एक_अनूभव..
त्या रात्री घरी जायला जरा उशीरच झाला होता, नेमकी गल्लीमधली लाईटपण गेली होती वाटतेय, एकदम अंधार बूडूक.. मी आपला कडेकडेने हळूहळू घराकडे निघालो..
समोरून एक गाडी सुसाट वेगात अगदी माझ्या जवळूनच निघून गेली, मी रागात वळून पाहिले पण गाडीचा नंबरसुद्धा दिसला नाही एवढ्या वेगात.. विशेष म्हणजे त्या गाडीमध्ये कोणीच बसलेले नव्हते.. किंवा जास्त वेगात गेल्याने मलाच दिसले नसेल..
मी चिडचिड करत घराजवळ आलो तर तेथे अजूनच काळोख..ही लाईट कधी येतेय कुणास ठाऊक?
वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिन्याजवळ आलो.
जिन्याजवळच्या खोलीमध्ये म्हातारी आई अंधारातच झाडु मारत होती..मी थोडावेळ दरवाज्याच्या बाहेरच थांबलो.
"अगं, एवढ्या अंधारामध्ये कशाला झाडून घेतेस ? सकाळी घेतले असतेस की"
वयोवृद्ध आबांचा कापरा आवाज त्या अंधार्या खोलीतून ऐकू आला.
"आज आपला रमेश येणार हाये ना..त्याच्यासाठीच करतेय" आई म्हणाली.
मी येणार म्हणून? पण मी तर नेहमीच घरी येतो की..तसे अधेमधे कामानिमित्त काही दिवस बाहेरगावी पण असतो म्हणा..
"तो आला तरी नेहमीसारखा वरच जाईल की, आपल्याजवळ कशाला येईल झोपायला" आबा म्हणाले.
आबाच पण बरोबरच होतं, गेली कित्येक वर्षे ते दोघे एकटेच त्या खोलीत राहायचे. दररोजच्या धावपळीत त्यांची विचारपुस करणे सुद्धा शक्य होत नव्हते. मगं आज झोपायचे का आपण त्यांच्या जवळ..नको नाहीतर, आज नको, पुन्हा कधीतरी निवांत..
मी जिना चढून वर माझ्या घरात गेलो..
घरात आज एकदम शांतता जाणवत होती, मुलांचाही आवाज येत नव्हता..आधीच अंधार आणी त्यात ही शांतता.
तेवढ्यात थोडासा प्रकाश जाणवला, एका कोपर्यामध्ये मेणबत्ती पेटलेली होती..
मी आवाज देण्याच्या अगोदरच वैशाली आतल्या खोलीतून बाहेर येऊन समोर उभी राहिली..त्या अंधुक प्रकाशात पण तिने केलेला साजशृंगार उठून दिसत होता..माझ्या स्वागतासाठी.
"एवढ्या लवकर येताल असं वाटलं नव्हतं मला" ती अंधारातून जवळ येत म्हणाली.
"हा एवढा अंधार पडलाय बाहेर आणी लवकर म्हणतेस होय?
बर ते जाऊदे, जेवायला काय बनवलय आज..आणी मुले कुठे बाहेर गेलीयत का? " मी सोफ्यावर टेकत विचारले..
पण वैशालीने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, ती समोर तिच्या जागेवरच उभी होती.. तटस्थपणे.
"म्हणजे तुम्हाला अजून समजले नाही ?" तिने तुटकपणे विचारले.
"काय ते? अगं बाकी काही असुदे, पण आज खूप दमलोय मी..लवकरच जेवण करून आराम करायचाय मला, पण तु का अशी उभी आहेस ? लाईट येण्याची वाट पाहतियस का?"
"नाही, गाडी येण्याची"
"गाडी ? कोणती गाडी ?" मी आश्चर्याने विचारले.
"ती पहा आली तिकडे" तिने इशारा केला पण मला काहिच समजत नव्हते.
तेवढ्यात दूरून एका ॲंबुलंसचा आवाज ऐकू येऊ लागला.
आवाज हळूहळू जवळ येत ती ॲंबुलंस आमच्या घरासमोरच येऊन थांबली.
"आपल्या घरासमोर का थांबली ही गाडी, नक्की काय झालयं" मी विचारले.
"चला खाली जाऊन पाहु" ती म्हणाली आणी आम्ही खाली चाललो.
खाली येवून पाहतो तर घरासमोर बरीच गर्दी जमलेली दिसत होती. माझा भाऊ, वहिनी आणी इतरही काही नातेवाईक, शेजारी जमलेले दिसत होते.. काहीजण हुंदके देत होते..काही जणांनी ॲंबुलंस मधून एक डेडबॉडी काढून घरासमोर ठेवली.. त्या अंधारामध्ये मी सहजपणे जमलेल्या गर्दीतून वाट काढत बॉडीजवळ गेलो..आणी..
आणी ती खाली ठेवलेली डेडबॉडी पाहून कंरट लागल्यासारखा दचकलो..ती बॉडी दुसर्या कोणाची नसून माझीच होती.. हे भयानक दृश्य पाहून मला चक्कर आली आणी मी डोके धरून जागेवरच खाली बसलो..
काही क्षण असेच गेले आणी हळूहळू काहितरी ध्यानात येवू लागले..
दोन दिवसांपूर्वी घरी परतत असताना झालेला तो अपघात, ते हॉस्पिटल आणी पुढे..पुढे तर काहीच आठवत नव्हते..
आणी माझे आई बाबा? ते तर कित्येक वर्षापुर्वीच देवाघरी गेले होते, आणी पत्नी वैशाली? ती सुद्धा गेल्यावर्षीच आजारपणात गेली होती की..आणी आज मी पण..?
कोणीतरी जवळ येऊन खांद्यावर हात ठेवला..मी वर पाहिले, वैशाली होती ती..
"सुरवातीला असेच होते, शरीराचा झालेला वियोग आपले मन मान्य करत नाही, कोणी सांगितले असते तरी तुम्हाला पटले नसते प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय..चला आता, आई आबा तुमची वाट पाहत आहेत"
तिचे बोलणे ऐकून मी कसाबसा जागेवरून उठलो आणी पुन्हा एकदा जमलेल्या गर्दीतून अगदी सहजपणे कोणाच्याही नकळत वाट काढत बाहेर पडलो..
#समाप्त.
No comments:
Post a Comment