१९६८ सालची ही घटना, एखाद्या भयपटामध्ये शोभेल अशी आहे. त्यावर्षी अपस्टेट न्यूयॉर्कमधील एका टुमदार व्हिक्टोरियन घराच्या माळ्यावर नक्की काय काय सामान पडले हे पाहण्यासाठी माळ्यावर चढून आलेल्या घरातील मंडळींना एक जुनाट लोखंडी ट्रंक सापडली. या ट्रंकमध्ये जुनी कागदपत्रे, वर्तमानपत्रे ठेवलेली होती. आणखी काय सामान या ट्रंकमध्ये भरले आहे हे पाहत असतानाच ट्रंकच्या तळाशी ठेवलेला एक जुनाट बाहुला, आणि त्या बाहुल्यावर ठेवलेला, कालांतराने पिवळा पडलेला एक कागद घरमालकाला आढळला. त्या कागदावर कसली तरी प्रार्थना लिहिल्यासारखे वाटत होते. हा कागद या बाहुल्यावर का ठेवला असावा, याचा अंदाज घरमालकाला लावता येईना. ट्रंकमध्ये सापडलेल्या वृत्तपत्रांवरील तारीख १९३० सालची, म्हणजेच सुमारे अडतीस वर्षांपूर्वीची होती. मात्र हा बाहुला किती जुना असेल हे सांगणारा कोणताही पुरावा या ट्रंकेत आढळला नव्हता.
त्या घरामध्ये राहण्यासाठी आलेल्या मनुष्याचा कुटुंबाचा पसारा मोठा होता. तो स्वतः, त्याची पत्नी, आणि त्याच्या पाच मुली असा हा मोठा परिवार होता. घरमालकाला आणि त्याच्या परिवाराला जुन्या बाहुल्यांचा संग्रह करण्याची आवड होती, त्यामुळे माळ्यावरील ट्रंकेमध्ये सापडलेल्या बाहुल्याला त्यांच्या या संग्रहामध्ये मोठ्या आनंदाने समाविष्ट करून घेतले गेले, आणि इतर बाहुल्यांप्रमाणे त्याचेही नामकरण करण्यात आले. ‘चार्ली’ असे नामकरण केला गेलेला हा बाहुला इतर बाहुल्यांच्या प्रमाणेच, खास बाहुल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या बेंचवर विराजमान झाला.
काही दिवसांनी मात्र चार्ली त्याच्या बेंच व्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणी आढळून येऊ लागला. कधी चार्ली खुर्चीवर असे, तर कधी दिवाणखान्यातील एखाद्या कोपऱ्यात बसलेला दिसे. सुरुवातीला, घरातील लहान मुलींपैकी कोणी तरी वारंवार चार्लीला निरनिरळ्या ठिकाणी उचलून ठेवत असेल असे घरमालकाला वाटले. मात्र आपण चार्लीला त्याच्या जागेवरून अजिबात हलविले नसून, त्याची जागा वारंवार कशी बदलते हे आपल्याला ठाऊक नसल्याचे सर्व मुलींनी ठामपणे सांगितले. घरमालकाने ही या विषयाची अधिक चर्चा न करता हा विषय तिथेच थांबविला. काही काळ शांततेत उलटून गेला, आणि चार्लीचा विषय अचानक घरामध्ये पुन्हा निघाला. घरमालकाच्या सर्वात धाकट्या मुलीने सर्वांना जे काही सांगितले, ते ऐकून सर्वच जण चक्रावले. जेव्हा रात्री बाथरूममध्ये जाण्यासाठी हे मुलगी उठली, तेव्हा चार्ली तिथे असून, तो आपल्याशी बोलला असल्याचे तिने सांगितले. तिच्या आई वडिलांचा आणि इतर बहिणींचा तिच्यावर अर्थातच विश्वास बसला नाही. ती आपल्या मनाने काही तरी कल्पना रंगवून सांगत असल्याची खात्री सर्वांना होती.
दिवस सरत होते. घरमालकाने आणि त्याच्या पत्नीने चार्लीच्या कोणत्याच हालचाली कधीही अनुभवल्या नसल्या, तरी सर्वात धाकट्या लेकीप्रमाणे चार्लीच्या करामतींचा अनुभव घरातील इतर मुलींना ही येऊ लागला होता. त्यामुळे या मुली चार्लीच्या आसपास ही फटकत नसत. रात्रीच्या वेळी उठून बाथरूममध्ये जाण्याचा तर सर्वच मुलींनी धसकाच घेतला होता. आईवडिलांना त्यांच्या मुलींच्या वागण्यातील या बदलाचे कारण समजत नव्हते. त्यांनी स्वतः चार्लीला हालताना , बोलताना कधीच पहिले नसल्याने मुलींची भीती त्यांना समजत नव्हती. त्यानंतर जे घडले ते पाहून मात्र घरमालकाला चार्लीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घ्यावाच लागला. एका रात्री त्याच्या सर्वात धाकट्या मुलीचे किंचाळणे ऐकून सर्व जण धावतच तिच्या जवळ पोहोचले. तिच्या अंगभर उठलेले, रक्ताळलेले ओरखडे पाहून सर्व मंडळी घाबरून गेली. पण खरी भयंकर गोष्ट तर पुढेच होती. हे ओरखडे घरातल्या पाळीव मांजराने ओचकारल्यामुळे नसून, चार्लीने ओचकारल्यामुळे आले असल्याचे जेव्हा या मुलीने सांगितले, तेव्हा मात्र सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. खरे काय घडले असावे याची कल्पना कोणालाही नव्हती. पण तरीही मुलींची घाबरलेली अवस्था पाहून घरमालकाने चार्लीला त्वरित माळ्यावरील ट्रंकेत नेऊन टाकले आणि ट्रंकेला भले मोठे कुलूप ठोकले. कालांतराने परिस्थिती सामान्य झाली, आणि माळ्यावरील ट्रंकमध्ये ठेवलेल्या चार्लीचा सर्वांना विसरही पडला. जेव्हा मुली मोठ्या झाल्या, घर सोडून इतरत्र स्थायिक झाल्या, तेव्हा घरमालकानेही आपले घर विकण्यास काढले. घरातील अनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी ‘गॅरेज सेल’ सुरु केला. या सेलमध्ये विकण्यास ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये माळ्यावरील ट्रंकही होती. या ट्रंकमध्ये असलेला चार्ली एका वृद्ध महिलेला पाहताक्षणी पसंत पडला. ही महिला देखील जुन्या बाहुल्यांची संग्राहक असल्याने चार्लीसाठी हवी तितकी किंमत मोजण्याची तयारी तिने दर्शिविली.
घरमालकाने योग्य मोबदला घेऊन चार्लीला या महिलेच्या हवाली केले, आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये घडलेल्या सर्व हकीकतीही सविस्तर कथन केल्या. त्यानंतरही चार्ली बाहुल्याची पुढे अनेकदा खरेदी-विक्री करण्यात आली, आणि चार्ली सोबतच त्याच्याशी निगडित सर्व कथाही अनेक लोकांपर्यंत पोहोचल्या. सध्या चार्लीचा मुक्काम ‘लोकल आर्टिसन’ नामक एका अँटीक वस्तू विकणाऱ्या दुकानामध्ये आहे. आजही चार्ली दुकानामध्ये अनेक ठिकाणी आपणहोऊन फिरत असल्याचे म्हटले जाते, पण आसपास लहान मुले असतील तर चार्लीच्या हालचाली जास्त जाणवत असल्याचे ही म्हटले जात असते.
No comments:
Post a Comment