पाऊस -Rainy House story in Marathi
ढग प्रचंड गडगडत होते, मधेच एखादी वीज अवेळी पडलेल्या अंधाराला उजळवून टाकायची, सोसाट्याचा वारा पावसाला जणू कापत होता, असल्या वातावरणात ती जरा अवघडून बसली होती, कारण ती यांच्यात नवीन होती, यांचा ग्रुप म्हणजे मस्तीचं भांडार, हे करू नका हा, डेंजर असतं असं जर कोणी त्यांना सांगितलं तर ते करणाराचं, ही सालस, कोकणातल्या छोट्याशा गावातली, पण हुशार, गुणी, नोकरी करणारी पण यांच्या एवढि "बोल्ड" नाही, हे जन्मालाच मोठया शहरात आलेले, मोठया शाळेत शिकलेले, यांच्या पार्ट्या ,फिरणं ,यात आता नवऱ्याबरोबर हिला सामील व्हावच लागलं, कारण ते बोल्ड,बेफिकीर असले तरीही चांगले, माणुसकी असलेले होते, मग करायची ती त्यांचा वेडेपणा सहन. हा सुद्धा वेडेपणा च होता, कोणत्या तरी ट्रेक ला जायचा, भर पावसात, पाच जणांचा ग्रुप, त्यात ही सहावी, बरं फिरायला जायचं म्हणजे भल्या पहाटे उठून हेच हिला माहीत होतं, पण यांचं वेगळंच, आदल्या रात्री पार्टी करायची, दुसऱ्या दिवशी आरामात उठून निघायचं, आणि आज ही तेच झालं होतं. ते निघालेच होते दुपारी, मग काय गाठलं पावसाने, ही गुपचूप नवऱ्याच्या बाजूला बसली होती, तो भला माणूस होता,छान दिसणारा, मस्तं हसणारा, जिम बीम करून एकदम फिट राहणारा, हिला फार आवडला होता, आता हाच आपलं आयुष्य आहे, आई वाडीलांविना वाढलेल्या तिला त्याच्या प्रेमाने कधीच आपलंसं केलं होतं.
आता पुढचं दिसेना म्हणून ते एका छोट्या दुकानावर थांबले, गरमागरम वाफाळता चहा, आणि कढईतून डिश मध्ये आलेल्या गरम भजी ने त्यांना कोण आनंद झाला, टपरी वाले काका म्हणाले आता कुठे जाताय, पाऊस बघा, आता तिकडे जाणं योग्य नाही, आणि आता वातावरण पण काही ठीक दिसत नाही, सगळे जण हसले, एक जण म्हणाला काही नाही होत हो काका, उलट मस्तं पाऊस आहे, काका शांत बसले, आणि हे निघाले, आता पावसाचा जोर प्रचंड वाढला होता, हिचं मनं जरा घाबरं झालं होतं, त्याची मैत्रीण हळूच तिला म्हणाली काय ग, घाबरलीस, नको टेन्शन घेऊस, आम्ही आहोत ना, पावसाला काय घाबरायचं, नाही नाही, अग याच्यापेक्षा भयंकर पाऊस आमच्या कोकणात, पावसाला नाही घाबरत, पण पावसात आपण कुठे हरवू नये असं वाटतं, ही म्हणाली. तो आपल्या नाजूक बायकोकडे कौतुकाने पाहत होता.
आपलं ठिकाण काही अजून येईना म्हणून बेचैन झालेल्या सगळ्यांना लक्षात आलं, की आपण वाट चुकलोय, मग मात्र सगळे शांत झाले, एव्हाना सात वाजायला आले होते, पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता, अशातच बाजूला कडकड आवाज होऊन वीज कोसळली, आता मात्र सगळेच घाबरले, याने गाडीचा स्पीड वाढवला, आणि झालं, मागे पुढे होत, गाडी एक जागी संपूर्ण गोल फिरून थांबली, सगळे शांत झाले, हिला ते काही पटलं नाही, आणि गाडी थांबली ती थांबलीच, ती काही सुरू होण्याचं नाव घेईना, खुपवेळ गाडीत बसून कंटाळा आल्यावर,
मोबाईल ला प्लॅस्टिक च कव्हर अडकवून सगळे खाली उतरले, हल्ली स्वतः पेक्षा त्याची जास्त काळजी घेतली जाते ना, आणि दोन तीन पावलं चालल्यावर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला, कारण चक्क समोर एक घर होत, सगळे तिकडे निघाले, ही सारखी नवऱ्याला म्हणत होती, अहो एका माझं तिकडे नको, आपण गाडीत थांबू, पाऊस थांबला की बघता येईल, पण त्याचा बाकीचा ग्रुप पण त्यालाच दुजोरा देत होता, हिचा नाईलाज झाला.
ते एक भलंमोठं घर होतं, मोठया भिंती, मोठे दरवाजे, यांना नवल वाटलं हे बाहेरून किती छोट वाटतं होतं, दोन तीन वेळा दार वाजवून ही, कोणी दार उघडेना हे बघून याने दार ढकललं, हा सगळयांना चला आत जाऊ म्हणाला, तेवढ्यात हिला आतमध्ये कोणीतरी धावत जातांना दिसलं, हे प्रचंड घाबरली, आत नको जायला ,इकडे कोणीतरी आहे ही म्हणाली, आग असेल मांजर वगैरे, तो हसत म्हणाला, सगळे हसले, हिला चैन पडत नव्हतं, बाहेर पाऊस आता ओसरू लागला होता, व्हरांड्यात नारळाच्या झावळ्या अस्ताव्यस्त विखुरलेल्या होत्या, आत तस व्यवस्थित वाटत होतं, पण, कसलासा वास येत होता, बंद असल्याने कसला वास येतो ना,एकजण म्हणाली, हम्म, रूम फ्रेशनर आणतो हा मॅडम, सगळे हसले, आणि हिच्या एकदम लक्षात आलं, अहो आपण माझी बॅग, गाडीतच राहिली, ती म्हणाली, आणू ग, बस जरा, ते बसले आणि आत मधून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला, सगळे हसता हसता शांत झाले, आता कमालीची शांतता जाणवत होती, बाहेर पावसाची रिपरिप चालू होती, तेवढयात त्यांच्यामधल्या एकीचा आवाज आला,प्लिज माझे केस ओढू नकोस हा सचिन दुखत रे खूप, सचिन हसायला लागला ओके म्हणजे करायचं अक्षय ने आणि नाव माझ्यावर, सगळे हसले, पण आता मात्र हिच्या केसांना जोराचा हिसका बसला, आता मात्र ही नवऱ्याला म्हणाली अहो काय चाललंय तुमचं, त्याने हसता हसता तिच्याकडे पाहिलं, तेवढ्यात त्यांच्या हसण्यात लहान मुलांच्या हसण्याचा आवाज सामील झाला, आणि हे सगळे दचकले, आता सगळे शांत आणि आवाज फक्त हसण्याचा आवाज, आणि हळूहळू वाढत जाणारा, आता मात्र सगळे दचकले, आणि तेवढ्यात त्यात एका स्री वजा घोगऱ्या आवाजाची भर पडली, आता मात्र सगळ्यांनी ते सिरियसली घेतलं, आणि सगळे एकदम उठून बसले, हिच मात्र तोंडात काहीतरी पुटपुटण चालू झालं होतं, सगळ्या खोलीभर आता एक उग्र वास पसरला, आणि एकच वीज भयंकर आवाजाने कडाडली, आणि त्या वीजेच्या लक्ख प्रकाशात त्यांना ती दिसली, एका कोपऱ्यात उभी असलेली, दार उगाचच करकरल, सगळे प्रचंड घाबरले, घोगरा आवाज घुमला, "तुम्हांला म्हटलं होतं ना तुमचे बाबा येतील",पुन्हा त्या लहान मुलांचा आवाज, हिला प्रचंड भीती वाटली, हे काही साधसुधं नाही याची जाणीव तिला झाली, ती नवऱ्या जवळ जाणार ,तेवढयात एक कर्णकर्कश किंकाळी घुमली, आणि तो हिचा नवरा खाली पडला, तो प्रचंड घाबरला, सगळेच घाबरले, हीचा मात्र जीव घाबरा झाला, , त्याच्या छातीवर प्रचंड ओझं असल्या सारखं त्याला वाटत होतं, तो रडत होता, जिवाच्या आकांताने ओरडत होता, कोणल काय करावं हे कळत नव्हतं, ही रडत होती, पण एक क्षणाला हिला कोणतं बळ आलं माहीत नाही, हिला समोर दिसत होतं, याच्या शिवाय आपल्याला कोणी नाही, याला मी काही होऊन देणार नाही, जिवाच्या आकांताने ही धावत त्याच्या जवळ गेली, आणि काहीतरी प्रचंड आपल्याला विरोध करतंय हे तिला जाणवलं, तरीही तिने आवेशाने काहीतरी खेचलं, आणि ती दाराच्या दिशेने धावत सुटली, जातांना जो हाताला लागेल त्याचा हात धरून ती बाहेर गेली, घराच्या बाहेर वातावरण शांत होत, पाऊस आता बारीक झाला होता, तिने अंधारात पाहिलं तिच्या बरोबर अक्षय होता, तिने खेचून आणलेल्या गाडीच्या चावीने तिने गाडीच दार उघडलं, अक्षय प्रचंड घाबरला होता, पण तिला बघून त्याला धीर आला, तिने अक्षय ला सांगितलं, लायटर असेल तर बघा, अक्षय ने सचिन ची बॅग अक्षरशः उलटी केली, हिने स्वतः ची बॅग घेतली, गाडी तशीच सोडून ते धावत निघाले, बंद होणाऱ्या दरवाजाला अक्षय ने प्रचंड ताकदीने लाथ मारली, आणि तो आत शिरला आत सचिन खाली पडला होता, मागे पेटलेला विस्तव दिसल्यावर सगळे भानावर आले, आणि प्रचंड गुरगुरण्याच्या आवाज त्यांना आला, आणि एक भयानक दृश्य त्यांना दिसलं, हिच्या नवऱ्याच्या अंगावर ती बसली होती, केस अस्ताव्यस्त झालेली, डोळ्यांच्या खोबणीतून रक्त ओकणारी, ती आता त्याचा घोट घ्यायला तयार झालेली, मागे तिची दोन लहान मुलं, पांढरी फटक पडलेली, नाचणारी, घोगऱ्या आवाजात काहीतरी म्हणणारी, हिच्या पायाखालची जमीन सरकली, हिने जिवाच्या आकांताने हाक मारली निशांत उठ, तो खडबडून जागा झाला, पण ती त्याला उठू देत नव्हती, ती आग ओकत होती, ही पेटती झावळी घेऊन आत आली, आणि त्याच्या छातीवर बसलेली ती चावताळलीआणि , ही, जोरात ओरडली, ए बाई बऱ्याबोलानं उठ, तो माझा नवरा आहे, निशांत ची नाजूक साजूक, बायको आज सगळ्यांना दुर्गेचा अवतार वाटली, तिला धमकी देत हिने आणलेली बॅग निशांत च्या अंगावर जवळजवळ टाकलीच, आणि तो सुटला, एक भयानक जळका दर्प खोलीभर पसरला, सगळी कडे शांत झाल्यासारखा, हिने त्याला धावत जाऊन मिठी मारली, ती रडत होती, त्याच अंग प्रचंड जड झालं होतं, त्याने तिला घट्ट मिठी मारली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.. सगळे घराच्या बाहेर आले, बाहेर आता आकाश निरभ्र होत, पाऊस थांबला होता, घाबरून थकलेल्या त्यांना तिथेच डोळा लागला...
सकाळी सचिन उठला आणि जवळ जवळ ओरडला, त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळे घाबरून जागे झाले, आणि सगळेच चपापले, ते एका पडक्या, भग्नावस्थेत असलेल्या घरात होते, तिथल्या भिंती ते घर जळल्याच्या खुणा दाखवत होत्या, लाकडं जाळली होती, मनस्ताप, भीती, ओशाळलेपण सगळ्यांच्या तोंडावर होतं, फक्त तिच्या नव्हतं, सगळे उठले, आणि गाडीकडे निघाले, ती त्या पडक्या भिंती न्याहाळत होती, गाडीत बसणाऱ्या निशांत ने तीला हाक मारली, ति धावत जाऊन गाडीत बसली, आता गाडी व्यवस्थित चालू झाली, सगळ्यांनी तिच्या नावाचा जयघोष केला, निशांत म्हणाला तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे, तू आणि अक्षय होतात म्हणून, पण काय ग त्या बॅग मध्ये काय होतं, ती हसत म्हणाली, मी दर गुरुवारी वाचायला बसले की तुम्ही हसता ना...ती पोथी...तो ओशाळला, चला निघुया कालची रात्र आयुष्यात विसरणार नाही म्हणतात ना " काळ आला होता" अक्षय च्या या वाक्यावर ...हम्म ...सगळे म्हणाले...
गाडी आता निघाली होती....पण ही मात्र कसल्याशा विचारात होती....त्या पडक्या भिंतीवर लटकलेल्या त्याजुन्या जळक्या फोटो च्याविचारात, एक नथ घातलेली, डोक्यावर पदर घेऊन एका परकर पोलकं घातलेल्या लहान मुलीला मांडीवर घेतलेली बाई, तिच्या बाजूला एका मुलाला मांडीवर घेतलेला, पीळदार शरीरयष्टी असलेला पीळदार मिशीचा एक माणूस....."निशांत सारखा दिसणारा"
No comments:
Post a Comment