आठशे खिडक्या नऊशे दार या मराठी लोकगितातील ओळी आपल्याला अतिशयोक्ती वाटत असल्या तरी वाड्याला तशा खिडक्या, दरवाजे असतात. खिडकीला झरोके असेही म्हणतात. वाड्यात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांचे प्रयोजन असते. खिडक्यांमुळे संपूर्ण वाड्यात नैसर्गिकरित्या पुरेशा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते. आज बघतो तशा खिडक्या पूर्वी वाड्याला नव्हत्या. दरवाज्याएवढी एकएक खिडकी असायची. खिडकीची रुंदी कमी आणि उंची जास्त असायची. खिडक्या दोन झडपाच्या असत, त्या झडपा पुन्हा दोनतीन आडव्या भागात विभागल्या जात.
जमिनीवर मांडी घालून बसले असता खालची झडप उघडी ठेवली असता बाहेरचे दृश्य दिसे. आणि खिडकी उघडी असल्यामुळे वायुविजन होई. तसेच उभ्या स्थितीत वरची झडप उघडली असता डोळ्याच्या पातळीत खिडकी येत असे. ती उघड बंद करता येत असे. त्यामधून बाहेरील दृश्य पाहता येते, बाहेरील व्यक्तीस आतले दृश्य दिसणार नाही, परंतु आतल्या माणसास मात्र बाहेरील दृश्य स्पष्ट दिसते हे खिडकीचे वैशिष्ठ्य.
वरच्या बाजूला सूर्यप्रकाशासाठी साधारणत: एक फूट बाय एक फूटाची रंगीबेरंगी काचा लावलेल्या असत. त्यातून उजेड आत येतो. अशा काचांना टोमॅटो काचा म्हणतात. त्यामध्ये बाजरी नक्षीचे डिझाईन असते. खिडक्याच्या दोन्ही बाजूने वेलबुट्टीचे आकर्षक नक्षीकाम केलेले असते. दोन खिडक्या दरम्यान उभे व आडवे लाकडी स्तंभ व त्यावर नक्षीकाम ते स्तंभशीर्ष ही सुंदर बनविले जातात. अशा खिडक्यांना कलेचा आधार देऊन त्यांना वैशिष्ठ्यपूर्ण बनवत. त्यामुळे इमारतीचा भाग लक्ष वेधून घेतो.
खिडकीच्या खालच्या बाजूला सुरक्षेसाठी कठडा आणि वरच्या बाजूला महिरप/कमानी असतात. कमानीच्या खालच्या बाजूला द्राक्षाचा घड अथवा केळ फुलाचे सुंदर नक्षी असते. पोपट द्राक्षाच्या घडावर बसून द्राक्ष खात आहे. द्राक्ष व पोपट हे सुबत्तेचे प्रतीक आहेत. अशा खिडक्यांच्या झडपा बसवण्यासाठी बिजागरीचा वापर केलेला असतो. अशा बिजागरी मध्ये वेळोवेळी तेल सोडले जाई. त्यामुळे त्याचा आवाज येत नसे. तसेच खिडकी बंद करण्यासाठी कडी कोयंडे असतात. कडीवर नागफनीची नक्षी असते. त्यामुळे कडी काढणे सोपे होते. खिडकीला रेशमी, मलमली, चिकाचे पडदे लावतात. त्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश, हवा आत येत नाही.
आठशे खिडक्या नऊशे दारं म्हणीप्रमाणे चुकून एखादी खिडकी अथवा दरवाजा बंद करायचे राहून गेले तर ती खिडकी किंवा दरवाजा सहजासहजी उघडत नाही.
असे दरवाजे, खिडक्यांचे वैशिठ्य म्हणजे दोन्ही दारे बंद करताच त्याच्या खाचा एकमेकात चपखल बसतात आणि किती जोर लावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर त्या उघडत नाहीत. उलट दरवाजा घट्टच बसतो. अशी दारे उघडायची झाल्यास एक पुढे व दुसरे मागे उघडावे लागते. मगच ते उघडली जातात.
धन्यवाद.
‘वाडा’ या पुस्तकातून
लेखक :- विलास भि. कोळी
No comments:
Post a Comment