पहिल्या भागाची लिंक
श्रीकांत विचित्र पद्धतीने चालत होता.....काहीतरी विचित्र इंग्लिश मध्ये बडबड करीत होता.....मधेच सैतान अंथेम ची शिट्टी वाजवत खाली उतरत होता.....सोफ्यावर अजितराव डोकं धरून बसले होते......मागून श्रीकांत चालत येत होता....त्याच्या जिभेच्या टोकाला ब्लेड अडकले होते तो जीभ बाहेर काढून फिरवत होता....ब्लेड जिभेत अडकले होते तो पूर्ण तोंडात घेऊन फिरवत होता..अजितरावांना मागून कसला तरी आवाज येत होता काहीतरी ओढत आणल्यासारखा......त्यांनी मागे बघितले तर कुऱ्हाड उंचावून श्रीकांत उभा होता.....अजितरावांचे डोळे विस्फारले......श्रीकांतच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर त्यांनी क्रूर हावभाव पहिल्यांदा बघितले......श्रीकांत जोरात ओरडला.....पण तो आवाज त्याचा वाटत नव्हता......त्याने कुऱ्हाड तयार ठेवली होती.....अजितरावांनी बचावादाखल आपले हात समोर आणले......तितक्यात
"in the name of devil"
असा आवाज खोलीत घुमला आणि धारदार कुऱ्हाड फिरली.....कोरी करकरीत धार असलेली कुऱ्हाड अजितरावांचा हात तोडून त्यांच्या डोक्यात घुसली.....जोराची किंचाळी फुटली....अजितरावांच्या डोक्यातून रक्ताची धार समोरची लाईट कलर भिंत लाल भडक करून गेली.....अजितरावांचे करूण डोळे अजूनही श्रीकांतकडे बघत होते.....काहीतरी फुटल्याचा आवाज झाला.....श्रीकांतची नजर समोर गेली.....अजितरावांसाठी पाण्याचा ग्लास घेऊन येणाऱ्या जया समोरचं दृश्य बघून जागेवर थबकल्या....त्यांच्या हातातून ग्लास पडून त्याचे तुकडे झाले होते......अजितराव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.....ते रक्त श्रीकांतच्या पायाला भिजवत होतं......श्रीकांतने अजितरावांच्या छातीवर पाय दिला आणि त्यांच्या कवटीत अडकलेली कुऱ्हाड उपसून काढली.....श्रीकांत जोरजोरात हसू लागला.....हे बघून जया जोरात किंचाळल्या आणि जागेवर बेशुद्ध होऊन कोसळल्या......इकडे श्रीकांत हसत हसत गुडघ्यावर बसला....त्याने जिभेला अडकवलेलं ब्लेड काढलं आणि त्या ब्लेड ने अजितरावांच्या कपाळावर एक फुली मारली......त्याने पहिला बळी घेतला होता....तो ही मायकल स्टाईलने....त्याने आपली कुऱ्हाड आपल्या शर्टाला पुसली....त्याने जयाकडे एकनजर बघितलं.....तो तिच्या जवळ गेला फुटलेल्या ग्लासाच्या काचेचे तुकडे सगळीकडे पडले होते त्यावर चालत तो जया जवळ पोहोचला....एक काच त्याच्या पायात घुसली होती....पण एकही वेदनेचा भाव श्रीकांतच्या चेहऱ्यावर उमटला नाही.....जया कडे बघून तो मागे फिरला आणि दरवाज्यातून बाहेर पडला....एका वेगळ्याच यांत्रिक चालीने तो चालत होता....पाय जराही न उचलता जमिनीवर घासत पुढे पुढे सरकत होता....आपले केस झटकत कधी मान तिरपी करून......त्याच्या चाळीमध्ये एक वृद्धत्व जाणवत होतं....एखादि जाड व्यक्ती पाय जास्त न उचलता चालते तस श्रीकांत चालत होता...
रात्र बरीच झाली होती......हिलस्टेशन असल्याने लोक जरा लवकरच झोपायची...रस्ता सुमसान होता...मंद थंडी होती..नाही म्हणायला जितू आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलत रस्त्यावर उभा होता 12 वाजले असतील....एका लाईटीच्या पोल खाली जितू उभा होता आजूबाजूला किर्रर्र अंधार होता.....त्या अंधारात दोन लांब असलेल्या जीवांची हसत खेळत फोनवर वार्ता सुरू होती.....समोरच्या रस्त्यावरून कुणीतरी येत असल्याचं जितूला दिसलं.....कुणीतरी काहीतरी घासत येत होतं.....रस्त्यावर लोखंड घासल्यामुळे जो कर्कश आवाज यायचा तसाच आवाज आणि त्यात तो विचित्र बडबडण्याचा आवाज.....जितू सावध झाला.....जीतूला बघताच समोरून येणारा विचित्र चालीचा व्यक्ती आता माकडा सारख्या उड्या मारत येत होता.....जितू तसा धाडसी होता त्याने पटकन फोन खिश्यात ठेवला......ते जे काही होतं ते उड्या मारत नाचत "in the name of devil" अस काहीसं ओरडत येत होतं.....लाईटीचा उजेड होत अचानक जीतूला समोर श्रीकांत दिसला.....काहीसा सुटकेचा निःश्वास सोडत जितू मनातच म्हणाला
"अरे हा येडा इथे काय करायला आला आहे मरायला?"
पण जीतूला समोर बघून "अरे श्री इकडे कसा काय?"
कुऱ्हाड वर उचलली गेली.....एक वार सरळ जीतूच्या हातावर बसला.....रक्त उडालं....जीतूला आपलं उत्तर मिळालं....."अरे येड्या काय करतोस तू अस" म्हणत तो श्रीकांतकडे बघत होता पण तो श्रीकांत नव्हताच.......त्याने परत कुऱ्हाडीचा वार केला पण जीतूने तो चुकवला......आपला जखमी हात घेऊन तो धावत सुटला......धावत तो खूप दूर गेला श्रीकांतला त्याच्या मागे धावता आलं असतं कारण तो एक उत्तम धावपट्टू होता पण ह्यावेळी मात्र त्याला धाप लागली होती......तो परत आपले पाय घासत रस्त्यावर चालू लागला......एक पाय उचलून पुढे टाकल्यावर दुसरा पाय टाकत होता ह्या विशिष्ट चालीमुळे त्यांचे खांदे वरखाली होत होते.....हातात ती रक्ताळलेली कुऱ्हाड.....श्रीकांत गुरगुरत चालत होता.....जिभेला ब्लेड अडकवले होते तरी तोंडात एकही जखम झाली नव्हती....आसपास कुणी नव्हतं.....जितू जिकडे धावला होता त्या बाजूने तो चालला होता......कारण त्या टेकडीवर प्रकाश आणि मिणमिणत्या लाईट्स दिसत होत्या......इकडे हातावर मोठा घाव झेलून रक्ताळलेल्या हाताने जितू पोलीस स्टेशन मध्ये आला होता....रात्रीची वेळ.....सुशिक्षित एरिया तसेच मोठमोठे अधिकारी वास्तव्यास असल्यामुळे किरकोळ मारामारी वाद असल्या घटना त्या भागात जरा कमीच असायच्या.....पोलीस सुद्धा निर्धास्त असायचे.....त्यात लाल भडक चिरलेला हात घेऊन एक युवक अगदी ओरडत पोलीस स्टेशन मध्ये घुसला.....पोलीस अगदी खडबडून उठले त्यांनी जीतूला खाली बसवले......प्यायला पाणी देऊन त्याच्या जखमेवर प्रथमोपचार सुरू झाले....
"तो.....तो श्रीकांत.....श्रीकांत होता......हातात कुऱ्हाड घेऊन.......पण....पण श्रीकांत तर डावखुरा आहे........तो येत होता माझ्या मागे......मला वाचवा साहेब"
पोलिसांनी त्वरित एक टीम बनवली.....आणि 10 जणांचे एक पथक रवाना झाले.....श्रीकांत आपल्या शिकारीच्या शोधत पोलीस स्टेशन ओलांडून पुढे गेला होता.....पोलीस आपली वर्दी चढवून गाडीत बसणार तितक्यात त्यांना त्या शांत वातावरणात मानवी किंचाळीचा आवाज आला.....आवाज त्या वातावरणात घुमत होता......पोलीस त्या आवाजाच्या दिशेने धावले......थोड्या अंतरावर एक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व्यक्ती त्यांना दिसला.....त्याची बाईक बाजूला पडली होती......आणि त्याची छाती अक्षरशः फोडली होती.....वार इतका जबरदस्त होता की छातीची हाडे फोडून छिद्र बनले होते......पोलीस इन्स्पेक्टर जाधव शहारले मृत व्यक्ती त्यांच्या परिचयाची होती......कपाळावर धारदार शस्त्राने फुली मारली होती....त्यावरून रक्त वाहत होते.....एका कॉन्स्टेबलला त्या सुनसान रस्त्यावर रक्ताचे डाग पडलेले दिसले.....सगळी टीम त्या थेंबाचा पाठलाग करू लागली......अजून एक किंचाळी आणि पोलिसांच्या बंदुका वरती झाल्या......सगळ्यांच्या बंदुकीची नळी एकावर केंद्रित झाली.....श्रीकांतने पान टपरीवर बसलेल्या एकाला खलास केले होते....त्याची कुऱ्हाड अजूनही त्या व्यक्तीच्या डोक्यात अडकली होती.....टपरीवाला घाबरून पळण्याचा प्रयत्न करीत होता.....पण त्या वृद्ध पानवाल्याचे पाय थोडेच धावले असतील इतक्यात एक मोठी वीट त्याच्या डोक्यात बसली आणि तो खाली कोसळला......श्रीकांत चवताळला होता.....त्याने सरळ त्या वृद्ध पानवाल्याचा गळ्याला आपल्या दातात पकडून लचला तोडला.....रक्ताची धार उडाली आणि तो वृद्ध व्यक्ती तडफडू लागला.....श्रीकांत त्याला तडफडताना बघून जोरात हसत होता......त्याने एकवार समोर बघितले.....पोलीस बंदूक रोखून उभे होते त्याला हात वर करायला सांगत होते.....पण तो एकही न ऐकता त्या पानपट्टी कडे जाऊ लागला......इंन्स्पेक्टर जाधव ह्यांनी त्याला वारंवार चेतावणी दिली पण तो थांबला नाही....शेवटी नाईलाजाने जाधव ह्यांनी एक गोळी श्रीकांतच्या पायावर चालवली.....पण काहीच न झाल्यासारखं गुरगुरत तो पानपट्टी कडे चालू लागला......त्याच्या पायातून रक्त वाहत होतं....पण त्याची चाल बदलली नव्हती.....आणि वेदनेचे तर नामोनिशाण त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं........जाधव आणि इतर सहकारी आवक झाले.....एव्हाना पायावर गोळी लागल्यावर तो सामान्य शरीराचा मुलगा खाली कोसळायला हवा होता......पण श्रीकांत त्या पानपट्टीवर जाऊन तिथून सिगारेट उचलून ओढत उभा होता.....श्रीकांतला सिगारेटचं व्यसन नव्हतंच......इकडे पोलीसही घाबरले होते......एक गोळी लागून सुद्धा तो आरामात सिगरेट ओढत उभा होता.....श्रीकांतच्या हाताला लागलेलं रक्त वाळलं होतं.....10 मिनिटे अशीच गेली....शेवटी थोडा धीर एकवटून काही पोलीस त्याला पकडायला गेले......पण गेलेले दोन पोलीस श्रीकांतने सहज खाली लोळवले.....त्याच्या अंगात प्रचंड ताकत होती......खाली पडलेल्या एका कॉन्स्टेबलला त्याने पकडले आणि ओरडत गळा आवळू लागला.....श्रीकांत गळ्याच्या नसा तानेपर्यंत ओरडत होता....तो भरडा आवाज त्या चेहऱ्याला शोभत नव्हताच......श्रीकांत जोरात त्या पोलीसाचा गळा आवळत होता.....अखेर सगळे पोलीस एकत्र श्रीकांतवर धावून गेले.....त्याला ओढण्याचा प्रयत्न करू लागले पण श्रीकांत 10 जणांना भारी पडत होता.....काहींना उचलून आपटले होते....पण शेवटी पोलिसांनी त्याला खाली पडून त्याच्या हातामध्ये बेड्या घातल्या.....हातात बेड्या असताना तो जोरात किंचाळू लागला काहीतरी विचित्र इंग्रजीत बडबडु लागला......हातात बेड्या असतानाही तो झटपट होता....शेवटी पोलिसांनी त्याला दोरीने बांधून घातले....तरीही त्याचे ओरडणे अविरत सुरू होते....पायातून रक्त वाहत होते...पोलिसांनी त्याला उचलून गाडीत घातले.....त्याच्या हातातील बेडी श्रीकांतने तोडून टाकली होती....हातापायात जाड दोरखंड आणि त्याला ओढत आणणारे पोलीस......सगळं पोलीस स्टेशन श्रीकांतच्या ओरडण्याने हादरून गेलं.....पोलिसांनी त्याला स्पेशल सेल मध्ये ठेवलं....गोळी लागलेल्या पायावर उपचार करायचे होते पण श्रीकांत कुणालाही जवळ येऊ देत नव्हता.....त्याच्या हातात दोऱ्या तश्याच होत्या......पोलीस हा विचित्र प्रकार बघून सुन्न झाले होते.....एक वेगळ्या आवाजात ओरडणारा प्रचंड ताकतीचा खुनी त्यांच्या कैदेत होता......
6 खून केले होते श्रीकांत ने.....आता मीडियावर सिरीयल किलरच्या बातम्या रंगल्या होत्या.....आपल्या वडिलांच्या सोबत इतर 5 खून आणि प्रत्येकाच्या कपाळावर ब्लेडने फुली मारल्या होत्या..काहींना मायकल डेव्हीस प्रकरण आठवलं....सारं अगदी मायकल डेव्हीस प्रकरणाप्रमाणे होतं......श्रीकांतला लोक भारतातला मायकल डेव्हीस म्हणू लागले......श्रीकांतच्या आईची ते दृश्य बघून अगदी दातखिळी बसली होती.....तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं.....इकडे जितू आणि शेजारी श्रीकांतच्या वेडाचे किस्से अगदी मिडियासमोर सांगत होते त्यात जितू प्रत्यक्षदर्शी वाचला होता......
"श्रीकांत नव्हता तो.....तो आवाज श्रीकांतचा नाहीच....आणि त्याने माझ्यावर कुऱ्हाडीने वार केला ती कुऱ्हाड त्याने उजव्या हाताने चालवली होती आणि श्रीकांत डावखुरा आहे.....तो ह्या टोकाला जाईल अशी कल्पना नव्हती...तो चांगला जरा घाबरट मुलगा होता.....काही वर्षांपूर्वी भूत आणि आत्मा ह्या विषयात जास्त रस घेत होता...तो काही आत्मा बोलावण्याचे प्रयोग करत होता.....कदाचित......."
इकडे चर्चाना उधाण आले होते......पोलीसही चक्रावले होते.....कारण श्रीकांत एक वेळी एकदम शांत आणि नॉर्मल बोलायचा..त्याच्या पायात जी गोळी लागली होती ती तिथल्या डॉक्टरांनी बाहेर काढली होती....ह्या 10 लोकांना न ऐकणार्या मानसिक रोग्याला दवाखान्यात नेणे शक्य नव्हते....डॉक्टरांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याच्या पायातील गोळी काढली होती....ह्या वेदनेने तो दिवसा प्रचंड तडफडायचा...ज्यावेळी तो नॉर्मल झाला तेव्हा त्याने आपल्या जिभेवरचे ब्लेड काढून घेतले होते...नॉर्मल होताच त्या ब्लेडने त्याच्या तोंडात प्रचंड घाव केले होते...जेव्हा त्याच्या कृत्याबद्दल पोलीस त्याला सांगायचे आणि आपल्या वडिलांच्या बद्दल ऐकून तो रडायचा आणि पोलिसांना ओरडून सांगायचा
"मी नाही....मी नाही कुणाला मारलं.....ते सगळं मायकल डेव्हिस ने केले आहे.....तोच तो अमेरिकन सिरीयल किलर......मी....मी माझ्या वडिलांना मारुच शकत नाही"
हे तो नेहमी बोलायचा......मायकल डेव्हीस हे प्रकरण जगप्रसिद्ध होतं.....इकडे श्रीकांत दिवसा नीट शांत बोलायचा.....रडायचा...आपल्या कृत्याबद्दल भिंतीवर डोकं आपटायचा...पण जशी जशी जशी रात्र होत असे तेव्हा तो हिंसक बनत असे.....इंग्लिश मध्ये आणि घोगऱ्या आवाजात ओरडायचा......एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या पद्धतीने कशी काय वागू शकते हा प्रश्न पोलिसांना पडला होता......सकाळी रडका आणि मुळमुळीत श्रीकांत आणि रात्री मात्र 10 लोकांना भारी पडणारा दुसरा श्रीकांत...पोलिसांना नेमका प्रकार लक्षात येत नव्हता.....त्यांना पुरावे गोळा करायचे होते.....श्रीकांत कुणी मानसिक रोगी असला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं....खटला चालवणे ही अवघड होतं.....पोलिसांनी श्रीकांतचा खोलीतील सगळं समान चेक केले त्याचे फोटो काढले......मीडियावर हे प्रकरण गाजत असल्यामुळे सविस्तर उत्तरे द्यायची होती......इन्स्पेक्टर जाधव ह्यांनी शहरातले बेस्ट मानसोपचार तज्ञ डॉ शहा यांना बोलावून घेतले.....डॉक्टर शहा यांनी सगळी फाईल नीट बघितली....दोन दिवस ते पोलीस स्टेशन मध्ये राहून श्रीकांतची सगळी हालचाल तपासत होते....त्याच्याशी संवाद साधत होते....हे प्रकारण खूपच दुर्मिळ वाटत होतं.....शेवटी शहा यांनी इन्स्पेक्टर जाधव ह्यांना बोलावलं आणि सांगितलं
"जाधव ही एक रेअर केस वाटते....हा मुलगा सतत भुतांच्या गोष्टी वाचत आला आहे.....पॅरानॉर्मल रिसर्च करत आला आहे...मी ह्याची एक डायरी वाचली आहे....ह्याला कसले तरी भास होतात असे उल्लेख तो ह्या डायरीत करतो.....भूत आत्म्यांच्या सतत वाचनाने ह्याच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी घर करून बसल्या होत्या....आणि ह्याचे आई वडील ह्याचे मित्र ह्यावर टीका करत होते त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता....."
इंस्पेक्टर जाधव डॉक्टर शहा यांना मधेच थांबवत म्हणाले
"डॉक्टर माझा ह्या भूतप्रेतावर विश्वास नाही....पण हा मुलगा बघितला असेल तुम्ही....सकाळी एक वागतो आणि रात्री एक वागतो बरं रात्री तो 10 हवालदाराना भारी पडतो हा काय प्रकार आहे"
काहीतरी लिहत डॉक्टर शहा म्हणाले
"जाधव तेच सांगत आहे मी....हा मुलगा जे स्टडी करत होता ते साहित्य मी बघितलं आहे....अत्यंत किळसवाणे होतं सगळं.....आणि अन्यायाचा बळी पडलेला आणि नंतर सिरीयल किलर बनलेला मायकल डेव्हीसमध्ये हा स्वतःला बघत होता.....त्यामध्ये तो एवढा गुंतून गेला की स्वतःला मायकल डेव्हीस समजू लागला....मला वाटत कदाचित ह्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार असू शकतो....काही सांगता येत नाही....ह्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये आणावे लागेल मगच इलाज करता येईल"
इन्स्पेक्टर जाधव ह्यांनी कोर्टाकडून तशी परवानगी मागून घेतली.....कारण डॉक्टर शहा ह्यांना श्रीकांत वर रिसर्च करायचे होते....कोर्टाने तसा आदेश दिला होता.....त्या रात्री श्रीकांतला शिफ्ट करायचं होतं.....रात्र होताच पोलीस स्टेशन मध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं कारण रात्री श्रीकांत प्रचंड हायपर होत असे पण त्या रात्री श्रीकांत एकदम शांत होता.....डॉक्टर शहा आणि जाधव त्याच्या समोर आले
"मिस्टर श्रीकांत आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत कृपया तुम्ही सहकार्य करा"
हे ऐकून श्रीकांत हसला....त्याच्या गालावर ओठावर ब्लेडचे ओरखडे होते तरीही हसत हसत बोलला
"माझ्या बेड्या खोलाल का प्लिज....मी नाही त्रास देणार तुम्हाला....वचन देतो"
इन्स्पेक्टर जाधव यांनी कॉन्स्टेबल ला इशारा केला तश्या श्रीकांतच्या बेड्या दूर झाल्या हात चोळत श्रीकांत डॉक्टरांना म्हणाला
"शेवटी मी स्वतःला सिद्ध केलं.....खेचुन आणलं मायकल डेव्हीसला नरकातून.....माझ्या विद्येचा विजय झाला....मी स्वतःला सिद्ध केलं....आणि हा आनंद मला आयुष्यभर राहील.....आणि मी तुम्हाला आता कोणताच त्रास देणार नाही कारण माझ्या आतून तो निघून जात आहे तो बघा त्या दारातून."
सगळ्याची नजर दाराकडे गेली इतक्यात श्रीकांत ने शर्टाच्या कॉलर मध्ये लपवलेलं ब्लेड काढलं आणि सपासप आपल्या दोन्ही हाताच्या नसावर चालवलं....रक्त वाहू लागलं...अनपेक्षित घटनेने पोलीस हादरले...प्रचंड रक्तस्त्राव होत होता.....पोलिसांची धावाधाव होत होती.....श्रीकांतचे डोळे मिटत होते.....समोरच्या दारात उभी असलेली काळी आकृती त्याच्याकडे बघत आहे असं त्याला वाटत होतं...थरथरत्या ओठांनी जड डोळ्यांनी त्याच्या तोंडून शेवटचे शब्द बाहेर पडले
"बाबा....सिद्ध केलं मी स्वतःला"
रक्ताळलेल्या हाताचे बोट दाराकडे होतं......काही वेळाने तो हात थंड होऊन खाली आला.....सुरवातीला त्या काळ्या आकृतीने घोगऱ्या आवाजात काढलेले "in the name of devil" ह्या शब्दाचा अर्थ तो समजून चुकला होता....श्रीकांतला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी काहीजण धावले...नेत असताना त्याचं अंग गार पडलं होतं...दोन तीन कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन मध्ये थांबले.....पोलीस स्टेशन मध्ये समोर एक फळा होता.....त्यावरची मोठी अक्षरे बघून त्या दोघांचाही थरकाप उडाला.....खडूने अगदी मोठ्या अक्षरात लिहल होतं...."मायकल डेव्हिस" .................(समाप्त)
लेखन :- शशांक सुर्वे
(सहज सुचलेला विषय....ह्या कथेचा प्रतिसाद बघून ह्याच विषयावर पुढे लिहण्याचा प्रयत्न करीन......ही कथा कशी वाटली ह्याबद्दल आपला बहुमूल्य अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा......धन्यवाद )
No comments:
Post a Comment