माझे नाव दया माझी नुकतीच एका कंपनीत नोकरी लागली होती . कंपनी घरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे . आज माझा कामावरचा पहिलाच दिवस होता . माझी शिफ्ट ४ ते रात्रीचे १२ होती . कंपनी खुप चांगली होती पहिला दिवस खुप मजेत गेला . पण घरी जाताना तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले " साहेब वाटेत पिंपळवाडी हे एक छोटेसे खेडेगाव मिळणार तिथे अजिबात थांबु नका . "
मी विचारले " का ? "
तो म्हणाला " ते गाव झपाटलेलं आहे असे म्हणतात . रात्री अपरात्री खुप लोकांना तिथे भुताटकीचे अनुभव आलेले आहे . "
मग त्याने एका पेपरवर एक फोन नंबर लिहिला आणि मला देत म्हणाला " हा मॅकेनिकचा नंबर आहे कधीही त्या भागात गाडी बंद पडली तर या नंबरवर फोन कर तो एकच मॅकॅनिक आहे त्या भागात आणि कितीही रात्री फोन केला तर तो मदतीसाठी धावून येतो "
त्याचे बोलणे ऐकून मला थोडी भीती वाटली पण काय करणार दुसरा पर्याय नव्हता घरी जाण्यासाठी तो एकच रस्ता होता .
मी माझी कार स्टार्ट केली आणि घरी जायला निघालो . मी त्या गावाच्या सिमेजवळ पोहचताच माझ्या काळजाची धडधड वाढली . त्या गावात प्रवेश करताच असे वाटत होते की कोणी तरी माझी वाट पाहत आहे त्या गावात . मला माझ्या जवळपास कोणतरी असल्याचा आभास होत होता .
मी काही अंतरावर गेलो असता एक व्यक्ती अचानक समोर आला आणि दोन्ही हातांनी गाडी थांबवण्याचा इशारा करू लागला . तो अचानक समोर आल्यामुळे मला काहीच सुचले नाही आणि माझा पाय ब्रकवर गेला .
गाडी थांबताच तो दरवाज्या जवळ आला मी खाली न उतरता गाडीची काच खाली केली आणि विचारले " कोण आपण ? आणि इतक्या रात्री इथे काय करतात"
तो म्हणाला " माझे नाव प्रशांत मी माझ्या बायको आणि मुलासोबत जत्रेला गेलो होतो आणि घरी परतत असताना गाडी अचानक बंद पडली . बायको आणि मुलगा गाडीच्या आत आहे . आम्हाला शेजारच्या गावापर्यंत लिफ्ट मिळाली असती तर बरे झाले असते . "
मी दरवाजा उघडला तेवढ्यात मला त्या सहकाऱ्याने सांगितलेले शब्द आठवले आणि मी दरवाजा परत बंद केला. मला काय करावे काहीच सुचत नव्हते . मनात विचार आला जर हा भुताटकीचा प्रकार असेल तर माझी काही सुटका नाही . पण दुसऱ्या क्षणी विचार आला जर तो सांगत होता ते खरे असेल तर त्या लोकांना असे या ठिकाणी एकटे सोडणे बरोबर नाही .
मी विचार करत होतो तेवढ्यात मला समोरून एक व्यक्ती चालत येताना दिसला . मी लगेच गाडी थोडी पुढे घेतली आणि त्या व्यक्ती समोर थांबवली .
मी त्याला म्हणालो " भाऊ थोडी मदत हवी होती . त्या लोकांची गाडी खराब झाली आहे आणि त्यांना शेजारच्या गावात जायचे आहे . मी माझ्या गाडीने त्यांना सोडणार होतो पण मी असे ऐकले आहे की इथे भुताटकीचे प्रकार घडतात . तुम्ही जर माझ्या सोबत आलात तर मला थोडा धीर वाटणार आणि त्यांना पण मदत होईल . "
तो म्हणाला " तुम्ही कोणा बद्यल बोलतात मला तर इथे कोणीच दिसत नाही " .
मी प्रशांतकडे बोट दाखवत म्हणालो " तो बघा ना तो तिथेच आहे आणि बाजुला गाडी पण आहे त्यांची . "
तो म्हणाला " अहो साहेब मला तर कोणीच दिसत नाही आणि गाडी सुद्धा दिसत नाही . "
त्याचे बोलणे ऐकताच मला घाम फुटला आणि माझे हात पाय भितीने थरथरू लागले . मला घाबरलेल्या अवस्थेत पाहुन तो म्हणाला " घाबरू नका मी आहे ना सोबत आणि इथे असे प्रकार घडतच असतात . "
त्याचे बोलणे ऐकून मला धोडा धीर आला मी त्याले विचारले " आपण एवढया रात्री कुठे चाललात ? आणि तुम्हाला भिती वाटत नाही. "
तो म्हणाला " अगोदर वाटायची पण आता सवय झाली आहे .मी वाँचमन आहे रोज याच वाटेने कामावर जातो . भीती बाळगून बसलो तर घर कसे चालवणार . "
मी त्याचे आभार मानले आणि म्हणालो " तुम्ही देवासारखे आलात नाहीतर आज माझे काही खरे नव्हते . "
तो म्हणाला " या गावात असले प्रकार घडतात हे माहित असूनही आपण त्यांच्या मदतीसाठी थांबलात . खरच साहेब तुमचे मन खुप मोठे आहे नाहीतर हल्ली लोक फक्त स्वताचाच विचार करतात . तुम्ही जास्त वेळ थांबू नका इथे लगेच निघा ."
मी घरी आल्यावर थंड पाण्याने अंघोळ केली आणि त्या भयानक घटने बद्यल विचार करत झोपलो .
दुसऱ्या दिवशी कामावरून येताना धीडसच होत नव्हते त्या गावाहुन जायचे . मी ठरवले काहीही झाले तरी आज त्या गावात अजिबात गाडी थांबवायची नाही .
त्या गावाच्या सिमेवर पोहचताच मी गाडीचा वेग वाढवला . मी त्या गावातून वेगात जात होतो एवढ्यात मला तो वॉचमन चालत येताना दिसला . त्याला पाहुन मी गाडी थांबवलती .
मी - भाऊ गाडीत बसा सोडतो तुम्हाला
तो - नको साहेब ५ मिनटांची तर वाट आहे उगाच तुम्हाला त्रास कशाला .
मी - अहो त्रास कसला त्यात . काल तुम्ही माझी मदत केली होती आज मी तुमची करतो .
तो - मदतच करायची असेल तर माझे एक छोटेसे काम करणार ?
मी - बोला की
तो - (माझ्या हातात एक पिशवी देत ) ही वस्तु मी सांगतो त्या पत्त्यावर नेऊन द्या . खुप उपकार होतील तुमचे .
मी - उपकार कसले त्यात मी उद्याच नेऊन देतो .
मी ती पिशवी नीट संभाळून गाडीत ठेवली आणि घरी गेलो .
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहचलो . ते एक लहानसे मातीचे घर होते .
मी बाहेरुन आवाज दिला " कोणी आहे का घरात "
एक बाई बाहेर आली आणि म्हणाली " कोण आपण ? "
मी माझ्या हातातली पिशवी देत म्हणालो " वॉचमनने दिली आहे "
त्या बाईने पिशवी उघडली त्यात एक सोन्याचा हार होता . हार बघताच ती मोठ्याने रडू लागली .
मला काहीच समजत नव्हते कि ती का रडत होती . थोड्या वेळाने ती शांत झाली आणि मला आत यायला सांगितले . आत जाताच माझ्या पाया खालची जमीन सरकली . आत एका भिंतीवर त्या वॉचमनचा फोटो लावला होता आणि त्या फोटोवर हार चढवला होता .
मी फोटोकडे बघत तीला म्हणालो " हा तर ....
ती मला मधेच थांबवून म्हणाली " हा माझा नवरा . माझी मुलगी आजारी आहे तिच्या ऑपरेशन साठी २ लाख रुपयांची गरज होती . पण एका वॉचमेन जवळ एवढे पैसे कुठून येणार . यांनी खुप लोकांकडे मदत मागितली पण कोणीच मदत करण्यासाठी तयार नव्हता .
शेवटी यांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ह्या हाराची चोरी केली . चोरी कराताना त्यांना कोणीतरी बघितला आणि गावातील लोक त्याच्या मागे लागले . त्यांनी वाटेत कुठेतरी तो हार लपवला पण स्वःताला त्या लोकांपासून वाचवू शकले नाही . त्या लोकांनी त्याला मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला . मला वाटले होते त्यांचा प्राण तर गेला आणि आता माझ्या मुलीचेही काही खरे नाही पण तुमच्या मदतीने त्यांनी आपल्या मुलीचा प्राण वाचवला . आता त्यांच्या भटकत्या आत्माला शांती मिळणार ."
मी त्यांचा निरोप घेतला आणि घरी यायला निघालो वाटेत मला प्रशांत दिसला मी लगेच गाडी थांबवली आणि त्याला म्हणालो " सॉरी त्या दिवशी मी तुमची मदत करू शकलो नाही ."
तो म्हणाला " तुमीच तर मदत केली होती माझी . जर तुम्ही दरवाजा उघडून त्या मॅकॅनिकचा नंबर दिला नसता तर आम्ही रात्रभर तिथेच अडकलो असतो . तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाही . "
म्हणजे मी जेव्हा गाडीचा दरवाजा उघडला होता तेव्हा त्या सहकाऱ्याने दिलेला मॅकॅनिकचा नंबर खाली पडला होता ?
मी त्या रात्री नकळत का होईना पण दोघांची मदत केली होती याचे मला समाधान वाटत होते ...
समाप्त
No comments:
Post a Comment