माया- ek marathi romanchak gosht
मी कॉलर धरून ओढलं तसे रिक्षावाल्याने करकचून ब्रेक लावले. मागे बसलेली पोरं तर तोंडावरच आपटायची बाकी राहिली. रिक्षावाल्या काकांनी तोंड फिरवून माझ्याकडे पाहिलं..
अरे हे काय ? रोज इथे का थांबायला लावतोस.. घर अजून दूर आहे बाळा !
नको, इथेच थांबा. आजी येईल घ्यायला ! मी म्हणालो.
त्याने विचित्र दृष्टीने माझ्याकडे पाहिले. पण रिक्षा मात्र उभी केली. मी टुन्नदिशी खाली उडी टाकली.
काही वेळ गेला. आजी लगबगीने चालत माझ्याकडे आली. माझा घामेजलेला चेहरा तिने पदराने घासून पुसला. मला बरं वाटलं. आम्ही घराकडे चालू लागलो.
वाटेत ते दुकान लागलं. रोजच्यासारखाच मी थांबलो. आजीचा पदर धरून म्हणालो.
ए आजी, ते लालिपॉप घेऊन दे ना !
आजीचा चेहरा कसनुसा झाला. ती घाईघाईने म्हणाली.
नको रे बाळा, त्याने दात खराब होतात. आणि मागच्यासारखा खोकला झाला तर तुझी आई किती रागावते ते माहित आहे ना !
खरं आहे.. आईला रागावण्याशिवाय काहीच येत नाही. आता तर ती मारतेही ! बाबा नेहमीच फिरस्तीवर असतात. घरी असले तरी सदानकदा आईसोबत त्यांच्या बेडरूममध्ये.. अधूनमधून मला जवळ बोलावतात. त्यांच्या तोंडाला कायम घाणेरडा वास येतो. आजी म्हणते, बाई आणि बाटलीने त्यांची बुद्धी भ्रष्ट केली म्हणून !
मला ते काहीच कळत नाही. पण आजीला बरं वाटावं म्हणून मी हो म्हणतो. आजी कधी खोटं बोलत नाही. तिने एक गुपित मला सांगितलं होतं.
म्हणे, मी लहान होतो..म्हणजे अगदी पाळण्यात बरं का ! तेव्हा माझ्या खऱ्या आईला काही आजार झाला. ही आताची जी आई आहे ना, ती नर्स म्हणून बाबांनी आणली. माझी आई मात्र कधीच बरी झाली नाही. तिला देव घेऊन गेला. मग बाबांनी त्या नर्सला माझी आई बनवून टाकलं. तेव्हापासून ती माझा राग राग करते.
पण मी चिडत नाही. माझ्यावर माया करणारी आजी आहे ना !
गप्पा मारत आम्ही घरी पोहचलो. आई सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती. मी माझ्या खोलीत जाऊन दप्तर ठेवलं. हातपाय धुवून आलो. आईकडे जाऊन तिच्या गळ्यात हात टाकून म्हणालो..
आई, काहीतरी खायला दे ना !
तिने गळ्यातले माझे हात झटकून टाकले. रागात म्हणाली,
जा त्या डब्यात काही असेल असेल तर गिळ !
मी किचनमध्ये गेलो. डब्यातला चिवडा घेऊन माझ्या रूममध्ये पोहोचलो. तिथे आजी माझी वाटच बघत होती. काहीच न बोलता ती मला भरवू लागली.
आजी तू पण घे ना चिवडा ! मी तिच्याकडे घास नेला.
तिच्या डोळ्यात पाणी होते.
नको रे बाळा.. इतका जीव लावू ! तुझ्यामुळे मी अडकलीय इथे... ती म्हणाली.
मला वाईट वाटलं. आपल्यामुळे कोणाला त्रास झाला की सॉरी म्हणायचं असं टिचरने सांगितलंय. म्हणून मी कान धरून म्हणालो.
आज्जे.. सॉरी ग !
आजी वेडाबाईच आहे नुसती. लगेच मला कुशीत ओढून रडते.
बाबा घरी नाहीयेत आज.. म्हणून रात्री जळका वास येणारं पिठलं.. मला ओकारी आली पण आई रागावेल म्हणून मी भूक नसल्याचं सांगून रूममध्ये पळालो. रिकामं पोट किती मजेदार आवाज काढते. पण झोप मात्र येत नव्हती. आजीने थोपटत गोष्ट सांगितली. तेव्हा कुठे डोळे जड झाले. झोपताना आजी हळूच कानात फुसफुसली.
बाळा, आपलं गुपित ! ते कोणालाही सांगायचं नाही. प्रॉमिस ?
प्रॉमिस आजी.. म्हणत मी झोपलो.
दोन दिवसांनी बाबा आले. माझ्यासाठी एक छान शर्ट आणला होता त्यांनी. मी घालून दाखवला तर लगेच माझा पापा घेतला. आई मात्र म्हणाली.
अशाने शेफारलाय तो. तुमच्यामागे मला किती त्रास देतो माहितीय ?
डोन्ट वरी डार्लिंग.. अजून बच्चा आहे तो. आणि तूच तर म्हणालीस ना पुढच्या वर्षी त्याला होस्टेलला घालू म्हणून ! सो फक्त काही महिने.. बाबा म्हणाले.
तोंड वेंगाडून आई निघून गेली. मी बाबांना विचारलं.
बाबा, आज्जीला काहीच नाही आणलय ?
बाबाचे डोळेही आजीसारखेच भरून आले.
बाळा, तिला काय झालं माहित नाही. आपल्यावर रागावून ती निघून गेली रे ! किती शोधलं पण सापडली नाही. ती नक्की परत येईल हं.. अरे तू किती आवडायचास तिला ? तुझ्यासाठी तरी ती नक्की येईल.. बाबांची बडबड सुरु झाली.
मी मात्र खुद्कन हसलो. बावळटच आहे एव्हढा मोठा माणूस. ही गोरी गोरी आजी त्याच्याशेजारी बेडवर बसली आहे. मला नव्या शर्टात पाहून मस्त.. मस्त असं खुणावतेय आणि हा बाबा म्हणतो,.. माहित नाही कुठे गेली ती ?
बाबा पुन्हा टूरवर गेले. मी आणि आजी.. आमचं भारी चाललं होतं. आजीची माया आणि माझं सिक्रेट प्रॉमिस.. खूप मज्जा होती.
आईला मात्र संशय आला असावा. कधी नव्हे ती आता थेट मला शाळेत घ्यायला येऊ लागली होती. घरात तर माझ्यावर अखंड नजर ठेवायची. रात्री माझ्या रूमबाहेर तिची पावले वाजायची.
त्यादिवसाची रात्र.. मी नुकताच बेडवर लोळत होतो. आजी वेड्या लोकांची एक मस्त गोष्ट सांगत होती. मी खळखळून हसत होतो.
दार ढकलून आई आत आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच राग होता.
का रे कार्ट्या.. कोणासोबत बोलत होतास ? तिने विचारले.
कुठे काय, अग मी झोपलोय आई ! मी साळसूदपणे सांगितले.
अस्स, म्हणजे आता मला भास होताहेत का ? म्हणत तिने माझ्या थोबाडीत मारली. मी कळ्वळलो.
खरं सांग.. नाहीतर आज तुला जिवंत सोडणार नाही. तू रिक्षातून घरी येईपर्यंत कोणाशी तरी बोलतो हे कळलंय मला... ती हात नाचवत म्हणाली. चेटकिणीसारखी दिसत होती ती !
मी गप्प राहिलो. ती अधिकच चिडली. सोबत आणलेल्या काठीने मला बडवू लागली. मी मात्र ढिम्म उभा होतो.
मला तो मार लागतच नव्हता. आजीने मला घट्ट धरलं होतं. पण आईला ती दिसतच नव्हती.
कितीतरी वेळ आई मारतच होती. आजीला किती दुखत असेल या कल्पनेने मी कासावीस झालो. ओरडलो.
आई.. थांब !
आजी माझ्याकडे पाहून नको.. नको खुणावत होती. पण तिला मारलेलं मी पाहू शकत नव्हतो.
आई, मी आजीसोबत बोलत असतो... मी म्हणालो.
क्षणभर जीव गुदमरल्यासारखा आईचा चेहरा झाला. ती तुटक तुटक बोलली.
म्हणजे.. ती थेरडी तुला दिसते ?
आई, तिला थेरडी म्हणू नकोस.. ती इथेच आहे बरं ! मी म्हणालो.
आई थरथर कापू लागली. पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली.
एवढासा तू.. पण काय नाटक करतोस रे.. चल. आज तुला तुझ्या आजीजवळ पोहचवते.
मला ओढतच ती घरामागच्या मैदानात घेऊन गेली. माझे हातपाय बांधून तिथला खड्डा उकरू लागली.
ती काळोखी भयाण रात्र.. भणाणणारा वारा आणि पिसाटासारखी फावड्याने खड्डा उकरणारी आई.
मला भीतीने रडू येऊ लागले. माझे अश्रू कोणीतरी पुसले. मी दचकून पाहिले.
आजी हसत उभी होती. एक बोट तोंडावर ठेवून तिने ,मला गप्प राहण्याची खूण केली.
तिकडे आईसुद्धा थांबली. त्या खड्ड्यात तुच्छतेने थुंकून माझ्याकडे परतली.
बांधलेले हातपाय सोडून माझी मानगूट धरून खड्ड्यात ओणवा केलं तिने..
नीट बघून घे तुझ्या आजीला.. तुलाही तिच्याजवळ जायचं आहे. तुझी आईही विष देऊन मीच घालवली. तुझा बापही असाच जाणार आहे. माझ्या सुखाच्या आड कोणीच येऊ शकणार नाही.
खड्ड्यात तिने बॅटरी फिरवली. तिथलं दृश्य पाहून माझा उर फुटतोय की काय, असं वाटू लागलं.
झडत आलेलं जेमतेम मांस शिल्लक असलेला हाडांचा सापळा तिथे पडला होता. त्याची काहीच ओळख लागत नव्हती. त्याच्या हातातल्या बांगड्या मात्र मी ओळखल्या.
त्या आजीच्या होत्या. तो सांगाडाही आजीचा होता.
मी दचकून आईकडे बघितले. हातात फावडे घेऊन ती उभी होती. एकच घाव.. आणि मी खड्ड्यातल्या आजीजवळ कायमचा जाऊन पडणार होतो. मी घाबरून हातपाय आक्रसले.
तेवढ्यात तिच्याभोवती एक वावटळ भिरभिरू लागली. तिने तोल संभाळण्याचा प्रयत्न केला. पण तिला ढकलत ती वावटळ खड्डयाजवळ घेऊन गेली. काही न कळल्याने ती गोंधळून खड्ड्याकडे पाहू लागली. माझ्याशेजारची आजी तेव्हा मात्र कुठेशी नाहीशी झाली होती.
त्या खड्ड्यातून सांगाड्याचे दोन्ही हात बाहेर आले. त्यांच्यातल्या बांगड्या किणकिणत होत्या. आईच्या मानेचा ताबा घेऊन बोटांच्या जागी असलेली टोकदार हाडे रुतत चालली होती. सुटकेसाठी चाललेली आईची धडपड अल्पकाळच टिकली.
काड... असा आवाज झाला. आईची मान मोडून पडली असावी बहुतेक. त्या आवाजासोबतच आई खड्ड्यात ओढली गेली. वावटळींने उडालेली माती भरत जाऊन खड्ड्यातली आजी आणि आई दोघीही दृष्टीआड झाल्या. त्या मैदानावर आता खरी स्मशानशांतता पसरली होती.
माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. मी वर मान करून पाहिले. आजी नेहमीसारखी छान हसत उभी होती.
आज्जी सॉरी.. मी तुझं सीक्रेट सांगून प्रॉमिस तोडलं... मी म्हणालो.
ठीक आहे. पण आताच हे सीक्रेट ? आजीने माझं डोकं कुरवाळत विचारले.
प्रॉमिस.. कोणालाच सांगणार नाही... मी गळ्यावर चिमूट धरली.
आजीने मला कवटाळले..
माझं मायेचं लेकरू ते ! चल, सकाळी शाळेत जायचंय. उशीर होईल.
एकमेकांचा हात धरून आम्ही घराकडे निघालो.
(समाप्त)

No comments:
Post a Comment