आक्का सुक्या मिरच्या सोलत बसली होती. संध्याकाळची वेळ आणि पडवितच बसली होती. सूर्य मावळण्याच्या तयारीत होता आणि जाता जाता आपली किरणं त्या मिरचांवर पाडत असे. आक्काने वर पाहिले आणि समोर बघते तर काय, उमा लंगडत समोरून येत होती. "काय गं काय झालं?" आक्का उठली आणि विचारलं.
"अहो आक्का पाय मुरगळला, विहिरीवर जरा पाणी काडत होते..." पाय दुखतोय हे दर्शवत उमा म्हणाली.
"अगं मुली ही विहीर आहे तुमचा मुंबईचा स्वीममिंग पूल नाही... काळजीने पाणी काढायचं असतं... पाय घसरला मग... आणि एकटीच काय गेली होतीस... कोणाला तरी घेऊन जायचा ना...” आक्काच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत होती.
"बस आधी इथे... अगं सुमे जरा पाणी गरम कर आणि आण... सुनबाई आज पराक्रम करायला निघाल्या होत्या...”
उमाला समजले होतं की आक्कांना आवडले नाही विहिरीवर पाणी काढणं आणि म्हणाली, "माफ करा आक्का परत नाही जाणार तिथे.” आक्काने नुसती मान हलवली आणि पायाला शेक देऊ लागली. उमा म्हणाली की, वेद किती नशीबवान आहे की त्याला आक्का आईचं प्रेम आणि माया देत आहेत.
रात्र झाली आणि उमा पडून होती. आक्का आली आणि म्हणाली "झोपलीस का गं?"
"नाही आक्का, या ना..." जरा उठून बसली आणि आक्कांना बसायला जागा दिली.
"हे बघ मुली. तुला वेदने इथे माझ्या जबाबदारीवर पाठवलंय. आणि हे गाव तुझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे इथे तिथे जास्त भटकू नकोस, जायचं असेल तर मला सांग मी कोणाला तरी पाठवेन तुझ्याबरोबर. वेदला मी सांगितलं होतं की एकत्र या पण त्याचं काम नेहमी असंच... सदा जास्त... आता तू आलीस तर कदाचत गतिरोधक लागेल...” थोडी डोळ्यात भीती दाखवूनच आक्का म्हणाली.
"मी समजू शकते की तुम्हाला आमच्या प्रती काळजी वाटते. मी नाही जाणार कुठे तुम्हाला न विचारता..." हसतमुखाने उमा असं म्हणाली आणि आक्काच्या हातावर हात ठेवला.
आक्का पण हसली पण थोडं अस्वस्थ वाटत होतं तिला.
"काय झालं?" उमाने विचारलं.
"काही नाही, झोप आता..." म्हातारं देह उठलं आणि निजायला गेलं.
खिडकी लावायला गेली तर उमाने बाहेर मिट्ट अंधार बघितला. घड्याळात १० वाजून १३ मिनिटं झाली होती. "गावी किती लवकर झोपतात आणि शांतता असते" असं म्हणत उमाने उशीवर डोकं ठेवलं.
तासाभराने उमा उठली आणि शौचालयास जावेसे वाटले.
आक्कांना अस्वस्थ वाटत होतं म्हणून त्यांना तिने उठवलं नाही. शौचालय हे घराच्या बाहेर होतं, पाऊलभर लांब. गावी तशी पद्धत होती. बटन चालू केलं आणि पाठच्या बाजूला लावलेला बल्ब चालू झाला. हळूच दार उघडून उमा बाहेर निघाली. रातकिडे आवाज करण्यात व्यस्त होते. चांदणं पण काही फारसं छान नव्हतं. बाजूच्या आणि आक्काच्या घरामध्ये एक छोटा धक्का होता. तिथे एक ७० वय असलेला माणूस बिडी फुकत होतं. एक मळकट बंडी आणि तेवढंच मळकट धोतर घालून होते ते. उमा आपली मान खाली घालून गेली. ५ मिनिटांनी ती बाहेर आली तरी तो म्हातारा बिडी फ़ुकतच होता.
"तू वेदची बायको का गं?" असे त्याने उमाला विचारला.
पाठी वळू की नको कळेना. पण हिम्मत करून बघितलं.
"होय.." उमा म्हणाली.
"बरंय... कसं चालू आहे?" उत्सुकतेने त्यांनी विचारलं.
"छान"
उमा फिरली आणि दारा पर्यंत गेली. ते कोण होते आणि असे का बसलेले... ते प्रेत आत्मा तर नाही ना असा प्रश्न तिच्या मनात आला. हळूच तिने मागे वळून बघितलं आणि तो म्हातारा तिथेच बसून बिडी फुकत होता... गायब नाही झाला.
"काहीतरी येते बाई माझ्या मनात" डोकं हलवून ती आत गेली आणि दार लाऊन घेतलं.
पहाट झाली आणि सवयीप्रमाणे आक्का पहिले उठली.
"झोप लागली का गं..." आक्काने सहज विचारलं.
"हो लागली... थोडी भीती वाटली त्या काकांमुळे पण नंतर लागली..." उमा म्हणाली
"कोण काका?" कप्पाळावर आठ्या पाडून आक्काने विचारलं.
"काल रात्री शौचालयाला गेली होती तेव्हा त्या धक्क्यावर एक म्हातारे काका बसले होते."
"अगं माझी आई मी तुला सांगितलं ना मला सांगून जा..." चिडून आक्का म्हणाली.
"पण आक्का तुम्ही अस्वस्थ वाटलात म्हणून नाही सांगितलं...” लहान झालेलं तोंड घेऊन उमा म्हणाली.
"तुला नाही कळायचं हे सगळं, तुला माझं ऐकायचं नसेल तर जा तुझ्या नवर्याकडे...” रागावून आक्का निघून गेल्या बाहेर.
उमाने बाकीचं आटपलं आणि तासाभाराने आक्काकडे गेली. "जाऊ दे ना आक्का.... चला ना कुठे तरी जाऊया..." एकदम लाडाने उमा आक्काला म्हणाली. मग काय आक्का फसली.
"चल चल... उठते मी... एक फेरफटका मारून येऊ..." अस. म्हणत आक्का उठली आणि उमाच्या चेहऱ्यावर हसू आलं.
आक्का बऱ्याच दिवसांनी बाहेर निघाली होती म्हणून बाकी गावकऱ्यांना ते कौतुकास्पद वाटत होतं. सगळ्यांना हाक मारत आक्का गावभर फिरत.
"काय रे वसंता अजून फोन नीट नाही झाला का... मला वेदबरोबर बोलायला नाही मिळत." वसंत म्हणजे गावातल्या किराणा दुकानाचा मालक. त्याच्याकडे PCO होता पण काही कारणाने तो बंद होता म्हणून आक्काची त्याच्याकडे तक्रार.
आक्काने उमाला नदीकाठी आणले.
"ये बसू इथे..." दोघी बसल्या खाली.
"किती मस्त वाटतं इथे आणि किती शांत..." प्रसन्न मनाने उमा म्हणाली.
"माझ्यासाठी हेच गं स्वर्ग आणि दुनिया..." असे म्हणत आक्काने एक दगड पाण्यात टाकला. "आक्का काय खमंग सुवास सुट्लाय....बटाटे वडे करतंय वाटतं कोणी तरी..." नाक वर करून उमा म्हणाली.
अचानक तिथे कावळ्यांचा किवकिवाट सुरू झाला. बघता बघता बरेच कावळे जमा झाले आणि काव काव करू लागले. दोघींना कळेना काय झालं.
"हे काय होतंय... हिला कसला वास आला आणि तो मला का नाही येत. हे एवढे कावळे कुठून आले आणि काय सांगत आहेत ते." असे प्रश्न आक्काच्या डोक्यात फिरू लागले.
"घरी जायला हवं... उठ पहिले आणि भरा भरा चल..." भीती जास्त वाटू लागली म्हणून आक्का म्हणाली.
"जा पाय धू पहिले आणि दिवा बत्ती लाव..." आक्का स्वतःला शांत करू पाहत.
"गे आक्का आधी बाहेर ये...” जोर जोरात ओरडत गण्या आला.
"काय झालं गण्या... कशाला ओरडतो..." म्हणत आक्का बाहेर आली.
"मी मार्केटला गेलो होतो तर मुंबईहून वेदचा फोन आला. इथला फोन बंद असल्यामुळे तुला कळवू शकला नाही." धापा टाकत गण्या म्हणाला.
"काय निरोप आहे वेदचा... कधी येतोय?" उत्सुकतेने विचारलं.
"अगं तो आणि सुनबाई निघाले होते पण वाटेत गाडीचा अपघात झाला... अगं आक्का सुनबाई गेली गं..." असे म्हणत गण्याच्या डोळ्यात पाणी आलं.
हे ऐकून जणू आक्काच्या पायाखालची जमीनच सरकली.
आक्काच्या आता लक्षात येऊ लागलं. गावातली बुजवलेला विहीर उमाला कशी दिसली, तो म्हातारा मरून 3 वर्ष झाली आणि तो उमाबरोबर गप्पा मारत का होता, उमाला वड्यांचा वास कसा आला आणि ते मला का नाही जाणवलं... कावळे का पिसाळलेले. सगळ्या गोष्टीचे तर्क लागत गेले.
आक्का उठली आणि आत गेली, पण उमा कुठे दिसेनाशी झाली.
वेळ कशी कोणावर येईल काही सांगता येत नाही. अघटित गोष्टींना पाठी ठेऊन आक्का वेदला भेटायला मुंबईला निघाली...
No comments:
Post a Comment