माघारपण- Marathi bhutachya goshti
ही घटना आहे मे 1997 सालची, माझा गावचा जिवलग मित्र रम्याच लग्न होतं त्यानिमित्ताने मी चांगलीच पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन गावी आलो होतो. रम्या म्हणजे आमच्या गावातल्या धनाढ्य सावंतांचा एकुलता एक मुलगा, त्यामुळे लग्न अगदी राजेशाही थाटात झाल. लग्नाच्या सर्व विधी परंपरा झाल्या त्यानंतर नवीन वहिनी चार-पाच दिवस माघारपण म्हणून माहेरी गेल्या.
आता बायकोला आणायला रम्याला सासरी जावं लागणार होतं. त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या कुटुंबासोबत छान चहा घेत बसलो होतो तेवढ्यात रम्या त्यांची जीप घेऊन दारात हजर झाला. (श्रीमंती मुळे रम्याकडे तेव्हाची महिंद्रा जीप होती, त्या जीप दार नसायची त्या जागी खाकी पडदे असायचे.)
रम्या :- चल सोबत आज आपल्याला माझ्या सासरवाडीला जायचंय वहिनीला आणायला.
तोच माझ्या आजीने त्याला मध्येच रोखून बोलली आता एवढ्या संध्याकाळी का जायचं रात्र होईल पोरांना तुमास्नी, आणि आज अमावस्या हाय उद्या जा. पण मोठ्यांचा ऐकेल तो रम्या कसला माझ्या घरच्यांना थोडी लाडीगोडी लावून शेवटी त्याने सर्वांची मंजुरी घेतली.
मी उंडगायलाच गावी आलो होतो घरचे तयार होताच लगेच तयारी करून जीपमध्ये बसलो.
आमचा प्रवास सुरु झाला साधारण 20 किलोमीटर दूर जायचं होतं. रस्ता थोडा कच्चा होता पण गाडीमध्ये मस्त हवा खात गप्पा मारत आमचा प्रवास चालला होता. बोलता बोलता रात्र कधी झाली हेच समजले नाही. मध्येच जीप खालून दगडाला आदळल्या सारखा आवाज आला आणि जीपला धक्का बसला.
मी:- रम्या गाडी थांबून बघुया का काय झालय ते.
रम्या :- अरे काही नाही होत खूप वेळा आपटलीय अशी जीप.
थोड्या वेळानी जे व्हायला नको होत तेच झालं, गाडी तिथून जेमतेम अर्धा किलोमीटर चालून धक्का खात बंद पडली. माझ्या चेहऱ्यावरील प्रवासाच्या मजेचा सर्व रंग उतरला. रम्या संपूर्ण गावरान असल्यामुळे बिंदास जीपच्या खाली उतरला मला खाली उतरायला सांगितलं. माझ्या हातात रम्याने टॉर्च दिला आणि जिपचे बॉनेट उघडून जीपची डागडूजी करू लागला, मी आतून थोडा घाबरलो होतो पण चेहऱ्यावरच तस दाखवत नव्हतो.
दीड-दोन तास जीपची डागडुजी करून ही जीप काही सुरू झाली नाही तर रात्रीचे साडेदहा वाजले होत.
रम्या:- इथून माझी सासरवाडी फक्त दीड-दोन किलोमीटर वर आहे आपण चालत जाऊया
मी होकारार्थी मान हलवली दुसरा पर्याय नव्हता आमच्याकडे,
जीपच्या डागडुजी मध्ये मग्न असल्यामुळे अजून पर्यंत सभोवतालच्या वातावरणाचा कडे लक्ष गेलं नव्हतं ते आता आम्हाला चांगलंच जाणवत होतं.
थंडगार शांत हवा, नीरव शांतता, मध्येच दुरून कुत्र्यांचा रडण्याचा येणारा आवाज आणि अमावस्याचा तो गडद कळाकुट काळोख, रातकिड्यांची किरकिर ही आता थांबली होती. माझ्या पोटात भीतीचा गोळा आला होता.
या अशा भयानक वातावरणातून आम्ही दोघंच टॉर्चच्या उजेडात पायपीट करत होतो. एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला शेतजमीन होती, ही भीती कमी व्हावी म्हणून आम्ही गप्पा मारत चाललो होतो. मला जाणवलं बोलतोय फक्त मी रम्या माझ्या बोलण्याला फक्त हुंकार देत होता. अचानक रम्याने चालण्याचा वेग वाढवला.
थोड्यावेळाने मला असं जाणवलं की आम्हा दोघांच्या मागून अजून कोणीतरी तिसर चालतंय. मी मागे वळून बघणार तोच....
रम्या:- मागं बघू नगस.
भीती मुळे माझ्या शरीरातून भर थंडीत घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. तसा मी पण माझा वेग वाढवला.
अचानक सळसळ आवाज करत कोणीतरी वेगाने धावत जंगलात गेल्यासारखं जाणवल. हृदय धडधड करत आता झटका येतो कि काय असं झालं होतं. जीवाच्या आकांताने आम्ही दोघं झपाझपा पावले टाकू लागलो. एवढा जोरात आणि एवढा वेळ चालून सुद्धा गाव येत नाही नक्कीच आम्हाला चकवा लागला आहे हे दोघानाही समजून चुकल होत.
माझी नजर रस्त्या शेजारील शेतजमिनी कडे गेली, आणि काळजाचा ठोका चुकला. शेत जमिनीच्या बांधावरून पांढरफाट्ट साधारण 9/10 फूट बाईच्या आकाराची आकृती काखेला लहान मुलाला घेऊन आमच्या समांतरच बांधावरून धावत होती. त्या आकृतीचा तिचा आकार लहान मोठा होत होता.
रम्या:- तिकडं अजिबात बघू नगस सरळ वाटण चालत ऱ्हा ( हळू आवाजात मला बजावल).
दोन किलोमीटर चालायला साडेदहाला निघालेलो आम्ही आता तीन वाजता गावात येऊन पोहोचलो होतो. तेव्हा कुठे जीवात जीव आला.
घरा जवळ पोहचलो दार ठोकवलं रम्याच्या सासर्याने शहानिशा करूनच घराचं दार उघडलं, घरात घेतलं. झालेला सर्व प्रकार आम्ही त्यांना सांगत होतो, त्यांनी मध्येच आम्हाला थांबवलं व बोलले आपण यावर उद्या सकाळी बोलू.
सकाळी आम्हाला रम्याच्या सर यांनी सर्व प्रकार सांगितला, त्यांच्या गावातील एका बाईने दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आपल्या पाच महिन्याच्या मुलाला सहित गावाच्या वेशीवर आत्महत्त्या केली होती. ती येता जाता वाटसरूंना असा त्रास देते. रम्याचे सासरे बोलले तुमचा नशीब बलवत्तर जे तुम्ही तिथून जिवंत परत आलात.
मी राम्याला विचारले रात्री आपण चालत असताना मागून कोणीतरी चालल्याची तुला जाणीव झाली होती का?
रम्या :- कोणी एकटा-दुकटा आपल्या मागून चालत नव्हता गड्या, चांगल्या पंधरा-वीस पांढरपट्टे आकृत्या आपला माग घेत होत्या.
राम्याचे सासरे :- आणि त्या आकृत्या तुमच्या मागोमाग आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या रात्री बोलताना, माझं लक्ष खिडकी कडे गेलं आणि खिडकीच्या च्या बाहेर पंधरा-वीस पांढरपट्टे आकृत्या एकटक आपल्याकडे घरात डोकावत बघत होत्या, म्हणून तुम्हाला बोललो की आपण यावर सकाळी बोलू.
मला समजून चुकले की आमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
सकाळी मेकॅनिकला बोलून सर्वात आधी गाडी दुरुस्त करून रम्याच्या बायको सहीत आमचा गाव गाठला.
समाप्त.....
No comments:
Post a Comment