इसवी सन १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध किंवा बंड म्हटले की आपल्या नजरे समोर अनेक नावे येतात त्यात प्रामुख्याने झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुर शहा जफर मंगल पांडे यांची नावे येतात आणि आपल्याला इतिहासात ह्या स्वातंत्र्य बंडा बद्दल बरेच शिकवल जातं. परंतु त्या इतिहासात एका व्यक्तिविशेषाचे नाव सहसा करून येत नाही ते म्हणजे छत्रपति शिवरायांचे वंशज असलेले आणि करवीरकर गादी चे वारसदार महाराज बुवासाहेब यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी ८ जानेवारी १८३१ रोजी जन्म झालेले शाहू उर्फ चिमासाहेब महाराज. आज त्यांचा स्मृतिदिन त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती देत आहे त्या वेळी कोल्हापूरच्या गादीवर चिमासाहेब महाराजांचे थोरले सावत्र बंधू शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराज होते चिमासाहेब हे अत्यंत तेजस्वी तडफदार आणि करारी वृत्तीचे होते. त्याकाळी कोल्हापूर शहराला संपूर्ण तटबंदी होती सहा वेशी ४८ बुरुज आणि संपूर्ण शहरा भोवती मोठा खंदक होता आणि सर्व बुरुजा वरती शहराच्या सुरक्षा करिता तोफा सज्ज ठेवलेल्या असत. इंग्रजांचे राज्य असल्यामुळे कोल्हापुरात इंग्रजांची सेना ठाण मांडून बसलेली असायची. कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण भारतात इंग्रजां विरुद्ध असंतोष पसरलेला होता. ज्या वेळी चिमासाहेब तेरा वर्षाचे होते तेव्हा १८४४ मध्ये कोल्हापुरात पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड येथील गडक-यांनी एकाच वेळी इंग्रजां विरुद्ध बंड पुकारले होते. परंतु इंग्रजां समोर त्यांची ताकद अपुरी पडल्याने इंग्रजांनी ते बंड मोडून काढले. यानंतर इंग्रजांनी बंड करणाऱ्यां वर केलेले अत्याचार पाहून चिमा साहेबांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष खदखदू लागला मग त्यांनी आपल्या आसपास समविचारी लोकांचा संग्रह जमा करण्यास सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने फिरंगोजी शिंदे, रामजी शिरसाट, रामसिंग परदेशी, हंबीरराव आणि दौलतराव मोहिते अशी मंडळी होती मग चिमाजी साहेबांनी अशा लोकांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठावाची जय्यत तयारी केली. शिवाय छत्रपतींचे "रेड रिसाला" नावाचे लष्कर आणि इंग्रज सरकारची कोल्हापूर मधील सत्ताविसावी फलटण ज्यामध्ये मराठा शिपाई भरपूर होते त्यामध्ये फितूरी घडवून आणली. ज्यावेळी इकडे उत्तरेमध्ये इंग्रजांविरुद्ध उठावाला सुरुवात झाली, त्याच वेळी चिमाजी साहेबांचा एक सहकारी रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वा खाली इंग्रजांच्या २७ व्या पलटणिने १८ जुलै १८५७ रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठावाला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच इंग्रजी शिपायांना ठार केले आणि इंग्रजांचा खजिना लुटला त्यामध्ये त्यांना सुमारे ४० ते ५० हजार रुपयांची रक्कम मिळाली. इंग्रजांनी लगेच बाहेरून म्हणजे बेळगाव आणि रत्नागिरी येथून आपल्या मोठ्या फौजा बोलून घेतल्या आणि रामजी शिरसाट आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना पकडून, काहींना फाशी दिली तर काहींना गोळ्या घातल्या. कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी इंग्रजांविरुद्ध चकमकी घडत होत्या इंग्रजांच्या मोठ्या फौजे पुढे बंडखोर शिपायांचा प्रतिकार कमी पडू लागला. इंग्रजही मागचा पुढचा विचार न करता धडाधड गोळ्या घालत होते. यातच १० ऑगस्ट रोजी लेफ्टनंट केर साहेबाच्या सैन्याने घाटातील राधाकृष्ण मंदिरात लपून बसलेल्या उठावातील ४० शिपायांना घेराव घातला आणि त्यांना ठार केले. तरीसुद्धा कोल्हापूरातील उठाव काही शांत होत नव्हता. शेवटी मुंबईहून चतुर चालाक आणि धूर्त कर्नल जेकब ला कोल्हापुरात पाठवण्यात आले. जेकबने अतिशय निष्ठुर पणे हा उठाव मोडून काढला १८ ऑगस्ट रोजी आठ जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं! दोन जणांना फाशी देण्यात आली! आणि अकरा जणांना जाहीर रित्या गोळ्या घालण्यात आल्या!! हळूहळू बंड शमत होते. परंतु प्रश्न असा होता की ह्या उठावा मागे कोण आहे? कोणी शिपायांना फूस लावली? इंग्रजांविरुद्ध लोकांना कोणी फितवले? कर्नल जेकब ची चौकशी चालू होती त्यातच पुन्हा सहा डिसेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा बंड झाले! त्यावेळी सुद्धा चार जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आले तर ३२ जणांना गोळ्या घालण्यात आल्या. एवढे होऊनही उठावा मागचा सूत्रधार कोण आहे हे कळत नव्हते. कर्नल जेकब चौकशीसाठी राजवाड्यात जात येत होता. महाराज बाबासाहेबां बरोबर त्याच्या बैठका होत होत्या. चौकशी चालू होती त्यावेळी तिथे उपस्थित असणारे चिमासाहेब हे सर्व शांत चित्ताने ऐकत होते, पाहत होते. धुर्त आणि लबाड जेकबने चिमा साहेबांच्या देहबोली वरुन आणि त्याच्या नजरे वरुन ओळखले कि उठावाचा सूत्रधार हाच तरुण तेजस्वी तडफदार मराठा राजा आहे! त्यावेळी जेकब राजवाड्यातुन गुपचूप निघून गेला परंतु दुसर्या दिवशी त्याने चीमा साहेबांना आपल्या कचेरीत बोलून घेतले ही बातमी कोल्हापूरकरांना समजताच सगळे नागरिक रस्त्यावर उतरले ती परिस्थिती पाहून जेकबने तात्काळ चौकशी थांबून चिमा साहेबांना परत जाण्यास सांगितले. त्यावेळी संपूर्ण कोल्हापूरच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. चिमासाहेब परत गेल्यावर, दिवस मावळल्या नंतर संपूर्ण शांतता असते वेळी अत्यंत गुप्तपणे रात्री चिमा साहेबांना चौकशीचे निमित्त करुन परत बोलावण्यात आले आणि अटक करण्यात आली आणि चिमा साहेबांची कोल्हापुरातली लोकप्रियता पाहून त्याच रात्री आधी वाघाटणे बंदरातून मुंबई आणि मुंबईहून पुढे कराचीला नेण्यात आले १२ मे १८५८ रोजी चिमा साहेब कराचीला पोहोचले आणि उठावाला चीमा साहेबांचे पाठबळ आणि फुस असण्याचा आरोप करून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. आणि कराचीमध्ये त्यांना अकरा वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याच ठिकाणी कैदेत असताना १५ मे १८६९ रोजी चिमा साहेबांच दुःखद निधन झालं लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्यानंतर काही वर्षांनी तेथील स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. त्या नंतर १६ डिसेंबर १८९६ ला राजर्षी शाहु महाराजांनी तेथे जाऊन समाधिचे दर्शन घेतले. आणि शाहु उर्फ चिमासाहेबाचा स्मृति दिन साजरा करण्यास सुरवात केली. जो फाळणी होई पर्यंत साजरा केला जात होता. आता ती समाधि अस्तित्वात आहे का नाही याचा शोध घ्यावा लागेल. अश्या ह्या छत्रपति शिवरायांचे वंशज असलेल्या, आपल्या पुर्वजां प्रमाणे मातृभूमि साठी प्राणार्पण करणा-या छत्रपति चिमासाहेबांना त्यांच्या स्मृति दिनी मानाचा मुजरा. . काही संदर्भ आणि आधार घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास आपल्या प्रतिक्रियेची अपेक्षा आणि चुकत असल्यास मार्गदर्शनाची अपेक्षा आहे-
जय शिवराय, खलिल शेख
No comments:
Post a Comment