मायकल -भाग क्र -१ -लेखन -- शशांक सुर्वे
"अरे येडा झालाय तो.....दोन वर्षांपूर्वी त्या कसल्याश्या घोस्ट हंटर सेमिनारला जाऊन आल्यापासून अस विचित्र वागत आहे....अरे त्याची खोली बघितली परवा....भयानक पुस्तके कसल्याश्या बाहुल्या भयानक भिंत्तीचित्रे....अरे अर्धा तास थांबल्यावर विचित्र वाटत होतं नुसतं.....हा येडा मला म्हणत होता की आत्मा बोलावणार आहे..... सारख सारख एकच बडबडत होता.......जोरजोरात ओरडत होता कसले तरी मंत्र म्हणीत.....कुठली आत्मा आणि कुठलं काय......चार शिव्या घालून आलो परत.....बर झालं त्यानेच आग लावली खोलीला.....नसता ताप डोक्याला"
आपल्या घराच्या अंगणात उभे राहून संदीप आपला मित्र जितूला सांगत होता.....श्रीकांतचे घर समोर होते आणि त्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या त्याच्या खोलीतून धूर येत होता.....घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती.....अग्निशामक गाडीचा फिरता लाल लाईट वातावरण गंभीर करत होता...अग्निशामक कर्मचारी आपले काम करीत होते...बाहेरून खिडकीतून आगीचे लोट येत होते...पण खोलीतील सामानाला त्या भयाण आगीने स्पर्शही केला नव्हता.....खोलीत आत शिरलेले कर्मचारी आवक झाले...आगीच्या धुराने भिंती काळ्या पडल्या होत्या....उष्णतेने चिरल्याही होत्या....पण आत असलेली पुस्तके,2,3 लाकडी पेट्या अगदी जश्याच्या तश्या होत्या....अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आपले काम तत्परतेने केले....आग आटोक्यात आणली आणि बाहेर उभ्या असलेल्या लोकांच्या टाळ्यांची कमाई करून निघूनही गेले..... आता लोकांची कुजबुज सुरू होती......"अजितरावांच्या येड्या पोराने घराला आग लावली" अशी काहीशी कुजबुज पायरी वर डोकं धरून बसलेल्या अजितरावांच्या कानावर पडली तसे ते धावत जिथे श्रीकांत उभा होता तिथे गेले....त्याच्या कॉलरला पकडून त्यांनी सरळ जमिनीवर लोळवले आणि पूर्ण ताकतीने खाली पडलेल्या श्रीकांतला लाथा घालू लागले.....त्यांचा आवेग प्रचंड होता.....शेजारचे लोक त्यांचे हे रूप पहिल्यांदा बघत होते काही वेळानी शेजारच्या काही जेष्ठ मंडळीनी अजितरावांना सावरले.....श्रीकांत मात्र एकही शब्द न बोलता गप्प पडून होता....एक लाथ त्याच्या डोक्यावर बसली होती....त्यामुळे जमिनीवरची माती त्याच्या तोंडात गेली होती....ती माती थुकुन तो कपडे झाडत उभा राहिला......एक सनकी पोरगा अशी त्याची ओळख बनलेली....आता हा काय करणार ह्याकडे सगळे बघे बघत होते.....कुजबुज शांत झाली.....तसा श्रीकांत सगळ्या लोकांकडे बघत जोरात किंचाळला....ह्यावेळी त्याचा आवाज थोडा दबका होता.....वडिलांनी पहिल्यांदा त्याच्यावर हात उचलला होता.....त्या वेदनेने अश्रूंना वाट मोकळी करून दिली....नाकातले आणि डोळ्यात आलेले पाणी शर्टाच्या बाही ने एका दमात पुसत तो बोलला
"एक ना एक दिवस मी स्वतःला सिद्ध करीन....बघा तुम्ही"
अस बोलून तो घरात धावला मागोमाग त्याचे आईवडीलही धावले.....अजितराव आणि जया दोघेही उच्च शिक्षित त्यांचा एकुलता एक मुलगा श्रीकांत......आधीपासून हुशार आणि खूपच जिज्ञासू होता...हीच जिज्ञासा त्याला पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी ह्या विषयाकडे घेऊन आली.....श्रीकांत जास्त वेळ ह्यातच रमू लागला....आपल्या हुशार पोराने अश्या अस्तित्वात नसलेल्या भुतांच्या मागे त्यांचा शोध घेत फिरू नये अशी त्यांची माफक अपेक्षा होती....पण त्यांचे काही श्रीकांतने ऐकलं नाही.....शेवटी व्हायचा तो तमाशा झालाच
अजितराव गरिबीतून वर आलेले....सर्व परिस्तिथी जाणून होते...आपला मुलगा हुशार आहे काहीतरी नक्की बनेल असा विश्वास त्यांना एका वेळेपर्यंत होता पण ह्या स्वप्नाला नजर लागली.....घरात जाऊन दोघाही आईवडिलांनी डोळ्यात अश्रू आणून श्रीकांतला समजावले...श्रीकांतही हळवा होता...पहिल्यांदा आईवडिलांना रडताना बघून श्रीकांतही भावनिक होऊन आईला बिलगून दोघांची माफी मागितली आणि तो आपल्या खोलीत परत जाण्यासाठी निघाला.....एकनजर त्याने मागे फिरून बघितले त्याचे आई वडील अजूनही त्याच्याकडे बघत होते......
"हे काय झालोय आपण.....शेजारचे लोक मला वेडा बोलत आहेत....आईवडील माझ्यासाठी काळजीत आहेत.....आणि मी उगीच हे न सुटणारं कोडं घेऊन फिरत आहे....शाळा सोडून नाही ते करत बसलो....आता ह्या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे.....नको आता त्या भुतांचा आणि आत्म्याचा नाद.....पप्पा म्हणतात तेच खरं.....सगळं खोटं असत ते"
असा विचार करत करत तो आपल्या खोलीजवळ पोहोचला.....पडदे वैगेरे जळाले होते त्याचा एक मंद वास येत होता.....खोलीत जाऊन त्याने प्रेत आत्म्यासंबंधित ज्या ज्या वस्तू गोळा केल्या होत्या....त्या त्या वस्तू खाली आणून कचऱ्यात फेकून द्याव्यात ह्या उद्देशाने तो आपल्या खोलीत गेला होता.....पण खोलीत पोहोचताच त्याचे डोळे विस्फारले....तो आवाक होऊन सगळं बघत होता......काल परवा खरेदी केलेली सैतानी किताब वरती दिसत होती.....पूर्ण खोलीत आग पसरली होती......भिंती आगीमुळे काळ्या पडल्या होत्या पडदे जळाले होते....भिंतीमधून अजूनही वाफा निघत होत्या.....त्या गरम वाफांच्या मुळे वातावरण अगदी उष्ण झालं होतं.....खोलीतल्या बर्याचश्या वस्तू जळल्या होत्या मात्र श्रीकांत ने जमा केलेली भूत आत्म्या विषयी माहिती असलेलं एकही पुस्तक जळाले नव्हते अगदी सुस्थितीत होते......
ही आग लागण्यापूर्वी त्याने फरशीवर मार्कर ने एक मोठी चांदणी आणि त्यात वेगवेगळी चिन्हे काढली होती समोर काही मेणबत्ती पेटवल्या होत्या.....नवीन आणलेल्या पुस्तकात बघून तो काहीसे मंत्र पुटपुटत होता.....पण त्या मेणबत्तीच्या ज्योती मध्ये जराही हालचाल जाणवत नव्हती......श्रीकांतचा आवाज वाढला होता कारण त्या मेणबत्तीच्या ज्योती हलू लागल्या तर कुठे आपला आत्म्याशी संपर्क होत आहे असे काहीसे संकेत होते पण तस काही जाणवत नव्हतं.....आधीच उन्हाळा त्यात जोरात मंत्र पुटपटून श्रीकांतचा गळा सुकला होता......तब्बल 50 हजार रुपयेला त्याने हे नवीन आणि खूप जुने पुराने पुस्तक घेतले होते....एका विक्षिप्त दिसणाऱ्या माणसाकडून खरेदी केले होते ते.....ते पुस्तक श्रीकांतला देताना तो कमालीचा आनंदित होता.....कुठल्यातरी जबाबदारीतून आपण सुटलो असे काहीसे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.....वडिलांच्या कडून गाडीसाठी घेतलेले पैसे त्याने ह्यात गुंतवले होते......त्याच्या हातात ज्याच्याकडून हे पुस्तक घेतले होते त्याच माणसाने पिशवी भर पांढरी राख दिली होती.....ती राख त्याने मेणबत्तीच्या ज्योतीवर मारताच आगीचा भडका व्हायचा...श्रीकांत थकला होता....पण काही फरक दिसेना.....श्रीकांत चिडला होता....त्याचे डोळे रागाने लाल झाले होते... हे पुस्तक म्हणजे आत्म्याशी संपर्क करण्याचे त्याचे शेवटचे साधन होते.....तो ती राख मेणबत्तीवर मारून बाजूला लावलेल्या आधुनिक घोस्ट डिटेक्टर मशीनचे रिडींग बघायचा पण त्या रिडींग मध्येही काहीच हालचाल नव्हती.....इकडे श्रीकांतची मात्र हालचाल वाढली होती......अखेर एक जोराचा राखेचा भपका त्याने त्या मेणबत्तीवर मारला आणि ती आग भडकली होती......ह्याबद्दल त्याने वडिलांचा मारही खाल्ला होता
पण आता मात्र श्रीकांतचा आशा पल्लवित झाल्या होत्या.....चमत्कार त्याच्या समोर होता....पूर्ण खोली पेटली होती पण त्याची ती भुतीया पुस्तके.....त्या तंत्र मंत्र विषयक गोष्टी अगदी जश्याच्या तश्या होत्या.....काहीतरी चमत्कारिक होतं हे.....श्रीकांत ने समोरचे भले मोठे पुस्तक हातात घेतले आणि खाली जमिनीवर बघितले त्याने खाली आखलेली चांदणी आणि ती चिन्हे अगदी जशीच्या तशी होती....श्रीकांतने ड्राव्हर उघडला तिथून तीन मेणबत्ती काढल्या आणि बाजूची पांढरी राख घेऊन परत ते मंत्र पुटपुटत बसला....आत्म्यांशी सम्पर्क परत सुरू झाला......
2,3 वर्षांपूर्वी श्रीकांत हा खूप नॉर्मल आणि रेग्युलर रुटीनने जगणारा मुलगा होता.....त्याच्या आई वडिलांचे स्वप्न होते की त्याने डॉक्टर व्हावे......आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू होते.....अभ्यासात खूप हुशार आणि त्याचे सामान्यज्ञान जबरदस्त होते.....त्याचे मित्र नेहमी म्हणत की "सुई पासून रॉकेट सायन्स पर्यंतचे सगळे नॉलेज श्रीकांत जवळ आहे".......जन्मजात जिज्ञासू स्वभाव त्यात मिळत असलेले वडिलांचे आर्थिक पाठबळ......त्यामुळे जेवढं होईल तेवढं ज्ञान तो आपल्या डोक्यात साठवत होता.....तो दोन तीन लायब्ररीचा मेम्बर तर होताच पण त्याची वैयक्तिक खोलीही नवनवीन पुस्तकांनी भरलेली असायची.....वडीलही खुश होते....सगळीकडून श्रीकांतच्या हुशारीचे किस्से ऐकायला मिळत होते....श्रीकांतला हॉरर मुव्ही खूपच आवडायच्या....त्यातील बाधित शरीरावर जे उपचार केले जायचे त्या विधिविषयी त्याला भारी आकर्षण होते.....त्यावर तो बरीचशी माहिती नेट वर वाचत होता....काही हॉरर पुस्तके वाचून माहिती घेत होता....त्यातच त्याला आत्मा, त्यांच्याशी संपर्क ह्या गोष्टीत रस वाढू लागला म्हणून तर त्याने एक पॅरानॉर्मल रिसर्च करणाऱ्या लोकांचा एक ग्रुप जॉईन केला....त्यावर त्याला भुतांची बरीचशी माहिती मिळाली होती.....अनेक हॉंटेड ठिकाणी त्याची रिसर्चही झाली होती.....श्रीकांतही ह्या गोष्टीत हरवून जात होता.....आपल्या मित्रात तसेच नातेवाईकांच्यात तो कमी वावरू लागला.....ह्या पॅरानॉर्मल लोकांसोबत ह्याच्या ट्रिपा वाढू लागल्या.....अभ्यासाकडे दुर्लक्ष म्हणून त्याचे वडील नाराज होते......आत्मा बोलावून संवाद साधणे ह्या एका गोष्टीत त्याला एवढा रस होता की त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता......बऱ्याच वेळी इच्छा नसताना तो घराजवळील मित्रांच्यात मिसळायचा.....पण श्रीकांतचे लक्ष मित्रात नसायचं....कुठे तरी अंधारा कोपरा....पानांची सळसळ....जुनाट पडकी घरे दिसली की तिथे आपलं डिटेक्टर यंत्र फिरवून चेहऱ्यावरचे हावभाव बदलत फिरायचा.....काहीतरी विचित्र बडबडत असायचा.....कसले तरी मंत्र....आजूबाजूच्या अतृप्त आत्माना आवाहन करीत होता म्हणे.....सुरवातीला मित्रांनी थोडं कुतूहल म्हणून सहन केलं पण नंतर नंतर त्याचे वेड वाढू लागले.....कुणाला ना कुणाला पकडून तो वेगवेगळे प्रयोग करायचा आत्म्यांचे अस्तित्व दाखवण्यासाठी त्याला कुणी ना कुणी आय विटनेस हवा होता आणि बहुतेक प्रयोगात तो मित्रांना बोलावून घ्यायचा.....खोलीतील वातावरण एवढं गंभीर व्हायचं की त्याच्या बरोबर असणारे त्याचे मित्र प्रचंड घाबरायचे......काहींनी तर त्याला वेड लागलंय अस जाहीर करून टाकलं होतं.....असा होता श्रीकांत
ह्या वेडात त्याने आज आपल्या खोलीला आग लावली होती.....ती आग आणि त्यांच्या आईवडिलांच्या मनातील आग शांत होते ना होते तोपर्यंत खाली निवांत बसलेल्या त्याच्या वडिलांना परत श्रीकांतचा खोलीतून ओरडण्याचा आवाज आला.....आवाज आणि सूर तोच होता.....आता त्या सुराला अजितरावांच्या पट्ट्याने दाद मिळणार होती.....कारण काहीवेळा पूर्वी सगळं बंद करतो अस सांगून गेलेला श्रीकांत परत ते मंत्र ओरडू लागला.....श्रीकांतची आई अजितरावांच्या मागे गेली श्रीकांत त्या चांदणीच्या चिन्हात गुडघ्यावर बसला होता.....समोर मेणबत्ती पेटल्या होत्या.....ह्या मेणबत्तीच्या ज्योती एकरेषेत पण जरा उंच अश्या पेटल्या होत्या....खोलीत पडदे नसल्याने वारा वाहत होता पण त्या वाऱ्यामुळे त्या ज्योती जराही हालत नव्हत्या.....श्रीकांत समोर एक जुने जाड पुस्तक होते.....त्या ज्योतीच्या कडे एकटक बघत श्रीकांत मंत्र पुटपुटत होता.....श्रीकांतचे डोळे विस्फारले होते....त्याने कित्येक उशीर डोळ्यांची पापणी देखील मिटली नव्हती.....त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते इतक्यात अजितरावांच्या तोंडून कधीही न ऐकलेली शिवी बाहेर पडली सोबत त्यांनी आणलेल्या चामडी बेल्टचा एक जोरदार फटका श्रीकांतच्या पाठीत बसला.....पण हळवा असलेला श्रीकांत ह्यावेळी मात्र इतका कठोर कसा झाला हा प्रश्न तिच्या आईच्या मनाला पडला होता....ती आपले हुंदके पदराने दाबत होती.....एकापाठोपाठ एक सटासट फटके श्रीकांतच्या पाठीवर बसत होते....पण फटका बसताच तो त्या वेदनेच्या सुराने जोरात तो इंग्रजी मंत्र म्हणत होता......अजितरावांना पहिल्यांदा आपल्या मुलाचा राग आला....त्यांनी एक जोराची लाथ श्रीकांतच्या पाठीवर मारली.....ह्या अनपेक्षित हल्ल्याने बेसावध श्रीकांत सरळ त्याने एका रेषेत लावलेल्या मेणबत्तीवर जाऊन पडला......वरून अजित राव अविरत लाथांचा प्रहार श्रीकांत वर करत होते.....त्याचे ते आत्म्यांना बोलवायचे अनुष्ठान मधेच खंड पडले होते.....इतक्या वर्षात काहीशी आशा आज जाणवत होती पण ती सुद्धा श्रीकांतचा वडिलांनी धूसर करून टाकली होती.....जया पुढे आल्या आणि त्यांनी अजितरावांना सावरले ती त्यांना ओढून बाहेर नेऊ लागली.....बाहेर जात असताना अजितरावांच्या तोंडून श्रीकांत साठी गलिच्छ शिव्या होत्याच......श्रीकांतच्या कपाळावर वडील मारत असलेल्या बेल्टचे स्टील चे बक्कल लागले होते.....त्या जखमेतून हलकेच रक्त वाहून त्या जुन्या पुस्तकावर पडले होते.....श्रीकांत जमिनीवर पडून गुरगुरत होता.....त्याला प्रचंड राग आला होता.....त्याने क्षणभर डोळे बंद केले.....ह्या दोन एक वर्षात त्याचे मित्र त्याला वेडा म्हणत टिंगल करत होते....परत आज त्याचे वडील शिव्या घालत होते मारत होते हे सगळं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहत होते......"खरोखर हे भूतांचे वेड मला खाऊन टाकत आहे का??" असे अनेक प्रश्न श्रीकांतच्या डोक्यात घुमत होते.....शेवटी तो किंचाळला
"बस्स बस्स बस्स झालं.....आता मला स्वतःला सिद्ध केलंच पाहिजे.....आता त्या पारलौकिक दुनियेतून मी आत्मा बोलावून दाखवतोच.....मी नाही त्यातला....शेवटपर्यंत लढत राहीन प्रयत्न करत राहीन........मायकल.....मायकल डेव्हीस"
श्रीकांत थरथरत होता....तो समोर असलेल्या पुस्तकाच्या गठ्याकडे धावला....कपाटात एक मोठं अस पुस्तक होतं...."सिरीयल किलर्स" अस लाल भडक अक्षरात लिहलं होत....श्रीकांतने ते पुस्तक जमिनीवर आदळलं आणि पाने पालटून मायकल डेव्हीस हा धडा शोधू लागला 666 नंबर पानावर मायकल डेव्हीसचा धडा होता......1990 च्या काळातील क्रूर सिरीयल किलर.....तोंडावर मास्क लावलेला....तो मास्कही त्याने मानवी चमड्यापासून बनवलेला होता......हातात मोठा धारदार चाकू आणि दाढी करायचे शेविंग ब्लेड जिभेच्या मध्ये अडकवून तो फिरत असायचा......कट्टर आस्तिक असलेला मायकल....काही कारणामुळे अचानक नास्तिक बनला आणि "in the name of devil" अस बोलून तावडीत सापडेल त्याला मारत सुटू लागला.....धिप्पाड प्रचंड ताकतीचा मायकल जेव्हा रात्री शिकारीला निघायचा तेव्हा 13 जणांना भोकसून यायचा.....रोज 13 खून केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे.....आणि खून केल्यावर त्याच्या जिभेवर अडकवलेल्या ब्लेड ने तो मृताच्या कपाळावर फुली मारायचा.....रोज खून होत होते वेगवेगळ्या भागात तब्बल 130 खून पडले होते.....अमेरिकेतले निम्मे पोलीस खाते रस्त्यावर होते....त्यातल्या एका ग्रुपला मायकल दिसला आणि त्या पोलीस टीमने जवळपास 15 गोळ्या मारल्या त्याला तेव्हा कुठे तो मरण पावला....असा हा भयानक सिरीयल किलर......त्याचे चित्र आणि त्याची सगळी डिटेल श्रीकांत समोर होती.....श्रीकांत ने एकनजर त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघितलं.....त्या स्थिर होत्या....बाहेर जोराचा वारा वाहत होता पण त्या वाऱ्याचा त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर काहीच परिणाम होत नव्हता.....श्रीकांत ने फुंकर मारली पण त्या ज्योती जरासुद्धा लवल्या नाहीत.....श्रीकांतने त्या जुन्या पुस्तकात बघितले.....खूप मोठं काहीतरी लिहलं होतं.....पण श्रीकांतने वरच्या दोन ओळी बघितल्या....आणि त्याने तो लिहलेला मंत्र उच्चरला.....मंत्र उच्चारत असताना त्याने तीन वेळा "मायकल डेव्हीस" हे नाव घेतले.....मंत्र पूर्ण झाला आणि त्या ज्योती विझल्या....श्रीकांतला काही समजेना.....त्याने परत ते जुनाट पुस्तक बघितले.......त्यात काही सूचना इंग्रजी मधून होत्या
"ज्योती विझल्या तर तुम्ही जवळच असलेले पवित्र जल स्वतःवर शिंपडावे.....ज्योती विझल्या ह्याचा अर्थ नरकातून एक क्रूर आत्मा तुम्ही ह्या भूतलावर आणली आहे.....तिला नीट हाताळावे तिला योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी पुढील विधी............."
पुढे काही वाचायच्या आत श्रीकांतची नजर बाहेर गेली.....पानांची सळसळ प्रचंड वाढली होती....श्रीकांतची एक नजर त्या पुस्तकाच्या जुनाट पानावर कधी झाडांच्या पानावर पडत होती.....पुस्तकात ज्या पवित्र जलाचा उल्लेख केला होता ते त्याच्याजवळ नव्हतेच.....श्रीकांतची नजर समोरच्या खिडकीवर पडली...फक्त उत्सुकतेपोटी त्याने हे पुस्तक घेतले होते......खिडकीतुन काळा एका विशिष्ट आकाराचा धुर आत येत होता.....तो धूर श्रीकांत समोर येऊन एका विशिष्ट आकारत फिरू लागला.......श्रीकांतचा चेहऱ्यावर भीती होती पण त्यातूनही तो चेहऱ्यावर खोटं हसू आणत होता......"who.....who are you?"
ह्या प्रश्नाने त्या काळ्या धुरात हालचाल वाढली.....काळे कण जोरजोरात आपल्या भोवती फिरत असल्यासारखे वाटत होते.....काहीतरी कराऱ्या आवाजात बाहेर पडलं.....त्या काळ्या आकृतीमधून तो आवाज येत होता......
"मायकल....मायकल डेव्हीस....."
श्रीकांतच्या चेहऱ्यावर थोडे समाधान होते पण त्या आकृतीच्या पुढच्या शब्दांनी तो पुरता गारद झाला.....एक करारी आवाज आला "in the name of devil"
हे शब्द मायकल जेव्हा खून करत होता तेव्हा म्हणायचा
तो काळा धूर थोडा वर उडाला आणि पूर्ण स्पीड ने श्रीकांतच्या तोंडात जाऊ लागला....श्रीकांतचे डोळे विस्फारले...पांढरे पडू लागले....त्याने आपले हात आपल्या तोंडावर नेण्याचा प्रयत्न केला पण कुणीतरी त्याचा हात घट्ट पकडून होतं.....सगळा धूर श्रीकांतच्या तोंडात शिरला....श्रीकांतने मान टाकली.....काहीवेळ गरगर मान फिरवून त्याने आपले डोळे खाडकन उघडले......तो उठून उभा राहिला....त्याने आपल्या हाताकडे बघितले.....खाली ते मोठे पुस्तक पडले होते त्यावर असलेल्या मायकलच्या चित्राकडे बघितले......त्याने खोलीत नजर फिरवली.....झाडे तोडायची कुऱ्हाड कोपऱ्यात ठेवली होती श्रीकांतने ती उचलली...श्रीकांत आपल्याच खोलीत एखाद्या अनोळखी व्यक्ती सारखा इकडे तिकडे काही शोधू लागला.....तो टेबलाजवळ गेला एका ड्राव्हरमध्ये दाढी करायचे ब्लेड ठेवले होते ते ब्लेड उचलून त्याने त्या ब्लेडच्या मध्ये ही खाच होती ती खाच आपल्या जिभेत अडकवली आणि जीभ पूर्ण आत घेतली.....श्रीकांत उंचापुरा होता पण आता थोडं वाकून आणि संथ गतीने चालू लागला.....हातातली कुऱ्हाड फरशीवर आपटत तो खाली उतरू लागला........(क्रमशः)
लेखन-- शशांक सुर्वे
No comments:
Post a Comment