेल्वे स्टेशन मधे अभियंता म्हणून मागच्याच आठवड्यात रुजू झालो होतो...स्टेशन पासून थोडयाच लागूनच रेल्वे कॉर्टर होत्या तिथेच मला एक कॉर्टर मिळाली...जागा पुरेशी होती कारण तिथे मी एकटाच राहणार होतो...तसं पाहिलं तर माझ्यासोबत राहणार असं माझं स्वतःचं कोणी ही नव्हतं..कारण मी अनाथ म्हणूनच वाढलो पण माझ्या परिचयातल्या एक आजी होत्या त्यांनी मला खुप आधार दिला होता..त्यांना ही त्यांचे हक्काचे असे कोणीही नव्हते...मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा मी त्या आजीला माझ्यासोबत येण्याची खुप विनंती केली होती पण त्यांचा त्याला कायम नकारच राहिला... नाइलाजाने मला इथून जावे लागले...आज आजीला जाऊन आठ वर्ष उलटली..त्यांचे अंतिम दर्शन ही माझ्या नाशिबात नव्हते...कारण आजी गेल्याची बातमी मला समजलीच नव्हती...कारण इथे माझ्या परिचयातले तसे कोणीच नव्हते...
जुई ही आमच्या क्लास मधे होती , ती कुठल्या गावची हे देखील माहीत मला नव्हते,फक्त आमच्या एका सिनियर सोबत तीच अफेअर होत हे सगळ्या क्लास ला माहीत होते,त्या मुळे तिच्या सोबत बोलण्याची हिंमत तशी कोणी करत नसे...त्याचा काय परिणाम होतो हे आमच्या ग्रुप नी आणि मी देखीलअनुभवले होते.. माझा मित्र वैभव याला त्या सिनियर्स नी खूप मारले होते त्याची फक्त एक चूक होती की त्याने जुई सोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता..पण ते ही माझ्यासाठी, कारण जुई मला खुप आवडत होती...तीच्या मनात काय आहे हे मलाही जाणून घ्यायचे होते कारण तीच असलेल्या अफेयर्स च्या चर्चा ह्या कितपत खऱ्या होत्या की त्या सीनियर्स नी जाणून बुजुन पसरवल्या होत्या हे समजून घ्यायच्या होत्या..आणि जुई देखील तशी नव्हती , कधी कधी असं वाटायचे ही तीला देखील माझ्यासोबत काही महत्वाचे बोलायचे होते....पण ते कधीच शक्य झाले नाही... , आमच्या सगळ्यांशी बोलायला आवडत होत पण सिनियर्स च्या भीती मुळे सगळेच तिच्यापासून दूर रहात असत... अगदी मुली देखील....कॉलेज च्या शेवटच्या दिवशी तीला मी खुप शोधले पण ती दिसली नाही
पण ही जुई त्या सिनियर्स च्या सोबत का असते हे शेवटपर्यंत समजले नाही.आणि पुन्हा हे विचारण्यासाठी मी तिथे थांबलो नव्हतो, कॉलेज संपले आणि मला काही दिवसांमधेच एका प्रोजेक्ट मधे सीनियर मैनेजर ची नोकरी मिळाली, मी तिथून निघुन गेलो...ते आज योगायोगाने पुन्हा इथेच आलो आणि इथेच ती पुन्हा दिसली...ती ही अशी ? पण मनाला अजुन पटत नव्हते ती जुई होती कारण ह्या गावकडे येताना सतत त्या जुन्या आठवणी मनात होत्या आणि तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता...त्या मुळेच असेल कदाचित..पण इथे आल्यापासून आज पर्यंत जुई काही केल्या माझ्या विचारतून जात नव्हती....
मी माझ्या कामात मन लावण्याचा प्रयत्न केला ,आता बस झाल..जे झालं ते संपले आता पुन्हा त्या आठवणी नको...
रेल्वे ट्रैक मेंटेनेंस चे काम हातात असल्याने दिवसभरात स्टेशन वर एक फेरी तरी होत असे पण तेव्हा देखील माझी नजर तीला शोधत असायची...चार दिवसांनंतर एक सुट्टी असल्याने मी कॉलेज ला जाण्याचा विचार केला...पण तिथे आता कोण भेटणार ह्या विचारने ते ही राहून गेलं... पण त्या रात्री माझ्या सोबत एक अनपेक्षित क्षण घडला.... ती पुन्हा दिसली.....
रात्री जेवणाचा डबा घेण्यासाठी मी बाहेर पडलो कारण आज त्या मावशी काही कारणाने डबा घेऊन येऊ शकणार नव्हत्या म्हणून मीच त्यांच्या घराकडे निघालो होतो.. जाताना रस्त्यावर इतकी रहदारी देखील नव्हती पण नवीन जागा असल्याने मनात एक अनामिक भीती घर करून होती ,डबेवाल्या मावशीनं सांगितले साहेब इथवर आलात तर आता इथूनच गरम जेवून जा म्हणून मी तिथेच जेवलो आणि पुन्हा रेल्वेकॉर्टर कडे निघालो येताना एव्हाना 12 वाजून गेले होते...पण आता सर्वत्र सामसूम होती..शेवटची ट्रेन 1वाजुन 30 मिनीटा ला येते त्या मुळे रेल्वे फाटका जवळ एक दोन रिक्षा वाले उभे होते...आणि एक पान टपरी उघडी होती...एक सिगारेट घेतली आणि पेटवून मी कॉर्टर च्या दिशेने निघालो... आता मात्र मी घाबरलो होतो ,कारण इथून पुढे रस्ता खूप अंधारात होत...फोन च्या टॉर्च च्या प्रकाशात मी पुढे चालत होतो...आणि अचानक मला कोणी तरी आवाज दिला...मी दचकून आजूबाजूला पाहिले तर माझ्या मागे जुई उभी होती....तीची केविलवाणी नजर माझ्या डोळ्यात पहात होती
मी दचकून दोन पावलं मागे सरकलो , अचानक काय बोलावं हे समजत नव्हतं..पण तिची नजर माझ्याकडेच होती...मी माझी नजर खाली केली तशी ती पुन्हा बोलली,
"विजय तू येशील हे मला माहित होतं... खूप वाट पाहायला लावली रे तू " कधीतरी पुन्हा भेटावं ही माझी मनापासून आशा होती..आणि बघ, तू भेटलास..."
"पण ? पण... जुई तू इथे काय करतेस, तू कुठे रहातेस "?
"सगळं सांगेन रे...तेच तर सांगण्यासाठी आज मी इथे आले आहे,तुला मी काही दिवसांपूर्वीच पाहिले. खूप काही सांगायचे आहे तुला , आणि मी इथेच थोडं पुढे रहाते"
"पण जुई तुझी ही अशी अवस्था? आणि त्या दिवशी तुझ्या जवळ असणारे ते लहान मूल " ?
माझेच ! आणि....
आणि काय जुई?
"आणि ,कुणाचे हे मात्र मला माहित नाही... कारण त्या दिवशी माझ्यासोबत जे काही घडले ते कोणालच माहित नाही...अगदी मला देखील."
मी जुई कडे पाहुन ही न पाहिल्या सारखे केले कारण या क्षणा ला काय बोलणार हे मला सूचत नव्हते ,कॉलेज चे दिवस अचानक डोळ्यांसमोर जागे झाले... सीनियर्स सोबत ती का असायची हे आज ती मला सांगत होती...कॉलेज मधे प्रवेश झाल्या नंतर जुई गर्ल्स होस्टेल साठी ट्राय करत होती...पण होस्टेल मधे जागा खाली नव्हत्या म्हणून गर्ल्स होस्टेल मधल्या एका मुलीने एक सीनियर मुलाची ओळख करून दिली ...तो मुलगा मला होस्टेल मिळवून देण्यासाठी मदत करणार होता...पण त्या क्षणी माझी राहण्याची सोय नसल्याने त्याने त्याच्या ओळखीमधून एक छोटी रूम मिळवली आणि मला दिली,काही दिवसांनी होस्टेल मिळाले की तिकडेच जायचे होते त्या मुळे मी देखील तिथे रहायला लागले...हळू हळू त्याचे मित्र माझ्या ओळखीचे झाले त्या मुळे कैंटीन असो वा कुठेही मी त्यांच्या सोबतच असायचे ,असेच काही दिवस गेले पण मला होस्टेल काही मिळाले नाही...होस्टेल ला त्याच्या ओळखीचे जे कोणी होते ते आता तिथे काम करत नाहीत ही अशी काही कारणं काढून तो मुलगा टाळायला लागला, त्या मुले नाइलाजाने मला तिथेच रहाणे भाग होते.... हळू हळू त्याने त्याच्या मित्रांना देखील रूम वर आणणे सुरु केले,मी काही बोलले तर तो मला धमकावायला लागला..कारण त्याच्या कडे माझ्या नकळत काढलेले माझे काही फोटोग्राफ होते ते कॉलेज मधे पसरवून बदनाम करण्याची धमकी तो देत असे.... म्हणून मी कोणाशीही बोललेले त्याला पटत नव्हते त्या मुळे मी कोणाशी बोलत नव्हते...त्यांचा त्रास खुप वाढत होता....सहन करण्याची ताकद राहिली नव्हती...मला ते बळजबरीने ड्रिंक पाजयचे ,कधी कधी ती मुलगी देखील त्यांच्या सोबत यायची पण हळू हळू तिचे येणे बंद झाले...
कॉलेज च्या शेवटच्या दिवशी मी तुझ्यासाठी एक निरोप देण्यासाठी एक चिट्ठी लिहिली होती पण ती देखील त्यांना सापडली आणि त्या दिवशी माझ्यासोबत जे घडलं ते खुप भयानक होतं..
त्या सगळ्या नराधमांनी मला नशेच औषध देउन माझ्यावार पाशवी बलात्कार केला...ते सहा जण माझ्यावार अगदी तूटून पडले होते.....माझी जी अवस्था झाली होती तसेच सोडून ते तिथून निघुन गेले,मला उठण्याची ही ताकद नव्हती रे विजय...
त्या नंतर सगळंच संपलं....कॉलेज संपलं, सगळे आपापल्या मार्गी लागले...तू ही कायमचा निघुन गेलास...
त्या नाराधमांनी माझ्या अब्रूचे धिंडवडे काढले,मी फक्त एक शरीर होते त्यांच्यासाठी....वेळ गेला त्यातच मला दिवस गेले आणि एका मुलीला मी जन्म दिला...
माझी काही खबर नव्हती त्या मुळे माझे वडील एकदा इकडे भेटायला आले होते,त्यांना हे समजले तेव्हा त्यांनी देखील आत्महत्या केली,कारण श्वासांची घुसमट काही वेळाने थांबू शकते पण मनाची घुसमट कधीच थांबत नाही... कारण बिना आईच्या मुलीला त्यांनी वाढवलं ,गरीबीत असून देखील त्यांनी माझ्यासाठी खुप काही केलं होतं...त्यांचा आत्महत्या करण्याचा निर्णय योग्यच होता कदाचित...
तीन महिन्यांचे ते बाळ आणि मी या इथेच रहायचो... पण आता नाही... कारण त्या रात्रीच इथे प्लेटफार्म नं 7 ला येणाऱ्या शेवटच्या 1:30 च्या ट्रेन खाली मी आणि माझे बाळ कायमचे शांत झालो......
हे ऐकून मी सुन्न झालो...माझे पाय जागचे हालत नव्हते...मी खुप घाबरलो... पण आता जुई हळू हळू विरळ होत चालली होती..
ती बोलली....आणि हो विजय ,जेव्हा मला त्या अवस्थेत ते सहा नराधम सोडून गेले तेव्हा काही वेळाने ते पुन्हा आले होते...माझा उपभोग घ्यायला पण तेंव्हा ते सात होते....विजय
आणि तो सातवा नराधम तू होतास..... विजय
ती बघ शेवटची 1:30 ची ट्रेन येतेय....
माझे पाय थंड पडले होते...बोलता बोलता रेल्वे ट्रैक वर कधी आलो हे ही समजले नव्हते, आता जुईची पारदर्शी आकृति आता पुर्णपणे विरळ झाली होती आणि 1:30 ची शेवटची ट्रेन धडधडत माझ्या दिशेने येत होती...
जयेश पाटील
No comments:
Post a Comment